प्रौढांमधील नैराश्य

Depression in adults

Below is a Marathi translation of our information resource on depression in adults. You can also read our other Marathi translations.

हे माहिती पत्रक अशा प्रत्येकासाठी आहे ज्यांना निराश, व्यथित, हतबल किंवा हताश वाटत आहे, ज्यांना आपण सतत संघर्ष करीत असल्यासारखे आणि नैराश्य ग्रस्त असल्यासारखे वाटत आहे. नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणी यांनाही याचा फायदा होईल, अशी आम्हाला आशा आहे.

नैराश्य कसे वाटते (दोन्ही, तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या शरीरामध्ये), तुम्ही स्वतःला कशी मदत करू शकता, उपलब्ध असलेली काही मदत आणि नैराश्यग्रस्त असलेल्या दुसऱ्या एखाद्यास कशी मदत करावी, याचे हे वर्णन करते.

पत्रकाच्या शेवटी, इतर अशा ठिकाणांची यादी आहे जिथून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.

दु:खी असणे आणि नैराश्य येणे यात काय फरक आहे?

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा त्यांना उबग येतो किंवा दुःखी वाटते. हे सहसा एखाद्या विशिष्ट कारणामुळे होते, त्याचा दैनंदिन जीवनात फारसा हस्तक्षेप होत नाही आणि सहसा एक किंवा दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ ते टिकत नाही.

तथापि, जर या भावना अनेक आठवडे किंवा महिने चालू राहिल्या, किंवा इतक्या वाईट पातळीला गेल्या की तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागावर त्यांचा परिणाम होऊ लागला तर तुम्ही नैराश्य ग्रस्त असू शकता आणि तुम्हाला मदतीची आवश्यकता असू शकते.

नैराश्य ग्रस्त असल्याची लक्षणे कोणती आहेत?

लोक वेगवेगळ्या पातळीच्या नैराश्याचा अनुभव वेगवेगळ्या प्रकारे घेतात. नैराश्याची सौम्य, मध्यम किंवा तीव्र पातळी असते.1

लोकांच्या नैराश्याच्या अनुभवावर त्यांच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचा आणि त्यांच्या वैयक्तिक मूल्यांचा, विश्वासाचा आणि भाषेचा ही प्रभाव असतो.

जर तुम्ही नैराश्य ग्रस्त असाल तर खाली दिलेल्यांपैकी काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील:1 2

तुमच्या मनात, तुम्हाला:

  • अप्रसन्नता, उदासीनता, दु:ख, नैराश्य जाणवते - ही जाणीव सहज रितीने दूर होत नाही आणि दिवसाच्या विशिष्ट वेळी, बऱ्याचदा सर्वप्रथम सकाळी ती अधिक तीव्र होऊ शकते
  • कशाचाही आनंद घेता येत नाही
  • लोकांना भेटण्यात रस वाटत नाही आणि मित्रांशी संपर्क नकोसा होतो
  • व्यवस्थित लक्ष केंद्रित करता येत नाही आणि निर्णय घेणे कठीण वाटते
  • आत्मविश्वास वाटत नाही
  • अपराधी आणि अपात्र वाटते
  • निराशावाद भेडसावतो
  • हताश वाटू लागते आणि कदाचित आत्महत्याही करावीशी वाटू लागते.

तुमच्या शरीरात, तुम्हाला कदाचित:

  • अस्वस्थता, चिंता किंवा चिडचिड जाणवते
  • थकवा आणि अशक्तपणा जाणवतो
  • झोप येत नाही किंवा खूप जास्त झोप येते
  • सकाळी लवकर जाग येते आणि/किंवा रात्रभर जागे राहता
  • डोकेदुखीचा किंवा अपचनाचा त्रास होतो
  • लैंगिक सहवासात रस वाटत नाही
  • खाणे नकोसे वाटते आणि त्यामुळे वजन कमी होते किंवा सोयीस्कर रितीने जास्त खाल्ले जाते आणि वजन वाढते.

इतर लोकांच्या लक्षात येईल की तुम्ही:

  • कामात चुका करता किंवा लक्ष केंद्रित करू शकत नाही
  • असामान्यपणे शांत आणि संकोची दिसता किंवा लोकांना टाळत असल्याचे दिसता
  • प्रत्येक गोष्टीची नेहमीपेक्षा जास्त काळजी करता
  • नेहमीपेक्षा जास्त चिडचिड करता
  • नेहमीपेक्षा जास्त किंवा कमी झोपता
  • ढोबळ शारीरिक समस्यांविषयी तक्रार करता
  • स्वतःची योग्य प्रकारे काळजी घेणे सोडून देता - तुम्ही तुमचे केस किंवा तुमचे कपडे धूत नाही
  • तुमच्या घराची नीट काळजी घेणे थांबवता - तुम्ही स्वयंपाक करणे सोडता, स्वच्छता करणे सोडता किंवा पलंगावरील चादर बदलण्यास विसरता.

बऱ्याच लोकांना या सर्व गोष्टींचा अनुभव येणार नाही आणि काही लोकांना केवळ शारीरिक लक्षणांची जाणीव होईल. कदाचित तुम्हाला असे वाटेल की आपल्याला शारीरिक आजार आहे कारण तुम्हाला खूप थकवा जाणवत असेल किंवा व्यवस्थित झोप लागत नसेल, परंतु या सारख्या शारीरिक समस्या नैराश्याचे पहिले लक्षण असू शकतात. 1 2

तुम्ही किती नैराश्य ग्रस्त आहात हे कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही, विशेषतः जर ते हळूहळू आले असेल. कधी कधी लोक संघर्ष करण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या आळशी असण्याबद्दल किंवा आपल्याकडे इच्छा शक्तीचा अभाव असण्याबद्दल स्वतःला दोषही देऊ लागतात.

कधी कधी ही खरोखरच एक समस्या आहे हे पटवून देण्यासाठी आणि त्यासाठी तुम्ही मदत घेतली पाहिजे असे सुचवण्यासाठी एखाद्या मित्राची किंवा जोडीदाराची आवश्यकता असते.

तुम्हाला मदत घेण्याची आवश्यकता असू शकते जर तुम्हाला किंवा एखाद्या मित्राला किंवा जोडीदाराला असे लक्षात की:

  • तुमच्या नैराश्याच्या भावना तुमच्या कामावर, आवडीनिवडींवर आणि तुमच्या कुटुंबीय व मित्रमंडळींविषयीच्या भावनांवर परिणाम करत आहेत
  • तुमच्या नैराश्याच्या भावना काही काळापासून सुरू आहेत आणि त्यांच्यात काही सुधारणा होताना दिसत नाही
  • आयुष्यात जगण्यासारखे काही नाही किंवा आपण नाही राहिलो तर इतरांचे आयुष्य अधिक चांगले होईल असे आपल्याला वाटते.

चिंता वाटत असेल तर?

काही लोक जेव्हा नैराश्य ग्रस्त होतात तेव्हा त्यांना खूप चिंता देखील वाटू शकते. 1 3

तुम्हाला नेहमीच तणावपूर्ण, चिंतातूर, भयावह वाटत असेल आणि बाहेर जाणे किंवा लोकांमध्ये राहणे कठीण होत असेल. किंवा तुम्हाला तोंड कोरडे होणे, घाम येणे, दम लागणे किंवा पोटात मुरडा मारणे यासारख्या शारीरिक लक्षणांचा अनुभव येत असेल.

तुम्हाला नैराश्य आणि चिंता या दोन्ही गोष्टींचा त्रास होत असल्यास, सामान्यतः तुम्हाला यांपैकी ज्या गोष्टीचा जास्त त्रास होत असेल त्याचे उपचार केले जातील. 1

बायपोलर डिसऑर्डर (मॅनिक डिप्रेशन) असेल तर?

काही लोक जे नैराश्य ग्रस्त असतात त्यांना काही वेळा दीर्घ कालावधीसाठी अत्यंत आनंदी आणि अतिउत्साही देखील वाटू शकते. याला 'मॅनिया' असे म्हणतात आणि याचा अर्थ असा होऊ शकतो की तुम्हाला बायपोलर डिसऑर्डर (ज्याला पूर्वी मॅनिक डिप्रेशन असे म्हटले जायचे) नावाची व्याधी असू शकते.4 5

नैराश्य का येते?

नैराश्य हे कमकुवतपणाचे लक्षण नाही. हे सर्वात दृढ निश्चयी लोकांना होऊ शकते - अगदी प्रसिद्ध लोक, खेळाडू आणि ख्यातनाम व्यक्तींना देखील नैराश्याचा अनुभव येऊ शकतो.

कधी नैराश्य ग्रस्त होण्याचे स्पष्ट कारण असू शकते, तर कधी नाही. हे अपेक्षाभंग, विफलता किंवा आपण आपल्यासाठी महत्त्वाचे असलेले काहीतरी किंवा कोणीतरी गमावल्यामुळे होऊ शकते.

बऱ्याचदा याची एकापेक्षा जास्त कारणे असतात आणि वेगवेगळ्या लोकांसाठी ही कारणे वेगवेगळी असू शकतात. आम्ही खाली काही सामान्य कारणांचे वर्णन केले आहे.

जीवनातील घटना आणि वैयक्तिक परिस्थिती

नैराश्य हे तणावग्रस्त किंवा त्रासदायक घटनेमुळे उद्भवू शकते, जसे की शोक, प्रेमाचे नातेसंबंध तुटणे किंवा नोकरी गमावणे. 6 7

जर तुमच्या जीवनात एकटे राहणे किंवा आजूबाजूला मित्रमंडळी किंवा कुटुंबीयांची संगत नसणे अशी परिस्थिती असेल तर तुम्ही निराशा ग्रस्त होण्याची शक्यता जास्त असू शकते. 8 9

शारीरिक आरोग्य

झोप, आहार आणि व्यायाम हे सर्व आपल्या मनःस्थितीवर आणि आपण गोष्टींना कसे सामोरे जातो यावर परिणाम करू शकतात.

शारीरिक आरोग्य समस्या, विशेषत: ज्या गंभीर किंवा दीर्घकालीन आहेत, यामुळे नैराश्य येऊ शकते किंवा ते आणखी तीव्र होऊ शकते. 10 11 यामध्ये हे समाविष्ट आहे:

  • कर्करोग आणि हृदयरोगासारखे जीवघेणे आजार
  • संधिवात सारखे दीर्घकालीन आणि/किंवा वेदनादायक आजार
  • 'फ्लू' किंवा ग्रंथीज्वर यासारखे विषाणूजन्य संक्रमण - विशेषत: तरुण लोकांमध्ये
  • - हार्मोनल समस्या, जसे की अंडर-ॲक्टिव्ह थायरॉईड
  • मेंदू किंवा मज्जासंस्थेवर परिणाम करणारे आजार.12

बालपणातील मानसिक आघात

काही लोकांना नैराश्य इतरांच्या तुलनेत अधिक सहजपणे येऊ शकते. हे बालपणातील कठीण अनुभव किंवा मानसिक आघातामुळे असू शकते, ज्यात गैरवर्तन (शारीरिक, लैंगिक किंवा मानसिक), उपेक्षा, हिंसा किंवा क्लेशकारक घटनांचे साक्षीदार असणे किंवा अस्थिर कौटुंबिक वातावरण यांचा समावेश असू शकतो.13 14 15

नशा आणि मादक पदार्थांचा वापर

नियमित तीव्र मद्यपान16 17 किंवा गांजा18 19 सारख्या मादक पदार्थांचा वापर केल्याने तुम्हाला कालांतराने नैराश्य येण्याची शक्यता जास्त असते.

अनुवांशिक घटक

एखाद्याला गंभीर नैराश्य, बायपोलर डिसऑर्डर किंवा स्किझोफ्रेनिया होतो की नाही यामागे एकाच प्रकारचे अनुवांशिक 'जोखीम घटक' समाविष्ट असतात. असे काही पर्यावरणीय जोखीम घटक देखील असतात जे अनुवांशिक जोखीम घटकांसह मिळून असे आजार विकसित होण्याचा धोका वाढवू किंवा कमी करू शकतात.

उदाहरणार्थ, तुमच्यामध्ये असे काही अनुवांशिक जोखीम घटक असू शकतात ज्यामुळे तुम्हाला गंभीर नैराश्य येण्याची शक्यता जास्त असू शकते. तथापि, जर तुम्ही स्थिर आणि सकारात्मक वातावरणात वाढले असाल किंवा राहत असाल तर यामुळे तुम्हाला गंभीर मानसिक आजार होण्याचा धोका कमी होऊ शकतो.

तुमच्या एका पालकाला गंभीर नैराश्यासारखा गंभीर मानसिक आजार असेल तर हा तुमच्यामध्ये एखादा गंभीर मानसिक आजार उद्भवण्याचा सर्वात मजबूत असा जोखीम घटक असण्याचे सर्वज्ञात आहे. ज्यांच्या पालकांना गंभीर मानसिक आजार आहे अशा ३ पैकी १ मुलांमध्ये त्यांना गंभीर मानसिक आजार होण्याची शक्यता असते.

नैराश्य येण्याच्या कारणांबद्दल विचार करताना, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश असतो आणि कोणत्याही एका जोखीम घटकामुळे नैराश्य येत नाही.20

लिंग आणि लैंगिकतेशी संबंधित नैराश्यामध्ये फरक आहे का?

नैराश्य ग्रस्त होणारे पुरुष त्यांच्या भावनांबद्दल बोलण्याची आणि मदत मागण्याची शक्यता कमी असते. 21 ते त्यांचे नैराश्य अचानक रागावणे, अधिकाधिक नियंत्रण गमावणे, अधिक जोखीम घेणे आणि आक्रमकता दाखवणे, तसेच परिस्थितीचा सामना करण्यासाठी दारू आणि अंमली पदार्थांचे सेवन करणे अशा वेगळ्या प्रकारे व्यक्त करू शकतात.23 24 स्त्रियांपेक्षा पुरुष आत्महत्या करून मारण्याची शक्यता जास्त असते.21 23

गर्भवती असलेल्या सुमारे १२% महिलांना त्यांच्या गर्भधारणेच्या दरम्यान नैराश्याचा अनुभव येतो, तर बाळ झाल्यानंतर पहिल्या वर्षात १५-२०% महिला नैराश्य ग्रस्त होतात.24

आपले जन्मजात लिंग स्वीकारणाऱ्या लोकांच्या तुलनेत विपरित लिंगाचे लोक (असे लोक स्वतःला त्यांच्या जन्मजात लिंगापेक्षा वेगळ्या लिंगाचे मानतात) नैराश्य आणि चिंता अधिक पातळीवर अनुभवू शकतात. जे लोक नॉन-बायनरी असतात (जे स्वतःला एक स्त्री किंवा एक पुरुष असे मानत नाहीत) ते देखील नैराश्य आणि चिंता अधिक पातळीवर अनुभवू शकतात.25 26

जे लोक स्वतःला लेस्बियन, गे किंवा उभयलिंगी मानतात त्यांना मानसिक आरोग्याची समस्या (नैराश्यासह) होण्याची शक्यता विषमलिंगी लोकांपेक्षा जास्त असते.27 त्यांच्यासाठी आत्महत्या आणि स्वतःचे नुकसान करून घेण्याचा प्रयत्न करणे याचा धोका देखील जास्त असतो. 27 28

मी स्वतःहून बरे होऊ शकेन का?

चांगली बातमी अशी आहे की बहुतेक नैराश्य ग्रस्त लोक स्वतःची मदत करण्यासाठी स्वतः पावले उचलून बरे होऊ शकतात. तुम्ही स्वतःच स्वतःच्या नैराश्यावर मात करू शकता, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाची आणि आत्मविश्वासाची जाणीव होईल आणि त्याच्या सहाय्याने भविष्यात जर कधी तुम्हाला पुन्हा दुःखी वाटू लागले तर त्याचा सामना करता येईल.

या पत्रकातील काही सूचना पाळल्याने नैराश्याचा कालावधी कमी होऊ शकतो आणि भविष्यात तुम्हाला निरोगी राहण्यास मदत होऊ शकते.

परंतु काही लोकांना, विशेषत: जर त्यांचे नैराश्य तीव्र असेल किंवा ते दीर्घकाळ चालू असेल किंवा त्यांनी बरे होण्याचा प्रयत्न केलेल्या गोष्टी कार्य करत नसतील तर त्यांना अतिरिक्त मदतीची आवश्यकता असते.

जर तुम्ही प्रथमच नैराश्याचा अनुभव घेत असाल तर तुमचे पुन्हा नैराश्य ग्रस्त होण्याची शक्यता अंदाजे ५०:५० असते, म्हणून तुम्हाला आवश्यक असल्यास मदत कशी मिळवावी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.1, 29

म्हणून तुम्हाला कसे वाटते याबद्दल तुम्हाला एखाद्याशी बोलण्याची आवश्यकता वाटत असल्यास, ते टाळू नका, कारण हे तुम्हाला तुम्ही पूर्वी करत असलेल्या गोष्टी पुन्हा करण्यास आणि जीवनाचा आनंद घेण्यास लवकर मदत करू शकते.

काही वेळा तुम्हाला कसे वाटते आहे हे इतर लोकांना समजावे यासाठी थोडे प्रयत्न करावे लागू शकतात. चिकाटी ठेवा आणि हार मानू नका - तुम्हाला योग्य मदत मिळू शकते.

मी स्वतःची कशी मदत करू?

तुम्हाला निराश वाटत असेल तेव्हा तुम्ही पुढील काही सूचनांचे पालन करू शकता. तुम्हाला सर्वात उत्तम कशाची मदत होते ते शोधणे आणि उपयुक्त धोरणांची तुमची स्वतःची यादी तयार करणे महत्त्वाचे आहे.

कोणाबरोबर तरी बोला: जर तुम्हाला काही वाईट बातमी मिळाली असेल किंवा तुमचे आयुष्य कोलमडून जाईल अशी स्थिती आली असेल, तर स्वतःच्या भावना मनामध्ये बंद करून ठेवू नका. त्याबद्दल तुम्हाला कसे वाटते आहे हे तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला सांगितल्याने तुम्हाला मदत होऊ शकते. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कोणाशीही बोलू शकत नाही, तर तुम्हाला कसे वाटते ते लिहिण्याचा प्रयत्न करून पाहा.

स्वतःला सक्रिय ठेवा: जर तुम्हाला शक्य असेल तर, थोडा व्यायाम व्हावा म्हणून बाहेर पडा, मग जरी ते फक्त थोडे चालण्यासाठी असले तरीही चालेल. हे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त ठेवण्यास आणि चांगली झोप लागण्यास मदत करेल. यामुळे तुम्हाला वेदनादायक विचार आणि भावना याऐवजी इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यामध्येसुद्धा मदत होऊ शकते.

योग्य आहार घ्या: तुम्हाला कदाचित खूप भूक लागणार नाही, पण तरीही नियमित खाण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही अतिशय निराश असता तेव्हा सहजपणे तुमचे वजन आणि शरीरातील जीवनसत्त्वे कमी होऊ शकतात - किंवा सत्त्वहीन पदार्थ खूप जास्त प्रमाणात खाल्ले जातात आणि नको तेवढे वजन वाढू शकते. भरपूर फळे आणि भाज्यांसह संतुलित आहार तुमचे शरीर आणि मन निरोगी ठेवण्यास मदत करू शकतो.

दारू आणि अमली पदार्थांचे सेवन टाळा: दारू पिण्यामुळे तुम्हाला काही तासांसाठी बरे वाटू शकते, परंतु त्यामुळे वास्तविक तुमचे नैराश्य दीर्घ काळासाठी जास्त वाईट होते. रस्त्यावर मिळणारे अंमली पदार्थ, विशेषतः गांजा, ॲम्फेटामाइन्स, कोकेन आणि एक्स्टसी यासाठीही हेच लागू आहे.

झोपेचा नित्यक्रम तयार करा: प्रत्येक रात्री एका ठराविक वेळी झोपण्याचा आणि प्रत्येक सकाळी एका ठराविक वेळी उठण्याचा प्रयत्न करा. झोपण्यापूर्वी ज्यामुळे तुम्हाला शांत वाटेल असे काहीतरी करा, जसे की मानसिक ताण कमी करणारे संगीत ऐकणे किंवा एखादे पुस्तक वाचणे. जर तुम्हाला झोप येत नसेल, तर अंथरुणातून बाहेर पडा आणि कोचावर बसण्यासारखे ज्यामुळे शांत वाटेल असे काहीतरी करा.

आरामदायक क्रिया करून पहा: जर तुम्हाला सतत मानसिक ताण जाणवत असेल तर आरामदायी व्यायाम, योगा, मालीश, अरोमाथेरपी किंवा तुम्हाला आरामदायी वाटणारी इतर काही क्रिया करून पहा.

ज्यामुळे तुम्हाला आनंद होतो असे काही करा: ज्यामुळे तुम्हाला खरोखर आनंद होतो – जसे की एखादा खेळ खेळणे, वाचन करणे किंवा दुसरा एखादा छंद इत्यादी, असे काहीतरी करण्यासाठी नियमित वेळ काढा.

नैराश्याविषयी अधिक वाचा: नैराश्याविषयी माहितीची अनेक पुस्तके आणि वेबसाईट्स आहेत. ते तुम्हाला काय होते आहे हे समजून घेण्यात मदत करू शकते, त्यातून तुम्हाला नैराश्याला अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाण्याचे मार्ग मिळू शकतात आणि मित्रमंडळी व नातेवाईकांना देखील तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात हे समजून देण्यामध्ये मदत करू शकते.

स्वतःला अनुकंपा दाखवण्याचा सराव करा: तुम्ही एक अगदी काटेकोर व्यक्ती असू शकता जे स्वतःला अतिशय कठोरपणे वागवतात. स्वतः समोर अधिक वास्तववादी ध्येये किंवा अपेक्षा ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वतःला अधिक दयाळूपणे वागवा.

विश्रांती घ्या: काही दिवस आपल्या सामान्य दिनचर्येपासून दूर जाऊन काही वेगळे करणे खरोखर उपयुक्त ठरू शकते. तुमचे दैनंदिन ताणतणाव आणि चिंता यापासून स्वतःला विश्रांती द्या. जर तुम्ही तुमचे वातावरण अगदी फक्त काही तासांसाठी बदलू शकत असाल, तरी त्याने मदत होऊ शकते.

समर्थन गटात सामील व्हा: निराश असताना तुम्हाला स्वतःला मदत करणे कठीण वाटू शकते. एकसारख्या परिस्थितीतून जाणाऱ्या इतर लोकांशी त्याविषयी बोलल्याने मदत होऊ शकते. अधिक माहितीसाठी या पत्रकाच्या शेवटी दिलेल्या संस्थांची यादी पहा.

आशावादी रहा: स्वतःला आठवण करून द्या की इतर अनेक लोकांना याआधी नैराश्य आले आहे आणि ते त्यातून बरे झाले आहेत - यासाठी मदत उपलब्ध आहे आणि तुम्हाला बरे वाटण्यासाठी आवश्यक असलेल्या मदतीसाठी तुम्ही पात्र आहात.

नैराश्यासाठी मला कोणती मदत मिळू शकते?

स्वतःहून बरे होण्याचा प्रयत्न तुम्हाला वाटते तितक्या लवकर किंवा तुमच्या इच्छेनुसार कार्य करत नसल्यास, तुमच्या सामान्य चिकित्सक डॉक्टरांशी बोलणे हा चांगला मार्ग असू शकतो.

नैराश्य असलेल्या बहुतेक लोकांवर त्यांच्या सामान्य चिकित्सक डॉक्टरांद्वारे उपचार केले जातात. तुम्ही नियमितपणे कोणाही सामान्य चिकित्सक डॉक्टरांकडे जात नसल्यास तुमच्या स्थानिक चिकित्सा विभागामध्ये तुम्हाला ज्यांच्याबरोबर बोलणे योग्य वाटेल आणि ज्यांना तुम्ही नियमितपणे भेटू शकाल असे डॉक्टर शोधण्याचा प्रयत्न करा.

तुमचे सामान्य चिकित्सक डॉक्टर तुमच्या लक्षणांचा आढावा घेण्यासाठी आणि तुमच्यासाठी कोणते उपचार उपयुक्त ठरतील हे शोधण्यासाठी तुमच्याबरोबर चर्चा करतील.

तुमच्यासाठी कोणते उपचार सर्वात जास्त योग्य आहेत हे तुमच्या नैराश्याची सध्याची पातळी, ते किती कालावधीपासून चालू आहे आणि याआधी कधी तुम्हाला नैराश्याचा त्रास झाला होता किंवा नाही यावर अवलंबून असेल.

तुमचे सामान्य चिकित्सक डॉक्टर तुमची योग्य शारीरिक तपासणी देखील करू शकतात. याचे कारण म्हणजे काही शारीरिक आजारांमुळे नैराश्य येऊ शकते. तुम्ही आधीपासून एखाद्या शारीरिक आजारावर उपचार घेत असल्यास, तुमच्या सामान्य चिकित्सक डॉक्टरांना त्याविषयी माहिती देणे आवश्यक आहे.

प्रारंभिक उपचार (सौम्य नैराश्य)

जर तुम्ही पहिल्यांदाच नैराश्याचा अनुभव घेत असाल, तर सामान्यतः तुम्हाला अँटीडिप्रेसंट औषधे दिली जाणार नाहीत. तुमचे सामान्य चिकित्सक डॉक्टर एखादा सौम्य-तीव्रतेचा मानसिक हस्तक्षेपीय उपचार (किंवा चर्चेद्वारे उपचार) सुचवू शकतात जसे की:1 2

  • कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी (सी बी टी) तत्त्वांवर आधारित स्व-सहाय्यता पत्रके किंवा पुस्तके (आरोग्यसेवा व्यावसायिकाच्या समर्थनाने)
  • संगणकीकृत स्व-सहाय्यता सी बी टी कार्यक्रम (हे देखील आरोग्यसेवा व्यावसायिकाच्या समर्थनाने)
  • सामुदायिक सराव
  • एखादा सामुदायिक कार्यक्रम, जो त्यात सहभागी होणाऱ्यांच्या मदतीने केलेली स्व-सहाय्यता किंवा सी बी टी वर आधारित असेल.

तुमचे सामान्य चिकित्सक डॉक्टर तुम्हाला तुमच्यासाठी योग्य असा कार्यक्रम निवडण्यामध्ये मदत करू शकतील.

याचा तुम्हाला फारसा उपयोग होत नसल्यास, तुमचे सामान्य चिकित्सक डॉक्टर उपचारांच्या पुढील विभागातील मध्यम आणि तीव्र नैराश्यासाठी असलेल्या हस्तक्षेपीय उपचारांपैकी एखाद्या उपचाराचा प्रयत्न करून बघण्यास सांगू शकतील

पुढील उपचार (मध्यम आणि तीव्र नैराश्य)

तुमचे सामान्य चिकित्सक डॉक्टर एखादा उच्च-तीव्रतेचा मानसिक हस्तक्षेपीय उपचार किंवा अँटीडिप्रेसंट औषधे किंवा दोन्ही वापरण्याचा सल्ला देऊ शकतात.1 तुमच्यासाठी सर्वात योग्य उपचार कोणता हे ठरवण्यासाठी तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता.

मानसशास्त्रीय हस्तक्षेप

नैराश्याने ग्रस्त लोकांसाठी अनेक प्रकारचे मानसिक हस्तक्षेपीय उपचार आहेत आणि तुमच्या स्थानिक भागात त्यांच्यापैकी जे उपचार उपलब्ध आहेत त्यांच्या संदर्भात तुम्हाला सल्ला दिला जाऊ शकतो.1

एखादा विशिष्ट मानसिक हस्तक्षेपीय उपचार मिळण्यासाठी प्रतीक्षा यादी असल्यास, यादरम्यान तुम्ही तुमची काळजी घेण्यासाठी काय करू शकता याबद्दल तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलले पाहिजे.

कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी (सीबीटी)

आपल्यापैकी बऱ्याच जणांना नकारात्मक विचार करण्याची सवय असते जी, जीवनात इतर काहीही घडत असेल तरी आपल्याला निराश बनवते आणि नेहेमी निराश राहण्यात मदत करते. सीबीटी ची तुम्हाला पुढीलप्रमाणे मदत होते:

  1. कोणत्याही अवास्तव आणि निरुपयोगी प्रकारच्या विचारांचे मार्ग ओळखता येतात
  2. त्यानंतर विचार करण्याचे आणि वागण्याचे नवीन, अधिक उपयुक्त मार्ग विकसित करता येतात.

नैराश्यावरील उपचार म्हणून सीबीटी हा सर्वोत्तम पुरावा आहे.1 30 31

इंटरपर्सनल थेरपी (आयपीटी)

इंटरपर्सनल थेरपी तुम्हाला कुटुंब, जोडीदार आणि मित्रमंडळी सोबतच्या तुमच्या नातेसंबंधातील समस्या ओळखण्यात आणि त्यांचे निराकरण करण्यात मदत करू शकते.

वर्तणूक सक्रियीकरण

वर्तणूक सक्रियीकरण तुम्हाला अधिक सकारात्मक वर्तन विकसित करण्यास प्रोत्साहित करते जसे की क्रियांचे नियोजन करणे आणि तुम्ही सहसा टाळत असलेल्या रचनात्मक गोष्टी करणे

जोडप्याची थेरपी

जर तुमच्या जोडीदाराबरोबरचे तुमचे नातेसंबंध तुमच्या नैराश्यावर परिणाम करत असतील, तर तुम्हाला तुमचे नैराश्य आणि तुमचे नाते यांच्यातील दुवे समजून घेण्यास जोडप्याची थेरपी घेणे मदत करू शकते. हे तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर अधिक आश्वासक नातेसंबंध जोडण्यामध्येही मदत करू शकते.

समुपदेशन

प्रशिक्षित समुपदेशक तुम्हाला तुमची लक्षणे आणि समस्या शोधण्यात आणि तुम्हाला आधार आणि मार्गदर्शन प्रदान करण्यात मदत करू शकतात.

सायकोडायनॅमिक मानसोपचार

तुमच्या भूतकाळातील अनुभवांचा तुमच्या इथल्या आणि आत्ताच्या जीवनावर कसा परिणाम होत असेल हे पाहण्यासाठी हे उपचार तुम्हाला मदत करतात.

अँटीडिप्रेसंट औषधे

जर तुमचे नैराश्य मध्यम किंवा तीव्र असेल किंवा दीर्घकाळ चालू असेल, तर तुमचे डॉक्टर अँटीडिप्रेसंट औषधांचा कोर्स सुचवू शकतात, सामान्यत: असा की ज्यामध्ये निवडक सेरोटोनिन रीअपटेक इनहिबिटर (एसएसआरआय) असेल.1 32 तुमच्यासाठी कोणते अँटीडिप्रेसंट औषध सर्वोत्तम काम करू शकते याबद्दल ते तुमच्याशी बोलतील - तुम्ही याआधी अँटीडिप्रेसंट औषधे घेतली आहेत किंवा नाही, सध्या तुम्ही इतर काही औषधे घेत आहात का, आणि तुम्हाला इतर कोणत्याही शारीरिक आरोग्य समस्या आहेत का यावर हे अवलंबून असेल.

अँटीडिप्रेसंट औषधांचे दुष्परिणाम होतात का?

सर्व औषधांप्रमाणेच, अँटीडिप्रेसंट औषधांचे दुष्परिणाम असतात, परंतु सहसा ते सौम्य असतात आणि बरेचदा काही आठवड्यांनंतर ते निघून जातात.32 33

काय अपेक्षित आहे यावर तुमचे डॉक्टर तुम्हाला सल्ला देऊ शकतात आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टीची काळजी वाटत असल्यास, किंवा तुम्हाला खूप प्रकारचे दुष्परिणाम जाणवत असल्यास तुम्ही त्यांच्याशी बोलले पाहिजे. तुम्हाला तुमच्या औषध विक्रेत्याकडून औषधांची लेखी माहिती देखील मिळेल.

जर एखाद्या अँटीडिप्रेसंट औषधामुळे तुम्हाला झोप येते असे वाटत असेल तर तुम्ही ते रात्री घ्यावे म्हणजे त्यामुळे तुम्हाला झोप येण्यास मदत होईल. अर्थात जर तुम्हाला दिवसा झोप आल्यासारखे जाणवत असेल तर औषधाचा परिणाम कमी होईपर्यंत तुम्ही वाहन चालवू नये किंवा यंत्रांवर काम करू नये. तुम्ही गोळ्या घेत असताना दारू प्यायल्यास तुम्हाला खूप झोपू येऊ शकते, त्यामुळे ते टाळणे चांगले.३४

इतर काही औषधे किंवा अंमली पदार्थ (जसे की निकोटीन किंवा दारू) यांच्या बाबतीत जसे होते त्याप्रमाणे एखादे अँटीडिप्रेसंट औषध घेण्याची तुम्हाला तलफ वाटणार नाही किंवा तोच परिणाम जाणवण्यासाठी ते अधिक प्रमाणात घ्यावे असेही वाटणार नाही.1

मला अँटीडिप्रेसंट औषधे किती काळ घ्यावी लागतील?

उपचाराने फरक पडत असल्याची खात्री करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांना तुम्हाला सुरुवातीला नियमितपणे (पहिल्या २ आठवड्यांनंतर, नंतर पहिल्या ३ महिन्यांसाठी २-४ आठवड्यांच्या दरम्यान, नंतर कमी वेळा) भेटावे लागेल.1

जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील किंवा तुमचे वय ३० पेक्षा कमी असेल, तर तुमच्या डॉक्टरांना तुम्हाला अधिक वेळा (सामान्यत: आठवड्यातून एकदा) भेटणे योग्य वाटेल. याचे कारण असे की काही अँटीडिप्रेसंट औषधांमुळे सुरुवातीला आत्महत्येचे विचार बळावू शकतात, खासकरून जर तुम्ही तरुण असाल तर.1

जर अँटीडिप्रेसंट औषधे घेतल्याने मदत होत असेल तर तुम्ही ती तुम्हाला बरे वाटत असले तरीही किमान ६ महिने घेत राहिले पाहिजे. यामुळे तुमचे नैराश्य परत येण्याची शक्यता कमी होण्यास मदत होऊ शकते.1

जर तुम्ही पूर्वी नैराश्य अनुभवले असेल तर तुम्हाला यापेक्षा जास्त काळ औषधे घ्यावी लागतील. तुम्ही ते घेणे कधी थांबवू शकता आणि हे सुरक्षितपणे कसे करावे याबद्दल तुमचे डॉक्टर तुम्हाला सल्ला देतील.

तुम्ही तुमचे अँटीडिप्रेसंट औषध घेणे अचानक बंद केल्यास तुम्हाला ते अचानक सोडण्याची लक्षणे जाणवू शकतात. यामध्ये झोपेची समस्या, चिंता, चक्कर येणे किंवा पोटदुखीचा समावेश होतो.1

जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही घेत असलेल्या अँटीडिप्रेसंट औषधाचा (ते सुरु केल्यापासून ३ ते ४ आठवड्यांनंतर) काही उपयोग होत नाही, तर तुमच्या डॉक्टरांशी बोला. ते तुमचा डोस बदलू शकतील किंवा तुम्हाला वेगळ्या प्रकारचे अँटीडिप्रेसंट औषध किंवा दुसरे एखादे औषध देऊ शकतील.1

अधिक मदत मिळवणे (तीव्र नैराश्य)

नैराश्याने ग्रस्त होणाऱ्या बहुतेक लोकांना त्यांच्या सामान्य चिकित्सक डॉक्टरांकडून आवश्यक ती मदत मिळते. जर तुमच्या सामान्य चिकित्सक डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर तुमचे नैराश्य सुधारत नसेल आणि तुम्हाला अधिक तज्ञ मदतीची आवश्यकता असेल तर तुम्हाला तज्ञ मानसिक आरोग्य सेवा केंद्राकडे किंवा कार्य संघाकडे पाठविले जाऊ शकते.1

मानसिक आरोग्य व्यावसायिक तुमच्या सामान्य पार्श्वभूमीबद्दल आणि तुम्हाला पूर्वी झालेल्या कोणत्याही तीव्र आजारांबद्दल किंवा भावनिक समस्यांबद्दल जाणून घेऊ इच्छित असतील.

अलीकडे तुमच्या आयुष्यात काय घडत आले आहे, नैराश्य कसे विकसित झाले आहे आणि तुम्ही आधीच यावर काही उपचार केले आहेत किंवा नाही याबद्दल ते विचारतील.

कधीकधी या सर्व प्रश्नांची उत्तरे देणे कठीण असू शकते, परंतु तुम्ही दिलेली माहिती डॉक्टरांना तुम्हाला एक व्यक्ती म्हणून ओळखण्यास आणि तुमच्यासाठी उपचाराचे कोणते चांगले पर्याय असतील हे ठरवण्यास मदत करेल.

जर तुमचे नैराश्य तीव्र असेल किंवा तुम्हाला तज्ञ उपचारांची आवश्यकता असेल तर तुम्हाला उपचार घेण्यासाठी रुग्णालयात येण्याची आवश्यकता असू शकते. तुमची काळजी घेणारा कार्यसंघ तुम्हाला तुमच्यासाठी सर्वात योग्य असा उपचार आणि मदत मिळत आहे याची खात्री करेल.

इलेक्ट्रोकॉन्व्हल्सिव्ह थेरपी (ईसीटी)

इलेक्ट्रोकॉन्व्हल्सिव्ह थेरपी (संक्षेपात ईसीटी) बहुतांश वेळा पुढील बाबींसाठी उपचार म्हणून वापरली जाते:

  • अतिशय तीव्र नैराश्य ज्यामुळे व्यक्तीच्या जीवाला धोका वाटत असेल आणि त्यांना तातडीच्या उपचारांची आवश्यकता असेल
  • इतर कोणत्याही उपचारांनी बरे न झालेले मध्यम किंवा तीव्र नैराश्य.1

ईसीटी मध्ये मेंदूतून विद्युत धारा प्रवाहित केली जाते, म्हणून हा उपचार नेहेमीच रुग्णालयामध्ये जनरल ऍनेस्थेटिकच्या प्रभावाखाली (सर्वांग भूल) केला जातो. काही लोकांना ईसीटी नंतर तात्पुरत्या स्मृती समस्या उद्भवतात.

पर्यायी उपाय

सेंट जॉनचे वोर्ट ही एक औषधी वनस्पती आरोग्यदायक-खाद्य दुकाने आणि फार्मसीमध्ये उपलब्ध असते आणि काही लोक नैराश्यावर उपाय म्हणून त्याचा वापर करतात. हे औषध म्हणून किंवा याचा सल्ला सहसा डॉक्टरांकडून दिला जात नाही कारण:

  • नैराश्यासाठी याचा योग्य डोस काय आहे हे स्पष्ट नाही
  • याचे विविध प्रकार त्यांच्यातील समाविष्ट घटकांनुसार भिन्न असू शकतात
  • हे इतर औषधांसह (विशेषत: गर्भनिरोधक गोळी, अँटिकोअग्युलॅन्ट किंवा अँटिकनव्हलसन्ट) घेतल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात.1

तुम्हाला याविषयी अधिक सल्ला हवा असल्यास, तुम्ही तुमच्या सामान्य चिकित्सक डॉक्टरांशी किंवा फार्मसिस्टशी चर्चा केली पाहिजे.

मला एखाद्या नैराश्य ग्रस्त व्यक्तीला कशी मदत करता येईल?

  • ऐका. हे वाटते त्यापेक्षा कठीण असू शकते. तुम्हाला पुन्हा पुन्हा एकच गोष्ट ऐकावी लागू शकते. तुम्हाला उत्तर पूर्णपणे स्पष्ट वाटत असले तरीही त्याचा विचारल्याशिवाय सल्ला न देणे सहसा चांगले. जर नैराश्य एखाद्या विशिष्ट समस्येमुळे आले असेल तर तुम्ही त्यावर उपाय शोधण्यात किंवा कमीत कमी त्या अडचणीचा सामना करण्याचा मार्ग शोधण्यात मदत करू शकता.
  • त्यांच्याबरोबर वेळ घालवा. नैराश्य ग्रस्त व्यक्तीबरोबर केवळ वेळ घालवणे देखील उपयुक्त असते. तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध आहात याची त्यांना जाणीव करून दिल्याने त्यांना बोलण्यास आणि बरे वाटण्यासाठी गोष्टी करत राहण्यास प्रोत्साहित करण्यात मदत होऊ शकते.
  • त्यांना आश्वस्त करा. जे नैराश्य ग्रस्त आहेत त्यांना, ते कधी बरे होऊ शकतील यावर, विश्वास ठेवणे कठीण होऊन बसते. तुम्ही त्यांना खात्री देऊ शकता की ते बरे होतील, परंतु तुम्हाला तसे त्यांना पुन्हा पुन्हा सांगावे लागेल.
  • त्यांनी स्वतःची काळजी घेण्यासाठी त्यांना आधार द्या. ते नियमितपणे पुरेसे अन्न खरेदी करत असल्याची आणि खात असल्याची, तसेच त्यांच्या आहारात चांगल्या प्रमाणात फळे आणि भाज्या असल्याची, खात्री करा. तुम्ही त्यांना घरातून बाहेर पडण्यास आणि काही व्यायाम किंवा इतर आनंददायक गोष्टी करण्यास मदत करू शकता, जो त्यांच्या भावनांचा सामना करण्यासाठी दारू किंवा अंमली पदार्थांचा वापर करण्यापेक्षा एक चांगला पर्याय असू शकतो.
  • त्यांना गांभीर्याने घ्या. जर त्यांची परिस्थिती अधिकाधिक वाईट होत असेल आणि ते जगण्याची इच्छा नसल्याबद्दल बोलू लागले किंवा स्वतःला हानी पोहोचविण्याचे संकेत देऊ लागले तर त्यांना गांभीर्याने घ्या. ते तसे त्यांच्या डॉक्टरांना सांगतील याची खात्री करा.
  • त्यांना मदत स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करा. त्यांना त्यांच्या डॉक्टरांना भेटण्यास, त्यांची औषधे घेण्यास किंवा त्यांच्या थेरपिस्ट किंवा समुपदेशकांशी बोलण्यास प्रोत्साहित करा. जर त्यांना त्यांच्या उपचारांबद्दल काळजी वाटत असेल तर त्यांना त्यांच्या डॉक्टरांशी त्याविषयी चर्चा करण्यास प्रोत्साहित करा.
  • स्वत:ची काळजी घ्या. नैराश्य वाटणाऱ्या एखाद्यास पाठिंबा देणे भावनिकदृष्ट्या त्रासदायक ठरू शकते, म्हणून तुम्ही स्वतःच्या मानसिक आरोग्याची आणि स्वास्थ्याची नक्की काळजी घ्या.

जर तुम्हाला तुमच्या ओळखीची एखादी व्यक्ती आत्महत्या करू शकते अशी काळजी वाटत असेल

नैराश्याने ग्रस्त असलेल्या काही मोजक्या व्यक्ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न किंवा तसे करून मरू शकतात. 35 36

जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची काळजी वाटत असेल तर त्यांच्याशी आत्महत्येचे विचार आणि भावनांबद्दल बोलणे आणि त्यांना गांभीर्याने घेणे महत्वाचे आहे.

एखाद्या व्यक्तीला त्यांना आत्महत्या करावीशी वाटत आहे किंवा नाही याबाबत विचारल्यास ही कल्पना त्यांच्या डोक्यात येईल किंवा ते त्या विचारांनुसार तसे करतील असे नाही. 37 38

परंतु तरीही जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीविषयी काळजी वाटत असेल तर अतिरिक्त मदत आणि सल्ल्यासाठी तुम्ही खालील पैकी एखाद्या सेवेशी संपर्क साधू शकता.

झिरो सुसाइड अलायन्स आत्महत्या जागरूकता आणि प्रतिबंध याविषयी विनामूल्य ऑनलाइन प्रशिक्षण प्रदान करते जे ज्यांना एखाद्या व्यक्तीविषयी काळजी वाटत असेल अशांसाठी सुरुवात करण्याचे योग्य ठिकाण आहे.

आत्महत्येच्या विचारांच्या विरोधात मदत मिळवणे

तुम्हाला आत्ता काही मदतीची आवश्यकता असेल तर या अशा सेवा आहेत ज्या तुम्हाला मदत करू शकतात:

यूके मध्ये सर्वत्र

वेल्स

स्कॉटलंड

उत्तर आयर्लंड

  • भेट द्यालाईफलाईन किंवा ०८०८ ८०८ ८००० (फ्रीफोन) वर कॉल करा

आपण आत्ता स्वत:ला सुरक्षित ठेवू शकत नाही असे तुम्हाला वाटत असल्यास आणि इतर मदतीची स्थाने तुम्हाला मदत करण्यासाठी पुरेशी नसल्यास, ९९९ वर कॉल करा किंवा तुमच्या जवळच्या रुग्णालयातील ए अँड ई विभागात जा (कधीकधी हा आपत्कालीन विभाग म्हणून ओळखला जातो). किंवा, तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी तुमच्यासाठी ९९९ वर कॉल करण्यास किंवा तुम्हाला ए अँड ई विभागात घेऊन जाण्यास सांगू शकता.

अधिक मदत

असोसिएशन फॉर पोस्टनेटल इलनेस (एपीएनआय): एपीएनआय प्रसूतीनंतर नैराश्य आलेल्या मातांना मदत करते. ही संस्था या अवस्थेबद्दल जनजागृती वाढविण्यासाठी आणि त्याचे कारण आणि स्वरूप याबद्दल संशोधनास प्रोत्साहित करण्यासाठी आहे. हेल्पलाइन: ०२०७ ३८६ ०८६८ (सोमवार ते शुक्रवार सकाळी १०-दुपारी २).

ब्लॅक, आफ्रिकन आणि एशियन थेरपी नेटवर्क (बीएएटीएन ): ब्लॅक, आफ्रिकन, दक्षिण आशियाई आणि कॅरेबियन लोकांसाठी योग्य मानसशास्त्रीय सेवांपर्यंत पोहचण्यातील असमानता दूर करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेली ब्रिटनची सर्वात मोठी स्वतंत्र संस्था. ते मानसिक आरोग्याबद्दल माहिती प्रदान करतात. ते एक निर्देशिका प्रदान करतात ज्यामध्ये लोकांना थेरपिस्ट, घटना, प्रशिक्षण आणि इतर संसाधने याविषयी माहिती मिळू शकते. ईमेल: connect@baatn.org.uk

CALM (कॅम्पेन अगेंस्ट लिविंग मीजरेबली): तरुणांमधील नैराश्य आणि आत्महत्या यांच्या विरुद्ध लढा देण्यावर केंद्रित असलेली एक राष्ट्रीय मोहीम. गोपनीय हेल्पलाइन: ०८०० ५८ ५८ ५८ (संध्याकाळी ५ ते मध्यरात्र, आठवड्यातील ७ दिवस).

डिप्रेशन यूके: नैराश्यग्रस्त लोकांसाठी एक राष्ट्रीय परस्पर समर्थन गट. ईमेल: info@depressionuk.org

मेन्स हेल्थ फोरम: संशोधनाद्वारे, पुरुषांच्या आरोग्याच्या समस्यांबद्दल जागरूकता वाढवण्याद्वारे आणि आरोग्याची माहिती आणि सल्ला प्रदान करण्याद्वारे पुरुषांच्या आरोग्यास समर्थन देणारी इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंडमधील एक धर्मादाय संस्था. फोन: ०२० ७९२२ ७९०८.

मेंटल हेल्थ फोरम: एक ऑनलाइन समुदाय जिथे लोकांना समान अनुभव असलेल्या लोकांकडून परस्पर समर्थन मिळू शकते.

माइंड: एक मानसिक आरोग्य धर्मादाय संस्था जी मानसिक आरोग्याच्या समस्या अनुभवत असलेल्या लोकांसाठी सल्ला आणि समर्थन प्रदान करते, तसेच स्थानिक सहकर्मी समर्थन गटांबद्दल माहिती प्रदान करते. हेल्पलाइन: ०३०० १२३ ३३९३ (सकाळी ९ ते सायंकाळी ६, सोमवार ते शुक्रवार). तसेच जे दुसऱ्यांना मदत करत आहेत त्यांनी स्वतः परिस्थितीला सामोरे कसे जावे याविषयी माहिती प्रदान करते. लोकल माइंड्स तुमच्या घराच्या जवळ उपलब्ध असलेली मानसिक आरोग्य सेवा शोधण्यात तुमची मदत करू शकते.

माइंडआउट: लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्स आणि क्वीर (एलजीबीटीक्यू) लोकांद्वारे आणि त्यांच्यासाठी चालविली जाणारी मानसिक आरोग्य सेवा. ते सल्ला आणि माहिती, ऑनलाइन समर्थन, समुपदेशन, सहकाऱ्यांचे समर्थन आणि पुरस्कृती प्रदान करतात. फोन: ०१२७३ २३४ ८३९ ईमेल: info@mindout.org.uk

एनएचएस: मानसिक आरोग्य सेवा कशा मिळवायच्या याची माहिती

पेपिरस होपलाइन यूके: आत्महत्येचे विचार येत असलेल्या किंवा दुसऱ्या कोणाची काळजी असलेल्या ३५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना समर्थन, व्यावहारिक सल्ला आणि माहिती प्रदान करणारी व्यावसायिक कर्मचारी असलेली हेल्पलाइन. होपलाइन: ०८०० ०६८ ४१ ४१.

रीडिंग वेल एजन्सी: बूक्स ऑन प्रिस्क्रिप्शन: अशी एक योजना जी लोकांना स्व-सहाय्यता वाचनाच्या वापराने स्वतःच्या आरोग्याची नीट काळजी घेण्यास मदत करते. रॉयल कॉलेज ऑफ सायकियाट्रिस्टस (Royal College of Psychiatrists) सह अनेक आरोग्य व्यावसायिकांनी याचे समर्थन केले आहे आणि ते सार्वजनिक ग्रंथालयांद्वारे समर्थित आहे.

रीलेट: नातेसंबंधांविषयी समर्थन पुरवणारी युके मधील सर्वात मोठी संस्था. ते विविध समुपदेशन सेवा प्रदान करतात. विचारणा: ०३०० ००३ ०३९६.

समेरिटन्स: यूके आणि रिपब्लिक ऑफ आयर्लंडमधील एक राष्ट्रीय धर्मादाय संस्था जी आत्महत्या करणाऱ्या किंवा अस्वस्थ असलेल्या कोणत्याही व्यक्तीस गोपनीय भावनिक आधार प्रदान करते. हेल्पलाइन: ११६ १२३. ईमेल: jo@samaritans.org

सेनलाइन: मानसिक आरोग्याच्या समस्याग्रस्त लोकांसाठी अवेळी भावनिक आधार आणि माहिती देणारी एक राष्ट्रीय दूरध्वनी हेल्पलाइन. हेल्पलाइन: ०३०० ३०४ ७०० (दररोज दुपारी ४:३० ते रात्री १०:३०). ईमेल: support@sane.org.uk

स्टोनवॉल: एलजीबीटीक्यू+ समुदायांसाठी माहिती आणि समर्थन प्रदान करते, ज्यात सेवा आणि स्थानिक गटांची माहिती समाविष्ट आहे. फ्रीफोन: ०८०० ०५० २०२० (सोमवार ते शुक्रवार, ९:३०-४:३० चालू) ईमेल info@stonewall.org.uk

स्विचबोर्ड: एक एलजीबीटीक्यू+ हेल्पलाइन जी त्यांच्या मानसिक आरोग्यासह लैंगिकता आणि/किंवा लिंग ओळखीच्या समस्यांबद्दल चर्चा करू इच्छिणार्‍या कोणालाही माहिती, समर्थन आणि रेफरल सेवा प्रदान करते. ते ऑनलाइन चॅट प्रदान करतात, फोनलाइन: ०३०० ३३० ०३६० (दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत) ईमेल: chris@switchboard.lgbt

यंग माइंड्स: २५ वर्षांखालील सर्व मुलेमुली आणि तरुण तरुणींचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी वचनबद्ध असलेली एक राष्ट्रीय धर्मादाय संस्था. पालकांची हेल्पलाइन: ०८०८ ८०२ ५५४४ (सोमवार ते शुक्रवार सकाळी ९:३० ते दुपारी ४).

झिरो सुसाइड अलायन्स: आत्महत्या जागरूकता आणि प्रतिबंध याविषयी विनामूल्य ऑनलाइन प्रशिक्षण प्रदान करते, जेणेकरून लोकांना जर ते एखाद्या व्यक्तीविषयी चिंताग्रस्त असतील तर त्यांची मदत करण्यास उपयोग होईल.

आभार

RCPsych पब्लिक एंगेजमेंट एडिटोरियल बोर्ड आणि नॅशनल कोलॅबोरेटिंग सेंटर फॉर मेंटल हेल्थ द्वारे निर्मित.

मालिका संपादक: डॉ फिल टिम्स

मालिका व्यवस्थापक: थॉमस केनेडी

© ऑक्टोबर २०२० Royal College of Psychiatrists

This translation was produced by CLEAR Global (Feb 2024)