प्रतिअवसादी

Antidepressants

Below is a Marathi translation of our information resource on antidepressants. You can also read our other Marathi translations.

ही माहिती अशा लोकांसाठी आहे ज्यांना प्रतिअवसादिंबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. हे ते कसे कार्य करतात, ते का लिहून दिले जातात, त्यांचे परिणाम आणि दुष्परिणाम, आणि वैकल्पिक उपचारांचे वर्णन करते.

प्रतिअवसादी काय आहेत?

प्रतिअवसादी हे असे औषधोपचार आहेत जे उदासीनता, चिंता विकार आणि इतर काही परिस्थितींपासून मुक्त होण्यास मदत करतात. ते प्रथम 1950 मध्ये विकसित केले गेले होते आणि तेव्हापासून ते नियमितपणे वापरले जात आहेत. त्यांच्या पाच मुख्य श्रेणी आहेत:

  • एसएसआरआय (सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रीअपटेक इनहिबिटर)
  • एसएनआरआय (सेरोटोनिन आणि नॉरएड्रेनलिन रीअपटेक इनहिबिटर)
  • एनएएसएसए (नॉरअड्रेनलिन आणि विशिष्ट सेरोटोनिनर्जिक अँटीडिप्रेसंट्स)
  • ट्रायसायक्लिक्स
  • एमएओआई (मॉनोआमीन ऑक्सिडेस इनहिबिटर).

प्रतिअवसादींच्या इतर श्रेणी आहेत, ज्या आज सामान्यपणे उपचार म्हणून लिहून दिल्या जातात:

  • टेट्रासायक्लिक्स
  • एसएआरआई (सेरोटोनिन अँटॅगॉनिस्ट आणि रिअपटेक इनहिबिटर)
  • एनआरडीआई (नोरेपिनेफ्रीन डोपामिन रिअपटेक इनहिबिटर).

हे संसाधन नैराश्याच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी प्रतिअवसादी कसे वापरले जातात यावर लक्ष केंद्रित करते. परंतु, या संसाधनातील बरीच माहिती इतर परिस्थितींसाठी प्रतिअवसादी घेत असलेल्या लोकांसाठी उपयुक्त ठरेल.

प्रतिअवसादी घेणे सुरक्षितपणे कसे थांबवायचे याच्या माहितीसाठी, आमचे प्रतिअवसादी थांबवण्याची साधने पहा.

प्रतिअवसादी कश्या काम करतात?

बऱ्याच इतर औषोषधांसारखे, आपल्याला प्रतिपाव्साधींचे कार्य नेमके असे सांगता नाही येणार. आपल्याला माहित आहे की ते आपल्या मेंदूतील विशिष्ट रसायनांच्या क्रियाकलापांवर परिणाम करतात. त्यांना न्यूरोट्रांसमीटर म्हणतात, आणि ते एका मेंदूच्या पेशीपासून दुसऱ्या पेशीला संकेत देतात. सेरोटोनिन आणि नॉरअड्रेनलिन हे न्यूरोट्रांसमीटर प्रतिअवसादिंमुळे सर्वातात जास्त प्रभावित होतात.

तथापि, संशोधन असे सूचित करते की प्रतिअवसादी मेंदूवर अनेक मार्गांनी कार्य करतात जे सामान्य रासायनिक अभिक्रियांच्या पलीकडे जातात. हे संशोधन सूचित करते की ते:

  • तणावाखाली शरीराची प्रतिक्रिया प्रभावित करतात
  • आपली नकारात्मक विचारसरणी सुधारतात
  • मेंदूच्या पेशींना होणारे नुकसान थांबवतात किंवा उलट करतात.

प्रतिअवसादी कशासाठी वापरले जातात?

सौम्य नैराश्यासाठी प्रतिअवसादी सहसा लिहून देऊ नये. परंतु, मध्यम ते गंभीर अवसादग्रस्त आजार असलेल्या प्रौढांसाठी त्यांची शिफारस केली जाते. हे तेव्हा जेव्हा नैराश्य एखाद्याच्या जीवनाची गुणवत्ता लक्षणीयरीत्या कमी करत असते आणि त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करते. अँटीडिप्रेसंट्स स्वतंत्रपणे किंवा मानसोपचारांच्या संयोजनात वापरली जाऊ शकतात.

ते सामान्यतः मुले आणि पौगंडावस्थेतील मुलांसाठी वापरले जाऊ नये, जोपर्यंत त्यांच्या नैराश्यात:

  • कुठल्याही इतर प्रक्रियांनी बदल झालेला नाही
  • किंवा अवस्था विशेषतः गंभीर आहे.

प्रतिअवसादी इतर काही परिस्थितींसाठी देखील लिहून दिले जाऊ शकतात, जसे की:

तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला प्रतिअवसादी घेण्याचा सल्ला का दिला आहे हे स्पष्ट केले पाहिजे. त्यांनी प्रतिअवसादी घेण्याचे संभाव्य फायदे आणि जोखीम देखील सांगितले पाहिजे.

प्रतिअवसादी किती चांगले काम करतात?

संशोधनात असे दिसून आले आहे की प्रतिअवसादी प्रौढांमधील मध्यम आणि तीव्र नैराश्याची लक्षणे कमी करण्यास मदत करतात. पण वेगवेगळ्या लोकांना या औषधांचा खूप वेगळा अनुभव असतो.

काही लोक कालांतराने प्रतिअवसादिंशिवाय बरे होतात. तथापि, सामान्यतः लोक प्रतिअवसादी वापरल्यानंतर त्यांच्या लक्षणांमध्ये आणि जीवनाच्या गुणवत्तेत सुधारणा पाहतात. विशेषतः जेव्हा त्यांचे नैराश्य अधिक तीव्र असते तेव्हा हे जाणवते. काही लोकांना असे आढळून येते की प्रतिअवसादी त्यांच्या नैराश्याची लक्षणे कमी करतात परंतु त्यांचे दुष्परिणाम आव्हानात्मक असतात. इतरांना असे आढळते की प्रतिअवसादी त्यांच्यासाठी उपयुक्त ठरत नाहीत.

जर तुमच्या डॉक्टरांनी एखादे प्रतिअवसादी लिहून दिले असेल, तर तुम्ही निरीक्षण करण्यासाठी ते घेणे सुरू केल्यानंतर सुमारे दोन आठवड्यांनी त्यांनी तुम्हाला पुनरावलोकन द्यावे:

  • तुम्हाला कसे वाटत आहे
  • तुम्हाला दुष्परिणाम होत आहेत का
  • आणि तुम्हाला प्रतिअवसादी घेत राहण्याची गरज आहे का.

प्रतिअवसादी ते बाह्य घटक काढून टाकू शकत नाहीत ज्यामुळे तुम्हाला नैराश्य येऊ शकते. उदाहरणार्थ, जर तुम्ही कामावर खूप तणावाखाली असाल किंवा तुम्हाला शोक वाटत असेल, तर प्रतिअवसादी नक्कीच या गोष्टी दूर करू शकणार नाहीत. तथापि, ते नैराश्याच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात आणि या बाह्य घटकांचा सामना करणे सोपे करू शकतात. हे एक कारण आहे की ते अनेकदा मनोचिकित्सांसोबत वापरले जातात.

प्रतिअवसादी औषधांचे दुष्परिणाम असतात का?

सर्व औषधांचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्ही प्रतिअवसादी वापरण्यास सहमती देण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांनी तुमच्याशी याबद्दल चर्चा केली पाहिजे. तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भूतकाळात असलेल्या किंवा झालेल्या कोणत्याही वैद्यकीय परिस्थितीबद्दल सांगावे. ते तुमच्यासाठी शिफारस करत असलेल्या प्रतिअवसादींच्या प्रकारावर याचा परिणाम होऊ शकतो.

खाली काही दुष्परिणाम दिले आहेत जे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिअवसादिंमुळे अनुभवास येऊ शकतात. तुम्ही घेत असलेल्या औषधांसोबत येणाऱ्या पत्रकांमध्ये याची संपूर्ण माहिती असेल.

औषधांच्या दुष्परिणामांची यादी चिंताजनक दिसत असली तरी, बहुतेक लोकांसाठी हे सौम्य असतील. जेव्हा तुमच्या शरीराला औषधाची सवय होईल तेव्हा ते सामान्यतः काही आठवड्यांत बंद होतील.

एसएसआरआई (सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रीअपटेक इनहिबिटर) आणि एसएनआरआई (सेरोटोनिन आणि नॉरएड्रेनलिन रीअपटेक इनहिबिटर)

  • चिडचिड, थरकाप किंवा चिंताग्रस्त वाटणे. यामुळे अनेकदा लोक त्यांचे प्रतिअवसादी घेणे बंद करतात, विशेषत: जर त्यांना त्याबद्दल चेतावणी दिली गेली नसेल. परंतु, हा दुष्परिणाम सामान्यतः प्रतिअवसादी सुरू केल्यानंतर काही आठवड्यांनी कमी होतो.
  • आजारी वाटणे किंवा आजारी पडणे
  • अपचन किंवा पोटदुखी
  • अतिसार किंवा बद्धकोष्ठता
  • भूक न लागणे
  • चक्कर येणे
  • अंधुक दृष्टी
  • तोंड कोरडे पडणे
  • घाम येणे
  • नीट झोप येत नाही (निद्रानाश), किंवा खूप झोप येते
  • डोकेदुखी
  • कामवासना कमी होणे
  • संभोग किंवा हस्तमैथुन दरम्यान कामोत्तेजना प्राप्त करण्यात अडचणी
  • पुरुषांमध्ये, ताठरता (इरेक्टाइल डिसफंक्शन) मिळवण्यात किंवा राखण्यात अडचणी येतात.

एसएसआरआय घेणे बंद केल्यानंतर क्वचितच लोकांना अधिक सतत लैंगिक दुष्परिणाम जाणवू शकतात. या लक्षणांचे वर्णन करण्यासाठी 'पोस्ट एसएसआरआय सेक्शुअल डिसफंक्शन' (पीएसएसडी) हा शब्द काही लोक वापरतात. या लोकांसाठी, पीएसएसडी चा त्यांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण आणि त्रासदायक परिणाम होऊ शकतो.

हे का घडते आणि ते किती सामान्य आहे हे समजून घेण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे. सतत लैंगिक दुष्परिणाम अनुभवणाऱ्या लोकांना योग्य आणि वेळेवर आधार मिळणे महत्त्वाचे आहे.

एनएएसएसए (नॉरअड्रेनलिन आणि विशिष्ट सेरोटोनिनर्जिक अँटीडिप्रेसंट्स)

एनएएसएसए चे दुष्परिणाम एसएसआरआई सारखेच आहेत. ते तुम्हाला तंद्री लावू शकतात आणि तुमचे वजन वाढवू शकतात, परंतु ते कमी लैंगिक समस्या निर्माण करतात. 

ट्रायसायक्लिक्स

यामुळे (खालील) होऊ शकतात:

  • तोंड कोरडे पडणे
  • दृष्टीची थोडीशी अस्पष्टता
  • बद्धकोष्ठता
  • लघवी करताना समस्या
  • तंद्री येणे
  • चक्कर येणे
  • वजन वाढणे
  • जास्त घाम येणे (विशेषतः रात्री)
  • हृदयाच्या लय समस्या, जसे की लक्षात येण्याजोगे धडधडणे किंवा वेगवान हृदयाचा ठोका (टाकीकार्डिया).

एसएसआरआई/एसएनआरआई प्रमाणे, हे दुष्परिणाम सामान्यतः सौम्य असतात आणि काही आठवड्यांत ते बंद होतात.

एमएओआई (मॉनोआमीन ऑक्सिडेस इनहिबिटर)

एमएओआई हे प्रतिअवसादिंचा एक वर्ग आहेत जे कमी सामान्यपणे लिहून दिले जातात. ते फक्त तज्ञांद्वारे वापरले जातात. याचे मुख्य कारण असे आहे की जे लोक ते घेतात त्यांना कठोर आहाराचे पालन करणे आवश्यक आहे जे जास्त प्रमाणात टायरामाइन (अमीनो ऍसिड) असलेले पदार्थ टाळतात. या आहाराचे पालन न केल्यास, धोकादायक उच्च रक्तदाब विकसित होण्याचा धोका असतो. सर्वसाधारणपणे, एमएओआई चांगले सहन केले जातात. ते काही विशिष्ट परिस्थितींमध्ये प्रभावी असू शकतात जेथे इतर प्रतिअवसादी काम करत नाही किंवा अप्रिय दुष्परिणाम होऊ शकतात. 

तुम्ही कोणत्याही प्रकारचे प्रतिअवसादी वापरत असाल आणि काही आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारे किंवा असह्य होणारे दुष्परिणाम अनुभवत असाल तर तुमच्या डॉक्टरांशी बोला. तुम्हाला तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबियांना सांगणे देखील उपयुक्त वाटू शकते की तुम्ही प्रतिअवसादी सुरू करत आहात. तुम्हाला साइड इफेक्ट्स होत असल्यास हे त्यांना तुमची मदत करण्यास मदत करू शकते.

परिणामासह तुम्ही घेत असलेल्या अँटीडिप्रेसंटच्या संपूर्ण माहितीसाठी, कृपया इलेक्ट्रॉनिक मेडिसिन कंपेंडियम (ईएमसी) ला भेट द्या. पृष्ठाच्या शीर्षस्थानी असलेल्या शोध बॉक्समध्ये औषधाचे नाव टाइप करा. जेव्हा तुम्हाला तुमची औषधे दिली जातात तेव्हा तुम्हाला या माहितीची कागदी प्रत देखील दिली पाहिजे. तुम्हाला एखादे न मिळाल्यास, तुमच्या फार्मासिस्टला तुम्हाला ते देण्यास सांगा.

प्रतिअवसादी आणि आत्महत्येचे विचार

नैराश्यामुळे तुम्हाला आत्महत्येची भावना येऊ शकते. जेव्हा काही लोक अँटीडिप्रेसस घेऊ लागतात तेव्हा त्यांच्या आत्महत्येच्या विचारांमध्ये वाढ होते. मुलांमध्ये आणि पौगंडावस्थेमध्ये असे होण्याचा धोका जास्त असू शकतो. यामुळे, जर त्यांना प्रतिअवसादी लिहून दिली असतील, तर डॉक्टरांनी किंवा इतर आरोग्यसेवा व्यावसायिकांनी आत्महत्येच्या विचारांवर त्यांचे बारकाईने निरीक्षण केले पाहिजे.

हे खूप महत्वाचे आहे की जर तुम्हाला आत्महत्येचे विचार किंवा भावना येत असतील, तर तुम्ही ते लगेच तुमच्या डॉक्टरांना कळवा. ते सुचवू शकतात की तुम्ही तुमचे प्रतिअवसादी घेणे थांबवा.

तुम्हाला स्वत:ला इजा होण्याचा धोका वाटत असल्यास, 999 वर कॉल करा किंवा तुमच्या जवळच्या A&E वर जा.

तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत नसल्यास, परंतु मदत हवी असल्यास, NHS 111 वर कॉल करा.

ड्रायव्हिंग किंवा मशीनरी चालवण्याबद्दल काय?

काही प्रतिअवसादी तुम्हाला झोपेचा त्रास देतात आणि तुमच्या प्रतिक्रिया कमी करतात, त्यामुळे तुम्ही वाहन चालवत असाल किंवा मशिनरी चालवत असाल तर ते घेऊ शकत नाही. खात्री करण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि औषधांसोबत आलेले पत्रक पहा.

तुमची स्थिती किंवा औषधांमुळे तुमच्या वाहन चालविण्याच्या क्षमतेवर परिणाम होत असल्यास, तुम्ही ड्रायव्हर अँड व्हेईकल लायसन्सिंग एजन्सी (डीविएलए) ला कळवावे.

प्रतिअवसादी थांबवणे कसे वाटते?

प्रतिअवसादी थांबवणे काही लोकांसाठी कठीण असते, तर इतर लोक तुलनेने सहज थांबू शकतात.

प्रतिअवसादी कधीही लगेच थांबवू नये. आम्ही प्रतिअवसादी थांबवण्यासाठी एक वेगळा माहिती संसाधन विकसित केला आहे जो या क्षेत्राचा तपशीलवार विचार करतो. हे हळूहळू कसे थांबवायचे याबद्दल सल्ला देते.

प्रतिअवसादी थांबवल्याच्या काही दिवसांत माघार लक्षणे दिसतात आणि त्यात हे समाविष्ट होते:

  • डोकेदुखी
  • हलकेपणा
  • मळमळ
  • झोपण्यात अडचण
  • ज्वलंत किंवा भयावह स्वप्ने
  • विजेसारख्या संवेदना (ज्याला 'झॅप्स' असेही म्हणतात)
  • जलद मूड बदल, यासह चिंता आणि चिडचिडही.

जर उदासीनता काही आठवड्यांनंतर किंवा महिन्यांनंतर परत येत असेल, तर हे बहुधा माघारीच्या लक्षणांऐवजी मूळ स्थितीत परत येण्यामुळे होते.

तुम्ही आमच्या स्टॉपिंग एंटिडप्रेसेंट्स माहिती संसाधनामध्ये याबद्दल अधिक जाणून घेऊ शकता.

प्रतिअवसादी व्यसनाधीन आहेत किंवा तुम्ही त्यांच्यावर अवलंबून राहू शकता?

काही लोक जेव्हा एंटिडप्रेसन्ट्स वापरणे थांबवतात तेव्हा ते अप्रिय माघार लक्षणे अनुभवतात. बऱ्याच लोकांमध्ये, काही आठवड्यांत प्रतिअवसादींचे डोस हळूहळू कमी करून ही माघार लक्षणे कमी केली जाऊ शकतात. परंतु काही लोकांना ते पुन्हा घेणे सुरू करावे लागेल आणि ते आणखी हळूहळू कमी करावे लागेल.

तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही ते घेणे थांबवू शकत नसाल तर तुम्हाला प्रतिअवसादींचे व्यसन आहे असे वाटू शकते. हे 'व्यसनी' असण्यासारखे नाही.

व्यसनाचा सामान्यतः अर्थ असा होतो की आपल्याला:

  • पदार्थ वापरण्याची इच्छा किंवा लालसा जाणवणे
  • पदार्थाच्या वापरावरील नियंत्रण गमावणे
  • जेव्हा तुम्ही ते वापरता तेव्हा आनंद किंवा 'उच्च' अनुभवणे.

अल्कोहोल, निकोटीन आणि बेंझोडायझेपाइन्स सारख्या पदार्च व्यसन होऊ शकते.

प्रतिअवसादी घेणे थांबवणे कठीण होऊ शकते, परंतु याचे शारीरिक अवलंबित्व म्हणून अधिक अचूकपणे वर्णन केले जाऊ शकते.

'शारीरिक अवलंबित्व' हा शब्द व्यसनाशी गोंधळलेला आहे. शारीरिक अवलंबित्वाचा अर्थ असा आहे की आपले शरीर एखाद्या पदार्थ किंवा औषधाच्या उपस्थितीशी जुळवून घेते.

यामुळे सहिष्णुता आणि माघार लक्षणे निर्माण होतात कारण ते निघून गेल्यावर शरीराला त्याची ‘आठवण’ येते . अवलंबित्व निर्माण होण्यासाठी औषधाला 'नशेचा अनुभव' तयार करण्याची गरज नाही.

मला कोणत्या प्रकारच्या प्रतिअवसादिंची शिफारस करण्यात आली आहे?

येथे तुम्हाला सामान्य वापरात असलेल्या प्रतिअवसादिंची यादी, त्यांची यूकेमधील व्यापारी नावे आणि ते कोणत्या गटात आहेत याची यादी मिळू शकते.

औषधोपचार

व्यापार नाव

गट

अमिट्रिप्टिलाइन ट्रिप्टिझोल ट्रायसायक्लिक
ऍगोमेलेटिन वाल्डोक्सन इतर*
बुप्रोपियन झायबान एनडीआरआई
सितालोप्रम सिप्रामिल सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रीअपटेक इनहिबिटर (एसएसआरआई)
क्लोमीप्रामाइन अनफ्रनिल ट्रायसायक्लिक
देसीप्रामाइन नॉरप्रमीन ट्रायसायक्लिक
डेस्वेनलाफॅक्सिन प्रिस्टिक सेरोटोनिन आणि नॉरएड्रेनलिन रीअपटेक इनहिबिटर (एसएनआरआई)
डोसुलेपिन प्रोथियाडेन ट्रायसायक्लिक
डॉक्सपिन सिनेक्वान ट्रायसायक्लिक
ड्युलोक्सेटीन सिम्बाल्टा, एंट्रेव्ह सेरोटोनिन आणि नॉरएड्रेनलिन रीअपटेक इनहिबिटर (एसएनआरआई)
एस्किटालोप्रम सिप्रॅलेक्स सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रीअपटेक इनहिबिटर (एसएसआरआई)
फ्लूओक्सेटिन प्रोझॅक सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रीअपटेक इनहिबिटर (एसएसआरआई)
फ्लुवोक्सामीन फावेरीन सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रीअपटेक इनहिबिटर (एसएसआरआई)
इमिप्रामाइन तोफ्रानील ट्रायसायक्लिक
आयसोकॅर्बोक्साझिड मारप्लान एमएओआई
लोफेप्रमीन गामानील ट्रायसायक्लिक
मियांसेरीन टोलवोन टेट्रासायक्लिक
मिलनासिप्रन ऐक्सेल आणि सावेल्ला सेरोटोनिन आणि नॉरएड्रेनलिन रीअपटेक इनहिबिटर (एसएनआरआई)
मिर्तझापाइन झिसपिन नॉरअड्रेनलिन आणि विशिष्ट सेरोटोनिनर्जिक अँटीडिप्रेसंट्स (एनएएसएसए)
मोक्लोबेमाइड मॅनेरिक्स एमएओआई
नेफाझोडोन सर्झोन एसएआरआई
नॉर्ट्रिप्टाईलाइन ऍलेग्रॉन ट्रायसायक्लिक
पॅरोक्सेटीन सेरोक्सॅट सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रीअपटेक इनहिबिटर (एसएसआरआई)
फेनेलझिन नार्दील एमएओआई
रीबॉक्सेटीन एड्रोनॅक्स सेरोटोनिन आणि नॉरएड्रेनलिन रीअपटेक इनहिबिटर (एसएनआरआई)
सर्ट्रालाइन लस्ट्रल सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रीअपटेक इनहिबिटर (एसएसआरआई)
ट्रॅनिलसिप्रोमाइन पारनेट एमएओआई
ट्रॅझोडोन मोलीपॅक्सिन ट्रायसायक्लिक-संबंधित
त्रिमिप्रामाइन सुरमोंटिल ट्रायसायक्लिक
व्हेनलाफॅक्सिन एफएक्सोर सेरोटोनिन आणि नॉरएड्रेनलिन रीअपटेक इनहिबिटर (एसएनआरआई)
विलाझोडोन व्हायब्रीड सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रीअपटेक इनहिबिटर (एसएसआरआई)
व्होर्टिओक्सेटीन ब्रिन्टेलिक्स सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रीअपटेक इनहिबिटर (एसएसआरआई)

*हे प्रतिअवसादी सेरोटोनिनचे नियमन करते परंतु अभिजात प्रतिअवसादिंच्या तुलनेत वेगळ्या प्रकारे. हे मेलाटोनिनवर देखील कार्य करते जे झोपेशी निगडित संप्रेरक आहे.

ही सर्व प्रतिअवसादिंची संपूर्ण यादी नाही. इतर औषधे आहेत जी कधीकधी विशेषज्ञ परिस्थितींमध्ये वापरली जातात.

गर्भधारणा आणि स्तनपानाबद्दल काय?

बर्याच लोकांना गर्भधारणेपूर्वी, दरम्यान आणि नंतर शारीरिक किंवा मानसिक आरोग्य समस्यांसाठी औषधे घेणे आवश्यक होऊ शकते. काही औषधे अनेक वर्षांपासून गरोदरपणात वापरली जात आहेत. इतर काही औषधे गरोदारपणात धोकादायक ठरतात (उदा. सोडियम व्हॅल्प्रोएट).

गरोदारपणात किंवा स्तनपानाच्या काळात प्रतिअवसादी औषधे सुरू ठेवावीत, बदलावी की थांबवावीत, याबाबतचा निर्णय सोपा किंवा सरळ नसतो. विचार करण्यासारखे अनेक घटक असतात, त्यामध्ये यांचा समावेश होतो:

  • आपण घेत असलेले औषधोपचार
  • आपला वैयक्तिक आजाराचा इतिहास
  • उपचाराला आपली प्रतिक्रिया
  • आपली मते.

गरोदारपणात औषधे (प्रतिअवसादीसह) घेण्यामुळे होणारा कोणताही धोका, उपचार न घेतल्यास आजारी पडण्याच्या धोक्याच्या तुलनेत तोलून पाहणे आवश्यक असते. आपल्याला आपल्या जी.पी. किंवा मानसोपचार तज्ञासोबत काळजीपूर्वक चर्चा करावी लागेल.

संशोधन अभ्यासांमध्ये गरोदारपणादरम्यान प्रतिअवसादी औषधे घेतलेल्या अनेक हजार महिलांचा अभ्यास करण्यात आला आहे. हे अभ्यास नेहमी सोपे समजणे शक्य नसते, कारण बाळांच्या परिणामांवर अनेक घटकांचा परिणाम होतो. आपले जी.पी. किंवा मानसोपचारतज्ज्ञ आपल्या वैयक्तिक परिस्थितीत विविध औषधांबाबत चालू संशोधन काय सांगते हे समजून घेण्यास मदत करू शकतात.

गरोदारपणात अनेक महिला प्रतिअवसादी औषधे घेतात. एसएसआरआय सारखी अधिक वापरली जाणारी प्रतिअवसादी औषधे आणि गरोदारपणात त्यांचा वापर याबाबत अधिक माहिती उपलब्ध आहे. व्हॉर्टिऑक्सेटीन सारख्या नवीन प्रतिअवसादी औषधांबाबत मात्र खूपच कमी माहिती उपलब्ध आहे. आपण वैयक्तिक प्रतिअवसादी औषधांबाबतची माहिती Best Use of Medications in Pregnancy website यावर पाहू शकता.

जर आपण अद्याप गर्भवती नसाल

शक्य असल्यास, गर्भवती होण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करावी. तथापि, अनेक गर्भधारणा नियोजित नसतात आणि आपण आधीच गर्भवती असताना औषधांबाबत निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता असते.

जर आपण आधीच गर्भवती असाल

जर आपण आधीच गर्भवती असाल, तर शक्य तितक्या लवकर आपल्या डॉक्टरांना भेटा. आपल्या डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय औषधे अचानक बंद करणे टाळणे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रतिअवसादी औषधे अचानक बंद केल्याने मानसिक आरोग्याच्या समस्यांचा पुन्हा उद्रेक होऊ शकतो. यामुळे अप्रिय दुष्परिणामही होऊ शकतात. औषधे बंद करणे सुरक्षित आहे का हे ठरवण्यापूर्वी, आपल्या पूर्वीच्या आजाराच्या तीव्रतेबद्दल विचार करणे आवश्यक आहे. गर्भावस्थेत औषधे बंद केल्यानंतर अनेक महिलांना आजाराचा पुन्हा उद्रेक होतो.

अधिक माहितीसाठी, आमचे गर्भावस्थेतील मानसिक आरोग्य या विषयावरील माहितीपत्रक पहा.

मला प्रतिअवसादी औषधे किती काळ घ्यावी लागतील?

आपण प्रतिअवसादी औषधे किती काळ घ्याल हे, ती औषधे का लिहून दिली गेली आणि आपण ती यापूर्वी घेतली आहेत का यावर अवलंबून असते.

जर आपण पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा प्रतिअवसादी औषधे घेत असाल, तर तब्येत सुधारल्यानंतर किमान सहा महिने ती सुरू ठेवणे चांगले. त्या आधी औषधे बंद केल्यास, नैराश्याची लक्षणे पुन्हा येण्याची शक्यता जास्त असते. जर यापूर्वी आपल्याला नैराश्याचे अनेक टप्पे आले असतील, तर ही औषधे अधिक काळ घ्यावी लागण्याची शक्यता असते. तथापि, औषधे कधी आणि कशी बंद करावीत याबद्दल आपल्या डॉक्टरांशी सतत चर्चा होणे आवश्यक आहे.

आपण आजारी पडण्यामागे कोणते घटक कारणीभूत ठरले असतील, याबद्दल विचार करणे महत्त्वाचे ठरते. कधी कधी नैराश्यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या अचानक उद्भवतात आणि त्यामागे कोणतेही स्पष्ट कारण नसते. तथापि, आपल्या आयुष्यातील काही कठीण गोष्टींनी आपल्याला आजारी पडण्यास हातभार लावला असू शकतो. उदा., आर्थिक ताण, एकटेपणा किंवा नोकरी जाणे. कधी कधी असे ताण पूर्णपणे टाळता येत नाहीत. तथापि, भविष्यात पुन्हा आजारी पडण्याची शक्यता कमी करण्यासाठी आपण काही गोष्टी करू शकता.

नैराश्य पुन्हा आल्यास काय करावे?

कधी कधी, तब्येत चांगली ठेवण्यासाठी आपण शक्य तितके प्रयत्न केले तरीही नैराश्य पुन्हा येते. असे झाल्यास, आपण खालील गोष्टी करण्याची गरज भासू शकते:

  • आपल्या जी.पी. (सामान्य वैद्य) यांच्याशी सल्लामसलत करून पुन्हा प्रतिअवसादी औषधे घेणे
  • आपले प्रतिअवसादी औषध बदलणे
  • किंवा टॉकिंग थेरपीज सारखा दुसरा उपचार प्रकार आजमावून पाहणे.

काही लोकांना तब्येत चांगली ठेवण्यासाठी प्रतिअवसादी औषधे दीर्घकाळ घ्यावी लागतात. आपण प्रतिअवसादी औषधे बंद करू शकाल अशी आशा असल्यास, हे निराशाजनक वाटू शकते. तथापि, भविष्यात पुन्हा प्रतिअवसादी औषधे बंद करण्याची शक्यता असू शकते हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. याचा अर्थ असा नाही की आपण ‘अपयशी’ ठरलात.

जर मी प्रतिअवसादी औषधे घेतली नाहीत तर काय होईल?

हे सांगणे कठीण आहे. हे त्या औषधे का लिहून दिली गेली, आपले नैराश्य किती गंभीर आहे आणि ते किती काळापासून आहे यावर अवलंबून आहे. कधी कधी नैराश्य कोणत्याही उपचारांशिवाय किंवा टॉकिंग थेरपीज सारख्या इतर उपचारांमुळे सुधारते.

प्रतिअवसादी औषधे घेतल्याने आपण टॉकिंग थेरपीसारख्या इतर उपचारांमध्ये सहभागी होणे सोपे होऊ शकते. यामुळे टॉकिंग थेरपी अधिक परिणामकारकही ठरू शकते.

आपल्याला प्रतिअवसादी औषधे लिहून देण्यापूर्वी, आपल्या डॉक्टरांनी या विषयावर आपल्याशी चर्चा करावी. प्रतिअवसादी औषधे घेण्याचे आणि न घेण्याचे फायदे व धोके आपण पूर्णपणे समजून घेतले आहेत, याची खात्री त्यांनी करून घ्यावी.

प्रतिअवसादी औषधांबाबत मला आणखी काय माहिती असणे आवश्यक आहे?

प्रतिअवसादी औषधे घेत असाल, तर खालील काही गोष्टी आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतात:

  • जर आपण घेत असलेल्या प्रतिअवसादी औषधांमुळे त्रास होत असेल, तर आपल्या डॉक्टरांशी बोला. ते आपल्याला असा औषधप्रकार किंवा डोस शोधण्यात मदत करतील, जो आपल्यासाठी परिणामकारक असेल आणि ज्यामुळे असह्य दुष्परिणाम होणार नाहीत. आपण अनेक ॲंटीडिप्रेसंट औषधे वापरून पाहिली असतील, तर ते पर्यायी उपायांचा विचार करू शकतात.
  • दुष्परिणाम झाल्यास त्यापासून घाबरू नका. हे दुष्परिणाम अप्रिय असू शकतात आणि त्यामुळे काही लोक ॲंटीडिप्रेसंट औषधे घेणे थांबवतात हे समजण्यासारखे आहे. तथापि, बहुतेक दुष्परिणाम दोन आठवड्यांच्या आत कमी होतात. शक्य असल्यास, औषधे बंद करण्यापूर्वी हा कालावधी थांबण्याचा प्रयत्न करा. तथापि, दुष्परिणाम असह्य होत असतील किंवा आपल्याला आत्महत्येचे विचार येत असतील, तर त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
  • औषधाचा एकही डोस चुकवू नका, कारण त्यामुळे आपल्याला औषधे अचानक बंद केल्यासारखी लक्षणे जाणवू शकतात. जर एखादा डोस चुकला, तर पुढचा डोस नेहमीप्रमाणे घ्या. चुकलेला डोस भरून काढण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त औषधे घेऊ नका.
  • बहुतेक लोकांना प्रतिअवसादी औषधे परिणाम दाखवण्यासाठी 1-2 आठवडे लागतात असे आढळते. काही लोकांना पूर्ण परिणाम जाणवण्यासाठी 6 आठवडे लागू शकतात. आपल्या प्रतिअवसादी औषधांचा फायदा अजून जाणवत नसेल, तरी ती काही आठवडे सुरू ठेवण्याचा प्रयत्न करा, औषधे बंद करण्यापूर्वी. आपल्याला सुधारणा जाणवू शकते.
  • दारू पिण्याबाबत आपल्या डॉक्टरांशी बोला. बहुतेक प्रतिअवसादी औषधांचा दारूसोबत वाईट परिणाम होत नाही. तथापि, काही प्रतिअवसादी औषधे घेत असताना दारू पिल्यास आपण आजारी पडू शकता किंवा झोप येऊ शकते, किंवा दारूचा परिणाम वाढू शकतो.
  • आपल्याला वाटत असेल की प्रतिअवसादी औषधांचा आपल्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहे, तर आपल्या डॉक्टरांशी बोला.
  • प्रतिअवसादी औषधे काही अन्नपदार्थ आणि औषधांशी परस्परसंवाद करू शकतात. उदा., द्राक्षफळाचा रस हे सर्ट्रालिन या प्रतिअवसादी औषधाशी परस्परसंवाद करू शकते. आपल्या प्रतिअवसादी औषधांचा कोणत्याही अन्नपदार्थ किंवा औषधांशी परस्परसंवाद होतो का, हे आपण आपल्या डॉक्टरांना किंवा औषध विक्रेत्याला विचारावे, तसेच आपल्या प्रिस्क्रिप्शनसोबत दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी. आपण नवे औषध सुरू करत असाल, तर त्यासोबत दिलेली माहिती तपासा, जेणेकरून त्याचा आपल्या प्रतिअवसादी औषधाशी परस्परसंवाद होत नाही याची खात्री करता येईल.

नैराश्यासाठी आणखी कोणते उपचार उपलब्ध आहेत?

टॉकिंग थेरपीज (मानसशास्त्रीय थेरपी)

नैराश्यासाठी उपयुक्त अशा अनेक टॉकिंग थेरपीज उपलब्ध आहेत. हे उपचार अनेकदा पहिल्या पर्यायाप्रमाणे सुचवले जातात किंवा ॲंटीडिप्रेसंट औषधांसोबत वापरले जातात.

  • काउन्सेलिंग – सौम्य नैराश्यात काउन्सेलिंग उपयुक्त ठरू शकते आणि समस्या सोडवण्याच्या पद्धती विकसित करण्यात मदत करू शकते. आपल्या आयुष्यातील अडचणींमुळे नैराश्य आले असल्यास, काउन्सेलिंग उपयुक्त ठरते.
  • कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी (CBT) – CBT आपले विचार, कृती आणि भावना यांच्यातील संबंध ओळखण्यास शिकवून आपली मानसिक अवस्था सुधारण्यात मदत करू शकते. इतर मानसशास्त्रीय थेरपीपेक्षा हे आपल्या भूतकाळावर कमी आणि वर्तमानात काय घडत आहे यावर अधिक लक्ष केंद्रित करते.

या व इतर प्रकारच्या मानसोपचारांबाबत अधिक माहितीसाठी, आमची खालील माहिती पहा:

इतर औषधोपचार

प्रतिअवसादी औषधे घेतल्यानंतरही सुधारणा झाली नाही तर, आपले डॉक्टर दुसरे औषध वापरून पाहण्याचा सल्ला देऊ शकतात. यामध्ये खालीलपैकी काही पर्यायांचा समावेश असू शकतो (सध्याचे प्रतिअवसादी औषध वाढवणे किंवा बदलणे):

  • वेगळ्या प्रकारचे दुसरे प्रतिअवसादी
  • ॲंटीसायकॉटिक औषधे (उदा., ॲरिपिप्राझोल, ओलँझपीन, क्वेटायपीन किंवा रिस्पेरिडोन)
  • लिथियम
  • लॅमोट्रिजीन
  • ट्रायआयोडोथायरॉनिन (लायोथायरॉनिन)

हे पर्याय यूकेमध्ये सामान्यपणे वापरले जातात. तथापि, कृपया लक्षात घ्या की ही यादी सर्वसमावेशक नाही.

इलेक्ट्रोकॉन्व्हल्सिव्ह थेरपी (ईसीटी)

इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी (ECT) हा काही प्रकारच्या गंभीर मानसिक आरोग्य स्थितीवर प्रभावी उपचार आहे. मनोचिकित्सा किंवा औषधोपचार यांसारखे इतर उपचार पर्याय यशस्वी ठरले नाहीत किंवा एखादी व्यक्ती अतिशय आजारी असून तातडीच्या उपचारांची गरज आहे, अशा वेळी ECT चा विचार केला जाऊ शकतो.

वनौषधींचे उपचार

हर्बल उपचार हे वनस्पतींपासून तयार केले जातात आणि यूकेमध्ये NHS द्वारे लिहून दिले जात नाहीत.

काही हर्बल उपचार नैराश्य असलेल्या लोकांवर सकारात्मक परिणाम करतात असे दिसून आले आहे. यापैकी एक हायपेरिकम आहे, जे सेंट जॉन्स वॉर्ट नावाच्या औषधी वनस्पतीपासून तयार केले जाते. हर्बल उपचार असल्यामुळे, यावर कमी संशोधन झाले आहे आणि त्याची विक्री कशी करावी याबाबत कमी नियम आहेत. आपण ते कुठून खरेदी करता यावर त्यातील प्रमाण बदलू शकते.

सेंट जॉन्स वॉर्ट हे SSRI प्रतिअवसादी औषधे आणि इतर औषधांसोबत घेतल्यास धोकादायक ठरू शकते. ते गर्भनिरोधक गोळ्यांसारख्या इतर औषधांच्या प्रभावातही अडथळा आणू शकते. कोणतेही हर्बल उपचार घेण्याचा विचार करत असल्यास, आधी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करा.

सर्वसाधारण आरोग्य

आपल्या एकूण आरोग्याबद्दल विचार करणे महत्त्वाचे आहे. स्वतःला चांगले वाटण्यासाठी आणि पुन्हा नैराश्य होण्याची शक्यता कमी करण्यासाठी अनेक गोष्टी करता येतात. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होऊ शकतो:

  • कोणीतरी असा व्यक्ती शोधणे ज्याच्याशी आपण बोलू शकता
  • शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे
  • दारू कमी पिणे आणि अमली पदार्थ न घेणे
  • चांगले आहार घेणे – उदा., जास्त मासे, फळे आणि भाजीपाला खाणे
  • आराम मिळवण्यासाठी स्व-सहाय्य तंत्रांचा वापर करणे
  • नैराश्याला कारणीभूत ठरलेल्या कोणत्याही व्यवहार्य समस्या सोडवण्याचे मार्ग शोधणे
  • पीअर सपोर्ट – आपल्या सारखीच समस्या असलेल्या लोकांना भेटणे आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आपल्यासाठी योग्य असलेल्या पीअर सपोर्ट गटांबद्दल आपल्या जी.पी. यांच्याशी चर्चा करा.

स्वयं-मदतयाबाबत काही टिप्ससाठी, आमचे नैराश्य या विषयावरील माहितीपत्रक पहा.

सोशल प्रिस्क्रायबिंग

सोशल प्रिस्क्रायबिंग म्हणजे लोकांना त्यांच्या परिसरातील सामुदायिक सेवा आणि गटांशी जोडणे होय. यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला आधार मिळू शकतो.

उदा., जर आपल्याला बागकामाची आवड असेल, तर सोशल प्रिस्क्रायबिंगद्वारे आपल्याला आपल्या जवळच्या साप्ताहिक बागकाम गटाशी जोडले जाऊ शकते. यामुळे आपण इतर लोकांना भेटू शकाल आणि आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी एकत्र करण्यासाठी वेळ घालवू शकाल.

याबद्दल अधिक माहितीसाठी आमचे सोशल प्रिस्क्रायबिंग साधन पहा.

प्रकाश

काही लोकांना ऋतू बदलामुळे त्यांच्या मनःस्थितीवर परिणाम झाल्यासारखे वाटते. याला सिझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर (SAD) असे म्हणतात. जर आपण दर हिवाळ्यात नैराश्यात जात असाल पण दिवस लांब होऊ लागले की सुधारणा होत असेल, तर लाइट बॉक्स आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. हे तेजस्वी प्रकाशाचे एक साधन असते, जे दररोज ठराविक वेळेसाठी लावले जाते आणि हिवाळ्यातील प्रकाशाच्या कमतरतेची भरपाई करण्यात मदत करू शकते. आपल्याला SAD होत असल्याचा संशय असल्यास आपल्या डॉक्टरांशी बोला.

मी आणखी माहिती कुठे मिळेल?

प्रतिअवसादी औषधांबाबत आपल्याला काही प्रश्न असल्यास, येथे दिलेल्या इतर माहिती स्रोतांकडे पहा किंवा आपल्या डॉक्टरांशी बोला.

श्रेय नामावली

ही माहिती रॉयल कॉलेज ऑफ सायकायट्रिस्टस (Royal College of Psychiatrists) यांच्या पब्लिक एंगेजमेंट एडिटोरियल बोर्ड (पीइइबी) ने तयार केली आहे. ही माहिती लेखनाच्या वेळी उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम पुराव्यांवर आधारित आहे.

मुख्य लेखक: प्रोफेसर वेंडी बर्न

तज्ञ पुनरावलोकन: रॉयल कॉलेज ऑफ सायकायट्रिस्टस (Royal College of Psychiatrists) ची मनोऔषधशास्त्र कमिटी

अनुभवाधारित तज्ज्ञ: फियोना रेज आणि व्हिक्टोरिया ब्रिजलंड

विनंती केल्यास पूर्ण संदर्भ उपलब्ध होईल.

This translation was produced by CLEAR Global (Sep 2025)