मनोविकृती (सायकॉसिस)

Psychosis

Below is a Marathi translation of our information resource on psychosis. You can also read our other Marathi translations.

जेव्हा एखाद्या व्यक्तीचे विचार आणि भावना इतक्या वेगाने बदलतात की त्यांना त्यांची लक्षणे आणि वास्तव यांत फरकही करता येत नाही तेव्हा त्यासाठी मनोविकृती ही संज्ञा वापरली जाते. हे संसाधन मनोविकृती विषयी माहिती देते. यामध्ये मनोविकृती म्हणजे काय, ते कशामुळे होते, त्यावर उपचार कसे केले जातात, आणि त्याचा इतर मानसिक आणि शारीरिक आजारांशी काय संबंध आहे या माहितीचा समावेश आहे.

मनोविकृती म्हणजे काय?

विशिष्ट प्रकारच्या लक्षणांच्या गटासाठी मनोविकृती ही संज्ञा वापरली जाते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला मनोविकृतीची लागण होते तेव्हा त्यांचे विचार आणि भावना इतक्या वेगाने बदलतात की त्यांना काय वास्तव आहे आणि काय नाही यामध्ये फरक करणे कठीण होते.

मनोविकृतीची लागण बऱ्याच लोकांना वाटते त्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात आढळून येते आणि त्याचा अनुभव घेणाऱ्या व्यक्तीसाठी ते अतिशय भितीदायक असू शकते व त्यांच्या आसपासच्या व्यक्तींना ते क्लेशदायक वाटू शकते. तथापि यासाठी मदत आणि समर्थन उपलब्ध आहे.

मनोविकृतीची लक्षणे काय असतात?

भ्रम

भ्रम या अशा गोष्टी आहेत ज्यावर तुमचा इतका विश्वास आहे की त्या तुमच्यासाठी वास्तव आहेत. तथापि, इतर लोकं जसे की तुमचे मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीय बहुतेक ते मानत नाहीत किंवा त्यांना ते समजत नाहीत. हे भ्रम म्हणजे तुमचा असा दृढ विश्वास असू शकतो की:

  • तुम्ही वास्तविक असाल त्यापेक्षा खूप जास्त प्रबळ, वजनदार, श्रीमंत किंवा प्रसिद्ध आहात. उदाहरणार्थ, तुम्हाला कदाचित असे वाटत असेल की तुम्ही राजघराण्याचे सदस्य आहात.
  • तुमच्याशी आणि तुमच्या आयुष्याशी इतर गोष्टी जुळलेल्या आहेत. उदाहरणार्थ, तुम्हाला कदाचित असे वाटत असेल की टीव्ही किंवा रेडिओवरील माणसे तुमच्याशी संपर्क साधत आहेत किंवा तुम्हाला असे संदेश पाठवत आहेत जे फक्त तुमच्यासाठीच आहेत.
  • तुमच्यावर पाळत ठेवली जात आहे, तुम्हाला इजा पोहोचवली जात आहे किंवा लोकं तुमच्या विरुद्ध कट करत आहेत. उदाहरणार्थ, तुम्हाला कदाचित असे वाटत असेल की सरकार तुमची फोनवरील संभाषणे ऐकत आहे.

तुम्ही कदाचित ह्या गोष्टी इतर लोकांकडे व्यक्त करत असाल किंवा इतरांशी त्याविषयी बोलत असाल. किंवा तुम्ही ह्या गोष्टींशी संबंधित असे वर्तन करत असाल, जसे की जे लोक तुम्हाला इजा पोहोचवत आहेत असे तुम्हाला वाटते त्यांच्यापासून लपून राहणे.

तुमचे धार्मिक किंवा सांस्कृतिक संबंध ह्या गोष्टींविषयी तुम्हाला सहजासहजी समजावू शकत नाहीत.

मतिभ्रम

जेव्हा तुम्ही अशा गोष्टी अनुभवता ज्या इतर लोकं अनुभवू शकत नाहीत तेव्हा तो मतिभ्रम असतो हे म्हणजे गोष्टी तिथे नसतानाही त्या ऐकणे, पाहणे, जाणवणे, त्यांचा वास घेणे किंवा चव घेणे असे असू शकते.

सामान्यपणे सर्वात जास्त प्रमाणात अनुभवला जाणारा मतिभ्रमाचा प्रकार म्हणजे श्रवण (ऐकू येण्याविषयी) मतिभ्रम. हे म्हणजे इतरांना ऐकू न येणारे आवाज, एका किंवा अनेक व्यक्तींचे बोलणे तुम्हाला ऐकू येणे. हे आवाज ऐकून असे वाटते की ते तुमच्या डोक्यात नसून कुणीतरी तुमच्या पाठून किंवा दूर अंतरावरून तुमच्या कानांमध्ये बोलत आहे. कधी कधी हे आवाज थेट तुमच्याशी बोलत असतील, किंवा ते तुमच्या विषयी एकमेकांमध्ये बोलत असतील. किंवा ते ह्या दोन्ही गोष्टी करत असतील.

तुमच्या विचारांचे मोठ्याने ‘प्रसारण’ केले जात आहे असे तुम्हाला वाटत असेल आणि इतर लोकं ते ऐकू शकतात याची तुम्हाला खात्री वाटत असेल.

कधी कधी तुमच्या मतिभ्रमांचे स्पष्टीकरण देण्यासाठी तुमचे भ्रम कामी येत असतील. उदाहरणार्थ, तुम्हाला जर तुमच्याविषयी बोलण्याचे आवाज ऐकू येत असतील तर तुम्ही असा भ्रम करून घेत असाल की तुमचे शेजारी तुमच्या विरुद्ध कारस्थान करत आहेत आणि त्यांचे आवाज तुम्ही ऐकू शकता.

श्रवण मतिभ्रम निरनिराळ्या लोकांना निरनिराळ्या प्रकारे ऐकू येऊ शकतात. काही लोकांना भितीदायक, घाबरवणारे किंवा अस्वस्थ करणारे आवाज ऐकू येतात. इतर काही लोकांना ‘अलिप्त’ असे आवाज ऐकू येतात, आणि काही जणांना असे आवाज ऐकू येतात की जे दिलासा देणारे किंवा आश्वासक वाटतील. काही जणांना सुरुवातीला अलिप्त किंवा मैत्रीपूर्ण असे आवाज ऐकू येतात, जे कालांतराने अधिकाधिक अस्वस्थ करणारे किंवा त्रासदायक होत जातात.

अस्ताव्यस्त विचारसरणी

जर तुम्हाला अस्ताव्यस्त विचारसरणीचा अनुभव येत असेल:

  • तुमचे विचार आणि कल्पना कदाचित गोंधळून जात असतील आणि त्याच्यामध्ये दुवा साधला जात नसेल
  • तुम्हाला काय म्हणायचे आहे हे समजणे इतर लोकांना कठीण जात असेल
  • काही बाबतींमध्ये, तुमचे बोलणे इतके गोंधळून जात असेल की त्याचा काहीही अर्थ लागत नसेल.

तुम्हाला प्रभावित किंवा नियंत्रित केले जात असल्यासारखे तुम्हाला वाटत असेल

तुम्हाला असा अतिशय दृढ विश्वास वाटू लागला असेल की:

  • तुमचे विचार, भावना किंवा कृती एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या गोष्टीच्या द्वारे प्रभावित किंवा नियंत्रित केली जात आहे. उदाहरणार्थ, मायक्रोचिप द्वारे किंवा कृत्रिम उपग्रहाद्वारे
  • इतर कुणाच्या किंवा कशाच्या तरी द्वारे तुमचे विचार तुमच्या मनात घातले किंवा मनातून काढले जात आहेत
  • तुमचे विचार तुमच्या मनातून प्रसारित केले जात आहेत जेणेकरून इतर लोकं ते काय आहेत हे सांगू शकतात

तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर संशय घेऊ लागाल आणि इतरांवर विश्वास ठेवणे तुम्हाला कठीण वाटू लागेल, किंवा तुम्हाला असे वाटत असेल की देव, भूत-पिशाच्च, आत्मे किंवा परग्रहावरील जीव यांसारखी एखादी अमानवीय बाह्यशक्ती तुम्हाला नियंत्रित करत आहे.

हे अनुभव खरे नाहीत हे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना दिसत असले तरी ते तुम्हाला अगदी खरे वाटत असतील.

इथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की ही लक्षणे तुम्ही नेहेमीच अनुभवण्याचा संभव नाही. त्याऐवजी तुम्ही वेगळ्या वेळी वेगळी लक्षणे अनुभवण्याचा संभव आहे, आणि या लक्षणांची कमी अधिक तीव्रता जाणवणे हे अनेक घटकांवर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला आधी भ्रम जाणवेल, आणि त्यानंतर मतिभ्रमाचा अनुभव येण्यास सुरुवात होईल. यामुळे तुमची तब्येत ठीक नाही याची जाणीव होणे कठीण होऊ शकते.

जेव्हा तुम्हाला मनोविकृतीची लागण झाली असेल तेव्हा वर वर्णन केलेली लक्षणे तुम्ही अनुभवत आहात हे ओळखणे तुम्हाला कठीण जाऊ शकते. दुर्दैवाने यामुळे मदत मिळवणे कठीण होऊ शकते.

भ्रम आणि वास्तव यामधील फरक ओळखणे

इतर लोकांना तुम्ही भ्रमात आहात हे ओळखणे कठीण जाऊ शकते. विशेषतः जर तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतील ज्या तुमच्या भ्रमाशी संबंधित आहेत किंवा तुमचा भ्रम खऱ्या गोष्टींवर आधारित असेल तर हे जास्त शक्य आहे. उदाहरणार्थ:

धर्म

जर तुम्ही धार्मिक असाल तर तुम्ही तुमच्या देवाशी प्रार्थनेमधून संवाद साधता असे समजणे हा तुमच्या श्रद्धा प्रणालीचा सामान्य भाग असू शकतो. तथापि, जर हा समज अधिक तीव्र किंवा अवास्तव होऊ लागला, किंवा त्याचा तुमच्या इतरांबरोबरच्या नातेसंबंधांवर परिणाम होऊ लागला, तर हे तुम्ही आजारी आहात याचे चिन्ह असू शकते.

रोजगार

जर तुमच्या रोजगाराचे काम तुमच्या भ्रमाशी निगडित असेल तर तुम्ही भ्रमात आहात हे ओळखणे इतरांना कठीण जाऊ शकते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला गोपनीय माहिती निगडित काम करावे लागत असेल, जसे की सरकारी किंवा लष्करी आणि तुम्हाला पाळत ठेवली जाण्याविषयी भ्रम होत असेल.

खाजगी आयुष्य

तुमच्या खाजगी आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या असतील की ज्यामुळे तुमच्यावर नियंत्रण किंवा पाळत ठेवली गेली असेल. उदाहरणार्थ, अत्याचारी नातेसंबंध असणे. जर तुम्हाला असे भ्रम होऊ लागले की तुमचा पाठलाग केला जात आहे किंवा तुम्हाला ताब्यात ठेवले जात आहे, तर इतरांना तुम्ही आजारी आहात हे ओळखण्यामध्ये वेळ लागू शकतो.

जर तुम्ही भ्रमात असाल तर तुमचे विचार आणि कल्पना नेहेमीपेक्षा अधिक तीव्र असतील आणि इतरांना ते कदाचित विचित्र किंवा अस्वाभाविक वाटतील.

मनोविकृती कसा अनुभव देते?

मनोविकृतीमध्ये कसे वाटते हे ज्यांनी त्याचा अनुभव घेतलेला नाही अशा लोकांना समजणे कठीण वाटू शकते. ज्यांनी मनोविकृतीचा अनुभव घेतलेला आहे अशा काही लोकांनी आपले अनुभव इथे सांगितले आहेत:

“मला हॉस्पिटलच्या कार पार्किंगमध्ये बसवले होते आणि मला असे वाटले की मी एका खूप मोठ्या आणि पोकळ गोलकाच्या आत आहे. मला फक्त गडद भुऱ्या आणि काळ्या रंगाचे कोड्याचे तुकडे ज्यांनी गोलक बनला होता, तेच दिसत होते. ते बाहेरच्या बाजूला पडू लागले आणि मी काळ्याकुट्ट शून्यतेमध्ये राहिले. मी थिजून गेले. असे वाटत होते की जणू काही जगाचे तुकडे तुकडे झाले आणि आपल्या पृथ्वीचा अंत झाला.” डेब्रा

“मला बंदर दिसत होते आणि मी काही बोटींची नावे देखील जवळजवळ वाचू शकत होतो. मी अगदी गंभीर मनोविकृतीमध्ये होतो आणि मी जणू काही त्या बोटींना, क्रेनना आणि बंदराला स्पर्श करण्यासाठी माझा हात खिडकीतून बाहेर काढला.” मायकेल

“मी अगदी भयंकर वेदनेत आहे असे मला वाटत असे. हा भ्रम नसून एक संवेदनात्मक मतिभ्रम होता - मला ते खरोखरच जाणवत होते. मला आवाज ऐकू येत असतानाही त्या वेदना होत होत्या - त्यामुळे बहुतेक माझी लक्षणे अधिकच खरी वाटत होती. बहुतेकवेळा मला भितीदायक विचार येत असताना माझे डोके दुखत असे.” मार्क

मनोविकृतीचा इतर मानसिक आजारांशी काय संबंध आहे?

मनोविकृती ही संज्ञा लक्षणांच्या एका समूहाचे वर्णन करते. ती एक सर्व-समाविष्ट संज्ञा देखील आहे. निरनिराळ्या प्रकारच्या अनेक आरोग्य स्थितींमध्ये असणारे लोक मनोविकृतीची लक्षणे अनुभवू शकतात, यामध्ये समाविष्ट आहेत:

  • स्किझोफ्रेनिया
  • स्किझोअफेक्टिव्ह डिसऑर्डर
  • बायपोलर डिसॉर्डर
  • तीव्र नैराश्य

इतर मानसिक आरोग्य स्थिती जसे की जनरलाइज्ड एंग्जाइटी डिसऑर्डर किंवा ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर (ओसीडी) यातूनही एखाद्या व्यक्तीमध्ये पुढे मनोविकृती विकसित होऊ शकते. या आरोग्य स्थितीशी निगडित तीव्र तणावाचा परिणाम म्हणून असे होऊ शकते.

एखाद्या व्यक्तीला मनोविकृती होण्याची शक्यता असू शकते जेव्हा त्यांना:

  • मेंदूला दुखापत झालेली असताना
  • दारूच्या व्यसनातून दूर होताना
  • पुरेशा झोपेचा अभाव असताना
  • आनंदासाठी गांजा किंवा कोकेन यासारख्या अंमली पदार्थांचे सेवन केलेले असताना
  • अंमली पदार्थांच्या व्यसनातून दूर होत असताना
  • मूत्रसंसर्ग यासारखा संसर्ग झालेला असताना. संसर्ग झाल्यामुळे कधी कधी डिलीरियम नावाची स्थिती उद्भवू शकते ज्यामुळे लोकांना दिशाहीन झाल्यासारखे वाटते आणि कधी कधी मनोविकृतीची लक्षणे विकसित होतात बरेचदा डिलीरियम होण्याच्या कारणांवर उपचार झाले की मनोविकृतीच्या लक्षणांमध्ये फरक पडतो.

एखाद्या नवीन किंवा नुकत्याच लिहून दिलेल्या औषधाचा दुष्परिणाम म्हणून किंवा एखादे औषध बंद करताना देखील हे होऊ शकते.

कधी कधी एखाद्या व्यक्तीमध्ये मनोविकृती का विकसित झाली आहे हे शोधून काढणे शक्य नसते.

मनोविकृतीचा अनुभव निरनिराळ्या लोकांसाठी निरनिराळा असतो:

  • आयुष्यातील महत्त्वाच्या घटना - एखादा जवळचा मित्र/ मैत्रीण किंवा नातेवाईक यांचा मृत्यू होणे यासारख्या महत्त्वाच्या किंवा तणावपूर्ण घटनेनंतर कधी कधी मनोविकृती उद्भवू शकते. जर एखाद्या व्यक्तीने लहानपणी शोषण किंवा उपेक्षा अनुभवली असेल तर ते विकसित होण्याची शक्यता जास्त असते.
  • बाळंतपण - बाळंतपणानंतर मनोविकृती उद्भवू शकते; याला पोस्टपार्टम सायकॉसिसअसे म्हणतात.
  • गांजा, एलएसडी, कोकेन किंवा ‘स्पीड’, सेवन केल्यास मनोविकृती उद्भवू शकते. कधी कधी एखाद्या व्यक्तीने अंमली पदार्थांचे किंवा दारूचे सेवन करणे थांबवले तर त्यांच्या मनोविकृतीमध्ये सुधारणा होईल. तथापि, कधी कधी अंमली पदार्थ आणि मनोविकृती यांच्यामधील संबंध अधिक गुंतागुंतीचे असतात. जर तुम्ही अंमली पदार्थांचे सेवन करत असाल तर तुमच्यावर उपचार करणाऱ्या लोकांशी तुम्हाला हे थांबवण्यासाठी कशी मदत मिळेल याविषयी बोला.
  • जेव्हा एखाद्या व्यक्तीला मूड डिसऑर्डर असेल - जेव्हा एखाद्या व्यक्तीला तीव्र नैराश्य एपिसोड किंवा मॅनिक एपिसोड असेल तेव्हा मनोविकृती उद्भवू शकते.
  • पुरेशा झोपेचा अभाव - तीव्र प्रमाणात झोपेचा अभाव यामुळे मनोविकृती उद्भवू शकते.

इथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की बरेच लोकं तणाव अनुभवत असतील, अंमली पदार्थांचे सेवन करत असतील किंवा बाळाला जन्म देतील आणि त्यांच्यामध्ये कधीही मनोविकृती उद्भवणार नाही. कधी कधी मनोविकृती उद्भवण्याचे कोणतेही स्पष्ट कारण दिसून येत नाही. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की जर तुम्हाला मनोविकृतीचा त्रास झाला तर यात तुमची चूक नाही.

जर तुमच्या उपचारांमध्ये त्याचा उपयोग होणार असेल तर तुमचे डॉक्टर तुमच्यामध्ये मनोविकृती उद्भवण्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करतील. उदाहरणार्थ, जर तुम्ही अंमली पदार्थांचे सेवन करत असाल तर तुम्हाला ते थांबवण्यामध्ये मदत करणे हा तुम्हाला बरे करण्याचा एक महत्त्वाचा भाग असेल. तथापि, जर तुम्ही तुमच्या अवस्थेचा सामना करण्यासाठी म्हणून अंमली पदार्थ किंवा दारू घेत असाल तर यामुळे तुम्हाला संशोधनावर-आधारित उपचार घेण्यामध्ये अडथळा येण्याचे काही कारण नाही.

मला मनोविकृतीचा अनुभव येत आहे असे मला वाटत असल्यास मी काय करावे?

जर तुम्हाला मनोविकृती संबंधित कोणतेही अनुभव येत असतील तर तुमच्या डॉक्टरांशी बोला. ते कदाचित तुम्हाला तज्ञ मानसिक आरोग्य सेवेकडे किंवा तुमच्या स्थानिक मनोविकृतीमध्ये पूर्व हस्तक्षेप करण्याऱ्या सेवेकडे पाठवतील.

मनोविकृतीमध्ये पूर्व हस्तक्षेप करण्याऱ्या सेवा

मनोविकृतीमध्ये पूर्व हस्तक्षेप करणाऱ्या सेवा (अर्ली इंटरव्हेंशन इन सायकॉसिस - EIP) ही अशी एक प्रकारची उपचार प्रणाली आहे की ज्या व्यक्तींना मनोविकृतीचा अनुभव येत असेल किंवा तशी लक्षणे दिसत असतील, त्यांना योग्य ती देखभाल त्वरित मिळावी हे सुनिश्चित करण्यासाठी ती बनवली गेली आहे. असे अनेक पुरावे आहेत जे हे दर्शवतात की, जर मनोविकृतीसाठी लोकांना त्वरित मदत मिळाली, तर त्यांच्या बरे होण्याची शक्यता जास्त असते आणि ते लवकर बरे होऊ शकतात.

मूल्यमापन

जर तुम्हाला मनोविकृतीची लक्षणे जाणवत असतील, तर मनोविकृतीमधील तज्ज्ञ व्यक्तीने तुमची तपासणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून खालील गोष्टींबाबत अधिक माहिती मिळवता येईल:

  • काही लोकांना मनोविकृतीचा फक्त एकच ‘अनुभव’ येतो. याचा अर्थ ते मनोविकृतीचा अनुभव घेतात, त्यातून बरे होतात, आणि पुन्हा कधीही त्यांना तसा अनुभव येत नाही.
  • काही लोकांना त्यांच्या आयुष्यभरामध्ये मनोविकृतीचे अनेक अनुभव येतात.
  • यांच्यापैकी काही जणांना पुढे स्किझोफ्रेनिया, स्किझोअफेक्टिव्ह डिसऑर्डर किंवा त्याच्याशी जुळलेल्या इतर एखाद्या मनोविकृतीच्या आजाराचे निदान होते तुम्हाला मिळणारे निदान ऐकण्यास खूप क्लिष्ट वाटू शकते, आणि तुम्ही तुमच्या डॉक्टरांना तुमच्या आजाराच्या निदानाचे वेगवेगळे भाग स्पष्ट करून सांगण्यास विचारू शकता.

जर तुम्हाला मनोविकृतीचा एकदा किंवा एकापेक्षा जास्त वेळा अनुभव आला असेल आणि तरीही तुम्हाला स्किझोफ्रेनिया किंवा स्किझोअफेक्टिव्ह डिसऑर्डर यासारख्या आजाराचे निदान का झाले नाही हे तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर तुमच्या डॉक्टरांशी बोला. अशी काही कारणे असू शकतात ज्यांच्यामुळे तुमच्या अनुभवांचे निदान यांच्यापैकी एखादा आजार नसावा असे तुमच्या डॉक्टरांना वाटत असेल.

मनोविकृती का उद्भवते?

मनोविकृती कशामुळे उद्भवली आहे हे आपल्याला नेहेमीच समजते असे नाही. काही गोष्टीमुळे मनोविकृती उद्भवण्याची शक्यता जास्त असते, ज्यामध्ये समाविष्ट आहेत:

  • तुमचे मानसिक आरोग्य
  • तुम्ही अंमली पदार्थ किंवा मद्यपान यांचे सेवन करत असाल किंवा नाही
  • तुम्ही घेत असलेली कोणतीही औषधे
  • तुम्हाला असलेल्या कोणत्याही शारीरिक आरोग्य समस्या आणि तुमचे सामान्य शारीरिक आरोग्य
  • तुमचे नातेसंबंध आणि तुम्हाला उपलब्ध असलेले सहकार्य - उदाहरणार्थ, तुमच्यासाठी एखाद्या काळजीवाहू व्यक्तीकडून मदत उपलब्ध असल्यास
  • तुम्हाला भूतकाळात आलेले कोणतेही क्लेशदायक किंवा कठीण अनुभव
  • तुमचे शिक्षण आणि रोजगाराचा इतिहास
  • तुमच्या जीवनाचा सामान्य दर्जा.

ही माहिती खूप जास्त वाटू शकते. तथापि, तुमचे उपचार करणाऱ्या लोकांना तुमची जीवनशैली, तुम्हाला जाणवणाऱ्या अडचणी आणि ते तुम्हाला कोणकोणत्या विविध प्रकारे मदत करू शकतात, हे समजून घेण्यासाठी याची मदत होऊ शकते.

दुर्दैवाने, जर तुम्हाला मनोविकृतीचा त्रास होत असेल, तर तुम्ही आजारी आहात हे ओळखणे कदाचित तुम्हाला शक्य होणार नाही. यामुळे मदत मिळवणे अधिक कठीण होऊ शकते.

मनोविकृतीसाठी कोणतीही शारीरिक चाचणी उपलब्ध नाही. त्याऐवजी, तुमची तपासणी करणारी व्यक्ती तुम्हाला जाणवत असलेल्या कोणत्याही लक्षणांविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करेल. यामुळे त्यांना अचूक निदान करण्यास मदत होईल.

मनोविकृतीवर उपचार कसे केले जातात?

मनोविकृती असलेल्या व्यक्तीला मदत करू शकतील अशा अनेक गोष्टी आहेत. या गोष्टी वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या प्रकारे उपयुक्त ठरू शकतात.

दुर्दैवाने, या विभागात आम्ही नमूद केलेल्या काही सेवा संपूर्ण यूके मध्ये सर्वत्र नेहेमीच उपलब्ध नसतात. काही सेवा उपलब्ध आहेत, परंतु कदाचित तुम्हाला त्या लगेच मिळू शकणार नाहीत.

औषधोपचार

जर तुम्हाला पहिल्यांदाच मनोविकृतीचा त्रास होत असेल, तर तुम्हाला अँटीसायकोटिक नावाचे औषध दिले जाण्याची शक्यता आहे.

अँटीसायकोटिक औषधे कसे कार्य करतात?

अँटीसायकोटिक औषधे तुमच्या मेंदूतील वेगवेगळ्या रसायनांवर परिणाम करतात, विशेषतः 'डोपामिन' नावाच्या रसायनावर. असे मानले जाते की मेंदूमध्ये डोपामिन जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे भ्रम आणि मतिभ्रम यांसारखी मनोविकृतीची लक्षणे निर्माण होतात. अँटीसायकोटिक औषधे मेंदूतील डोपामिनची पातळी कमी करण्याचे काम करतात, ज्यामुळे मनोविकृतीची लक्षणे सुधारू शकतात किंवा कमी होऊ शकतात.

मनोविकृतीमध्ये सेरोटोनिन, नोरॅड्रेनालाईन, हिस्टामाइन आणि ग्लुटामेट यांसारख्या मेंदूतील इतर रसायनांवरही परिणाम होतो असे मानले जाते. अनेक अँटीसायकोटिक औषधे या रसायनांच्या पातळीवर देखील परिणाम करतात. 

अँटीसायकोटिक औषधांचे दुष्परिणाम असतात का?

सर्व औषधांचे दुष्परिणाम असतात, आणि ते व्यक्तीनुसार व औषधाच्या प्रकारानुसार वेगवेगळे असू शकतात. तुम्ही अँटीसायकोटिक औषध सुरू केल्यास तुम्हाला जाणवू शकणाऱ्या दुष्परिणामांबद्दल तुमच्या डॉक्टरांनी माहिती दिली पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या औषधांबाबत तसेच कोणत्याही शंकांबाबत चर्चा करण्याची संधी दिली पाहिजे.

तुम्हाला सुचवण्यात आलेल्या औषधाशी संबंधित सामान्य दुष्परिणामांची माहिती देणारे एक पत्रक देखील तुम्हाला दिले गेले पाहिजे. हे पत्रक वाचण्यासाठी वेळ काढा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुमचे औषध लिहून देणाऱ्या व्यक्तीला ते नक्की विचारा.

जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही घेत असलेल्या औषधामुळे तुम्हाला त्रासदायक दुष्परिणाम होत आहेत, तर तुमच्या डॉक्टरांशी बोला. तुमची लक्षणे बरी होतील आणि ज्याचे तुम्हाला असहनीय किंवा त्रासदायक दुष्परिणाम होणार नाहीत, असे औषध शोधण्यासाठी त्यांनी तुम्हाला सहकार्य केले पाहिजे. तुम्हाला अँटीसायकोटिक औषध लिहून देताना, तुमच्या डॉक्टरांनी तुम्ही घेत असलेल्या इतर औषधांचा आणि त्यांच्यामध्ये होऊ शकणाऱ्या संभाव्य प्रतिक्रियेचा देखील विचार केला पाहिजे. तुम्ही औषधांमधील परस्पर प्रतिक्रियेबद्दल अधिक माहिती BNF वेबसाइट वर वाचू शकता.

आरोग्य तपासणी

कोणतेही अँटीसायकोटिक औषध सुरू करण्यापूर्वी तुमची संपूर्ण शारीरिक आरोग्य तपासणी केली गेली पाहिजे. यात खालील गोष्टींचा समावेश असेल:

  • रक्त चाचण्या, ज्याद्वारे मधुमेह आणि अति कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांची तपासणी केली जाते.
  • शारीरिक निरीक्षणे (जसे की रक्तदाब, हृदयाचे ठोके आणि तापमान)
  • तुमच्या उंचीची आणि वजनाची तपासणी, आणि शक्य असल्यास तुमच्या बॉडी मास इंडेक्स (BMI) ची तपासणी
  • इसीजी (ECG), जो हृदयाच्या विद्युत क्रियाकलपांचे मोजमाप करतो
  • जर तुमच्यासाठी या गोष्टी लागू होत असतील तर धूम्रपान, मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन या विषयावर चर्चा.

तुम्ही मनोविकृतीवर उपचार म्हणून लिहून दिलेली औषधे घेण्याच्या कालावधीत, वर्षातून किमान एकदा तरी तुमची शारीरिक आरोग्य तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या आरोग्य तपासण्या तुमच्या फॅमिली डॉक्टरकडून किंवा तुमच्या मानसिक आरोग्य गटाद्वारे केल्या जाऊ शकतात. तुमच्या शारीरिक आरोग्य तपासण्या कोण करणार आहे आणि काही आरोग्याच्या समस्या आढळल्यास पुढे काय केले जाईल, हे जाणून घेण्यासाठी तुमच्या मानसिक आरोग्य गटाशी संवाद साधा.

ज्या काही गोष्टींची अँटीसायकोटिक औषधांसोबत प्रतिक्रिया घातक ठरू शकते, त्यामध्ये इतर काही विशिष्ट औषधे, अल्कोहोल, अंमली पदार्थ आणि सिगारेट यांचा समावेश होतो. हे अत्यंत महत्त्वाचे आहे की तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलावे:

  • तुम्ही इतर कोणतेही औषध घेण्यास सुरुवात करण्यापूर्वी
  • जर तुम्ही मद्यापान करत असाल तर
  • जर तुम्ही अंमली पदार्थांचे सेवन करत असाल तर
  • जर तुम्ही मोठ्या प्रमाणात कॅफिनचे सेवन करत असाल (विशेषतः जर तुम्ही हे अधूनमधून करत असाल, सतत नाही) तर
  • जर तुम्ही सिगारेट ओढण्यास सुरुवात करण्याचा, ती बंद करण्याचा किंवा त्याचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय घेतला असेल तर. जर तुम्ही धूम्रपान बंद केले, तर तुमच्या रक्तातील अँटीसायकोटिक औषधाचे प्रमाण वाढू शकते, त्यामुळे तुम्हाला औषधाच्या कमी डोसची गरज भासू शकते. तुम्ही क्लोजॅपाइन घेत असाल तर हे विशेषतः महत्त्वाचे आहे (तुम्ही पुढील भागात क्लोजॅपाइनबद्दल अधिक माहिती वाचू शकता).
  • जर तुम्हाला संसर्ग झाला असेल तर. कारण यामुळे तुमच्या शरीरातील औषधाच्या पातळीत बदल होऊ शकतो.

नियमित आरोग्य तपासणी का आवश्यक आहे?

मनोविकृती असलेल्या व्यक्तींच्या शारीरिक आरोग्यावर, विशेषतः हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, म्हणूनच त्याचे काळजीपूर्वक निरीक्षण करणे आवश्यक असते. जर तुमच्या शारीरिक आरोग्यामध्ये सुधारणा होणार असेल, तर तुमचे डॉक्टर तुम्हाला जीवनशैलीत बदल करण्याचा, औषधांचे नियोजन वेगळ्या पद्धतीने करण्याचा किंवा काही विशिष्ट दुष्परिणाम (जसे की वजन वाढणे) रोखण्यासाठी अतिरिक्त औषधे घेण्याचा सल्ला देऊ शकतात.

मला कोणते अँटीसायकोटिक औषध दिले जाईल?

अनेक प्रकारची वेगवेगळी अँटीसायकोटिक औषधे उपलब्ध आहेत. सर्व अँटीसायकोटिक औषधे सारखीच प्रभावी असल्याचे सातत्याने दिसून आले आहे, केवळ क्लोजॅपाइनचा अपवाद वगळता, जे अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. एका अँटीसायकोटिकपासून दुसऱ्या अँटीसायकोटिकमध्ये जो फरक असतो, तो म्हणजे ती औषधे घेतल्यावर व्यक्तीला जाणवणारे दुष्परिणामांचे प्रकार आणि त्यांची तीव्रता.

तुम्हाला काही विशिष्ट अँटीसायकोटिक औषधे न घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो जर:

  • तुम्ही गर्भवती राहण्यास समर्थ असाल
  • तुम्ही इतर काही विशिष्ट औषधे घेत असाल
  • तुम्हाला मधुमेह किंवा उच्च रक्तदाब यांसारखे इतर काही आजार असतील.

तुमच्या डॉक्टरांनी या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि तुमच्यासाठी सर्वात योग्य असे अँटीसायकोटिक औषध निवडण्याचे काम तुमच्या सहकार्याने केले पाहिजे.

क्लोजॅपाइन

संशोधन अभ्यासातून सातत्याने असे दिसून आले आहे की, ज्या लोकांमध्ये इतर अँटीसायकोटिक औषधे नीट काम करत नाहीत, त्यांच्यासाठी क्लोजॅपाइन हे एकमेव प्रभावी ठरणारे अँटीसायकोटिक औषध आहे. तुमचे डॉक्टर तुम्हाला क्लोजॅपाइन सुरू करण्याचा सल्ला देऊ शकतात जर:

  • तुम्ही किमान दोन वेगवेगळी अँटीसायकोटिक औषधे किमान काही आठवडे घेऊन पाहिली असतील आणि
  • तरीही तुम्हाला मनोविकृतीच्या लक्षणांचा त्रास होत असेल.

जर तुम्ही क्लोजॅपाइन घ्यायला सुरुवात केली, तर तुमची नेहमीची शारीरिक आरोग्य तपासणी केली जाईल, ज्याचे वर्णन मागील भागात केले आहे. तुमची अधिक बारकाईने देखरेख देखील केली जाईल:

  • तुम्ही क्लोजॅपाइन सुरू केल्यावर पहिल्या १८ आठवड्यांसाठी, तुम्हाला दर आठवड्याला एकदा रक्ताची चाचणी करावी लागेल.
  • यानंतर, क्लोजॅपाइन सुरू केल्यापासून एक वर्षापर्यंत तुम्हाला दर दोन आठवड्यांनी एकदा रक्ताची चाचणी करावी लागेल.
  • एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर, जोपर्यंत तुम्ही क्लोजॅपाइन वापरत आहात, तोपर्यंत तुम्हाला दर चार आठवड्यांनी एकदा रक्ताची चाचणी करावी लागेल.

रक्ताच्या चाचण्या

जर तुम्ही क्लोजॅपाइन घेत असाल, तर तुम्हाला नियमितपणे फुल ब्लड काउंट नावाची रक्ताची चाचणी करणे अनिवार्य आहे. ही चाचणी क्लोजॅपाइनच्या अत्यंत दुर्मिळ अशा संभाव्य दुष्परिणामाची तपासणी करण्यासाठी केली जाते, ज्यामध्ये तुमच्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींची संख्या कमी होते. पांढऱ्या रक्तपेशी संसर्गाशी लढतात आणि जर तुमच्या शरीरात त्यांची पुरेशी संख्या नसेल, तर तुम्ही खूप आजारी पडू शकता. नियमित रक्ताच्या चाचण्यांमुळे असे काही घडण्याची चिन्हे नाहीत, याची खात्री करण्यास डॉक्टरांना मदत मिळते.

तुम्हाला प्लाझ्मा लेव्हल मॉनिटरिंग नावाची दुसरी एक रक्ताची चाचणी करण्याची देखील गरज पडू शकते. ही चाचणी तुमच्या रक्तामध्ये क्लोजॅपाइनचे प्रमाण किती आहे, याचे निरीक्षण करते. या चाचणीचा उपयोग तुम्ही क्लोजॅपाइनचा योग्य डोस घेत आहात याची खात्री करण्यासाठी आणि क्लोजॅपाइनच्या वापराशी संबंधित कोणत्याही आरोग्य समस्यांचे निदान करण्यासाठी किंवा त्या टाळण्यासाठी केला जाऊ शकतो.

असा पुरावा समोर येऊ लागला आहे ज्यावरून असे सूचित होते की, भविष्यात काही लोकांना सध्याच्या तुलनेत इतक्या वारंवार रक्ताच्या चाचण्या करण्याची गरज भासणार नाही. जर या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल झाला, तर तुमचा मानसिक आरोग्य गट तुमच्याशी त्याबद्दल चर्चा करेल.

जर तुम्ही क्लोजॅपाइन घेत असाल, तर ते डॉक्टरांनी सांगितल्यानुसार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुमचा क्लोजॅपाइनचा डोस ४८ तासांपेक्षा जास्त काळ चुकला असेल, तर पुढचा डोस घेण्यापूर्वी तातडीने सल्ला घेण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. कारण, खंड पडल्यानंतर थेट पूर्ण डोस घेणे असुरक्षित असू शकते.

औषधाचा दुष्परिणाम

क्लोजॅपाइन घेणाऱ्या व्यक्तींना इतरही काही दुष्परिणामांचा अनुभव येऊ शकतो. यापैकी काही दुष्परिणाम मागील भागात नमूद केलेल्या सर्व अँटीसायकोटिक औषधांच्या दुष्परिणामांसारखेच आहेत, परंतु काही विशेषतः क्लोजॅपाइनच्या बाबतीत सामान्यपणे आढळतात, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:

  • वजन वाढणे
  • थकवा जाणवणे
  • बद्धकोष्ठता.

क्लोजॅपाइनमुळे काही लोकांच्या हृदयाचे ठोके नेहमीपेक्षा जास्त वेगाने पडू शकतात (ज्याला साइनस टॅकिकार्डिया असे म्हणतात). क्लोजॅपाइन सुरू केल्यानंतर शरीराने दिलेली ही एक सामान्य प्रतिक्रिया असू शकते. तथापि, हे हृदयाला होणाऱ्या इजेचे लक्षण देखील असू शकते. यामुळेच, जर एखाद्या व्यक्तीला सतत साइनस टॅकिकार्डियाचा त्रास होत असेल, तर त्यांच्यामध्ये हृदयाला इजा झाल्याची इतर चिन्हे किंवा लक्षणे आहेत का, याची तपासणी केली पाहिजे.

हे दुष्परिणाम ऐकायला चिंताजनक वाटू शकतात, परंतु त्यातील बहुतेकांचे व्यवस्थापन सहजपणे केले जाऊ शकते.

मला किती काळ औषध घ्यावे लागेल?

अनेक लोकांना हे जाणून घेण्याची इच्छा असते की त्यांना किती काळ औषध घ्यावे लागेल, आणि भविष्यात ते औषध घेणे थांबवू शकतील का. एखाद्या व्यक्तीला किती काळ औषध घेण्याची आवश्यकता असू शकते याचा अंदाज लावणे खरोखर कठीण असू शकते आणि ते वेगवेगळ्या अनेक गोष्टींवर अवलंबून असू शकते.

जर तुम्ही औषधोपचार सुरू केल्यापासून १ ते २ वर्षांच्या आत ते बंद केले, तर आजार पुन्हा बळावण्याचा धोका जास्त असतो. रिलॅप्स म्हणजे पुन्हा मनोविकृतीच्या अधिक झटक्यांचा अनुभव येणे. औषध चालू ठेवल्यामुळे तुम्हाला भविष्यात पुन्हा आजार बळावण्याचा धोका लक्षणीय रितीने कमी होऊ शकतो.

जर तुम्ही औषधोपचार बंद केले आणि तुम्हाला पुन्हा मनोविकृतीचा झटका आला, तर तुम्हाला बरे राहण्यासाठी पुन्हा औषध सुरू करावे लागू शकते आणि ते नियमितपणे चालू ठेवावे लागेल. तुम्हाला किती काळ औषधोपचार घेण्याची गरज पडेल, हे तुमच्यावर आणि तुमच्या विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून असते.

मी माझे औषधोपचार बंद केले तर काय होईल?

जर तुम्ही तुमचे औषधोपचार बंद केले, तर तुम्ही पुन्हा आजारी पडू शकता. तुम्ही जितक्या वेळा पुन्हा पुन्हा आजारी पडाल, तितकेच पूर्णपणे बरे होणे तुमच्यासाठी अधिक कठीण होऊ शकते. तसेच, प्रत्येक वेळी तुमची तब्येत पूर्वीसारखीच किंवा त्याच पातळीवर बरी होईल असे नाही. हे एक मुख्य कारण आहे ज्यामुळे तुमचे डॉक्टर तुम्हाला तुमचे औषध घेत राहण्यासाठी प्रोत्साहित करतील.

जर तुम्हाला तुमचा औषधोपचार बंद करायचा असेल किंवा तुम्ही तसा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला प्रथम तुमच्या मानसिक आरोग्य व्यावसायिकाशी किंवा डॉक्टरांशी बोलण्याचा ठाम सल्ला देतो. त्यांनी तुमच्याशी औषधोपचार बंद करण्याचे फायदे आणि तोटे, त्यामध्ये असणारे कोणतेही धोके आणि औषध बंद करण्याचा सर्वात योग्य मार्ग यावर चर्चा केली पाहिजे.

दीर्घकालीन प्रभाव करणारी इंजेक्शन्स

दीर्घकालीन प्रभाव करणारी इंजेक्शन्स, ज्यांना डेपो मेडिकेशन असेही म्हणतात, ही औषधे गोळ्यांच्या रूपात न घेता स्नायूमध्ये इंजेक्शनद्वारे (इंट्रामस्क्युलर इंजेक्शन) दिली जातात. यातून औषध त्यानंतर काही आठवड्यांच्या कालावधीत हळूहळू शरीरात सोडले जाते.

दीर्घकालीन प्रभाव करणाऱ्या इंजेक्शनमधील औषध हे गोळ्यांमधील औषधासारखेच असते.

काही लोक दीर्घकालीन प्रभाव करणारे इंजेक्शन अधिक पसंत करतात, कारण त्यांना दररोज औषधाच्या गोळ्या घेण्याची आठवण ठेवावी लागत नाही. दुसऱ्या बाजूला, काही लोकांना इंजेक्शन आवडत नाहीत किंवा दररोज स्वतःहून औषधाच्या गोळ्या घेण्याची कल्पना त्यांना अधिक पसंत असते.

संशोधनातून असे दिसून येते की दीर्घकालीन प्रभाव करणारे इंजेक्शन वापरणाऱ्या लोकांमधील औषधाचा परिणाम, गोळ्यांच्या स्वरूपात अँटिसायकोटिक औषधे घेणाऱ्या लोकांपेक्षा अधिक चांगल्या प्रमाणात दिसतो. तुम्ही आमच्या माहिती स्रोतामध्ये दीर्घकालीन प्रभाव करणाऱ्या अँटिसायकोटिक इंजेक्शन्सबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.

मानसशास्त्रीय थेरपी

मानसशास्त्रीय थेरपी किंवा संभाषणाद्वारे केल्या जाणाऱ्या थेरपी म्हणजे तुम्ही एकटे किंवा गटामध्ये मिळून थेरपिस्टशी तुमच्या समस्या आणि अडचणींबद्दल चर्चा करता.

मानसशास्त्रीय थेरपी या मनोविकृती, स्किझोफ्रेनिया आणि स्किझोइफेक्टिव्ह डिसऑर्डर यांच्या उपचारासाठी सुचविल्या जातात आणि त्या प्रभावी असल्याचे भरपूर पुरावे उपलब्ध आहेत. औषधोपचार करत असताना त्याच वेळी तुम्हाला मानसशास्त्रीय थेरपीही दिली गेली पाहिजे, कारण त्यामुळे दोन्ही गोष्टी अधिक प्रभावी ठरू शकतात.

विविध मानसशास्त्रीय थेरपी तुम्हाला किती उपयुक्त वाटतील हे तुमच्यावर आणि तुमच्या वैयक्तिक परिस्थितीवर अवलंबून असेल.

दुर्दैवाने, तुम्ही कुठे राहता यावर अवलंबून मानसशास्त्रीय थेरपी मिळवण्यासाठी काही वेळ लागू शकतो.

कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी- सीबीटी (CBT)

CBT तुम्हाला दैनंदिन परिस्थितींमध्ये अधिक उपयुक्त पद्धतीने विचार करणे आणि प्रतिक्रिया देणे हे शिकण्यास मदत करते. इतर काही संभाषणाद्वारे केल्या जाणाऱ्या थेरपींपेक्षा वेगळ्या रितीने, CBT तुमच्या भूतकाळातील अनुभवांपेक्षा सध्याच्या अडचणींवर अधिक लक्ष केंद्रित करते.

तुम्हाला वैयक्तिक CBT दिली गेली पाहिजे, ज्यामध्ये आठवड्याला एक अशा किमान १६ सत्रांसाठी तुम्ही एकटे थेरपिस्टसोबत भेटता.

CBT चा मला कशाप्रकारे उपयोग होईल?

CBT तुम्हाला या गोष्टींमध्ये मदत करू शकते:

  • तुमच्या लक्षणांच्या संदर्भात तुमचे विचार, भावना आणि वर्तन यांच्यातील संबंध समजून घेणे
  • तुमच्या विश्वासांचा तुमच्या लक्षणांशी कसा संबंध आहे हे समजून घेणे
  • तुमच्या लक्षणांशी सामना करण्यासाठी पर्यायी मार्ग विकसित करणे
  • तुमच्या लक्षणांमुळे जाणवणारा त्रास कमी करणे.

मला CBT कधी सुरू करता येईल?

सामान्यतः जर तुम्ही मानसशास्त्रीय थेरपींमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि ठरलेल्या सत्रांव्यतिरिक्त त्यामध्ये दिलेले इतर सर्व काम पूर्ण केले तर त्या अधिक उपयुक्त ठरतात. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असाल, तर तुम्ही अधिक स्थिर झाल्यावर CBT सुरू करणे तुमच्यासाठी जास्त योग्य ठरू शकते. याचे कारण असे आहे की CBT मध्ये तुम्हाला तुमच्या काही भ्रमांना किंवा विश्वासांना आव्हान द्यावे लागू शकते. जर तुम्ही यासाठी तयार नसाल, तर त्यामुळे तुम्ही आणि तुमच्या थेरपिस्टमधील नातेसंबंध बिघडू शकतात आणि तुमच्या मानसिक आरोग्यावर याचा अधिक वाईट परिणाम होऊ शकतो.

कला थेरपी

कला थेरपी पद्धतींमध्ये सर्जनशील अभिव्यक्तीच्या विविध प्रकारांचा वापर करून लोकांना त्यांचे विचार आणि भावना यांचा शोध घेण्यास मदत केली जाते. कला थेरपी पद्धतींमध्ये चित्रकला, फोटोग्राफी, शिल्पकला, संगीत आणि लेखन यांसारख्या गोष्टींचा समावेश होऊ शकतो.

कला थेरपी पद्धती तुम्हाला पुढील गोष्टींमध्ये मदत करू शकतात:

  • स्वतःला व्यक्त करणे
  • इतर लोकांशी संवाद साधण्याचे नवे मार्ग शोधणे
  • तुमचे अनुभव कलेच्या माध्यमातून व्यक्त करणे.

कौटुंबिक हस्तक्षेप

कौटुंबिक हस्तक्षेप म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मिळू शकेल अशी विविध प्रकारची मदत, ज्यामुळे तुमच्या बरे होण्याच्या प्रक्रियेत सुधारणा होईल.

कुटुंबांसोबत काम करण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती असतात. तथापि, कौटुंबिक हस्तक्षेप हे मानसिक आरोग्य तज्ञांद्वारे केले गेले पाहिजे आणि त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असावा:

  • सायकोएज्युकेशन – तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तुमच्या आजाराचे निदान अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करणे
  • तणावाचे व्यवस्थापन करणे आणि तो कमी करण्यास मदत करणे
  • तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तुमच्या भावना प्रभावीपणे हाताळण्यास मदत करणे
  • विचार आणि विश्वासांविषयी वेगळ्या प्रकारे विचार करण्यास शिकण्यामध्ये मदत करणे
  • समस्या सोडवणे.

कौटुंबिक हस्तक्षेपांमध्ये तुमचा समावेश असू शकतो, किंवा सुरुवातीला ते फक्त तुमच्या कुटुंबासाठीच उपलब्ध केले जाऊ शकतात. कौटुंबिक हस्तक्षेप किमान तीन महिन्यांसाठी, किमान १० सत्रांसाठी उपलब्ध केले जावेत.

इतर थेरपी

इतरही काही थेरपी आहेत ज्यांचा येथे सविस्तर उल्लेख केलेला नाही, जसे की व्हॉइस डायलॉग (किंवा अवतार) थेरपी, कारण या उपचारपद्धती संपूर्ण यूकेमध्ये सर्वत्र उपलब्ध असतीलच असे नाही.

रुग्णालयात दाखल होणे

जर तुमची तब्येत खूपच बिघडली असेल तर बरे होण्यासाठी तुम्हाला काही काळ मनोरुग्णालयात राहण्याची आवश्यकता भासू शकते. हे उपयुक्त ठरू शकते, जर:

  • तुम्हाला अधिक सखोल उपचार आणि काळजीची गरज असेल
  • तुम्ही स्वतःला किंवा इतरांना इजा पोहोचवण्याचा धोका असेल
  • तुम्हाला इतरांकडून इजा होण्याचा धोका असेल.

सेक्शन्ड केले जाणे

काही प्रकरणांमध्ये, तुमचे मानसिक आरोग्य कायद्यांतर्गत मूल्यमापन करणे आणि तुम्हाला सक्तीने रुग्णालयात ठेवणे आवश्यक ठरू शकते. जेव्हा रुग्णालयाबाहेर तुम्ही सुरक्षितपणे राहू शकत नाही किंवा तुमची काळजी घेण्याबाबतचे निर्णय तुम्ही स्वतः सुरक्षितपणे घेऊ शकत नाही तेव्हा हे घडू शकते. याला ‘सेक्शन्ड केले जाणे’ (बिइंग सेक्शन्ड) असेही म्हणतात, आणि याचा अर्थ तुम्हाला कायद्याच्या अंतर्गत रुग्णालयात ठेवले जाते.

वेगवेगळ्या अनेक प्रकारचे सेक्शन आहेत आणि त्यांच्याबद्दल अधिक माहिती तुम्ही आमच्या ‘सेक्शन्ड केले जाणे’ (बिइंग सेक्शन्ड) संसाधन यामध्ये पाहू शकता. हे संसाधन फक्त इंग्लंड आणि वेल्स यांच्यासाठी लागू आहे, आणि स्कॉटलंड व उत्तर आयर्लंडमध्ये इतर कायदे आणि नियम लागू आहेत.

जरी तुम्हाला मानसिक आजार कायद्यांतर्गत रुग्णालयात ठेवले गेले असले, तरीही तुमच्या डॉक्टरांनी तुमच्या उपचारांबाबत तुमचे मत विचारात घेणे आणि शक्य तितक्या प्रमाणात निर्णय प्रक्रियेत तुम्हाला सहभागी होण्यामध्ये मदत करणे आवश्यक आहे. काही परिस्थितींमध्ये, तुमच्या डॉक्टरांना तुमच्या उपचारांबाबत जवळच्या एखाद्या मित्राशी/मैत्रिणीशी, कुटुंबातील सदस्याशी किंवा तुमची देखभाल करणार्‍या व्यक्तीशी बोलण्याची गरज भासू शकते. माहितीची देवाणघेवाण करण्याबाबत काही नियम असतात आणि त्याबद्दल अधिक माहिती तुम्ही मानसिक आजार असलेल्या व्यक्तीची काळजी घेणेया आमच्या माहिती संसाधनामध्ये पाहू शकता.

स्वतंत्र मानसिक आरोग्य प्रतिनिधी

जर तुम्हाला मानसिक आरोग्य कायद्यांतर्गत रुग्णालयात ठेवले गेले असेल, तर तुम्हाला आपोआप स्वतंत्र मानसिक आरोग्य प्रतिनिधी (IMHA) ची मदत घेण्याचा अधिकार असतो.

IMHA म्हणजे असे व्यक्ती ज्यांना पुढील गोष्टींचे चांगले ज्ञान असते:

  • मानसिक आरोग्य कायदा
  • मानसिक आरोग्य कायद्यांतर्गत रुग्णालयात ठेवलेल्या व्यक्तींचे अधिकार.

IMHA हे तुम्हाला ज्या मानसिक आरोग्य ट्रस्ट सेवेच्या अंतर्गत रुग्णालयात दाखल करण्यात आले असेल, त्या ट्रस्टपासून पूर्णपणे स्वतंत्र असतात. ते तुम्हाला तुमच्या रुग्णालयातील सक्तीच्या भरती विरुद्ध अपील करण्यास मदत करू शकतात आणि वॉर्ड पुनरावलोकन बैठकींना तुमच्यासोबत उपस्थित राहू शकतात. ते तुमच्यावर उपचार करणाऱ्या व्यक्ती तुमचे विचार आणि मते ऐकतील आणि विचारात घेतील याची खात्री करण्यास मदत करू शकतात.

IMHA बद्दल अधिक माहिती तुम्हीthe Mind website वर मिळवू शकता.

सामाजिक मानसिक आरोग्य सेवा

तुमची काळजी आणि उपचार तुम्हाला रुग्णालयाच्या बाहेर, समाजात मिळू शकतात. याचा अर्थ असा की तुम्ही घरी किंवा सहाय्यित निवासात राहू शकता आणि मानसिक आरोग्य सामाजिक गटाकडून उपचार घेऊ शकता.

मानसिक आरोग्य सामाजिक गट अनेक वेगवेगळ्या भूमिका पार पडणाऱ्या व्यावसायिकांनी बनलेले असतात, ज्यामध्ये मानसोपचारतज्ज्ञ, मानसिक आरोग्य परिचारिका, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, मानसशास्त्रज्ञ, सहाय्यक कर्मचारी आणि इतर अनेकांचा समावेश असतो.

तुमच्या औषधोपचाराचे पुनरावलोकन करणे किंवा तुम्हाला मानसिक आरोग्य थेरपी पुरवणे अशा मानसिक आरोग्य संबंधित मदतीबरोबरच, ते तुम्हाला नोकरी, घर किंवा सवलती/लाभ विषयक अर्ज करण्यासारख्या इतर बाबतीत देखील मदत करू शकतात.

सहाय्यित निवास

जर तुम्हाला सहाय्यित निवासाची आवश्यकता असेल, तर ते मिळवण्याची प्रक्रिया थोडी गुंतागुंतीची असू शकते. ते मिळणे हे तुमची काळजी घेण्यामध्ये सहभागी असलेल्या सर्व लोकांच्या परस्पर सहकार्यावर अवलंबून असते. तुम्हाला स्वावलंबी होण्यास प्रोत्साहित करणे आणि त्याचबरोबर तुम्हाला योग्य मदतही मिळेल याची खात्री करणे हे तुम्हाला मिळणाऱ्या सामाजिक सहाय्याचे मुख्य ध्येय असले पाहिजे.

सामाजिक सहाय्य गट

तुम्हाला सामाजिक सहाय्य देण्यासाठी विविध गट असतात:

मनोविकृती मध्ये पूर्व हस्तक्षेप करणारा गट

हा गट लोकांना मनोविकृतीचा पहिला झटका आल्यापासून सखोल सहाय्य पुरवतो; ज्यांच्यापैकी काहींना स्किझोफ्रेनिया किंवा स्किझोअफेक्टिव्ह डिसऑर्डरचे निदान झालेले असू शकते.

सक्रिय संपर्क सहाय्य गट

हा गट ज्यांना दीर्घकाळापासून स्किझोफ्रेनिया किंवा स्किझोअफेक्टिव्ह डिसऑर्डरचे निदान झालेले असेल अशा व्यक्तींना विस्तृत मदत आणि आधार पुरवतो. हे विशेषतः अशा व्यक्तींसाठी उपयुक्त ठरू शकते ज्यांना इतर सेवांकडून मदत घेणे कठीण वाटते, किंवा विविध कारणांमुळे ज्यांना नियमितपणे औषधोपचार घेता येत नाही.

संकट निवारण आणि घरगुती उपचार गट

तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होत असल्यास, रुग्णालयात दाखल करण्याच्या पर्यायाऐवजी हा गट तुम्हाला मदत आणि उपचार पुरवू शकतो.

व्यावसायिक पुनर्वसन

यामध्ये दिवस केंद्र, दिवसाचे रुग्णालय आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांचा समावेश होतो. या केंद्रांमध्ये पुन्हा कामावर जाण्यासाठी अभ्यासक्रम, शिक्षण, कला आणि स्वयंपाक यांसारखे विविध उपक्रम उपलब्ध असतात. तुमच्यासारखेच अनुभव घेत असलेल्या इतर लोकांशी तुम्हाला संपर्क साधता येऊ शकतो.

तुमच्या राहण्याच्या ठिकाणानुसार या सेवांची उपलब्धता बरीच वेगवेगळी असू शकते.

सामाजिक आधार

जर समाजात स्वतःची काळजी घेणे तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुमच्यासाठी एखादा सामाजिक कार्यकर्ता नेमला जाणे उपयुक्त ठरू शकते. ते केअर अ‍ॅक्ट मूल्यमापन करून तुमच्या काही अपूर्ण सामाजिक गरजा आहेत का हे पाहतील.

केअर अ‍ॅक्ट मूल्यमापनानुसार तुम्हाला पुढील गोष्टी देण्याची शिफारस केली जाऊ शकते:

  • तुमच्या स्वतःच्या घरी सामाजिक सहाय्याची सेवा
  • सहाय्यित निवासात राहण्याची व्यवस्था
  • ऑक्युपेशनल थेरपिस्टकडून मूल्यमापन

केअर अ‍ॅक्ट मूल्यमापन तुम्ही मानसोपचार रुग्णालयात दाखल असताना किंवा समाजात राहत असताना होऊ शकते.

मी कधी बरे होण्याची अपेक्षा आहे?

बरे होण्याची प्रक्रिया वेगवेगळ्या व्यक्तींसाठी खूप वेगवेगळी असते. हे अनेक घटकांवर अवलंबून असते, जसे की तुम्ही तुम्हाला नेमून दिलेली औषधे किती नियमितपणे घेता, मानसिक आरोग्य सेवांबरोबर तुमचा सहभाग किती आहे आणि तुमच्या कुटुंबियांकडून आणि मित्रमैत्रिणींकडून तुम्हाला मिळणारा आधार. तुम्ही बरे होण्यासाठी आणि स्थिर राहण्यासाठी सर्व ‘योग्य’ गोष्टी केल्या तरीही, तुमच्या लक्षणांमध्ये चढ-उतार जाणवू शकतात.

बरे होणे म्हणजे ‘आता कोणतीही लक्षणे नसणार’ असे मानले नाही तर ते उपयोगाचे ठरू शकते, कारण ते नेहमीच शक्य असेल असे नाही. त्याऐवजी, तुम्ही बरे होणे याला पुढील प्रकारे समजू शकता:

  • तुम्ही आधी करत असलेल्या गोष्टी पुन्हा करू शकणे
  • तुमच्या आजाराची स्थिती समजून घेणे
  • तुम्हाला शक्य तितके चांगले आणि स्थिर राहण्यासाठी काय उपयोगी आहे हे लक्षात घेणे
  • तुमची तब्येत बिघडत असल्याची चिन्हे ओळखणे आणि अशा वेळी तुम्हाला कोणती मदत लागेल हे समजून घेणे.

मी स्वतःची मदत कशाप्रकारे करू?

तुम्ही शक्य तितके निरोगी राहण्यामध्ये स्वतःची मदत करण्यासाठी अनेक गोष्टी करू शकता. तुमच्या मानसिक आरोग्य गटाने तुम्हाला ‘निरोगी राहण्याची योजना’ उपलब्ध करून दिली पाहिजे आणि ती पूर्ण करण्यासाठी तुमच्यासोबत काम केले पाहिजे. तुमच्या निरोगी राहण्याच्या योजनेचे नियमित पुनरावलोकन केले गेले पाहिजे आणि आवश्यक असल्यास त्यात बदल केले गेले पाहिजेत. ही योजना तुमच्याशी आणि तुमची काळजी घेण्यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींशी मिळून सहकार्याने तयार होणे महत्त्वाचे आहे आणि त्यात समाविष्ट केलेल्या गोष्टी तुमच्याशी संबंधित असल्या पाहिजेत.

स्वतःला मदत करण्यासाठी तुम्ही करू शकणाऱ्या इतर महत्त्वाच्या गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत:

तुमच्यासाठी तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी टाळणे

या गोष्टी प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या असू शकतात, पण यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो:

  • प्रवृत्त करणारे वातावरण – काही ठराविक ठिकाणे किंवा व्यक्ती ज्यांच्यामुळे तुम्हाला विशेष तणाव जाणवू शकतो.
  • अंमली पदार्थ आणि मद्य – मद्यपान करणे किंवा अंमली पदार्थांचे सेवन करणे त्या क्षणी आनंददायी वाटू शकते, पण त्यानंतर दीर्घकाळ त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. अंमली पदार्थ आणि मद्य तुमची मनःस्थिती खराब करू शकतात, तुम्ही भयग्रस्त होऊ शकता किंवा तुम्हाला भास होऊ लागू शकतात. अंमली पदार्थ आणि मद्य तुमच्या औषधांशी परस्पर क्रिया करू शकतात आणि ते अत्यंत धोकादायक ठरू शकते.

तुमचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्यास मदत करणाऱ्या गोष्टी करणे

यापैकी अनेक गोष्टी अशा आहेत की त्या सर्वांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. तुम्हाला मानसिक आजार असल्यास त्या विशेषतः उपयुक्त असू शकतात:

  • चांगला आहार – नियमित जेवण्याचा प्रयत्न करा, जेवण टाळू नका आणि मुख्य अन्न गटांतील पदार्थांचा खाण्यामध्ये समावेश करा. चांगला आहार कसा घ्यावा याबद्दल अधिक माहिती तुम्हाला NHS वेबसाइट वर मिळू शकते.
  • व्यायाम – सक्रिय राहिल्याने चांगले मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत होते, असे सिद्ध झाले आहे. तुम्हाला आवडणारा आणि तुम्ही नियमितपणे करू शकाल असा एखादा व्यायाम निवडण्याचा प्रयत्न करा. यामध्ये जलद चालणे, पोहणे किंवा जवळच्या व्यायाम वर्गात सहभागी होणे यांचा समावेश असू शकतो.
  • तुमच्या मानसिक आरोग्य गटाशी संपर्कात राहा – तुम्हाला अडचणी येत असल्यास तुमच्या मानसिक आरोग्य गटाशी संपर्क साधा आणि ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला मदत हवी आहे, त्या क्षेत्रांमध्ये ते कोणत्या प्रकारची मदत देऊ शकतात हे समजून घ्या.
  • आर्थिक आणि निवासाची स्थिरता – पैसे किंवा राहण्याच्या जागेशी संबंधित अडचणी या आपण अनुभवत असलेल्या सर्वात तणावपूर्ण गोष्टींपैकी असू शकतात. जर तुम्हाला घर किंवा आर्थिक बाबतीत अडचणी येत असतील, तर लाभ, आर्थिक सहाय्य आणि कर्जविषयक सल्ला यावरील आमचे संसाधन पहा; यात तुम्हाला कोणत्या प्रकारच्या लाभांचे अधिकार असू शकतात आणि ते कसे मिळवायचे हे समजावून सांगितले आहे. तुमच्या मानसिक आरोग्य गटामध्ये ऑक्युपेशनल थेरपिस्ट असल्यास, ते तुम्हाला याबाबत मदत करू शकतात.

तुमची रिलॅप्स सही समजून घेणे

तुमची रिलॅप्स सही ही तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होऊ लागल्यावर सहसा ज्या गोष्टी करू लागता किंवा तुमचे जे वर्तन दिसू लागते त्यांचे वर्णन करण्याची एक पद्धत आहे. याला ‘सही’ असे म्हटले जाते कारण ते तुमच्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असते.

तुम्ही आणि तुमच्या जवळच्या व्यक्ती या गोष्टींकडे लक्ष ठेवू शकता आणि अशा गोष्टी सुरू झाल्यास काय करायचे यासाठी आधीच ठरवलेली एखादी योजना तयार ठेवू शकता. तुमची तब्येत बिघडत असल्याच्या चिन्हांमध्ये या गोष्टी समाविष्ट असू शकतात:

  • झोप न लागणे
  • स्वतः एकटे राहणे किंवा नेहमीपेक्षा जास्त बाहेर जाणे
  • तुम्ही नेहमी जसे बोलता किंवा वागता त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने बोलणे किंवा वागणे
  • कामावर किंवा शाळेत तुमच्या कामगिरीमध्ये घट होणे
  • कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी यांच्यासमवेत इतरांशीही अधिक चिडचिडे आणि आक्रमक होणे

रिलॅप्स मध्ये विचारात घेण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘जाणीवेचा अभाव’. ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये तुम्हाला तुम्ही आजारी आहात आणि तुमची लक्षणे खरी नाहीत हे ओळखता येत नाही.

रिकव्हरी कॉलेजेस

रिकव्हरी कॉलेजेस मानसिक आजार, मानसिक आरोग्य आणि एकंदर स्वास्थ्य यावर ऑनलाइन आणि उपस्थित राहून करण्याचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देतात. ते अशा लोकांसाठी आहेत जे मानसिकदृष्ट्या आजारी आहेत आणि जे स्वतःच्या स्थितीबद्दल अधिक जाणून घेऊन त्यातून बरे होण्याच्या प्रक्रियेला कशी मदत होईल हे शिकू इच्छितात. रिकव्हरी कॉलेजेसमध्ये कुटुंबीय, मित्रमैत्रिणी आणि रुग्णाची काळजी घेणाऱ्यांसाठीही अभ्यासक्रम उपलब्ध असतात.

रिकव्हरी कॉलेजेस अनेक NHS मानसिक आरोग्य ट्रस्ट्समध्ये आणि तसेचरिकव्हरी कॉलेज ऑनलाइन द्वारे ऑनलाइन उपलब्ध आहेत.

सामाजिक उपचारांची शिफारस

तुमच्या बरे होण्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे इतरांसोबत वेळ घालवणे आणि तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी करणे. सामाजिक उपचारांची शिफारस लोकांना त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी स्थानिक सामाजिक सेवा आणि गटांशी जोडण्यात मदत करते.

उदाहरणार्थ, जर तुम्हाला बागकाम आवडत असेल, तर सामाजिक उपचारांच्या शिफारशीमुळे तुम्हाला तुमच्या जवळच्या साप्ताहिक बागकाम गटाशी जुळवले जाऊ शकते, जिथे तुम्ही इतर लोकांना भेटू शकता आणि तुम्हाला आवडणारे काम करत एकत्र वेळ घालवू शकता.

तुम्ही याबद्दल अधिक माहिती आमचे सामाजिक उपचारांची शिफारस संसाधन इथे मिळवू शकता.

काम करणे

जर तुम्ही खूप आजारी असाल, तर तुमच्या कामामध्ये कदाचित बदल करावे लागतील. याचा अर्थ तुमच्या नियोक्त्याकडून अधिक मदत मिळवणे, नोकरीतून थोडा काळ विश्रांती घेणे, किंवा तुमची सध्याची नोकरी तणाव निर्माण करत असेल तर दुसरी नोकरी शोधणे असा होऊ शकतो. हे बदल कायमस्वरूपी असणे आवश्यक नाहीत, परंतु तुम्ही शक्य तितके चांगले निरोगी राहण्यासाठी कोणते बदल करू शकता याचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

तुमच्या नियोक्त्याला माहिती देणे

जर तुम्हाला मानसिक आजाराचे निदान झाले असेल, तर तुम्ही तुमच्या नियोक्त्याला सांगावे की नाही, असा विचार तुमच्या मनात येऊ शकतो. काही लोकांना त्यांच्या निदानाबद्दल नियोक्त्याशी बोलताना नोकरी गमावण्याची, गैरवर्तन होण्याची किंवा सहकाऱ्यांपेक्षा वेगळ्या प्रकारे वागणूक मिळण्याची भीती वाटते.

मानसिक आजारांना २०१० च्या इक्वॉलिटी अ‍ॅक्ट (Equality Act 2010 ) आणि उत्तर आयर्लंडमधील १९९५ च्या डिसेबिलिटी डिस्क्रीमीनेशन अ‍ॅक्ट (Disability Discrimination Act 1995) अंतर्गत अपंगत्व म्हणून मानले जाते. याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार असल्यामुळे त्यांच्याशी भेदभाव करणे हे कायद्याविरुद्ध आहे.

तुम्ही जर तुमच्या आजाराच्या निदानाबद्दल तुमच्या नियोक्त्याला सांगितले, तर तुम्हाला मदत पुरवणे ही त्यांची कायदेशीर जबाबदारी आहे.

वाजवी तडजोड

तुमच्या नियोक्त्याला तुम्हाला तुमच्या कामात वाजवी बदल करण्यामध्ये तुमची मदत करावी लागू शकते. उदाहरणार्थ, तुम्ही याआधी आजारी असाल परंतु आता कामावर परतण्यासाठी तयार असाल, तर ते तुम्हाला टप्प्याटप्प्याने कामावर परतण्याची संधी देऊ शकतात. याचा अर्थ असा होऊ शकतो की सुरुवातीला पूर्ण दिवसाऐवजी अर्धा दिवस काम करणे किंवा काही तासांसाठी काम करणे आणि नंतर हळूहळू तुमचे कामाचे तास वाढवत पुन्हा पूर्ण वेळ काम करू लागणे.

तुमच्यासाठी कोणते बदल उपयुक्त ठरतील याचा विचार करा आणि तुमच्या नियोक्त्याशी त्याबद्दल बोला. तुम्ही Acas वेबसाइटवर  वाजवी तडजोड याविषयी अधिक माहिती मिळवू शकता.

Access to Work (अ‍ॅक्सेस टू वर्क)

Access to Work ही Department for Work and Pensions (DWP) (डिपार्टमेंट फॉर वर्क अ‍ॅन्ड पेनशन्स) द्वारे प्रदान केली जाणारी अशी सेवा आहे, जी अपंगत्व असलेल्या व्यक्तींना व्यावहारिक आणि आर्थिक सहाय्य देऊ शकते. ही सेवा नोकरी करणाऱ्या, धंदा करणाऱ्या किंवा नोकरी शोधणाऱ्या लोकांसाठी उपलब्ध आहे.

Access to Work ही सेवा वर सांगितलेल्या वाजवी तडजोड याच्या पलीकडे जाऊन अतिरिक्त मदत किंवा आवश्यक बदल प्रदान करू शकते. उदाहरणार्थ, तुमच्यासाठी कामाचे प्रशिक्षक नेमणे किंवा तुम्हाला अतिरिक्त प्रशिक्षण देणे यासाठी लागणारा खर्च देण्यासाठी Access to Work तुमच्या नियोक्त्याला मदत करू शकते.

वाहन चालवणे

तुम्हाला जर मनोविकृतीचा अनुभव येत असेल आणि तुम्ही वाहन चालवत असाल, तर तुम्ही कायदेशीर रितीने Driver and Vehicle Licensing Agency (DVLA) (ड्रायव्हर अँड वेहिकल लायसन्सिंग एजन्सी) ला याची माहिती देणे आवश्यक आहे.

तुम्ही आजारी असताना तुम्हाला वाहन चालवणे थांबवावे लागेल, कारण अशा स्थितीत वाहन चालवणे तुमच्यासाठी सुरक्षित नसेल. तथापि, जर तुम्ही किमान ३ महिने चांगल्या प्रकृतीत असाल, तर तुम्ही पुन्हा वाहन चालवायला सुरुवात करू शकता. तुमचे डॉक्टर तुम्हाला वाहन चालवणे तुमच्यासाठी सुरक्षित आहे किंवा नाही हे समजून घेण्यास मदत करू शकतात.

तुम्हाला बरे वाटल्यानंतर, DVLA तुमचे डॉक्टर किंवा मानसोपचारतज्ज्ञ यांना पत्र पाठवून तुम्ही पुन्हा वाहन चालवणे सुरक्षित आहे किंवा नाही याचे मूल्यमापन करण्याची विनंती करेल.

तुम्ही मानसिक आजार आणि वाहन चालवणे याबद्दल अधिक माहिती DVLA वेबसाइटवरील मानसिक विकार विभाग यामध्ये पाहू शकता.

कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींसाठी माहिती

जर तुम्हाला मनोविकृतीचा अनुभव घेतलेली एखादी व्यक्ती माहीत असेल, तर तुम्हाला आपण त्यांना कशी मदत करावी याबद्दल प्रश्न पडू शकतात. इथे आम्ही अशा काही गोष्टी सुचवल्या आहेत ज्या तुम्ही करू शकता.

स्वतःला आधार देणे

मनोविकृतीचा परिणाम ज्यांची त्या निदान झालेल्या व्यक्तीशी ओळख आहे, त्यांच्यावरही होऊ शकतो. जर तुमच्या ओळखीची किंवा ज्यांची तुम्हाला काळजी वाटते अशी व्यक्ती मनोविकृतीचा अनुभव घेत असेल, तर तुम्हालाही त्याविषयी माहिती आणि मदत मिळवणे उपयुक्त ठरू शकते. हे तुम्हा दोघांसाठीही उपयुक्त ठरू शकते, कारण जितके तुम्ही अधिक माहितीपूर्ण आणि समर्थ असाल, तितके तुम्ही चांगल्या रितीने तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला मदत करू शकाल.

मनोविकृती विषयी शिकणे

मनोविकृती ही एक अशी स्थिती आहे ज्या विषयी अनेकदा गैरसमज निर्माण होतात. तुमच्या स्वतःच्या वेळेत, आरोग्य संस्थांकडून किंवा धर्मदाय संस्थांकडून मिळणारी विश्वासार्ह माहिती वापरून मनोविकृती विषयी अधिक जाणून घेऊन तुम्ही तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला मदत करू शकता - यापैकी काही संस्थांची नावे आम्ही खाली दिली आहेत. तुम्ही मनोविकृतीचा अनुभव घेतलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्या कथा ऐकून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या प्रिय व्यक्तीला आता आणि भविष्यात काय अपेक्षित असू शकते हे अधिक चांगल्या प्रकारे समजेल.

तुम्ही कशी मदत करू शकता याची माहिती मिळवणे

तुम्ही तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला विचारा की अशा काही विशिष्ट गोष्टी आहेत का ज्यांच्या बाबतीत तुम्ही त्यांची मदत करू शकाल. ते तुमच्याकडून प्रत्यक्ष मदत मागू शकतील, जसे की त्यांचे आर्थिक व्यवहार नीट करण्यास मदत करणे. किंवा ते तुमच्याकडून भावनिक आधाराची अपेक्षा करू शकतील, जसे की त्यांच्या अपॉइंटमेंटसाठी त्यांच्या सोबत जाणे.

जर तुम्ही एखाद्या व्यक्तीची काळजी घेण्यामध्ये सहभागी असाल, तर कधी कधी तुम्हाला त्यांच्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी बोलावे लागेल, निर्णय घेण्यात मदत करावी लागेल किंवा त्यांच्यासाठी बाजू मांडावी लागेल. तुम्ही याबद्दल अधिक माहिती आमच्या मानसिक आजार असलेल्या व्यक्तीची काळजी घेणे या संसाधनामध्ये मिळवू शकता.

आर्थिक सहाय्य

तुमच्या ओळखीची व्यक्ती आजारी असताना नकळतपणे खूप पैसे खर्च करण्याचा किंवा इतरांकडून त्यांचे आर्थिक शोषण होण्याचा धोका असू शकतो. जर असे असेल, तर तुम्ही त्यांना त्यांच्या पैशांचे संरक्षण करण्यासाठी काही पूर्व उपाययोजना ठरविण्यामध्ये मदत करू शकता. हा निर्णय तुम्ही दोघांनी मिळून घ्यायला हवा.

तुम्ही लाभ, आर्थिक सल्ला आणि कर्ज याबद्दल अधिक माहिती आमच्या माहिती संसाधनामध्ये मिळवू शकता. तुम्ही National Debtline वेबसाइट ला भेट देऊन मानसिक आजार असलेल्या लोकांसाठी पैसे, कर्ज आणि आर्थिक सहाय्य याविषयी अधिक माहिती वाचू शकता.

तुम्ही  the Citizen’s Advice वेबसाइटला भेट देऊ शकता, किंवा तुमच्या जवळील स्थानिक Citizen’s Advice केंद्र शोधू शकता. तुम्ही ज्या लाभांसाठी पात्र आहात त्याबद्दल सल्लागाराशी बोलू शकता आणि ते तुम्हाला फॉर्म भरण्यात तसेच आवश्यक पुरावे मिळवण्यात मदत करू शकतात.

भ्रम समजून घेणे

आपल्या ओळखीतील एखाद्या व्यक्तीला जेव्हा असे विचार किंवा कल्पना येत असतील ज्या स्पष्टपणे खऱ्या नसतील, तेव्हा कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींना त्यावर कशी प्रतिक्रिया द्यावी हे समजणे कठीण जाऊ शकते. कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींना अनेकदा असा प्रश्न पडतो की या विचारांना विरोध करावा, त्यांना मान्यता द्यावी की त्यांच्याकडे फक्त दुर्लक्ष करावे. यामध्ये मनोविकृतीची लक्षणे अनुभवणाऱ्या व्यक्तीसाठी ही लक्षणे वास्तवापासून वेगळी ओळखणे अशक्य असू शकते, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

त्यांच्या भावना निर्माण करणाऱ्या विश्वासांपेक्षा त्यांच्या भावनांना मान्यता देणे अधिक उपयुक्त ठरू शकते. उदाहरणार्थ, जर तुमच्या ओळखीची व्यक्ती सरकार त्यांच्यावर पाळत ठेवत आहे म्हणून घाबरलेली असेल तर हे खरे नाही असे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, तुम्ही त्यांच्या भावनांना प्रतिसाद देण्यासाठी असे म्हणू शकता:

“हे खूप भीतीदायक वाटतंय, मला खूप वाईट वाटतं. तुम्हाला अधिक सुरक्षित वाटण्यासाठी मी काही मदत करू का?”

दुर्दैवाने, एखादी व्यक्ती संकटात असताना नेहमीच तुम्ही त्यांना चांगले वाटेल असे काही करू शकालच असे नाही.

जर तुम्ही काळजी घेणारे (केअरर) असाल

जर तुम्ही मानसिक आजार असलेल्या एखाद्या व्यक्तीची काळजी घेत असाल, तर तुम्हाला ‘काळजी घेणारे’ म्हणून गणले जाऊ शकते. मनोविकृती सारख्या गंभीर मानसिक आजार असलेल्या व्यक्तीची काळजी घेणे कधी कधी खूप कठीण असू शकते, आणि त्यामुळे तुम्हाला तुमचे स्वतःचे शारीरिक व मानसिक आरोग्यही सांभाळता येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जरी तुम्ही स्वतःला काळजी घेणारे म्हणून पाहत नसाल, तरीही तुम्हाला काही लाभ आणि मदतीचा हक्क असू शकतो.

जर तुम्ही काळजी घेणारे असाल, तर तुम्हाला मोफत काळजी घेणाऱ्यांचे मूल्यमापन (केअरर्स असेसमेंट) करून घेण्याचा अधिकार आहे. यामुळे तुमचे आयुष्य सोपे करण्यासाठी कोणत्या गोष्टी उपयुक्त ठरू शकतात हे समजण्यास मदत होईल. हे कसे करून घ्यावे याची माहिती तुम्ही NHS वेबसाइट वर मिळवू शकता.

मनोविकृतीचा अनुभव घेत असलेल्या व्यक्तींचे मित्र, कुटुंबीय आणि काळजी घेणारे यांच्यासाठी स्थानिक मदत गट तुम्हाला मिळू शकतात.

याबद्दल अधिक माहिती तुम्ही आमच्या मानसिक आजार असलेल्या व्यक्तीची काळजी घेणे या संसाधनात पाहू शकता.

अतिरिक्त संसाधने

प्रौढांमधील मनोविकृती आणि स्किझोफ्रेनिया: प्रतिबंध आणि व्यवस्थापन, सार्वजनिक माहिती — NICE (National Institute for Health and Care Excellence) नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर एक्सलन्स ही अशी एक संस्था आहे जी विविध आरोग्य स्थितींमध्ये असलेल्या लोकांना जे मिळायला हवे अशा उपचार व काळजीच्या मानकांबाबत मार्गदर्शन करते. ही माहिती सर्वसामान्य लोकांसाठी आहे आणि ही मनोविकृती व स्किझोफ्रेनिया असलेल्या प्रौढांसाठी दिलेल्या मार्गदर्शनाचा आढावा घेते.

धर्मदाय संस्था

तुम्ही खालील धर्मदाय संस्थांमार्फत मनोविकृती आणि इतर मानसिक आरोग्य समस्यांबद्दल इतर विश्वसनीय माहिती मिळवू शकता:

संबंधित संसाधने

खाली मनोविकृती आणि त्यावर मदत व उपचार यांच्याशी संबंधित अशी आमची काही संसाधने दिली आहेत, जी तुम्हाला उपयुक्त वाटू शकतात:

इतर आजार

उपचार

आधार आणि काळजी

श्रेयनामावली

ही माहिती रॉयल कॉलेज ऑफ सायकायट्रिस्टस (Royal College of Psychiatrists) यांच्या पब्लिक एंगेजमेंट एडिटोरियल बोर्ड (पीइइबी) (Public Engagement Editorial Board) (PEEB) ने तयार केली आहे. ही माहिती लेखनाच्या वेळी उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम पुराव्यांवर आधारित आहे.

तज्ञ लेखक: डॉ. डेक्लन हायलंड, डॉ. आंग्यलिकी त्सिआका, डॉ. जॉन क्रॉसबी आणि डॉ. लुए एल्ताहजी

अनुभवी तज्ज्ञ: अ‍ॅलिस इव्हान्स, अ‍ॅश्ली एन्सीम्बी, डेब्रा क्निहावा, जेनेट सील, मार्क एलर्बी, मायकेल रॉबिन्सन आणि डॉ. सोफिया ओपाचीच.

विनंती केल्यास पूर्ण संदर्भ उपलब्ध होईल.

This translation was produced by CLEAR Global (June 2026)