अँटीडिप्रेसंट औषधे थांबवणे
Stopping antidepressants
Below is a Marathi translation of our information resource on stopping antidepressants. You can also read our other Marathi translations.
ही माहिती अशा लोकांसाठी आहे ज्यांना अँटीडिप्रेसंट औषधे थांबवण्याविषयी अधिक जाणून घ्यायचे आहे.
यामध्ये पुढील गोष्टींचे वर्णन केले आहे:
- एखादी व्यक्ती अँटीडिप्रेसंट औषधे घेणे थांबवण्याचा निर्णय का घेऊ शकते
- ते सुरक्षितपणे कसे करावे
- अँटीडिप्रेसंट औषधे थांबवत असताना ज्यांचा अनुभव तुम्हाला येऊ शकतो अशी लक्षणे
- या लक्षणांना कमी करण्याचे किंवा टाळण्याचे काही मार्ग.
ही रुग्णांसाठीची माहितीप्रौढांमधील नैराश्य यावरील NICE मार्गदर्शक तत्त्वांतील शिफारशी अचूकपणे दर्शवते.
अँटीडिप्रेसंट औषधे म्हणजे काय?
अँटीडिप्रेसंट औषधे हा नैराश्य, जनरलाइज्ड एंग्जाइटी डिसऑर्डर आणि ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर (ओसीडी) यांसारख्या आरोग्यस्थितींसाठी लिहून दिला जाणारा असा औषधोपचार आहे. अँटीडिप्रेसंट औषधे कशी कार्य करतात, ती का लिहून दिली जातात, त्यांचे परिणाम व दुष्परिणाम, तसेच पर्यायी उपचार याविषयी अधिक माहिती तुम्हालाअँटीडिप्रेसंट औषधेयावरील आमच्या वेगळ्या संसाधनात मिळू शकते.
सामान्यतः अँटीडिप्रेसंट औषधे तुमची लक्षणे निघून गेल्यानंतर किमान ६ महिने तरी घ्यावी लागतात. तथापि, याचा तुमच्या डॉक्टरांकडून नियमितपणे आढावा घेतला गेला पाहिजे. तीव्र किंवा पुनरावृत्ती होणाऱ्या मानसिक आरोग्य विकाराने ग्रस्त लोकांना अँटीडिप्रेसंट औषधे अधिक काळ घ्यावी लागू शकतात.
मी अँटीडिप्रेसंट औषधे घेणे कधी थांबवावे?
लोकांनी त्यांची अँटीडिप्रेसंट औषधे घेणे थांबवण्याची अनेक कारणे आहेत, त्यात समाविष्ट आहेत:
- त्यांना असलेली मानसिक आरोग्य विकाराच्या समस्येमध्ये सुधारणा होणे
- अँटीडिप्रेसंट औषधांचा उपयोग होत नसणे
- अँटीडिप्रेसंट औषधांचे त्रासदायक दुष्परिणाम होणे
- त्यांना यापुढे अँटीडिप्रेसंट औषधे घेण्याची इच्छा नसणे
जर तुम्ही अँटीडिप्रेसंट औषधे घेत असाल आणि तुम्हाला या पैकी कोणतेही अनुभव येत असतील, तर तुमच्या डॉक्टरांशी बोला. ते तुम्हाला अँटीडिप्रेसंट औषधे थांबवणे तुमच्यासाठी योग्य आहे का आणि ते सुरक्षितपणे कसे करायचे हे ठरवण्यास मदत करू शकतात.
मी अँटीडिप्रेसंट औषधे घेणे कसे थांबवावे?
अँटीडिप्रेसंट औषधे सहसा अचानक थांबवू नयेत. यामुळे तुम्हाला अचानक औषध बंद केल्यामुळे होणारी प्रत्याहरण लक्षणे जाणवू शकतात आणि तुमची तब्येत पुन्हा बिघडण्याची शक्यता वाढू शकते. औषध बंद केल्यामुळे दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी असू शकतात. ती वेगवेगळ्या अँटीडिप्रेसंट औषधांनुसारही वेगवेगळी असू शकतात (परिशिष्ट १ पहा).
बहुतांशी लोक कमी कमी डोस घेत जाऊन आणि मग पूर्णपणे थांबवून काही आठवड्यांत किंवा महिन्यांमध्ये हळूहळू अँटीडिप्रेसंट औषधे घेणे थांबवू शकतात. याला ‘टेपरींग’ असे म्हणतात. यामुळे तुम्हाला औषध बंद केल्यामुळे दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे जाणवण्याचा धोका कमी होऊ शकतो किंवा अशी लक्षणे झालीच तर ती कमी तीव्र असू शकतात.
प्रत्येकाने अँटीडिप्रेसंट औषधांचा डोस हळूहळू कमी केला पाहिजे, परंतु काही लोकांना (साधारणपणे ज्यांनी ही औषधे फार काळ घेतलेली नसतील अशा लोकांना) डोस फक्त काही टप्प्यांत कमी करणे पुरेसे असू शकते.
जर तुम्ही अँटीडिप्रेसंट औषधे अल्प कालावधीनंतर थांबवत असाल, तर तुमचे डॉक्टर खाली दिलेल्या उदाहरणासारखी एखादी पद्धत तुम्हाला सुचवू शकतात. या पद्धतीमध्ये, तुम्ही दर २-४ आठवड्यांनी तुमचा सध्याचा डोस अंदाजे ५०% नी कमी कराल आणि कमी डोसपर्यंत पोहोचल्यानंतर औषध पूर्णपणे थांबवाल.

जर तुम्हाला इतक्या वेगाने डोस कमी करण्यात अडचण येत असेल आणि औषध थांबवण्याचा प्रयत्न करताना औषध बंद केल्यामुळे दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे जाणवत असतील, तर तुम्हाला अँटीडिप्रेसंट औषधांचा डोस अधिक हळूहळू कमी करावा लागेल. तुमच्यासाठी योग्य आणि ज्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण होणार नाही अशा पद्धतीने डोस कमी करणे महत्त्वाचे आहे.
या माहिती पत्रकाचा उद्देश तुम्हाला औषध बंद केल्यामुळे दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे टाळण्यास मदत करणे किंवा अशी लक्षणे शक्य तितक्या कमी प्रमाणात होण्यासाठी मदत करणे हा आहे. याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा, जेणेकरून औषधे थांबवण्याची तुमच्यासाठी सर्वात योग्य अशी पद्धत तुम्हाला ठरवता येईल.
अँटीडिप्रेसंट औषधे थांबवत असताना तुम्हाला कोणती लक्षणे जाणवू शकतात आणि ती किती तीव्र असू शकतात?
NICE मार्गदर्शक तत्त्वे यानुसार काही लोकांमध्ये औषध बंद केल्यामुळे दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे सौम्य असू शकतात आणि कोणत्याही मदतीची गरज न पडता तुलनेने लवकरच ती खूप कमी होऊ शकतात. इतर काही लोकांना अधिक तीव्र लक्षणे जाणवू शकतात जी खूप काळ टिकतात (कधीकधी महिने किंवा वर्षभरापेक्षा जास्त).
तूर्त कोणाला औषध बंद केल्यामुळे दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे अधिक गंभीर स्वरूपात जाणवतील याचे आपण भाकीत करू शकत नाही.
अँटीडिप्रेसंट औषधे थांबवल्यानंतर दिसू शकणारी लक्षणे
जर तुम्हाला खालीलपैकी कोणतीही लक्षणे आढळली, तर तुमच्या डॉक्टरांना कळवा.
तुम्हाला पुढील गोष्टी जाणवू शकतात:
- सतत येत आणि जात राहणारी चिंता, कधीकधी तीव्र ‘उद्रेकाच्या’ स्वरूपात
- झोप येण्यास अडचण होणे आणि जिवंत वाटणारी किंवा घाबरवणारी स्वप्ने पडणे
- निराश मनःस्थिती, गोष्टींमध्ये रस घेऊ शकत नसल्याची किंवा त्यांचा आनंद घेऊ शकत नसल्याची भावना
- शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची भावना
- जलद गतीने बदलणारी मनःस्थिती
- राग, निद्रानाश, थकवा, समन्वयाचा अभाव आणि डोकेदुखी
- तुमच्या हातांमध्ये, पायांमध्ये किंवा डोक्यात विजेचा झटका बसल्यासारखा अनुभव. यांना कधीकधी ‘झॅप्स’ असे म्हटले जाते आणि डोके एका बाजूला वळवल्यास ते अधिक तीव्र होऊ शकते.
- गोष्टी वास्तविक नाहीत अशी भावना ('डिरीअलायझेशन'), किंवा तुमच्या ‘डोक्यात कापूस भरला असल्यासारखे वाटणे’
- एकाग्रता करण्यात अडचण
- आत्महत्येचे विचार
- मळमळ
- गरगरणे (हे सहसा सौम्य असते, परंतु काही वेळा ते इतके तीव्र असू शकते की तुम्हाला मदतीशिवाय उभे राहणेही कठीण होऊ शकते)
- आतून अस्वस्थ वाटत असल्याची भावना आणि स्थिर बसता न येणे (अकॅथिसिया).
इतर नोंदवलेल्या लक्षणांची यादी पाहण्यासाठी परिशिष्ट २ पहा.
अँटीडिप्रेसंट औषधे बंद केल्यामुळे दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे कशामुळे होतात?
हे अद्याप नीट समजलेले नाही. न्यूरोट्रान्समीटर नावाची मेंदूमधील रसायने (जसे की सेरोटोनिन आणि नॉरअड्रेनलिन) यामध्ये सहभागी असतात. ते मज्जातंतूंच्या टोकांवर कार्य करून मज्जातंतूंच्या पेशींना एकमेकांशी संदेशांची देवाणघेवाण करण्यास मदत करतात. अँटीडिप्रेसंट औषधांमुळे मेंदूमधील मज्जातंतू पेशींमधील जागेत आणि तसेच संपूर्ण शरीरभर आणि आतड्यांतील मज्जातंतूंमध्ये या रसायनांचे प्रमाण वाढते असे मानले जाते. काळाच्या ओघात मेंदू आणि शरीर हळूहळू या वाढलेल्या पातळ्यांशी जुळवून घेत असल्याचे दिसते.
जर अँटीडिप्रेसंट औषधे खूप ताबडतोब थांबवले गेले, तर मेंदू आणि शरीराला पुन्हा जुळवून घेण्यासाठी वेळ लागेल. न्यूरोट्रान्समीटरच्या पातळीत अचानक घट झाल्यास, मेंदू त्या बदलाशी जुळवून घेत असताना औषध बंद केल्यामुळे दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे निर्माण होऊ शकतात असे मानले जाते. बदल जितके हळूहळू होतील, तितकीच लक्षणे सौम्य आणि सहन करण्यास सोपी असतील. किंवा ती कदाचित होणारही नाहीत.
यामुळेच अँटीडिप्रेसंट औषध हळूहळू थांबवणे सहसा उत्तम असते.
अँटीडिप्रेसंट औषध थांबवल्यानंतर दिसून येणाऱ्या प्रत्याहरण लक्षणांनी कोण प्रभावित होते?
अँटीडिप्रेसंट औषध घेणाऱ्या लोकांपैकी तृतीयांशापासून अर्ध्यापर्यंत लोकांना काही प्रमाणात अशी लक्षणे अनुभवावी लागतात. कोणाला ही लक्षणे जाणवतील याचे अद्याप आपण भाकीत करू शकत नाही.
जर तुम्ही दीर्घकाळ मोठ्या प्रमाणाचा डोस घेतला असेल तर धोका अधिक असल्यासारखे वाटते. पण जर तुम्ही अँटीडिप्रेसंट औषध फक्त थोड्या काळासाठी घेतले असेल तरीही असे होऊ शकते. हे तुम्ही घेतलेल्या अँटीडिप्रेसंट औषधाच्या प्रकारावरही अवलंबून असू शकते. जर तुम्ही अँटीडिप्रेसंट औषध घेणे अचानक थांबवले किंवा त्याचा डोस लवकर कमी केला, तर तुम्हाला ही लक्षणे जाणवण्याची (आणि ती अधिक तीव्र होण्याची) जास्त शक्यता असते.
ही औषध बंद केल्यामुळे दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे आहेत की माझे नैराश्य किंवा चिंता पुन्हा सुरू होत आहे हे मी कसे ओळखावे?
औषध बंद केल्यामुळे दिसून येणाऱ्या प्रत्याहरण लक्षणांपैकी काही लक्षणे अँटीडिप्रेसंट औषधे सुरू करण्यापूर्वी तुम्हाला जाणवत असलेल्या लक्षणांसारखी वाटू शकतात. निराश मनःस्थिती आणि झोप न येण्याची अडचण नैराश्याच्या लक्षणांसारखी वाटू शकतात. खूप घाबरून जाण्याची भावना हे औषध बंद केल्यामुळे होणारे एक सामान्य लक्षण असू शकते आणि ते चिंतेचा त्रास होत असतानाही दिसू शकते. या प्रकरणात, तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलले पाहिजे. औषध बंद केल्यामुळे दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे कमी करण्यासाठी, तुम्हाला काही काळासाठी डोस वाढवावा लागू शकतो आणि त्यानंतर डोस अधिक सावकाशपणे कमी करावा लागू शकतो.
जर तुम्हाला औषध बंद केल्यामुळे दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे जाणवली, तरीही तुम्ही अँटीडिप्रेसंट औषधे थांबवू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला डोस अधिक सावकाशपणे कमी करावा लागू शकतो. 'अँटीडिप्रेसंट औषधे कधी आणि कशी थांबवावी’ या विभागात पहा.
खालील काही मार्गांच्या मदतीने तुम्ही आणि तुमचे डॉक्टर हे ओळखू शकता की तुम्हाला औषध बंद केल्यामुळे दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे जाणवत आहेत की चिंता किंवा नैराश्य पुन्हा सुरू झाल्याची लक्षणे आहेत:
लक्षणे सुरू झाल्यावर
औषध बंद केल्यामुळे दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे साधारणपणे औषधाचा डोस कमी केल्यानंतर किंवा औषधोपचार थांबवल्यानंतर लवकरच सुरू होतात. काही अँटीडिप्रेसंट औषधांसाठी हा एक किंवा दोन दिवसांचा कालावधी असू शकतो – किंवा अगदी एकच डोस चुकवल्यानंतरही. सामान्यतः त्यांना सुरू होण्यासाठी काही दिवस लागतात आणि नंतर ते आणखी वाईट होतात.
निराशा किंवा चिंता परत येण्यासाठी सहसा जास्त वेळ लागतो – साधारणपणे काही आठवडे किंवा महिने. काही अँटीडिप्रेसंट औषधे, जसे फ्लुओक्सेटीन (fluoxetine), शरीरातून बाहेर पडण्यासाठी खूप जास्त वेळ घेतात. म्हणून, यांमुळे डोस थांबवल्यानंतर किंवा कमी केल्यानंतर काही दिवसांनी किंवा अगदी काही आठवड्यांनी सुद्धा लक्षणे सुरू होऊ शकतात. यामुळे ही लक्षणे औषध बंद केल्यामुळे होत आहेत की चिंता किंवा नैराश्याची मूळ लक्षणे पुन्हा दिसत आहेत हे ओळखणे अधिक कठीण होऊ शकते.
काही इतर अँटीडिप्रेसंट औषधांबाबत अशी नोंद झाली आहे की ती थांबवल्यानंतर काही आठवड्यांनीही औषध बंद केल्यामुळे दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे सुरू होऊ शकतात. याची कारणे चांगल्या प्रकारे समजलेली नाहीत.
लक्षणाचा प्रकार
औषध बंद केल्यामुळे दिसून येणाऱ्या प्रत्याहरण लक्षणांपैकी काही लक्षणे अशी असू शकतात जी तुम्हाला चिंता किंवा नैराश्य असताना पूर्वी कधी जाणवली नव्हती. उदाहरणार्थ, 'विद्युत् झटके' किंवा 'झॅप्स' किंवा अधिक सूक्ष्म भावना ज्या तुम्ही यापूर्वी अनुभवल्या नाहीत. लोक अनेकदा म्हणतात, "मला हे आधी कधीच जाणवले नव्हते" किंवा "हे माझ्या नैराश्यासारखे वाटत नाही.”
जर तुम्ही अँटीडिप्रेसंट औषध पुन्हा सुरू केले तर ते किती लवकर जातात
तुम्ही अँटीडिप्रेसंट औषध पुन्हा सुरू केल्यास, औषध बंद केल्यामुळे दिसून येणाऱ्या प्रत्याहरण लक्षणांमध्ये साधारणपणे लगेच सुधारणा होते (काही दिवसांत किंवा अगदी काही तासांतही). परत आलेल्या चिंता किंवा नैराश्याच्या लक्षणांना आराम देण्यासाठी अँटीडिप्रेसंट औषधांना सामान्यतः काही आठवडे लागतात, त्या तुलनेत हे खूपच जलद आहे.
याचा अर्थ असा होतो का की अँटीडिप्रेसंट औषधांचे व्यसन लागू शकते?
अँटीडिप्रेसंट औषधे थांबवल्यास तुम्हाला औषध बंद केल्यामुळे दिसून येणारी अस्वस्थ करणारी अशी लक्षणे जाणवू शकतात आणि तुम्ही ती पुन्हा घेण्यास सुरुवात केल्यास ही लक्षणे थांबू शकतात.
जर तुम्हाला हवे असतानाही अँटीडिप्रेसंट औषधे घेणे थांबवता येत नसेल, तर तुम्हाला त्यांच्या व्यसनाधीन झाल्यासारखे वाटू शकते. हे अगदी 'व्यसनाधीन' होण्यासारखे नाही.
सामान्यतः व्यसन म्हणजे:
- तुम्हाला एखाद्या पदार्थाचा वापर करण्याची तीव्र इच्छा किंवा तळमळ जाणवते
- तुम्ही त्या पदार्थाच्या वापरावरील तुमचे नियंत्रण गमावता
- जेव्हा तुम्ही त्याचा वापर करता तेव्हा तुम्हाला आनंद किंवा 'नशेचा' अनुभव येतो
दारू, निकोटीन (nicotine) आणि बेंझोडायजेपाइन (benzodiazepines) सारख्या पदार्थांचे व्यसन लागू शकते.
अँटीडिप्रेसंट औषधे घेणे थांबवणे कठीण असू शकते, परंतु हे अधिक अचूकपणे शारीरिक अवलंबित्व असे म्हणता येते.
'शारीरिक अवलंबित्व' आणि व्यसन यामध्ये गोंधळ केला जातो. शारीरिक अवलंबित्व म्हणजे तुमच्या शरीराने एखाद्या पदार्थाच्या किंवा औषधाच्या शरीरातील अस्तित्वाशी जुळवून घेतले आहे.
यामुळे सहनशीलता वाढते आणि औषध बंद केल्यामुळे दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे दिसू शकतात, कारण औषध बंद झाल्यावर शरीराला त्याची ‘कमतरता’ जाणवते. शारीरिक अवलंबित्व निर्माण करण्यासाठी एखाद्या औषधाने ‘नशा’ निर्माण करण्याची आवश्यकता नसते.
मला माझी अँटीडिप्रेसंट औषधे कधी आणि कशा प्रकारे थांबवायला हवीत?
तुम्ही अँटीडिप्रेसंट औषधे किती काळ घ्यावी हे तुम्हाला ते का लिहून दिले गेले आहे आणि तुम्हाला ते यापूर्वी घ्यावे लागले होते का यावर अवलंबून असते. अँटीडिप्रेसंट औषधांचा डोस कमी करण्यास आणि नंतर तो थांबवण्यास सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे, याबद्दल तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तुम्हाला पुढील गोष्टींमध्ये समतोल साधण्याची गरज पडू शकते:
- अँटीडिप्रेसंट औषधांमुळे तुम्हाला मिळणारे फायदे, जसे की चिंता किंवा नैराश्याच्या लक्षणांपासून आराम
आणि:
- ती दीर्घकाळ वापरल्यानंतर उद्भवू शकणाऱ्या समस्या. यामध्ये वजन वाढीसारख्या अधिक प्रमाणातील दुष्परिणामांचा समावेश असू शकतो. काही लोकांना असं आढळतं की कालांतराने त्यांच्या अँटीडिप्रेसंट औषधांचा परिणाम कमी होतो.
जेव्हा तुम्ही औषध थांबवण्याच्या योग्य वेळेशी सहमत व्हाल, तेव्हा तुमचे डॉक्टर तुम्हाला डोस हळूहळू कमी करण्याची टेपरींग योजना ठरवण्यास मदत करू शकतील. ही योजना किती सावकाश रितीने राबवायची हे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे असते.
जर तुम्ही फक्त काही आठवडे अँटीडिप्रेसंट औषध घेत असाल, तर तुम्ही ते एका महिन्याभरात कमी करून थांबवू शकता. जरी तुम्हाला औषध बंद केल्यामुळे दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे सौम्यपणे जाणवत असली (किंवा अजिबात नसली) तरीही, हे किमान चार आठवड्यांच्या कालावधीत करणे अधिक योग्य ठरेल.
जर तुम्ही अनेक महिने किंवा वर्षे अँटीडिप्रेसंट औषधे घेत असाल, तर डोस अधिक सावकाश रितीने कमी करणे जास्त योग्य ठरेल (पुन्हा, तुम्हाला सोयीस्कर वाटेल अशा गतीने). हे सहसा काही महिने किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी असेल. जर तुम्हाला यापूर्वी औषध बंद केल्यामुळे दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे जाणवली असतील, तर डोस हळूहळू कमी करणे अधिक योग्य ठरते. सहसा जसजसा डोस कमी होत जातो तसतसे कमी होण्याचे प्रमाणही कमी होत जाते. काही लोकांना औषध पूर्णपणे थांबवण्यापूर्वी डोस खूप कमी पातळीपर्यंत आणावा लागू शकतो, अगदी सुरुवातीच्या डोसच्या २% इतका कमी.
लक्षात ठेवा, जर तुम्हाला औषध बंद केल्यामुळे दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे जाणवू लागली तरी याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचे अँटीडिप्रेसंट औषध थांबवू शकत नाही. तुम्हाला फक्त हे करणे आवश्यक आहे:
- अधिक सावकाश रितीने कमी करणे
- डोसमध्ये कमी प्रमाणात घट करणे
- दीर्घ कालावधीसाठी करणे
फक्त क्वचितच, जेव्हा अँटीडिप्रेसंट औषधांयाचे गंभीर दुष्परिणाम निर्माण होतात, तेव्हाच डोस हळूहळू कमी न करता औषध अचानक बंद करावे. जर असे घडले, तर तुमच्या डॉक्टरांना ताबडतोब भेटा.
मी माझ्या औषधाचा डोस हळूहळू कसा कमी करावा?
ही गोष्ट कशी करायची याबाबत काही सामान्य सल्ला खाली दिला आहे. तथापि, हे तुमच्या डॉक्टरांच्या मदतीने करणे अधिक योग्य ठरेल, जेणेकरून ते तुमच्यासाठी योग्य प्रकारची तयारी आणि डोस लिहून देऊ शकतील. ते तुमच्या फार्मसिस्टसोबत तुमच्या विशिष्ट गरजांनुसार आवश्यक बाबी ठरवू शकतील, जेणेकरून तुम्हाला आवश्यक असलेल्या उपचारानुसार प्रिस्क्रिप्शन तयार करता येईल.
काही दिवशी औषध घेणे टाळू नका. बहुतेक वेळा, याचा परिणाम म्हणजे तुमच्या शरीरातील औषधाचे प्रमाण कमी-जास्त होत राहील आणि औषध बंद केल्यावर दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे जाणवण्याची शक्यता वाढेल. फ्लुओक्सेटिन इतर अँटीडिप्रेसंट औषधाच्या तुलनेत तुमच्या शरीरात जास्त काळ टिकते आणि ते एका दिवसाच्या अंतराने घेतले जाऊ शकते. तुम्ही हे करावे की नाही याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करावी.
सुरुवातीला चाचणी म्हणून, तुम्ही तुमचा नियमित डोस एक चतुर्थांश (२५%) किंवा अर्धा (५०%) ने कमी करून पाहू शकता. नवीन डोसशी जुळवून घेण्यासाठी आणि त्याचा परिणाम कसा होतो हे पाहण्यासाठी दोन ते चार आठवडे द्या.
जर तुम्हाला कोणतीही त्रासदायक लक्षणे जाणवली नाहीत, तर सध्याच्या डोसचा आणखी एक चतुर्थांश (२५%) किंवा अर्धा (५०%) डोस कमी करून पाहा. आणखी २ ते ४ आठवडे द्या आणि ही प्रक्रिया पुन्हा करा. गरज पडल्यास, डोस आणखी कमी करून त्यानंतर पुन्हा काही काळ प्रतीक्षा करा.
जर तुमचा पहिल्यांदा डोस कमी करण्यानंतर किंवा पुढील कोणत्याही डोस कमी करण्यावर अस्वस्थ करणारी लक्षणे दिसली, तर डोस कमी करणे थांबवा. ज्या शेवटच्या डोसमुळे तुम्हाला आरामदायक वाटत होते त्या डोसवर परत जा आणि पुन्हा प्रयत्न करण्यासाठी तुम्ही तयार आहात असे वाटेपर्यंत प्रतीक्षा करा. याचा अर्थ असा होऊ शकतो की तुम्हाला औषध अधिक सावकाश रितीने कमी करणे आवश्यक आहे, जसे की १०% किंवा अगदी ५% इतक्या लहान प्रमाणात.
जर तुम्ही अँटीडिप्रेसंट औषध दीर्घकाळ घेत असाल
जर तुम्ही:
- अनेक महिने किंवा त्याहून अधिक काळ अँटीडिप्रेसंट औषधे घेत असाल
- यापूर्वी अँटीडिप्रेसंट औषधाचा डोस कमी करण्याचा किंवा तो बंद करण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला त्रासदायक लक्षणे जाणवली असतील
- औषध बंद केल्यामुळे दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे होण्याचा जास्त धोका असलेले अँटीडिप्रेसंट औषधे घेत असाल
तर सुरुवातीपासूनच डोस अधिक सावकाश रितीने कमी करणे कदाचित अधिक योग्य ठरेल. उदाहरणार्थ, मूळ डोसचा वीसावा (५%) किंवा दहावा (१०%) भाग. तुमच्या डॉक्टरांशी नियमितपणे संपर्कात राहा, जेणेकरून ते तुमची प्रगती कशी होत आहे यावर लक्ष ठेवू शकतील.
दीर्घकाळ कार्य करणारी अँटीडिप्रेसंट औषधे, जसे फ्लुओक्सेटीन, तुमच्या शरीरातून बाहेर पडण्यासाठी काही आठवडे लागू शकतात (बहुतेक औषधे फक्त काही दिवसांत बाहेर पडतात). म्हणून, डोस कमी केल्यानंतर काही दिवसांनी किंवा अगदी काही आठवड्यांनीही औषध बंद केल्यामुळे दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे उद्भवू शकतात. पुन्हा डोस कमी करण्यापूर्वी, औषध बंद केल्यामुळे दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे सुरू होतात का हे पाहण्यासाठी किमान चार आठवडे थांबणे अधिक योग्य ठरेल.
तुम्ही डोस कितीही कमी पातळीवर केला तरी, औषध पूर्णपणे बंद केल्यानंतरही तुम्हाला औषध बंद केल्यामुळे दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे जाणवू शकतात. असे झाल्यास, तुम्हाला औषध पुन्हा लहान डोसमध्ये सुरु करावे लागून त्यानंतर डोस हळूहळू कमी करण्यास सुरुवात करावी लागू शकते.
अँटीडिप्रेसंट औषधाचा डोस कमी करताना किंवा ते बंद करताना तुम्हाला जर आत्महत्येचे विचार किंवा कल्पना येऊ लागल्या, तर ते औषध बंद केल्यामुळे दिसून येणारे प्रत्याहरण लक्षण असू शकते किंवा नैराश्य पुन्हा सुरू झाल्याचे लक्षण असू शकते. ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी बोला. ते कदाचित तुम्हाला ज्या शेवटच्या डोसमध्ये तुम्हाला बरे वाटत होते त्या डोसवर परत जाण्याचा सल्ला देतील. तुम्हाला गरज पडल्यास लवकर मदत कशी मिळवायची हे नक्की जाणून घ्या.
उपलब्धतेबाबत एक टीप
तुम्ही अँटीडिप्रेसंट औषधाचा डोस तुम्ही कसा कमी कराल हे यूकेमध्ये कोणते डोस गोळीच्या आणि सिरपच्या स्वरूपात उपलब्ध आहेत यावर अवलंबून असेल. जर तुम्ही सध्या घेत असलेले अँटीडिप्रेसंट औषध सिरपच्या स्वरूपात उपलब्ध नसेल, तर तुम्हाला बदल करून त्याऐवजी सिरपच्या स्वरूपात उपलब्ध असलेल्या तत्सम अँटीडिप्रेसंट औषधाचा वापर करावा लागू शकतो. किंवा तुम्हाला खालीलप्रमाणे नमूद केलेल्या इतर पर्यायांचा वापर करावा लागू शकतो. तुमचे डॉक्टर किंवा फार्मासिस्ट तुम्हाला हे सर्वोत्तम रितीने कसे करावे याबाबत मार्गदर्शन करू शकतात.
टेपरींग पट्ट्या हा एक संभाव्य पर्याय आहे. यामध्ये रोज घेण्यासाठी सलग थोड्या-थोड्या प्रमाणात कमी होत जाणारे डोस असलेल्या पुड्यांची गुंडाळी किंवा पट्टी असते. ते यूके मधील Medicines and Healthcare products Regulatory Agency (मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी) (MHRA) कडून परवाना प्राप्त केलेले नाहीत. याचा अर्थ असा की तुमचे डॉक्टर त्याऐवजी परवाना प्राप्त औषध वापरण्याचा निर्णय घेऊ शकतात.
The General Medical Council (द जनरल मेडिकल कौन्सिल) (GMC) म्हणते की वैद्यकीय व्यावसायिकांनी परवाना प्राप्त औषधे वापरण्याचा प्रयत्न करावा, परंतु जर परवाना प्राप्त पर्याय उपलब्ध नसेल तर ते परवाना नसलेली औषधे वापरू शकतात.
नियमित देखरेखीमुळे तुम्हाला आणि तुमच्या डॉक्टरांना कोणतीही समस्या लवकर ओळखता येईल, विशेषतः जर तुम्हाला एका अँटीडिप्रेसंट औषधापासून दुसऱ्या अँटीडिप्रेसंट औषधाकडे बदल करावा लागला असेल तर.
टेपरींग योजनांची उदाहरणे
औषधाचा डोस हळूहळू कमी करण्यास सुरुवात करण्यापूर्वी, तुम्ही टेपरींग योजनेवर तुमच्या डॉक्टरांशी सहमत झाले पाहिजे. ते तुम्हाला हे सुरक्षितपणे कसे करायचे याबद्दल सल्ला देऊ शकतील.
खाली वेगवेगळ्या गतीने डोस हळूहळू कमी करण्याच्या टेपरींग योजनांची उदाहरणे दिली आहेत. तुमच्या योजनेमध्ये, तुम्हाला प्रत्येक टप्पा पाळण्याची इच्छा किंवा गरज नसेल. पण काही लोकांना ते करणे आवश्यक वाटेल.
डोस कमी करण्यामधील अंतर इतके असावे की त्यामध्ये षध बंद केल्यामुळे दिसून येणारी कोणतीही प्रत्याहरण लक्षणे कमी होतील किंवा नाहीशी होतील.
काही लोक फक्त गोळ्या वापरून त्यांचे अँटीडिप्रेसंट औषधे घेणे थांबवू शकतात. जर तुम्हाला औषध बंद केल्यामुळे दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे जाणवत असतील आणि अँटीडिप्रेसंट औषध बंद करण्यात अडचण येत असेल, तर कमी डोस घेण्यासाठी तुम्हाला गोळ्या आणि सिरप अशा दोन्ही स्वरूपात अँटीडिप्रेसंट औषधाचा वापर करावा लागू शकतो.
सिरपचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा लागतो जेणेकरून डोसमध्ये कोणतीही चूक होणार नाही. जर तुम्ही गोळ्यांपासून सिरपकडे जात असाल, तर आपली मात्रा अचूक रूपांतरित होत आहे की नाही हे तपासण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी किंवा फार्मासिस्टशी बोला.
हे देखील लक्षात ठेवा की सिरप स्वरूपातील तेच औषध एकापेक्षा जास्त मात्रेमध्ये उपलब्ध असू शकते. उदाहरणार्थ, ५ मिग्रॅ /५ मिली आणि १ मिग्रॅ /५ मिली अशी दोन मिश्रणे उपलब्ध असू शकतात. तुम्ही घेत असलेला डोस काळजीपूर्वक तपासणे आणि फक्त सिरपच्या प्रमाणावर अवलंबून न राहणे महत्त्वाचे आहे.
या उदाहरणांमधील संख्या कशाप्रकारे गणल्या गेल्या आहेत?
उदाहरण १ मध्ये प्रमाणानुसार टेपरींग करण्याची पद्धत वापरली आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक टप्प्यातील डोस तुमच्या मूळ डोसच्या नव्हे, तर तुम्ही सध्या घेत असलेल्या डोसच्या टक्केवारीनुसार मोजले जाते. उदाहरणार्थ:
- जर तुम्ही २० मिग्रॅ औषध घेत असाल आणि ते २५%ने कमी करायचे असेल, तर तुम्हाला २० मिग्रॅच्या २५% म्हणजे ५ मिग्रॅ असे मोजावे लागेल
- तुमचा डोस ५ मिग्रॅने कमी केल्यावर तुम्ही १५ मिग्रॅ घेऊ लागाल
- जर तुम्हाला आणखी २५%ने मी करायचे असेल, तर तुम्ही १५ मिग्रॅच्या २५% असे मोजाल. हे ३.७५ मिग्रॅ आहे
- तुम्ही तुमचा सध्या घेत असलेला १५ मिग्रॅचा डोस ३.७५ मिग्रॅने कमी कराल. यामुळे ते ११.२५ मिग्रॅ पर्यंत कमी होईल
प्रमाणानुसार कमी करण्याच्या पद्धतीचा अर्थ असा की, तुलनेने लहान डोसवर पोहोचल्यानंतर तुम्हाला प्रत्येक वेळी अधिकाधिक लहान कपात करत जावी लागेल.
उदाहरण २ मध्ये हायपरबोलिक टेपरींग करण्याची पद्धत वापरली आहे. हे अँटीडिप्रेसंट औषधे मेंदूवर कसे परिणाम करतात याच्या समजुतीवर आधारित आहे. अँटीडिप्रेसंट औषधाचे लहान डोस मेंदूवर आपल्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त परिणाम करू शकतात, त्यामुळे लहान डोसपर्यंत आल्यावर डोस आणखी सावकाश रितीने कमी करणे आवश्यक असते.
हायपरबोलिक टेपरींग पद्धतीमध्ये डोसमधील कपात अगदी वर वर्णन केलेल्या साध्या प्रमाणानुसार टेपरींग पद्धतीच्या सारखीच असते. तथापि, काही फरक आहेत. उदाहरण २ मध्ये सुचवलेल्या काही डोसच्या मात्रा प्रमाणानुसार नियमाचे अचूक पालन करत नाहीत.
उदाहरण १
या उदाहरणात, तुम्ही प्रत्येक २-४ आठवड्यांनी तुमचा सध्याचा डोस सुमारे ५०%नी कमी कराल.
काही लोकांना हे अधिक सावकाश रितीने कमी करावे लागू शकते, जे तुम्ही उदाहरण २ मध्ये पाहू शकता.

उदाहरण २
या उदाहरणात, तुम्ही प्रत्येक २-४ आठवड्यांनी तुमचा डोस सुमारे १०%नी कमी कराल. सर्व टप्प्यांवर अचूकपणे १०%नी डोस कपात केलेली नाही कारण हे उदाहरण हायपरबोलिक टेपरींगवर आधारित आहे (वर पहा). काही लोकांना हे अधिक सावकाश रितीने कमी करावे लागू शकते. उदाहरणार्थ, प्रत्येक २-४ आठवड्यांनी सुमारे ५%नी कमी करणे.
खाली दिलेले कमी मात्रेचे डोस मिळवण्यासाठी तुम्हाला गोळ्या आणि सिरप अशा दोन्ही स्वरूपातील अँटीडिप्रेसंट औषधे मिळून किंवा फक्त सिरप स्वरूपातील अँटीडिप्रेसंट औषध वापरावे लागेल. याचे कारण असे की गोळीच्या स्वरूपातील अँटीडिप्रेसंट औषध इतक्या कमी प्रमाणात उपलब्ध नसतात की तुमचा डोस इतक्या सावकाश रितीने कमी करता येईल.
या संसाधनात पुढे आम्ही हे कसे केले जाते याची तत्त्वे स्पष्ट करू. तुम्ही सुरक्षितपणे डोस कमी करण्यासाठी आवश्यक असलेली मात्रा मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग जाणून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी बोला.

संपूर्ण ३८- टप्प्यांच्या योजनेसाठी परिशिष्ट ३ पहा.
मी कोणती योजना पाळावी?
तुमच्यासाठी सर्वोत्तम असलेली टेपरींग योजना अनेक गोष्टींवर अवलंबून असेल, जसे की:
- तुम्ही घेत असलेले औषध
- तुम्ही किती काळापासून औषध घेत आहात
- सुरुवात करण्यासाठी तुम्ही सध्या घेत असलेला डोस
- तुम्हाला औषध बंद केल्यामुळे दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे किती तीव्रपणे जाणवत आहेत किंवा यापूर्वी ती किती तीव्र होती.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या टेपरींग योजना फक्त सुरुवातीचे आधारबिंदू आहेत आणि ते तुमच्या अनुभवाप्रमाणे बदलले पाहिजेत.
जर तुम्हाला टेपरींग करण्यात काही अडचण नसेल तर
जर तुम्हाला डोस कमी करण्यास अजिबात अडचण येत नसेल, तर तुम्ही तुमच्या टेपरींग योजनेचा वेग वाढवू शकता. तुम्ही डोस कमी करण्याच्या टप्प्यांमध्ये कमी वेळ ठेवू शकता किंवा कमी टप्पे घेऊ शकता. हे तुम्ही तुमचे औषध आवश्यकतेपेक्षा जास्त काळ घेत नाहीत याची खात्री करण्यास मदत करू शकते.
जर तुम्हाला औषध बंद केल्यामुळे दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे जाणवली तर
जर तुम्हाला औषध बंद केल्यामुळे दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे खूप तीव्रपणे जाणवत असतील, तर तुमची टेपरींग योजना थांबवली पाहिजे किंवा आणखी सावकाश रितीने केली पाहिजे. याचा अर्थ असा असू शकतो:
- डोस लहान प्रमाणात कमी करणे
- डोस कमी करण्यापूर्वी अधिक कालावधी ठेवणे
- वरील दोन्ही
आम्ही या दोन टेपरींग योजना पद्धतींसाठी योग्य ठरू शकणारी अशी काही सामान्यतः वापरली जाणारी अँटीडिप्रेसंट औषधे सुचवली आहेत. या संसाधनाच्या शेवटी दिलेल्या परिशिष्टांमध्ये अधिक उदाहरणे समाविष्ट आहेत.
या संसाधनाच्या शेवटी असलेल्या परिशिष्ट १ मधील 'मध्यम, कमी किंवा सर्वात कमी धोका' स्तंभांमध्ये दिलेली अँटीडिप्रेसंट औषधे घेत असलेल्या लोकांसाठी उदाहरण १ प्रारंभ बिंदू म्हणून योग्य ठरू शकते.
- सिटालोप्राम (Citalopram)
- एस्सिटालोप्राम (Escitalopram)
- फ्लुवॉक्सामीन (Fluvoxamine)
- सर्ट्रालाइन (Sertraline)
- ट्राझोडोन (Trazodone)
- फ्लुओक्सेटीन (Fluoxetine)
- अमिटरिप्टिलिन (Amitriptyline)
परिशिष्ट १ मधील 'सर्वात जास्त धोका' स्तंभात दिलेली अँटीडिप्रेसंट औषधे घेणार्या लोकांसाठी उदाहरण २ प्रारंभ बिंदू म्हणून योग्य ठरू शकते.
- डुलोक्सेटिन (Duloxetine)
- मिर्ताझापाइन (Mirtazapine)
- पॅरॉक्सेटिन (Paroxetine)
- वेनलाफॅक्सिन (Venlafaxine)
याचे कारण असे की औषध बंद केल्यामुळे दिसून येणाऱ्या प्रत्याहरण लक्षणांचा धोका जितका जास्त असेल, तितक्या हळूहळू तुम्हाला डोस कमी करावा लागेल.
तथापि, तुम्ही कोणते उदाहरण अनुसराल हे तुमच्या वैयक्तिक गरजांवर अवलंबून असेल. केवळ एक योजना निवडून परिस्थिती काहीही असली तरी तीच काटेकोरपणे पाळण्याऐवजी तुम्हाला जाणवणाऱ्या औषध बंद केल्यामुळे दिसून येणाऱ्या प्रत्याहरण लक्षणांनुसार तुम्ही तुमच्या टेपरींग योजनेमध्ये गरजेप्रमाणे बदल करत गेले पाहिजे.
मी अँटीडिप्रेसंट औषधाचे लहान डोस कसे घ्यावे?
काही लोकांना हळूहळू कमी करत त्यांच्या अँटीडिप्रेसंट औषधाच्या गोळीच्या स्वरूपात उपलब्ध असलेल्या सर्वात लहान डोसपेक्षा कमी डोसवर जावे लागेल. औषध बंद केल्यामुळे दिसून येणारी प्रत्याहरण लक्षणे निर्माण होऊ नयेत म्हणून हे करावे लागते. हे करण्यासाठी, तुम्ही सिरप स्वरूपातील अँटीडिप्रेसंट औषध वापरून ते पातळ करू शकता.
खालील उदाहरण औषधाचा डोस हळूहळू कमी करण्यासाठी सिरप स्वरूपातील अँटीडिप्रेसंट औषध पातळ करण्याच्या तत्त्वांना समजून घेण्यास मदत करू शकते. खालीलप्रमाणे प्रक्रियेची जबाबदारी घेताना तुम्हाला आत्मविश्वास वाटावा यासाठी तुमच्या डॉक्टरांशी किंवा फार्मासिस्टशी चर्चा करणे अधिक योग्य ठरेल.
उदाहरण
या उदाहरणात, तुमच्याकडे एक सिरप स्वरूपातील अँटीडिप्रेसंट औषध आहे.
सिरपसह एक ड्रॉपर यंत्रणा दिली जाते जी एका वेळी औषधाचा एक थेंब काढते. हा एक थेंब साधारणपणे ०.०५ मिली असतो आणि त्यात २ मिग्रॅ औषध असते.
हे औषध हळूहळू बंद करण्यासाठी तुम्हाला २ मिग्रॅ पेक्षा कमी डोस घेण्याची गरज आहे, पण ड्रॉपरमुळे ते शक्य होत नाही.
लहान डोस मोजण्यासाठी तुम्हाला बाटलीतील ड्रॉपर काढून ओरल सिरिंज वापरावी लागेल.
कमी तीव्रतेचे द्रव्य तयार करण्यासाठी तुम्हाला हे सिरप पाण्याने पातळसुद्धा करावे लागू शकते. कारण ओरल सिरिंजने अचूकपणे मोजता येणारे सर्वात कमी सिरप साधारण ०.२ मिली असते.
तुम्ही ओरल सिरिंजचा वापर करून सिरप स्वरूपातील अँटीडिप्रेसंट औषध आणि पाणी यांचे अचूक प्रमाण मोजू शकता. या सिरिंज १ मिली, ५ मिली आणि १० मिली आकारात उपलब्ध असतात.
या सिरिंज तुम्ही फार्मसीतून किंवा ऑनलाइन खरेदी करू शकता किंवा तुम्हाला मोफत औषधपत्रिका मिळत असल्यास डॉक्टरांना त्या लिहून देण्यास सांगू शकता.
उदाहरणासाठी सूचना
या उदाहरणात, तुम्ही ४० मिग्रॅ/ मिली सिरप स्वरूपातील अँटीडिप्रेसंट औषध वापरत आहात. याचा अर्थ असा की या औषधाच्या प्रत्येक १ मिली मध्ये ४० मिग्रॅ औषध असते.
त्यामुळे, या सिरप स्वरूपातील अँटीडिप्रेसंट औषधाच्या प्रत्येक ०.५ मिली मध्ये २० मिग्रॅ औषध असते.
तुमचा उद्देश फक्त १ मिग्रॅ औषध घेणे आहे. हे करण्यासाठी तुम्हाला पुढील गोष्टी लागतील:
- १ मिली ओरल सिरिंज
- झाकण असलेले एक पात्र हलवल्यावर गळणार नाही
- तुमचे सिरप स्वरूपातील अँटीडिप्रेसंट औषध
टप्पे
- १ मिली ओरल सिरिंज वापरून सिरप स्वरूपातील अँटीडिप्रेसंट औषधाचे ०.५ मिली मोजून घ्या
- हे पात्रामध्ये घाला
- तुमची १० मिली ओरल सिरिंज वापरून ९.५ मिली पाणी मोजून घ्या
- हे पाणी सिरप स्वरूपातील अँटीडिप्रेसंट औषध असलेल्या पात्रामध्ये घाला
- पात्र जोरात हलवून चांगले मिसळा
- यामुळे तुम्हाला १० मिली पातळ केलेले मिश्रण मिळेल, ज्यामध्ये २० मिग्रॅ औषध असेल
- तुमची १ मिली ओरल सिरिंज पाण्याने स्वच्छ करा
- स्वच्छ केलेल्या सिरिंजचा वापर करून या पातळ केलेल्या मिश्रणामधून ०.५ मिली घ्या, ज्यामध्ये १ मिग्रॅ औषध असेल
- उरलेले विरघळलेले पातळ केलेले मिश्रण फेकून द्या*
याच पद्धतीचा वापर करून तुम्ही इतर डोसही तयार करू शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला पुढील गोष्टी माहिती असणे आवश्यक आहेत:
- तुम्ही वापरत असलेल्या सिरप स्वरूपातील अँटीडिप्रेसंट औषधामध्ये किती प्रमाणात औषध आहे (हे वेगवेगळ्या अँटीडिप्रेसंट औषधांसाठी वेगवेगळे असते)
- गोळीच्या स्वरूपातील समतुल्य डोस, जो नेहमी सारखाच असेल असे नाही (उदाहरणार्थ, सिरप स्वरूपातील ८ मिग्रॅ सिटालोप्राम (citalopram) हे गोळीच्या स्वरूपातील १० मिग्रॅ सिटालोप्राम (citalopram) इतके समतुल्य असते
यामुळे तुम्हाला अँटीडिप्रेसंट औषधाचे लहान डोस तयार करणे शक्य होईल आणि डोस अधिक सावकाश रितीने कमी करण्याची योजना पाळता येईल.
टेपरींग योजना सुरू करण्यापूर्वी नेहमी तुमच्या डॉक्टरांशी बोला.
*उत्पादकाच्या माहितीपत्रकानुसार (याला ‘Summary of Product Characteristics’ असेही म्हणतात), एकदा पाण्यात मिसळल्यानंतर हे मिश्रण ‘तात्काळ वापरावे’. याचा अर्थ असा की तुमचा पातळ केलेल्या मिश्रणाचा डोस घेतल्यानंतर तुम्ही उरलेले मिश्रण फेकून द्यावे आणि पुढच्या वेळी औषध घेताना नवीन मिश्रण तयार करावे. तुम्ही वापरत असलेल्या औषधाचे उत्पादक माहितीपत्रक तुमच्या डॉक्टरांकडून मागून घ्या.
टेपरींगचे इतर प्रकार
अँटीडिप्रेसंट औषधाच्या सिरप स्वरूपाचा वापर वर स्पष्ट केला गेला आहे. टेपरींगसाठी अँटीडिप्रेसंट औषधांचे लहान डोस तयार करण्याच्या इतरही पद्धती आहेत.
ही माहिती लोकांना टेपरींगच्या विविध पद्धतींबद्दल माहिती देण्यासाठी आहे. तुमच्या डॉक्टरांशी प्रथम चर्चा केल्याशिवाय यापैकी कोणतीही पद्धत वापरण्याचा तुम्ही प्रयत्न करू नये.
गोळीचे भाग करणे
सर्व गोळ्या जरी त्यांच्या मध्यभागी रेघ असली तरी त्यांचे भाग करण्यासाठी योग्य असतातच असे नाही हे करण्यापूर्वी तुमच्या फार्मसिस्ट किंवा डॉक्टरांशी सल्लामसलत करा. गोळीचे भाग करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे गोळीचे कटर वापरणे. हे कसे करायचे हे गोळीच्या आकारावर अवलंबून असते:
- गोलाकार गोळ्या, जर त्या खूप लहान नसतील तर साधारणपणे अर्ध्या किंवा चार भागांत विभागल्या जाऊ शकतात.
- कॅपलेट्स किंवा कॅप्सूल-आकाराच्या गोळ्या कधी कधी मध्ये रेघ असलेल्या असतात, ज्यामुळे त्या अर्ध्या मोडता येतात. हे टॅब्लेट कटरने अधिक अचूकपणे करता येते.
टॅब्लेट कटरमध्ये साधारणपणे गोळीचे तुकडे गोळा करण्यासाठी ट्रे किंवा इतर व्यवस्था असते.
तुम्हाला गोळीचे किती प्रमाण घ्यायचे आहे यावर अवलंबून तुम्ही गोळीचे अर्धे किंवा पाव भाग करू शकता. टॅब्लेट कटर वापरून पाव भागांपेक्षा लहान भाग अचूकपणे करणे शक्य नसते.
गोलाकार नसलेल्या गोळ्या साधारणपणे फक्त अर्ध्या भागात अचूक विभागू शकता. तुम्ही अशा आकाराच्या गोळ्या पाव भागांत विभागण्याचा प्रयत्न करू नये, कारण ते अचूक होणार नाही.
उदाहरण
तुमच्याकडे ४० मिग्रॅची गोळी आहे आणि तुम्हाला १० मिग्रॅ घ्यायचे आहे.
काही गोळ्यांमध्ये हे एका गोळीचे चार भाग करून करता येऊ शकते, जोपर्यंत गोळी तुकडे करताना फुटून विखुरत नाही. हे करण्यासाठी प्रथम टॅब्लेट कटर वापरून गोळीचे दोन भाग कराल. त्यानंतर यातील प्रत्येक अर्धा भाग घेऊन तुम्ही त्याला कापून अर्धा कराल.
अशा प्रकारे तुम्हाला चार पाव भाग मिळतील ज्यापैकी प्रत्येकात साधारण १० मिग्रॅ औषध असेल.
पुढील चार डोससाठी तुम्ही यापैकी एक पाव भाग घ्याल. याचा अर्थ असा की जरी पाव भाग पूर्णपणे सारखे कापले गेले नसले तरी तुम्ही एकूण घेतलेले औषध योग्य प्रमाणात राहील.
दाणे मोजणे किंवा त्यांचे वजन करणे
काही औषधे, जसे व्हेनलाफॅक्सिन (Venlafaxine) आणि ड्युलोक्सेटीन (Duloxetine), कॅप्सूलच्या स्वरूपात असतात आणि त्यामध्ये लहान ‘स्लो रिलीज’ दाणे असतात. याचा अर्थ असा की या दाण्यांवर असे एक आवरण असते जे आतले औषध शरीरात हळूहळू सोडते. तुम्ही घेत असलेल्या ब्रँडमध्ये असे दाणे आहेत का याची तुमच्या फार्मासिस्टकडून खात्री करून घ्या, कारण सर्व ब्रँडमध्ये हे असतेच असे नाही.
अशा परिस्थितीत, कॅप्सूल काळजीपूर्वक उघडून दाणे एका पात्रात काढता येतात. हे दाणे मोजून किंवा त्यांचे वजन करून कमी डोस तयार करता येतो. कॅप्सूलमधून बाहेर काढल्यानंतर हे दाणे स्थिर राहतात असे मानले जाते. याचा अर्थ असा की ते घेण्यापूर्वी तुम्ही ते काही दिवस हवाबंद बाटलीमध्ये प्रकाशापासून सुरक्षित (उदा. तपकिरी रंगाची औषधाची बाटली) ठेवू शकता.
उदाहरण
तुमच्याकडे ७५ मिग्रॅची व्हेनलाफॅक्सिन (venlafaxine) कॅप्सूल आहे. तुम्ही त्यातील दाणे बाहेर काढता आणि ते मोजता.
कॅप्सूलमध्ये २०० दाणे आहेत. याचा अर्थ १६० दाण्यांमध्ये ६० मिग्रॅ व्हेनलाफॅक्सिन (venlafaxine) असेल.
हे लक्षात ठेवा की या दाण्यांच्या आकारात काही प्रमाणात फरक असू शकतो. म्हणून दाणे मोजण्यापेक्षा त्यांचे वजन करणे अधिक अचूक असू शकते. अशा लहान प्रमाणांचे वजन करण्यासाठी विशेष वजनकाटा आणि हवेच्या झोतामुळे व्यत्यय न येणारे वातावरण आवश्यक असते.
हे दाणे गिळण्यापूर्वी तुम्ही ते पुन्हा कॅप्सूलमध्ये भरावेत. व्हेनलाफॅक्सिन (Venlafaxine) दाणे गिळायला सोपे व्हावे म्हणून एक चमचाभर दह्यावर टाकता येतात, जेणेकरून त्यांच्यामुळे तुमच्या घशाला त्रास होणार नाही. ड्युलोक्सेटीन (Duloxetine) चे दाणे अन्न किंवा द्रव्यामध्ये मिसळू नयेत.
कॅप्सूलमधील पावडर पाण्यात मिसळणे
काही कॅप्सूलमध्ये पावडर असते. जसे NHS Specialist Pharmacy Service (एनएचएस स्पेशॅलिस्ट फार्मसी सर्विस) ने मांडलेल्या रुपरेषेनुसार, या कॅप्सूल उघडून त्यातील सामग्री पाण्यात विखुरता येते.
उदाहरण
तुमच्याकडे २० मिग्रॅची कॅप्सूल आहे. तुम्हाला ४ मिग्रॅ अँटीडिप्रेसंट औषध घ्यायचे आहे.
तुम्ही कॅप्सूलमधील पावडर १०० मिली पाण्यात मिसळा. या मिश्रणात आता प्रत्येक ५ मिली मध्ये १ मिग्रॅ औषध असेल.
यानंतर तुम्ही सिरिंज वापरून या मिश्रणातील २० मिली घ्या, ज्यात ४ मिग्रॅ औषध असेल.
तयार केलेले कोणतेही मिश्रण घेण्यापूर्वी ते जोरात हलवावे, जेणेकरून औषध द्रव्यामध्ये समान प्रमाणात मिसळले गेल्याची खात्री होईल. तुम्हाला आवश्यक तेवढे तुम्ही घेतल्यानंतर उरलेले द्रव्य तुम्ही फेकून द्याल याची खात्री करा.
गोळ्या पाण्यात मिसळणे
गोळीच्या स्वरूपातील अनेक अँटीडिप्रेसंट औषधे पाण्यात टाकली की तुटून जातात आणि पाण्यात मिसळतात. या प्रक्रियेला विघटन असे म्हणतात. हे बहुतेक वेळा काही मिनिटांत होते, पण काही वेळा थोडा अधिक वेळ लागू शकतो. गोळी विघटित झाल्यानंतर तिच्यातील घटक लिक्वीडमध्ये समान पसरावेत म्हणून मिश्रण ढवळावे किंवा हलवावे लागते.
गोळी आधी चमचाच्या मागच्या बाजूने चुरडल्यास ही प्रक्रिया अधिक जलद होऊ शकते.
उदाहरण
तुमच्याकडे २० मिग्रॅची गोळी आहे पण तुम्हाला २ मिग्रॅ घ्यायचे आहे.
तुम्ही ती गोळी १०० मिली पाण्यात मिसळा. या मिश्रणात प्रत्येक ५ मिली मिश्रणामध्ये १ मिग्रॅ औषध असेल.
यानंतर तुम्ही सिरिंज वापरून या मिश्रणातील १० मिली घेऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला २ मिग्रॅ औषध मिळेल.
हे मिश्रण घेण्यापूर्वी ते जोरात हलवावे, जेणेकरून औषध मिश्रणामध्ये समान प्रमाणात पसरले गेले असल्याची खात्री करता येईल. तुम्हाला आवश्यक तेवढे तुम्ही घेतल्यानंतर उरलेले द्रव्य तुम्ही फेकून द्याल याची खात्री करा.
परिशिष्ट १: प्रत्येक अँटीडिप्रेसंट औषधामुळे औषध बंद केल्यामुळे दिसून येणाऱ्या प्रत्याहरण लक्षणांचा संभाव्य धोका
सर्वाधिक संभाव्य धोका | मध्यम संभाव्य धोका | कमी संभाव्य धोका | सर्वात कमी संभाव्य धोका | |||
| डेस्वेनलाफॅक्सिन (Desvenlafaxine) | अमिटरिप्टिलिन (Amitriptyline) | डोसुलेपिन (Dosulepin) | ऍगोमेलेटिन (Agomelatine) | |||
| डुलोक्सेटिन (Duloxetine) | बुप्रोपियन (Bupropion) | मियांसेरीन (Mianserin) | लोफेप्रमीन (Lofepramine) | |||
| आयसोकॅर्बोक्साझिड (Isocarboxazid) | सिटालोप्राम (Citalopram) | त्रिमिप्रामाइन (Trimipramine) | ||||
| मिर्ताझापाइन (Mirtazapine) | क्लोमीप्रामाइन (Clomipramine) | व्होर्टिओक्सेटीन (Vortioxetine) | ||||
| मोक्लोबेमाइड (Moclobemide) | देसीप्रामाइन (Desipramine) | |||||
| पॅरॉक्सेटिन (Paroxetine) | डॉक्सपिन (Doxepin) | |||||
| फेनेलझिन (Phenelzine) | एस्सिटालोप्राम (Escitalopram) | |||||
| ट्रॅनिलसिप्रोमाइन (Tranylcypromine) | फ्लुओक्सेटीन (Fluoxetine) | |||||
| वेनलाफॅक्सिन (Venlafaxine) | फ्लुवॉक्सामीन (Fluvoxamine) | |||||
| इमिप्रामाइन (Imipramine) | ||||||
| मिलनासिप्रन (Milnacipran) | ||||||
| नेफाझोडोन (Nefazodone) | ||||||
| नॉर्ट्रिप्टाईलाइन (Nortriptyline) | ||||||
| रीबॉक्सेटीन (Reboxetine) | ||||||
| सर्ट्रालाइन (Sertraline) | ||||||
| ट्राझोडोन (Trazodone) | ||||||
| विलाझोडोन (Vilazodone) |
परिशिष्ट २: औषध बंद केल्यामुळे दिसून येणाऱ्या प्रत्याहरण लक्षणांचे संभाव्य प्रकार
शारीरिक लक्षणे | झोपेची लक्षणे | भावनिक लक्षणे |
| मळमळ | निद्रानाश | चिंता |
| डोकेदुखी | स्वप्ने अधिक पडणे | नैराश्य |
| चक्कर येणे | तीव्र किंवा स्पष्ट स्वप्ने | घाबरल्यासारखे वाटणे |
| पोटात मुरडा येणे | भयानक स्वप्ने | अस्वस्थता |
| जुलाब | चिडचिड | |
| थकवा | मनस्थितीतील बदल | |
| फ्लूसारखी लक्षणे | ||
| विजेच्या झटकेसारख्या संवेदना (‘झॅप्स’) | ||
| भूक कमी होणे | ||
| दृष्टीतील बदल (दुहेरी दिसणे; दृश्यात्मक माग दिसणे) | ||
| हृदयाचे धडधडणे | ||
| हृदयाचे ठोके चुकणे | ||
| घाम येणे | ||
| त्वचा लाल होणे | ||
| थरथरणे | ||
| कानात वाजणे | ||
| आतून अस्वस्थ वाटणे आणि स्थिर बसता न येणे (अकॅथिसिया) | ||
परिशिष्ट ३: तपशीलवार टेपरींग योजना उदाहरण २
टप्पा | डोस (मिग्रॅ) | गोळ्या किंवा सिरप |
| १ | ४० | गोळ्या |
| २ | ३५ | अर्ध्या गोळ्या* किंवा सिरप |
| ३ | ३० | गोळ्या |
| ४ | २५ | अर्ध्या गोळ्या* किंवा सिरप |
| ५ | २२ | सिरप |
| ६ | २० | गोळ्या |
| ७ | १८ | सिरप |
| ८ | १६ | सिरप |
| ९ | १४ | सिरप |
| १० | १३ | सिरप |
| ११ | १२ | सिरप |
| १२ | ११ | सिरप |
| १३ | १० | सिरप किंवा गोळी |
| १४ | ९ | सिरप |
| १५ | ८.१ | सिरप |
| १६ | ७.२ | सिरप |
| १७ | ६.५ | सिरप |
| १८ | ५.९ | सिरप |
| १९ | ५.३ | सिरप |
| २० | ४.८ | सिरप |
| २१ | ४.३ | सिरप |
| २२ | ३.९ | सिरप |
| २३ | ३.५ | सिरप |
| २४ | ३.१ | सिरप |
| २५ | २.८ | सिरप |
| २६ | २.५ | सिरप |
| २७ | २.२ | सिरप |
| २८ | १.९ | सिरप |
| २९ | १.७ | सिरप |
| ३० | १.४ | सिरप |
| ३१ | १.२ | सिरप |
| ३२ | १ | सिरप |
| ३३ | ०.८ | सिरप |
| ३४ | ०.६४ | सिरप |
| ३५ | ०.५ | सिरप |
| ३६ | ०.३ | सिरप |
| ३७ | ०.१५ | सिरप |
| ३८ | ० |
*सर्व गोळ्या अर्ध्या करण्यासाठी योग्य नसतात. हे करण्यापूर्वी तुमच्या फार्मसिस्ट किंवा डॉक्टरांशी सल्लामसलत करा.
श्रेय
ही माहिती रॉयल कॉलेज ऑफ सायकियाट्रिस्टस यांच्या पब्लिक एंगेजमेंट एडिटोरियल बोर्ड (पीइइबी) (Royal College of Psychiatrists’ Public Engagement Editorial Board (PEEB)) यांनी तयार केली आहे. लेखनाच्या वेळी उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम पुराव्यांवर ती आधारित आहे.
तज्ञ लेखक:
- Professor Wendy Burn, माजी अध्यक्ष, रॉयल कॉलेज ऑफ सायकायट्रिस्टस (Royal College of Psychiatrists)
- Dr Mark Abie Horowitz BA BSc MBBS MSc PhD, Clinical Research Fellow (NELFT), Honorary Clinical Research Fellow (UCL)
- George Roycroft, Head of Policy and Campaigns, रॉयल कॉलेज ऑफ सायकायट्रिस्टस (Royal College of Psychiatrists)
- Professor David Taylor MSc PhD FFRPS FRPharmS, Professor of Psychopharmacology (KCL)
आम्ही Royal College of General Practitioners, The Royal Pharmaceutical Society आणि The College of Mental Health Pharmacy यांचे या कामाला समर्थन दिल्याबद्दल, तसेच ज्यांनी टिप्पणी केली व याच्या विकासाला सहाय्य केले अशा सर्व संबंधितांचे आभारी आहोत.