अत्यंत क्लेशकारक घटनेनंतर त्या अनुभवाचा सामना करणे

Coping after a traumatic event

Below is a Marathi translation of our information resource on coping after a traumatic event. You can also read our other Marathi translations.

ही माहिती ज्यांनी स्वतः एखाद्या क्लेशकारक घटनेचा अनुभव घेतला आहे किंवा जे असा अनुभव घेतलेल्या इतर एखाद्या व्यक्तीला ओळखतात अशा लोकांसाठी आहे.

एक अत्यंत क्लेशकारक घटना म्हणजे काय?

बऱ्याच लोकांना आयुष्यभर वेदनादायक घटनांचा अनुभव येत राहतो. इंग्लंडमधील सुमारे एक तृतियांश प्रौढांनी त्यांच्या आयुष्यभरात किमान एक अत्यंत क्लेशकारक घटना अनुभवल्याचे नोंदवले आहे.

क्लेशकारक घटनांमध्ये पुढील घटनांचा समावेश असू शकतो:

  • एखाद्याला मरताना पाहणे किंवा आपण स्वतः मेलो असतो असे वाटणे
  • गंभीर रितीने जखमी होणे किंवा
  • लैंगिक हिंसाचाराचा अनुभव येणे.

खालीलपैकी एखाद्या रितीने लोक अत्यंत क्लेशकारक घटनांना सामोरे जाऊ शकतात:

  • थेट – हे त्यांच्या बाबतीत घडले
  • साक्षीदार – त्यांनी हे दुसर्‍या एखाद्या व्यक्तीबरोबर घडताना पहिले
  • कळणे – त्यांना असे कळले की हे त्यांच्या अगदी जवळच्या एखाद्या व्यक्तीबरोबर घडले आहे
  • वारंवार सामना होणे – त्यांचा स्वतःचा वारंवार अशा क्लेशकारक घटनांशी सामना होणे किंवा वारंवार इतर लोकांवर परिणाम करणाऱ्या घटनांशी सामना होणे. आपल्याला हे देखील माहीत आहे की ज्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमे, टेलिव्हीजन, चित्रपट किंवा नोकरीच्या ठिकाणी पाहिलेली दृष्ये यांच्याद्वारे क्लेशकारक घटनांचा सामना करावा लागतो अशा काही व्यक्तींना देखील मानसिक आरोग्य समस्यांचा त्रास होऊ शकतो.

क्लेशकारक घटनांमध्ये साधारणपणे पुढील अनुभव समाविष्ट असू शकतात:

  • हिंसक मृत्यू होताना पाहणे
  • गंभीर अपघात उदाहरणार्थ मोटारीचा अपघात
  • शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार
  • गंभीर आरोग्य समस्या किंवा अतिदक्षता विभागात राहावे लागणे
  • गुंतागुंतीच्या बाळंतपणाचे अनुभव
  • एखाद्या जीवघेण्या आजाराचे निदान होणे
  • युद्ध आणि संघर्ष
  • दहशतवादी हल्ले
  • नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती, उदाहरणार्थ त्सुनामी किंवा आग

हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की येथे नमूद न केलेल्या अशा अनेक घटना आहेत ज्या अत्यंत क्लेशकारक वाटू शकतात. जर तुमचा अनुभव येथे नमूद केलेला नसेल, तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही मदत आणि आधार घेऊ नये.

काही लोकांच्या नोकर्‍या अशा असतात की त्यांना कामावर असताना क्लेशकारक घटनांचा अनुभव येण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये पुढील नोकऱ्यांचा समावेश असू शकतो:

  • आपत्कालीन सेवा कर्मचारी (उदाहरणार्थ पोलीस, अग्निशामक दलाचे जवान किंवा आपत्कालीन रुग्णसेवा)
  • सामाजिक कार्यकर्ते
  • अतिदक्षता विभाग कर्मचारी
  • लष्करी कर्मचारी आणि युद्ध क्षेत्रात काम करणारे इतर लोक

एखाद्या क्लेशकारक घटनेनंतर मला कसे वाटेल?

एखाद्या क्लेशकारक घटनेनंतर, लोकांना साधारणपणे खालीलपैकी काही गोष्टींचा अनुभव येतो:

  • आठवणी, स्वप्ने आणि फ्लॅशबॅक  – तुम्हाला कदाचित त्या घटनेच्या त्रासदायक आठवणी, स्वप्ने किंवा दचकून उठवणारी भयानक स्वप्ने येत असतील. तुम्हाला कदाचित ती घटना पुन्हा घडत असल्यासारखा देखील अनुभव येत असेल (याला फ्लॅशबॅक म्हणतात).
  • त्या घटनेची आठवण करून दिल्यावर अस्वस्थ वाटणे  – ती घटना जिथे घडली त्या ठिकाणाजवळ असताना किंवा त्या घटनेची आठवण करून देणाऱ्या वातावरणात असताना तुम्हाला विशेष अस्वस्थ वाटत असेल.
  • भावना आणि परिस्थिती टाळणे – तुम्ही त्या घटनेशी संबंधित आठवणी, विचार, भावना, गोष्टी, लोक आणि ठिकाणे टाळत असाल.
  • स्मरण कमी होणे  – तुम्हाला कदाचित त्या घटनेचे काही भाग लक्षात राहणार नाहीत.
  • त्रासदायक भावना – यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो:
    • स्वतःबद्दल, इतरांबद्दल किंवा जगाबद्दल नकारात्मक भावना येणे
    • जे घडले त्यासाठी स्वतःला किंवा इतरांना दोष देणे
    • भीती, भय, राग, अपराधीपणा किंवा लाज यासारख्या नकारात्मक भावना येणे
    • इतरांबद्दल आनंद, समाधान किंवा प्रेम अनुभवण्यात अक्षम असणे
  • तुमच्या वागण्याच्या पद्धतीत बदल येणे – यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो:
    • ज्या गोष्टी केल्याने तुम्हाला पूर्वी आनंद होत असे त्या गोष्टी न करणे किंवा त्यात स्वारस्य नसणे
    • इतर लोकांपासून अलिप्तपणाची भावना येणे
    • हलगर्जीपणे किंवा स्वतःला इजा होईल अशा प्रकारे वागणे
    • इतर लोक किंवा गोष्टींचा राग करणे आणि आक्रमक बनणे
    • अतिदक्ष राहणे किंवा ‘सतत पाळत’ ठेवणे

अशा सारखीच लक्षणे एखाद्या पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पी टी एस डी) असलेल्या व्यक्तीला होऊ शकतात. तथापि क्लेशकारक घटना अनुभवणाऱ्या प्रत्येकाला पी टी एस डी होईलच असे नाही. खरं तर अत्यंत क्लेशकारक घटनांचा अनुभव आलेल्या बहुतेक लोकांना त्याचा नकारात्मक प्रभाव कालांतराने निघून गेल्याचे जाणवते.

या भावना निघून जायला किती वेळ लागेल?

एखाद्या क्लेशकारक घटनेच्या अनुभवातून बरे होण्यासाठी काही दिवस, आठवडे किंवा महिने लागू शकतात.

जर एखाद्या व्यक्तीला महिन्याभरानंतरही थोडा त्रास होत असेल, परंतु या भावना हळूहळू सुधारत असतील, तर कदाचित ते बरे होतील आणि त्यांना उपचारांची आवश्यकता भासणार नाही.

तथापि जर त्यांना होणाऱ्या लक्षणीय त्रासामध्ये जर एका महिन्यानंतरही अजिबात सुधारणा जाणवत नसेल किंवा तीन महिन्यांहून अधिक कालावधी नंतरही त्रास होत असेल तर हे त्यांच्यामध्ये पी टी एस डीविकसित झाल्याचे लक्षण असू शकते. 

जर मी एखाद्या अत्यंत क्लेशकारक घटनेचा अनुभव घेतला असेल तर मी काय करावे?

या काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही एखाद्या अत्यंत क्लेशकारक घटनेचा अनुभव घेतल्यानंतर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे:

स्वतःला वेळ द्या

एखाद्या क्लेशकारक घटनेतून बरे होण्यासाठी वेळ लागू शकतो. जे घडले ते स्वीकारण्यासाठी किंवा त्यासोबत जगायला शिकण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो. जर एखाद्याचा मृत्यू झाला असेलकिंवा तुम्ही तुमच्यासाठी महत्त्वाचे असे काहीतरी गमावले असेल तर तुम्हाला दुःख होणे आवश्यक आहे. लगेच बरे वाटण्यासाठी स्वतःवर दबाव आणू नका.

त्या घटनेविषयी बोला

एखाद्या अत्यंत क्लेशकारक घटनेनंतर तुम्हाला त्या प्रसंगाची आठवण करून देणार्‍या गोष्टी टाळाव्या आणि जे घडले त्याबद्दल बोलणे टाळावे असे वाटू शकते. तथापि संशोधनात असे दिसून आले आहे की ती घटना आणि त्याविषयी तुमच्या भावनांबद्दल बोलणे तुम्हाला अधिक संवेदनक्षम होण्यास मदत करू शकते. आठवणी आणि भावना टाळल्यामुळे लोकांना जास्त वाईट वाटू लागल्याचे दिसून आले आहे.

तुमच्यासारखेच अनुभव घेतलेल्या इतरांशी बोला

त्याच क्लेशकारक प्रसंगाचा अनुभव घेतलेल्या इतर लोकांशी किंवा ज्यांना इतर त्या सारखेच अनुभव आले आहेत अशा लोकांशी बोलण्याने तुम्हाला मदत होऊ शकते. तथापि एकाच प्रसंगाच्या अनुभवातून वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतींनी बरे होतात आणि त्यांच्या प्रतिक्रियाही वेगवेगळ्या असतात. तुमच्या स्वतःच्या बरे होण्याची तुलना इतर कोणाशी न करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही स्वतःला त्या घटनेचा परिणाम झालेल्या इतरांना आधार देण्यास सक्षम समजत असाल तर ते देखील उपयुक्त ठरू शकते.

आधारासाठी मदत मागा

एखाद्या क्लेशकारक घटनेनंतर मित्र, कुटुंबीय किंवा तुमचा विश्वास असलेल्या इतर लोकांकडून मदत मागणे तुम्हाला त्या अनुभवाचा चांगल्या प्रकारे सामना करण्यास मदत करू शकते. भावनिक आधार देण्याबरोबरच ते तुम्हाला व्यावहारिक कामांमध्ये मदत करू शकतात किंवा तुमच्यासोबत ‘सामान्य’ गोष्टी करण्यात वेळ घालवू शकतात.

बराच वेळ एकटे राहणे टाळा

एखाद्या क्लेशकारक घटनेच्या अनुभवानंतर इतर लोकांच्या आसपास असण्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य खराब होण्याची शक्यता कमी होते असे दिसून आले आहे. जरी हे नेहेमी शक्य नसले तरी, जर तुम्ही एकटे राहत असाल तर एखाद्या क्लेशकारक घटनेच्या अनुभवानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबियांसमवेत किंवा एखाद्या खास मित्र/ मैत्रिणीसोबत जाऊन राहणे योग्य होईल. हे जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांसोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांच्याशी फोनवर किंवा व्हिडिओ कॉल द्वारे संपर्कात रहा.

आपली दिनचर्या चालू ठेवा

कितीही कठीण वाटत असले तरी क्लेशकारक घटनेचा अनुभव येण्यापूर्वी जी तुमची दिनचर्या होती तीच या अनुभवानंतरही शक्य असेल त्या प्रमाणात चालू ठेवण्याचा प्रयत्न करा. या अनुभवानंतर कदाचित तुमच्या खाण्याच्या आणि व्यायामाच्या सवयी बदलतील आणि तुम्हाला झोपायला त्रास होईल. नियमितपणे खाण्याचा आणि व्यायाम करण्याचा प्रयत्न करा आणि पुरेशी झोप घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या नीट झोप घेण्याविषयी संसाधनांवर एक नजर टाका.

व्यावसायिक तज्ञांची मदत घेण्याविषयी विचार करा

काही लोकांना त्रास होत असल्यास त्यांच्या नेहेमीच्या डॉक्टरांशी (जनरल प्रॅक्टिशनर) बोलणे उपयुक्त ठरू शकते. जर तुमची लक्षणे अतिशय गंभीर असल्याचे पाहून तुमच्या डॉक्टरांनी तशी शिफारस केली नसेल तर साधारणपणे एखाद्या क्लेशकारक घटनेनंतर पहिल्या महिन्यातच मानसिक आरोग्यासाठी व्यावसायिक तज्ञांची मदत घेणे फारसे उपयुक्त ठरत नाही.

तुम्हाला कसे वाटते आहे याकडे लक्ष द्या

एखाद्या क्लेशकारक घटनेनंतर पहिले काही महिने दिवसेंदिवस तुम्हाला कसे वाटते आहे याकडे तुम्ही लक्ष द्या. तुम्‍हाला आपण बरे होत नसल्यासारखे वाटत असेल किंवा तुमची परिस्थिती अधिक वाईट होऊ लागली तर तुम्‍ही तुमच्‍या नेहेमीच्या डॉक्टरांशी बोलले पाहिजे.

कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून मदत मागा

तुमच्या नोकरीचा एक भाग म्हणून जर तुम्ही क्लेशकारक घटनेचा अनुभव घेतला असेल तर तुमच्‍या कामाच्या ठिकाणी तुमच्‍या मदतीसाठी यंत्रणा उपलब्ध असू शकते. जर तुम्हाला कामाच्या ठिकाणाच्या बाहेर क्लेशकारक घटनेचा अनुभव आला असेल तर तुम्ही तुमच्या वरिष्ठांना त्याविषयी सांगितले पाहिजे म्हणजे जेणेकरून ते तुम्हाला मदत करू शकतील. हे काय घडले ते फक्त त्यांना सांगण्याइतके सोपे काम असेल म्हणजे तुमची मानसिक स्थिती कशी आहे याचा त्यांना अंदाज येईल. तुम्ही त्यांना तुमच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये जुळवून घेण्याची विनंती करू शकता, जसे की पुन्हा तुम्हाला अधिक आघात किंवा तीव्र तणावाचा सामना करावा लागणार नाही याची खात्री करणे किंवा तुमचे कामाचे तास जुळवून घेणे. अधिक माहितीसाठी या संसाधनामध्ये नियोक्त्यांसाठीचा विभाग पहा.

काळजी घ्या

एखाद्या क्लेशकारक घटनेच्या अनुभवानंतर लोकांचे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही घरात असताना आणि गाडी चालवत असताना काळजी घ्या. एखाद्या क्लेशकारक घटनेच्या अनुभवानंतर बरे वाटावे म्हणून दारू -किंवा बेकायदेशीर अंमली पदार्थ न वापरण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यामुळे तुम्हाला थोड्या कालावधीसाठी बरे वाटू शकते परंतु दीर्घ काळात पूर्णपणे बरे होण्यासाठी त्यांची काही मदत होणार नाही.

त्या घटनेविषयी प्रसार माध्यमांमधून खूप जास्त माहिती मिळवत राहणे टाळा

एखाद्या अत्यंत क्लेशकारक घटनेचा अनुभव घेतल्यानंतर सोशल मीडियावर किंवा बातम्यांमध्ये त्याबद्दल बर्‍याच गोष्टी पाहण्याचा किंवा वाचण्याचा मोह होऊ शकतो. विशेषतः अतिरेकी हल्ले किंवा नैसर्गिक आपत्ती यांसारख्या उच्च तीव्रतेच्या घटनांच्या बाबतीत असे घडते. तरीही प्रसार माध्यमांवर त्या घटनेशी संबंधित माहिती पाहणे, ऐकणे किंवा वाचणे टाळणे चांगले, विशेषतः जर तसे केल्याने तुम्हाला त्रास होत असेल तर. 

मी व्यावसायिक तज्ञांची मदत केव्हा घ्यावी?

क्लेशकारक अनुभव हाताळण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. बरेच लोक एखाद्या क्लेशकारक घटनेच्या अनुभवानंतर त्यांचे कुटुंबीय, मित्र/मैत्रिणी आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्या मदतीने बरे होतात.

तुम्ही एखाद्या क्लेशकारक घटनेच्या अनुभवातून पूर्णपणे बरे झालात तरीही बरेचदा तुम्ही ती घटना विसरत नाहीत. त्या घटनेबद्दल तुम्हाला अजूनही नकारात्मक भावना जाणवू शकतात किंवा त्याबद्दल विचार केल्यास वेळोवेळी अस्वस्थ वाटू शकते. तथापि या भावना खूप तीव्र नसतील किंवा त्या तुम्हाला जीवनाचा आनंद घेण्यापासून थांबवणार नाहीत.

तुम्ही तुमच्या नेहेमीच्या डॉक्टरांकडे मदत मागितली पाहिजे जर:

  • तुमची लक्षणे खूपच तीव्र असतील आणि
  • त्यांच्यात सुधारणा होत नसेल

जर तुमची लक्षणे खूप तीव्र असतील आणि एक महिना कालावधी नंतरही जर त्यांचा तुमच्या जगण्यावर परिणाम होत असेल तर, तुम्ही तुमच्या नेहेमीच्या डॉक्टरांशी बोलायला हवे.

जर तुमची लक्षणे तितकीशी तीव्र नसतील पण ती तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी नंतरही दिसत असतील, तर तुम्ही तुमच्या नेहेमीच्या डॉक्टरांशी बोलायला हवे.

पी टी एस डी ची लागण झाली तर?

एखाद्या अत्यंत क्लेशकारक घटनेचा अनुभव आलेल्या लोकांपैकी खूप कमी परंतु महत्त्वपूर्ण लोकांमध्ये  पी टी एस डी विकसित होतो. ही एक गंभीर मानसिक आरोग्य समस्या आहे.

पी टी एस डी असणार्‍या लोकांमध्ये अधिक तीव्र प्रारंभिक अडचणी असू शकतात आणि त्यांचे त्रासदायक विचार आणि भावना आपोआप जात नाहीत. त्यांना त्यांचे जीवन पूर्वीसारखे जगणे कठीण जाऊ शकते.

पी टी एस डी ची लक्षणे, कारणे आणि उपचार याविषयीची अधिक माहिती तुम्हाला आपली पी टी एस डी संसाधने येथे मिळू शकेल.

व्यावसायिक तज्ञांची कोणती मदत उपलब्ध आहे?

जर तुम्ही एखाद्या अत्यंत क्लेशकारक घटनेचा अनुभव घेतला असेल आणि त्यामुळे तुम्हाला वारंवार अडचणी येत असतील तर तुमचे नेहेमीचे डॉक्टर तुम्हाला अशा व्यावसायिक तज्ञांकडे पाठवतील जे लोकांना अशा अनुभवांमधून बरे होण्यास मदत करतात.

पी टी एस डी मधून बरे होण्यासाठी अनेक वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत. यामध्ये मानसोपचार, ट्रॉमा-फोकस्ड कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी (टी एफ - सी बी टी) आणि आय मुव्हमेंट डिसेन्सेटायझेशन अँड रिप्रोसेसिंग (इ एम डी आर) यांचा समावेश आहे. जर इतर उपचारांचा फायदा होत नसेल तर कदाचित तुम्हाला  अँटीडिप्रेसंट्ससुद्धा दिली जाऊ शकतात.

आपली पी टी एस डी संसाधनेयेथे तुम्ही या सगळ्या उपचारांसंबंधी अधिक माहिती मिळवू शकता.

माझे डॉक्टर मला या आजाराचा सामना करण्यास मदत करण्यासाठी औषधे लिहून देऊ शकतात का?

एखाद्या क्लेशकारक घटनेचा अनुभव घेतल्यानंतर औषधोपचार कधी कधी उपयुक्त ठरू शकतात, परंतु तरीही सगळे व्यवस्थित आहे हे तपासण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना नियमितपणे भेटणे महत्त्वाचे आहे.

झोपेची औषधे

एखाद्या क्लेशकारक घटनेचा अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला झोप लागत नसल्यास, तुमचे डॉक्टर कदाचित तुम्हाला झोपेची औषधे देऊ शकतात. ही तुम्हाला फक्त अल्प कालावधीसाठीच दिली जातील आणि हा कायमस्वरूपी पर्याय नाही.

जर एखाद्या क्लेशकारक घटनेचा अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला पी टी एस डी किंवा इतर आजार जसे की डिप्रेशनयांची बाधा झाली तर अँटीडिप्रेसंट्स यासारखी इतर औषधे दिली जाऊ शकतात. आपली पी टी एस डी संसाधनेयेथे तुम्ही पी टी एस डी बरे करण्यासाठी वापरली जाणारी औषधे आणि उपचारपद्धती याविषयी अधिक माहिती मिळवू शकता.

ज्याने एखाद्या क्लेशकारक घटनेचा अनुभव घेतला आहे अशा व्यक्तीला मी कशा प्रकारे मदत करू शकेन?

क्लेशकारक अनुभवातून गेलेल्या व्यक्तीला आधार देण्यासाठी खालील गोष्टी लाभदायक ठरू शकतात:

  • सोबत राहा - त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करण्याची तयारी दाखवा. जरी त्यांना तुम्हाला भेटायची इच्छा नसेल तरीही जर त्यांनी त्यांचा विचार बदलला तर तुम्ही नक्की याल याची त्यांना जाणीव करून दिल्याने मदत होईल. जरी सतत त्यांच्या मागे लागणे तुम्ही टाळायला हवे, तरीही तुमची मदत घेण्याची आठवण त्यांना मधेमधे करून देणे फायद्याचे ठरू शकेल.
  • ऐका – त्यांची इच्छा नसल्यास तुम्हाला त्यांच्या मनातील गोष्टी सांगण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणू नका. जर त्यांना बोलायचे असेल तर ऐकण्याचा प्रयत्न करा; त्यांच्या बोलण्यात व्यत्यय आणू नका किंवा तुमचे स्वत:चे अनुभव सांगत बसू नका.
  • मोघम प्रश्न विचारा – जर तुम्ही प्रश्न विचारणार असाल तर ते मोघम असावेत, कोणत्याही प्रकारचा निर्णय किंवा मत व्यक्त करणारे नसावेत. उदाहरणार्थ, तुम्ही विचारू शकता की , 'तुम्ही याबद्दल इतर कोणाशी बोलला आहात का?' किंवा 'तुम्हाला अजून थोडी मदत मिळवून देण्यासाठी मी काही प्रयत्न करू का?'
  • व्यावहारिक मदत देऊ करा - त्यांना कदाचित स्वत:ची काळजी घेणे आणि दररोजची कामे करणे अवघड जात असेल. साफसफाई, स्वयंपाक यांसारख्या कामांमध्ये मदत पाहिजे असल्यास विचारा.

तुम्ही हे टाळण्याचा प्रयत्न करावा:

  • त्यांना कसं वाटतं आहे हे तुम्हाला माहिती आहे असे सांगणे – जरी तुम्ही असे काही अनुभवले असले तरी निरनिराळे लोक खूपच वेगळ्या प्रकारे घटनांना सामोरे जातात. येथे तुलना करून काहीही मदत होणार नाही.
  • ते जिवंत आहेत हीच नशिबाची गोष्ट आहे असे त्यांना सांगणे – क्लेशकारक घटना अनुभवलेल्या लोकांना ते नशीबवान आहेत असे सहसा वाटत नाही. बरेचदा, इतरांचा मृत्यू झाला असल्यास त्यांना स्वतः जिवंत राहिल्याबद्दल दोषी वाटू शकते.
  • त्यांच्या अनुभवाचा प्रभाव कमी करणे – जरी त्यांना बरे वाटावे हा तुमचा उद्देश असला तरीही गोष्टी अजून वाईट थराला जाऊ शकल्या असत्या असे सुचवणे टाळा. यामुळे लोकांना असे वाटू शकते की त्यांचे अनुभव न्याय्य नाहीत.
  • निरुपयोगी सल्ले देणे – जरी अशा काही गोष्टी केल्याने तुम्हाला यापूर्वी फायदा झाला असला तरीही त्यांना सूचना देणे थांबवा. लोक खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि बरेचदा तुम्ही सुचवत असलेल्या गोष्टी त्यांनी आधीच करून पाहिलेल्या असतात.

नियोक्ता म्हणून मी कशाप्रकारे मदत करू शकतो?

कधीकधी लोक कामावर असताना अत्यंत क्लेशकारक घटना घडतात. आधी उल्लेख केल्याप्रमाणे, काही प्रकारच्या नोकर्‍यांमध्ये क्लेशकारक अनुभव येण्याची शक्यता अधिक असते. काही लोकांना कामावर नसताना इतर ठिकाणी क्लेशकारक घटनांचा अनुभव येतो, परंतु जर त्यांच्या कामाच्या जागेचे वातावरण सहकार्य करणारे असेल त्यांना बरे होण्यास मदतच होते.

जर तुमच्यासाठी काम करणार्‍या एका किंवा अनेक व्यक्तींनी एखाद्या क्लेशकारक घटनेचा अनुभव घेतला असेल तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण करू शकाल अशा काही गोष्टी आहेत:

  • काय घडले याबद्दल बोलणे – जर कामाच्या जागी क्लेशकारक घटना घडली असेल तर, त्या घटनेविषयी मोकळेपणाने बोलणे उपयोगी ठरेल. आपल्यासाठी काम करणार्‍या लोकांना त्रास होत असल्यास त्यांना त्या संबधित मदत कुठे मिळू शकेल हे त्यांना सांगणे सुद्धा उपयोगी ठरेल.
  • चौकशी कारणे – आपल्यासाठी काम करणाऱ्या एक किंवा अनेक व्यक्तींच्या भल्या-बुर्‍याची चौकशी करा. असे केल्याने त्यांना आवश्यक ती मदत मिळते आहे का हे तुम्हाला समजेल आणि त्यांच्यात झालेले काही बदल तुमच्या लक्षात येतील. जर एखाद्या व्यक्तीला बरे वाटत नसल्याची तुम्हाला शंका वाटत असेल तर 'मी ठीक आहे' असे त्यांचे उत्तर खरे मानण्यापासून सावध राहा.
  • पोषक वातावरण निर्माण करणे – विविध गटांमधील सकारात्मक संबंधांना प्रोत्साहन दिल्याने कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते. तुम्ही कर्मचार्‍यांना काही कार्यशाळांमध्ये जाण्यास किंवा त्यांना उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही समर्थन प्रणालीचा वापर करण्यास प्रोत्साहित करू शकता.
  • वाजवी समायोजन करणे – कामावर कोणत्या वाजवी समायोजनामुळे त्यांना बरे वाटण्यास मदत होईल हे शोधण्यासाठी तुमच्या कर्मचार्‍याशी किंवा कर्मचार्‍यांशी बोला. यात कामाचे तास शिथिल करणे किंवा कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात लहानसहान बदल करणे यासारख्या गोष्टींचा समावेश असू शकतो. एखाद्याला काय उपयोगी पडेल हे आपल्याला माहीत आहे असे गृहीत धरण्याऐवजी नेहमी एखाद्याला काय गरजेचे आहे हे त्यांना विचारा.

या सर्व कृतींचा कर्मचार्‍यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

अधिक मदत

उपयुक्त वेब लिंक्स

क्लेशकारक घटना अनुभवलेल्या लोकांना मदत करणार्‍या धर्मादाय संस्था

रेप क्रायसिस - अशा तीन धर्मादाय संस्था आहेत ज्या संपूर्ण यूके मधील बलात्कारासारख्या संकटाशी संबंधित लोकांना मदत करतात:

पीडित समर्थन - अशा तीन पीडित समर्थन धर्मादाय संस्था आहेत ज्या संपूर्ण यूके मधील अशा लोकांना मदत करतात जे गुन्हेगारी आणि क्लेशकारक घटनांना बळी पडले आहेत:

श्रेय नामावली

ही माहिती रॉयल कॉलेज ऑफ सायकियाट्रिस्टस् यांच्या पब्लिक एंगेजमेंट एडिटोरियल बोर्ड (पी इ इ बी)ने तयार केली आहे. ही माहिती लेखनाच्या वेळी उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम पुराव्यांवर आधारित आहे.

ज्यांनी या संसाधनावर आपला अभिप्राय दिला, अशा पी टी एस डी युके यांचे आम्ही विशेष आभारी आहोत.

तज्ञ संपादक: प्रोफेसर नील ग्रीनबर्ग

या संसाधनासाठीचे संपूर्ण संदर्भ विनंतीवर उपलब्ध आहेत.

प्रकाशित: नोव्हेंबर २०२१

पुनरावलोकन नियत काळ: नोव्हेंबर २०२४

© Royal College of Psychiatrists

This translation was produced by CLEAR Global (Oct 2023)