प्रौढांमधील एडीएचडी

ADHD in adults

Below is a Marathi translation of our information resource on ADHD in adults. You can also read our other Marathi translations.

ही माहिती ज्यांना अटेन्शन डेफिसिट हायपरॲक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी) आहे अशा प्रौढांसाठी, ज्यांना आपल्याला एडीएचडी असावा असे वाटते अशा प्रौढांसाठी आणि जे लोक हे जाणून आहेत आणि त्यांचे समर्थन करतात अशा लोकांसाठी आहे.

यामध्ये हे कळते:

  • एडीएचडी म्हणजे काय
  • एडीएचडी असलेल्या लोकांसाठी कोणत्या गोष्टींमध्ये आव्हाने आणि ताकद असू शकते
  • एडीएचडी ची कारणे
  • तुम्हाला त्रास होत असल्यास मदत आणि उपचार कसे घेता येतील
  • तुम्हाला स्वतःला किंवा तुमच्या परिचयातील एखाद्या व्यक्तीला आधार कसा देता येईल.

एडीएचडी म्हणजे काय?

अटेन्शन डेफिसिट हायपरॲक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी) हे निदान अशा लोकांसाठी केले जाते ज्यांना पुढील गोष्टींमध्ये आव्हान वाटत असेल:

  • दुर्लक्ष - लक्ष केंद्रित करणे कठीण जाणे
  • अतिक्रियाशीलता - अस्वस्थ वाटणे आणि स्थिरपणे बसणे कठीण जाणे
  • आवेग - एखाद्या गोष्टी आधी त्याच्या परिणामांचा विचार न करता बोलणे किंवा करणे.

बऱ्याच लोकांना त्यांच्या आयुष्यात कधी तरी किंवा काही विशिष्ट परिस्थितींमध्ये या आव्हानांचा अनुभव येतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला रात्री व्यवस्थित झोप न मिळाल्यास दुसऱ्या दिवशी लक्ष केंद्रित करणे कठीण जाते.

तथापि, एडीएचडी असलेल्या लोकांसाठी ही आव्हाने नेहेमी बालपणातच सुरू होतात आणि बऱ्याच जणांसाठी वाढत्या वयाबरोबर ती चालूच राहतात मात्र त्यांच्यामध्ये बदल किंवा सुधारणा होऊ शकते. ही आव्हाने एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक क्षेत्रांवर परिणाम करतात.

“माझ्यासाठी पुस्तक वाचणे म्हणजे गोल फिरणाऱ्या चक्रावर बसून बाहेर गर्दीमध्ये कुणीतरी हातात धरलेले पुस्तक आपण वाचत असल्यासारखे वाटते. मला एखादे काम करणे म्हणजे गाडी चालवत असल्यासारखे वाटते ज्यामध्ये माझी अधीर बाजू पेडल्स नियंत्रित करत असते परंतु माझ्या उत्सुक बाजूने स्टिअरिंग पकडलेले असते.” एडीएचडी असलेली एक व्यक्ती

एडीएचडी हा कशा प्रकारचा आजार आहे?

एडीएचडी हा एक ‘न्यूरो डेव्हलपमेंटल विकार’ आहे. या प्रकारचे विकार शिकणे, संवाद, हालचाल, भावना आणि लक्ष यांच्या समवेत मेंदूच्या अनेक क्रियांवर परिणाम करू शकतात.

न्यूरो डेव्हलपमेंटल विकार बालपणी सुरू होतात आणि बऱ्याच लोकांसाठी ते आयुष्यभर राहतात. याचा अर्थ की ते ‘बरे’ होत नाहीत. त्या ऐवजी, न्यूरो डेव्हलपमेंटल विकार असलेल्या लोकांना समर्थन आणि त्यांच्या वातावरणात केलेल्या बदलांचा फायदा होऊ शकतो.

ज्या लोकांना एक न्यूरो डेव्हलपमेंटल विकार असतो त्यांना दुसरा एखादा विकार होण्याची शक्यता जास्त असते, जसे की:

  • ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर
  • समन्वय साधण्यात अडचण
  • बोलणे, भाषा आणि संवाद यांचे विकार
  • टुरेटस् सिंड्रोम
  • डिस्लेक्सिया
  • डिसकॅल्क्युलिया.

जर एखाद्या व्यक्तीचा एडीएचडी व्यवस्थितपणे ओळखला गेला नाही किंवा त्यावर उपचार केले गेले नाहीत, तर याचा त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

ज्या लोकांना एडीएचडी चा विकार आहे त्यांच्यासाठी बरेच वेळा इतर मानसिक आणि शारीरिक आरोग्य समस्यांचे देखील निदान केले जाते यामुळे मूळ एडीएचडी ओळखणे कठीण होऊ शकते.

एडीएचडी किती सर्वसामान्यपणे आढळतो?

प्रत्येक 100 प्रौढांपैकी 3 ते 4 जणांना एडीएचडीचा त्रास होतो. कोणत्याही पार्श्वभूमीच्या लोकांना एडीएचडी होणे शक्य आहे, परंतु एडीएचडी सर्वसामान्यपणे अशा लोकांमध्ये जास्त आढळतो ज्यांना पुढील गोष्टी लागू असतील:

  • एडीएचडी असलेले एखादे भावंड किंवा जवळच्या कुटुंबातील व्यक्ती
  • मिरगी
  • इतर न्यूरो डेव्हलपमेंटल आजार, शैक्षणिक अक्षमता किंवा शैक्षणिक अडचणी
  • मानसिक आरोग्य स्थिती
  • दारू किंवा अंमली पदार्थांच्या गैरवापराचा इतिहास
  • फौजदारी न्याय व्यवस्थेशी आलेला संबंध
  • जन्मानंतर झालेली मेंदूची दुखापत
  • देखरेखीखाली राहिले असणे

किंवा ज्यांचा:

  • प्रीमॅच्युअर जन्म झाला असेल
  • ज्यांना लहानपणी ‘ऑपोजिशनल डिफायन्ट डिसऑर्डर’ किंवा ‘कंडक्ट डिसऑर्डर’ चे निदान झाले असेल
  • ज्यांना लहानपणी चिंता किंवा नैराश्य यासारखे मानसिक आरोग्य स्थिती असल्याचे समजले गेले असेल.

लिंगाप्रमाणे एडीएचडी मध्ये फरक आढळतो का?

मुलींपेक्षा मुलांमध्ये एडीएचडी चे जास्त प्रमाणात निदान केले जाते. तथापि, प्रौढांमध्ये एडीएचडी चे निदान पुरुष आणि महिलांमध्ये समान प्रमाणात केले जाते. याचे कारण असे असू शकते की मुलगे अतिक्रियाशीलतेची आणि आवेगाची लक्षणे दाखवण्याची शक्यता जास्त असल्याने ते जास्त लक्षात येण्याजोगे असते.

निदानाच्या संदर्भात, मुली आणि महिलांसाठी पुढील शक्यता जास्त प्रमाणात असू शकतात:

  • एडीएचडीचे निदान न होणे
  • एडीएचडी चे मूल्यमापन करून घेण्यासाठी सुचवले न जाणे
  • इतर एखाद्या मानसिक आजाराचे किंवा न्यूरो डेव्हलपमेंटल विकाराचे चुकीचे निदान केले जाणे.

मला एडीएचडी आहे हे कसे कळेल?

खाली एडीएचडीच्या मुख्य लक्षणांची यादी दिली आहे. एखाद्या व्यक्तीसाठी एडीएचडी चे निदान केले जाण्यासाठी या लक्षणांमुळे त्यांच्या दिनचर्ये मधील कमीत कमी दोन क्षेत्रांमध्ये विलक्षण अडचण भासली जाणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, घर, शिक्षण किंवा नोकरी, नातेसंबंध आणि निवासस्थान.

इतर असे अनेक अनुभव आहेत जे एडीएचडी असलेले लोक नोंदवतात पण ते इथे नमूद केले नसतील. आम्ही अशा उदाहरणांचा समावेश केला आहे ज्यामध्ये अजूनही शिक्षण घेत असलेल्या तरुण तरुणींपासून ते नोकरी करणाऱ्या लोकांपर्यंत विस्तारीत श्रेणीचे अनेक वयोगट आहेत.

दुर्लक्ष
  • तपशिलाकडे नीट लक्ष न देणे
  • शाळेत, कामामध्ये किंवा इतर क्रियांमध्ये चुका करणे
  • कामावर किंवा क्रियांमध्ये लक्ष केंद्रित करणे कठीण जाणे
  • स्वतःला उद्देशून बोलले जात असताना ते ऐकणे कठीण जाणे
  • सूचना न पाळणे आणि काम, दैनंदिन कार्ये किंवा इतर जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात अपयशी होणे
  • काम आणि क्रियांमध्ये आयोजन करणे कठीण जाणे
  • ज्या कामांमध्ये जास्त कालावधीसाठी बौद्धिक प्रयत्न करावे लागतात अशी कामे टाळणे किंवा ती न आवडणे (जसे शाळेतील अभ्यास, घरचा अभ्यास किंवा घरकाम)
  • महत्त्वाच्या गोष्टी हरवणे (उदाहरणार्थ शाळेचे साहित्य, पेन्सिली, पुस्तके, साधने, पाकिटे, चाव्या, कागदपत्रे, चष्मा, मोबाईल फोन)
  • लक्ष सहजपणे विचलित होणे
  • विसरभोळेपणा
अतिक्रियाशीलता आणि आवेग
  • हातांची किंवा पायांची सतत हालचाल करणे किंवा आपटणे, बसल्याजागी चुळबूळ करणे
  • जेव्हा बसून राहणे अपेक्षित असेल तेव्हा आपली जागा सोडून उठणे
  • सतत अस्वस्थ आणि अति उर्जित वाटणे
  • शांतपणे खेळणे किंवा आरामदायी क्रियांमध्ये सहभाग घेणे कठीण जाणे
  • अति बोलणे
  • प्रश्न पूर्णपणे विचारला जाण्याआधीच उत्तर बरळणे
  • स्वतःची पाळी येण्याची वाट पाहणे कठीण जाणे
  • दुसऱ्यांच्या बोलण्यामध्ये व्यत्यय आणणे किंवा वर चढून बोलणे

यातील सर्वच लक्षणे इतरांसाठी स्वाभाविक असतील असे नाही. एडीएचडी असलेले लोक नेहेमी त्यांची लक्षणे लपवण्याचे मार्ग शोधत असतात आणि असे करणे अतिशय थकवादायक असू शकते आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करू शकते.

एडीएचडी चे सामर्थ्य

एडीएचडी ही एक कमतरता किंवा विकार न समजता एक प्रकारचा ‘वेगळेपणा’ असल्याचे समजल्याने मदत होऊ शकते. काही लोक त्यांच्या एडीएचडी चे काही पैलू काही विशिष्ट परिस्थितींमध्ये किंवा वातावरणांमध्ये त्यांचे सामर्थ्य मानतात:

  • एकाग्रता - एडीएचडी असलेले काही लोक त्यांना आवडणाऱ्या गोष्टी एकाग्रतेने करू शकतात. याचा अर्थ ते काही विशिष्ट विषयांमध्ये खूप विद्वान असू शकतात, किंवा जेव्हा त्यांना एखाद्या गोष्टीविषयी प्रेरणा आणि उत्कटता वाटते तेव्हा ते खूप उपयुक्त काम करू शकतात.
  • संकटाला सामोरे जाणे - एडीएचडी असलेले इतर काही लोक संकटाच्या वेळी जेव्हा परिस्थितीमुळे त्यांना पूर्ण लक्ष देणे आवश्यक असते तेव्हा अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतात.
  • कल्पकता - लक्ष विचलित होण्याची सवय असणे याचा अर्थ असा होऊ शकतो की एडीएचडी असलेली एखादी व्यक्ती समस्येच्या वेळी पर्याय आणि इतर कल्पक मार्ग शोधत राहते.

एडीएचडी असलेले काही लोक या गुणधर्मांचा त्यांच्या फायद्यासाठी वापर करू शकतात. इतर काही लोकांना या ताकदींचा विकास करण्यासाठी सहाय्यकारी व्यवस्थांची मदत लागू शकते.

“मी सर्व विस्कळीत करतो, मी उद्धट आहे, मी व्यत्यय नेहेमीच आणतो असं सतत मला सांगितलं जात असल्याचा मला वैताग आला. पण हे वास्तव कोणी सांगितलं नाही की मी आतुर होतो. मी उत्सुक होतो. मी उत्साहित होतो. माझ्या हायस्कूल मधल्या एक अतिशय उत्कृष्ट शिक्षिका मला आठवतात, त्या म्हणायच्या की मला तुझी आतुरता आवडते, पण जरा पाच मिनिटे थांब. मला त्यामुळे खूप बरे वाटायचे.” हमीद

माझ्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीला एडीएचडी आहे हे मी कसे सांगू शकतो/ शकते?

मित्रमंडळी आणि कुटुंबीय यांना त्यांच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीमध्ये असलेली एडीएचडीची लक्षणे लक्षात येऊ शकतात. कॅनेडियन एडीएचडी रिसोर्स अलायन्स (CADDRA) यांची एक उपयुक्त यादी आहे ज्याच्या आधारे तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीला असमर्थित एडीएचडी असल्याचे कळू शकते:

  • आयोजन करण्याची समस्या. उदाहरणार्थ, वेळेचे व्यवस्थित नियोजन न करणे, नियोजित भेटी चुकवणे, बऱ्याच वेळा उशिरा आणि अपूर्ण काम करणे
  • अनियमित काम किंवा शैक्षणिक कामगिरी
  • रागावर नियंत्रण ठेवण्याची समस्या
  • कौटुंबिक किंवा वैवाहिक समस्या
  • नित्यक्रमाची कमतरता. उदाहरणार्थ, चुकीच्या झोपण्याच्या वेळा
  • आर्थिक नियोजन करणे कठीण जाणे
  • व्यसनी वर्तणूक जसे की अंमली पदार्थ सेवन, खरेदीचे किंवा जुगाराचे व्यसन
  • अविचारीपणामुळे किंवा निष्काळजीपणामुळे पुन्हा पुन्हा होणारे अपघात
  • गाडी चालवण्याच्या समस्या, जसे की वेगाने चालवल्यामुळे दंड, गंभीर अपघात, किंवा लायसन्स जप्त होणे
  • त्यांच्या कामाचे प्रमाण कमी करावे लागणे किंवा नेमून दिलेला अभ्यास पूर्ण करणे अवघड जाणे
  • खालावलेला स्वाभिमान किंवा गंभीर अपयश.

ज्या लोकांच्या जवळच्या नातलगाला एडीएचडी असेल त्यांना स्वतःलाही एडीएचडी असण्याची शक्यता जास्त असते.

 “मला माझ्या मेंदूमुळे जितका त्रास होतो तितकेच मी त्याची प्रशंसा करते. माझ्यासाठी इथे संतुलन महत्त्वाचे आहे. यासाठी मला बरीच वर्षे लागली, परंतु माझ्या मेंदूच्या काम करण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे मला मिळालेली ताकद मी ओळखू शकते. मी स्वतःला फक्त ‘तूट’ समजणार नाही. माझा वेगळेपणा हा मी स्वीकारलेला ‘माझा’ अनुभव आहे.” क्लेअर

एडीएचडी अधिकाधिक सर्वसामान्य होतो आहे का?

गेल्या काही वर्षांमध्ये, युके मधील सर्व ठिकाणच्या एडीएचडी सेवांमध्ये उपचाराच्या शिफारशींची संख्या वाढलेली दिसून आली आहे. याची जी अनेक कारणे असण्याची शक्यता आहे, त्यामध्ये समाविष्ट आहेत:

  • सामान्य नागरिक आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांमध्ये अधिकाधिक व्यापकतेने पसरलेली एडीएचडी विषयी जागरूकता
  • कोव्हिड-19 महामारी, ज्यामुळे कामाचे आणि शिक्षणाचे वातावरण बदलले आहे. यामुळे एडीएचडी ची वर्तणूक अधिक लक्षात येणे शक्य झाले असेल.

अधिकाधिक लोकांना एडीएचडी चे मूल्यमापन करून घेण्यासाठी शिफारस केली जात आहे ही चांगली गोष्ट आहे, कारण याचा अर्थ ज्यांना खरेच एडीएचडी आहे त्यांना आवश्यक असलेली मदत मिळू शकते. ज्यांना हे कळते की त्यांना एडीएचडी नाही, परंतु त्यांना त्याच्याशी निगडित मदतीची आवश्यकता आहे, त्यांनाही मदत मिळू शकते.

काही लोक जे म्हणतात की एडीएचडी ‘आधुनिक’ किंवा ‘रचलेला’ आहे ते चुकीचे आहे. खरे तर, 18 व्या शतकामध्ये सर्वात पहिल्यांदा एका डॉक्टरने एडीएचडी सारख्या विकाराचे वर्णन केलेले आहे. काळानुसार या विकाराचे नाव बदलले गेले परंतु आज आपण जी आव्हाने एडीएचडी ची म्हणून ओळखतो त्यांचेच वर्णन आहे.

जगभरातील आरोग्यसेवा व्यावसायिक आणि शास्त्रज्ञ याविषयी संमत आहेत की एडीएचडी हे एक वैध निदान आहे. एडीएचडी चे निदान कसे केले जाते, आणि त्याचे मूल्यमापन, समर्थन आणि उपचार कसे केले जावेत याविषयी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आहेत.

एडीएचडी ची सुरुवात कधी होते आणि काळानुसार त्यामध्ये कसा बदल होतो?

बालपणी

अगदी लहान वयापासून एडीएचडी दिसण्यास सुरुवात होते, आणि बरेचदा एखादी व्यक्ती शाळेमध्ये असताना तो पहिल्यांदा लक्षात येतो. तथापि, काही लोकांना त्याच्या आव्हानांचा अनुभव प्रौढ वयाचे होईपर्यंत जाणवत नाही, किंवा ते वयाने बरेच मोठे होईपर्यंत ही आव्हाने लक्षात येत नाहीत.

जरी एडीएचडी असलेल्या लोकांमध्ये सामान्य ‘ठरावीक’ लक्षणे दिसून येत असली तरी एडीएचडी निरनिराळ्या लोकांमध्ये वेगळा दिसतो. एखाद्या व्यक्तीमध्ये एडीएचडी कसा दिसतो हे त्या व्यक्तीच्या पुढील वैशिष्ट्यांवर अवलंबून असते:

  • पार्श्वभूमी
  • व्यक्तिमत्व
  • त्याची वातावरणाशी लायकता
  • मदत आणि व्यवस्थेची पातळी
  • आयुष्यातील सकारात्मक आणि नकारात्मक अनुभव
  • जीवनाचा टप्पा.

अतिक्रियाशीलतेची आणि आवेगाची लक्षणे सर्वसामान्यपणे लहानपणी जास्त दिसतात आणि काही लोकांसाठी काळानुसार कमी आव्हानात्मक होत जातात. दुर्लक्षपणाची लक्षणे किशोवयात आणि प्रौढ वयात अधिकाधिक समस्या बनण्याची शक्यता असते.

वाढत्या वयामध्ये

बहुतेक वेळा, लहान मुले जशी मोठी होतात तसे त्यांना अधिक आव्हानांचा अनुभव येऊ लागतो आणि त्यांना मदत कमी मिळते. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती घरी राहत असेल आणि त्यांना खूप मदत मिळत असेल तर त्यांनी घर सोडेपर्यंत त्यांना त्यांच्या एडीएचडी चा तितका त्रास होत नसेल.

एडीएचडी असलेल्या तरुण प्रौढांना नेहेमी नवीन आव्हानांना सामोरे जावे लागते, जसे की:

  • नोकरी किंवा शिक्षण
  • स्वतंत्रपणे राहणे
  • नातेसंबंध
  • आर्थिक नियोजन.

प्रौढावस्थेमध्ये

आयुष्यभरामध्ये, पालकत्वासारखी नवीन आव्हाने एखाद्या व्यक्तीच्या एकंदर ताणाची पातळी अधिकाधिक वाढवू शकते. याचा अर्थ असा की त्यांच्या वाढत्या वयाबरोबर त्यांच्या एडीएचडी मुळे त्यांना अधिक आव्हानांचा अनुभव येतो.

जसे जबाबदाऱ्या आणि ताण यांची एकंदर पातळी वाढत जाते, तसे एडीएचडी असलेल्या लोकांना त्या पुऱ्या करताना जास्त धडपड करावी लागते. जेव्हा असे घडते तेव्हा ते गांगरून जाऊ शकतात आणि आजारी पडू शकतात. हे योग्य आधार देऊन टाळता येऊ शकते. या संसाधनातील आधार यावरील विभागामध्ये तुम्हाला याविषयी अधिक माहिती मिळू शकते.

“कालच मला माझ्या डॉक्टरांकडून कळले… आणि त्याची पुष्टी करण्यासाठी तिने माझा संदर्भ दिला आहे. मी अजूनही त्याविषयीच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मी 38 वर्षांची आहे - माझ्या पूर्ण आयुष्यभरामध्ये हे लक्षातच आले नाही. मला कसे वाटत होते हे मी आत्तापर्यंत कधी सांगूच शकले नाही.” रेचल

एडीएचडी कशामुळे होतो?

एडीएचडी असलेल्या बऱ्याच लोकांमध्ये, हा आजार अनुवांशिक आणि वातावरणातील घटक यांच्या जुळणीमुळे होतो.

  • अनुवांशिक - जे अनुवांशिक घटक एखाद्या व्यक्तीमध्ये एडीएचडी विकसित करतात ते सर्वसामान्यपणे एकाच जनुकाऐवजी अनेक लहान अनुवांशिक फरकांनी बनलेले असतात.
  • वातावरणातील घटक - वातावरणातील घटकांमध्ये यासारख्या गोष्टींचा समावेश होतो:
    • तुम्ही जेव्हा गर्भाशयात होता तेव्हा आलेल्या अडचणी
    • जन्माच्या वेळी उद्भवलेल्या गुंतागुंती
    • विषारी पदार्थांशी आलेला संपर्क
    • पौष्टिक कमतरता
    • मेंदूला झालेली दुखापत.

अभ्यासाद्वारे हे दिसून आले आहे की जे अनुवांशिक आणि वातावरणातील घटक एडीएचडी विकसित करतात ते इतर सामान्य मानसिक आणि शारीरिक आरोग्य समस्या मध्येही दिसून येतात.

एडीएचडी असलेल्या लोकांना इतर आजार होण्याची शक्यता जास्त असते का?

संशोधनामध्ये हे दिसून आले आहे की एडीएचडी असलेल्या लोकांमध्ये इतर मानसिक आणि शारीरिक आरोग्य समस्या सामान्यपणे जास्त दिसून येतात. यामध्ये समावेश आहे:

  • चिंता
  • नैराश्य
  • बायपोलर डिसॉर्डर
  • व्यसन विकार
  • लठ्ठपणा
  • खाण्यापिण्याचा विकार
  • ऍलर्जी
  • अस्थमा
  • झोपेचे विकार
  • मधुमेह
  • ऑटोइम्यून विकार, उदाहरणार्थ संधिवात, सोरायसिस
  • जॉईंट हायपरमोबिलिटी.

जर मला एडीएचडी आहे असे वाटत असेल तर मला मदत कशी मिळू शकेल?

जर तुम्हाला एडीएचडी आहे असे वाटत असेल आणि त्याचा तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होत असेल, तर तुमच्या डॉक्टरांशी बोला, जे तुमच्यासाठी सर्वात जास्त योग्य अशा सेवेकडे तुमची शिफारस करू शकतील. बरेचदा ही एखादी सामाजिक मानसिक आरोग्य सेवा किंवा एखादी तज्ञ न्यूरोडेव्हलपमेंटल सेवा असेल.

दुर्दैवाने, आम्हाला माहीत आहे की काही लोकांना एडीएचडी चे मूल्यमापन करून घेण्यासाठी शिफारस मिळणे कठीण जाते. हे कदाचित प्रौढांमधील एडीएचडी विषयी माहिती नसल्यामुळे असेल किंवा त्यांना जाणवत असलेल्या आव्हानांना दुसरे काही कारणीभूत असल्याचे वाटल्यामुळे असेल. उदाहरणार्थ, काही लोकांसाठी चिंता, नैराश्य किंवा व्यसन विकार यासारख्या एखाद्या मानसिक आरोग्य समस्या चे निदान केले जाते परंतु हे केवळ त्यांच्या काही अडचणींचेच स्पष्टीकरण देऊ शकते. जेव्हा असे होते तेव्हा मुळाशी असलेला एडीएचडी ओळखणे राहून जाते.

आम्हाला हे देखील माहीत आहे की मूल्यमापन करून घेण्यासाठीची प्रतीक्षा यादी खूप लांब असू शकते, याचा अर्थ असा की काही लोकांना निदान करून घेण्यासाठी खूप वेळ वाट पहावी लागते. तुम्हाला किती वेळ वाट पहावी लागेल हे तुम्ही कुठे राहता यावर अवलंबून आहे.

एडीएचडी चे निदान कसे केले जाते?

तुम्हाला एडीएचडी आहे किंवा नाही हे कळण्यासाठी तुम्हाला एखाद्या प्रश्नावली किंवा चाचणीचा वापर करावा लागेल. प्रश्नावलींचा उपयोग मूल्यमापनाच्या प्रक्रियेसाठी होऊ शकतो परंतु एडीएचडी चे अचूकपणे निदान करण्यासाठी या गोष्टी आवश्यकच आहेत:

  • सविस्तर मुलाखत
  • सल्ला-मसलतीवर आधारित मूल्यमापन

NICE (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर एक्सलन्स) यांची एडीएचडीचे निदान करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेआहेत जी इंग्लंड आणि वेल्स मध्ये लागू होतात. इंग्लंड आणि वेल्स मध्ये तुम्ही कुठेही रहात असाल तरी तुमचे मूल्यमापन याच मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे केले जाईल.

एका सखोल मूल्यमापन रिपोर्टमध्ये कमीत कमी पुढील सर्व गोष्टींचा समावेश असेल:

  • तुमचे मूल्यमापन करणाऱ्या व्यक्तीचे कार्य, पात्रता आणि अनुभव
  • तुमची एडीएचडी ची लक्षणे आणि त्यांची निदान होण्यासाठी लागणाऱ्या निकषांसाठी पात्रता यांची चर्चा. सामान्यतः याचे रचनात्मक मूल्यमापनाची साधने आणि प्रश्नावली यांच्या आधारे समर्थन केले जाते
  • तुमच्या मानसिक आरोग्याचे संपूर्ण पुनरावलोकन
  • तुमचे बालपण, विकास, शालेय जीवन आणि रोजच्या जीवनातील क्षेत्रांमध्ये काम करण्याची तुमची क्षमता या विषयी माहिती
  • शारीरिक आरोग्य समस्या असल्यास त्यांचे पुनरावलोकन
  • तुम्हाला ओळखणाऱ्या इतरांकडून तुमच्याविषयी मिळालेली माहिती, विशेषतः तुम्ही लहानपणी कसे होता याविषयी, उपलब्ध असल्यास माहिती.

खाजगी मूल्यमापन

एनएचएस सेवांबरोबरच इतर अनेक प्रदाता आहेत जे एडीएचडी चे खाजगीरीत्या मूल्यमापन करून देतात.

जर तुम्ही इतर एखाद्या ठिकाणी मूल्यमापन करून घेतले असेल तर तज्ञ एनएचएस प्रौढ एडीएचडी सेवा तुम्हाला एनएचएस सेवेमध्ये स्वीकारण्याआधी तुमच्या रिपोर्ट मध्ये वर नमूद केलेले सर्व तपशील असल्याचे तपासून घेतील. याचे कारण असे की एडीएचडी वरील औषधोपचार करणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षित आणि तुमच्या परिस्थितीला योग्य अशी औषधे लिहून देण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती त्यांच्याकडे उपलब्ध असल्याची खात्री करावी लागते.

या कारणामुळे, एखाद्या पर्यायी सेवेकडून मूल्यमापन करून घेण्याआधी तुम्ही याची खात्री करून घेतली पाहिजे की ते तुमच्या स्थानिक एनएचएस सेवेद्वारे स्वीकारले जाईल.

मला एडीएचडी आहे हे कळल्यानंतर काय अपेक्षित आहे?

एडीएचडी चे निदान झाल्यानंतर तुम्हाला जुळवून घेण्याच्या कालावधी मधून जावे लागू शकते. तुम्हाला वेगळ्या भावनांचा अनुभव येऊ शकतो, जसे की:

  • तुमच्या काही आव्हानांचे स्पष्टीकरण मिळाल्यामुळे आणि तुम्ही एकटेच असे नाही आहात हे समजल्यामुळे आराम वाटणे. तुम्ही ‘आळशी’, ‘अनिच्छुक’, ‘गबाळ’ किंवा यापूर्वी तुम्हाला लावल्या गेलेल्या इतर एखाद्या शिक्क्याप्रमाणे नाही आहात हे समजल्यामुळे देखील तुम्हाला आराम वाटू शकतो.
  • या विकाराचे निदान आणि औषधोपचार या आधी न होऊ शकल्यामुळे निराश वाटणे. ज्यांच्या हे या आधी लक्षात आले नाही अशा तुमच्या पालकांचा किंवा शिक्षकांचा आणि डॉक्टरांचा तुम्हाला राग सुद्धा येऊ शकतो.
  • हातून गेलेल्या संधी आणि उपचार न केल्या गेलेल्या एडीएचडी चा तुमच्या आणि तुमच्या जवळच्या लोकांच्या आयुष्यावर झालेला प्रभाव याचे दुःख वाटणे.

जर तुमच्यासाठी एडीएचडी चे निदान झाले असेल तर हे निदान तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टीकोनाचा एक महत्त्वाचा भाग होऊ शकते. पुढील गोष्टींमध्ये समतोल साधणे कठीण होऊ शकते:

  • तुम्ही स्वतःकडे ज्यांचे आयुष्य अनेक प्रकारे एडीएचडी मुळे प्रभावित झाले आहे अशी व्यक्ती या दृष्टीने पाहणे
  • एडीएचडी हीच तुमच्या विषयीची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे असे न मानणे.

एक उपाय-केंद्रित दृष्टिकोन, जो तुमच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी कठीण आहेत आणि त्या सोप्या करण्यासाठी काय करता येईल यावर विचार करेल, हा समतोल साधण्यास मदत करू शकेल.

“या क्षणी माझ्या भावनांचे सतत उतार चढाव चालू आहेत. हे लवकर लक्षात आलं असतं तर बरं झालं असतं. चुकीच्या साचेबंद अनुभवांपेक्षा वास्तविक जीवनातील अनुभव ऐकूनच मी याचा विचार केला.”- रेचल

निदान झाल्यानंतर

जर तुमच्यासाठी एडीएचडी चे निदान झाले असेल तर ज्या व्यक्तीने तुमचे हे निदान केले असेल त्यांनी तुमच्याशी पुढील गोष्टींविषयी बोलणे आवश्यक आहे:

  • तुमच्यावर एडीएचडी चा कसा प्रभाव होतो
  • तुमची ध्येय
  • याआधी ज्यांचा तुम्हाला उपयोग झाला असेल त्या गोष्टी
  • तुम्हाला असलेले इतर आजार आणि जर त्यांचा एडीएचडी वर परिणाम होत असेल.

ज्यामुळे तुम्हाला मदत होऊ शकते अशा इतर काही सेवा किंवा माहिती त्यांनी तुम्हाला सुचवणे आवश्यक आहे.

वैद्यकीय उपचार सुरू करण्यापूर्वी

उपचार सुरू करण्यापूर्वी, ज्या व्यक्तीने तुमचे निदान केले त्यांनी तुमच्याशी पुढील गोष्टींविषयी बोलणे आवश्यक आहे:

  • घरी, नोकरीच्या आणि शिक्षणाच्या ठिकाणी वातावरणात सुधारणा
  • जीवनशैलीमध्ये उपयुक्त असे बदल
  • उपचारांचे फायदे आणि दुष्परिणाम
  • उपचारांसाठी तुमचे प्राधान्य असलेल्या गोष्टी
  • तुम्हाला काळजी वाटत असेल अशा गोष्टी.

जर मला एडीएचडी असेल तर मला कोणत्या प्रकारची मदत मिळू शकते?

ज्यांना एडीएचडी ची समज आहे अशा लोकांसमवेत राहिल्याने आणि तुम्हाला स्वतःच्या परीने जिथे सर्वोत्तम काम करता येईल अशा वातावरणात राहिल्याने सर्वात मोठा फरक पडू शकतो. हे कामाच्या ठिकाणी रास्त तडजोड दिली जाणे किंवा घरी यशस्वी दिनचर्या विकसित करण्यासाठी एखाद्या ऑक्युपेशनल थेरपिस्टची मदत मिळणे असे असू शकते.

या गोष्टी खाली आपण अधिक बारकाव्याने समजून घेऊ परंतु वातावरणातील सुधारणा हे तुम्हाला एडीएचडी साठी मिळणाऱ्या मदतीचा सर्वात महत्त्वाचा भाग असू शकतो.

हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की असा कुठलाही एकच उपाय नाही जो एडीएचडी ची सर्व लक्षणे दूर करेल. तुम्ही ही माहिती वाचत असताना तुमची लक्षणे तुमच्या आयुष्यातील वेगवेगळ्या क्षेत्रांवर कशी परिणाम करतात याचा विचार केल्यास मदत होऊ शकेल.

“जरी एडीएचडी सांभाळता येणे अतिशय कठीण असले तरी मदतीच्या आधारे मला हे समजू लागले आहे की माझ्या आवडत्या क्रियांमध्ये झोकून देण्याची माझी सवय आहे आणि याचा सकारात्मक रितीने वापर करता येतो.” जेम्स

तुमचा एडीएचडी समजून घेणे

सहयोगी मदत गट

सहयोगी मदत गट अशा मोफत किंवा स्वस्त सेवा पुरवतात जिथे एडीएचडी असणारे लोक अनुभव, सल्ला, धोरणे आणि उपयुक्त सूचना ऐकू आणि सांगू शकतात. ते इतरांबरोबर मिसळण्याची संधी देखील देतात. गटांच्या भेटी ऑनलाईन किंवा समोरासमोर असू शकतात. सहयोगी मदत गटांची उपलब्धता आणि दर्जा वेगवेगळा असतो आणि तुम्ही कुठे राहता यावर ते अवलंबून आहे.

ऑनलाईन माहिती

एखाद्या आरोग्य स्थितीविषयी माहिती मिळवणे उपयुक्त असू शकते आणि ऑनलाईन एडीएचडी विषयी भरपूर माहिती मिळू शकते. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की ऑनलाईन माहिती वेगवेगळ्या दर्जाची असते. दुर्दैवाने, ऑनलाईन माहिती चुकीची, दिशाभूल करणारी किंवा खोटी सुद्धा असू शकते. या संसाधनाच्या शेवटी आम्ही काही उपयुक्त वेबसाईट्स दिल्या आहेत.

ऑक्युपेशनल थेरपी (ओटी)

ऑक्युपेशनल थेरपिस्ट एडीएचडी असलेल्या लोकांबरोबर काम करून त्यांना पुढील मदत करू शकतात:

  • त्यांचे भौतिक आणि सामाजिक वातावरण व्यवस्थित करणे
  • उपयुक्त वेळ व्यवस्थापनाची कौशल्ये विकसित करणे
  • नोकरीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त नियोजन वेळापत्रके विकसित करणे
  • लक्ष विचलित न होऊ देता आणि बदलांशी सुद्धा जुळवून घेत नियोजित क्रिया पार पडण्याची शिस्तबद्धता विकसित करणे.

लोकांना शक्य होईल तितक्या स्वतंत्रपणे राहता येईल आणि अर्थपूर्ण क्रियांमध्ये सहभागी होता येईल यासाठी मदत करणे हे ऑक्युपेशनल थेरपीचे ध्येय असते.

तुम्हाला एनएचएस कडून किंवा सामाजिक सेवांकडून मोफत ऑक्युपेशनल थेरपीसाठी समर्थन मिळू शकते. हे तुमच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. तुम्ही फी भरून स्वतंत्र ऑक्युपेशनल थेरपिस्टकडे जाण्याचेही ठरवू शकता. रॉयल कॉलेज ऑफ ऑक्युपेशनल थेरपिस्टस (The Royal College of Occupational Therapists) यांच्याकडे पात्र आणि नोंदणीकृत ऑक्युपेशनल थेरपिस्टची यादी आहे.

“जर मला माहीत असतं की एडीएचडी असलेले लोक बऱ्याच गोष्टींना सुरुवात करतात आणि त्या पूर्ण करत नाहीत… तर माझे नक्कीच तसेच आहे. आणि जर मला माहीत असतं की हे एडीएचडी मुळे असं आहे तर मी विचार न करता आवेशात गोष्टी करण्याविषयी अधिक सावध राहिलो असतो.” हमीद

नोकरी आणि शिक्षण

वाजवी तडजोड

इक्वॅलिटी अ‍ॅक्ट 2010 च्या अंतर्गत नोकरी नियोक्ता, कॉलेज आणि युनिव्हर्सिटी यांनी ‘वाजवी तडजोड’ करणे आवश्यक आहे ज्यामुळे ‘संरक्षित वैशिष्ट्ये’ असणाऱ्या लोकांचे लक्षणीय नुकसान होणार नाही. या संरक्षित वैशिष्ट्यांमध्ये अपंगत्व समाविष्ट आहे ज्यामध्ये एडीएचडी चा अंतर्भाव होतो. तुम्हाला अपंगत्व आणि कायदा याविषयी अधिक माहिती सरकारी वेबसाईटवर मिळू शकते.

एडीएचडी असलेल्या एखाद्या व्यक्तीला कोणत्या प्रकारच्या तडजोडी मिळू शकतील हे पुढील गोष्टींवर अवलंबून आहे:

  • त्यांच्या स्थितीचा त्यांच्यावर कसा परिणाम होतो
  • व्यावहारिकता
  • नोकरीची कंपनी किंवा संस्था किती मोठी आहे
  • पैसे आणि संसाधने यांची उपलब्धता
  • जर त्या तडजोडीमुळे ते अनुभवत असलेली गैरसोय दूर होणार असेल.

वाजवी तडजोडींमध्ये समाविष्ट होणारी काही उदाहरणे पुढे दिली आहेत:

  • ऑफिसच्या शांत भागामध्ये कामाचा डेस्क देणे
  • लिखित आणि तोंडी सुद्धा सूचना देणे
  • जेव्हा योग्य असेल तेव्हा जबाबदारी देणे
  • काम रचनाबद्ध करण्यामध्ये मदत करणे.

असोसिएशन ऑफ ग्रॅज्युएट करिअर्स अ‍ॅडवायजरी सर्व्हिस यांनी अधिक उदाहरणे दिली आहेत.

अ‍ॅक्सेस टू वर्क

अ‍ॅक्सेस टू वर्क ही सेवा डिपार्टमेंट ऑफ वर्क अँड पेन्शन द्वारे पुरवली जाते. ही अपंगत्व असणाऱ्या लोकांना व्यावहारिक आणि आर्थिक मदत करू शकते. ही नोकरी करणाऱ्या, धंदा करणाऱ्या किंवा नोकरी शोधणाऱ्या लोकांसाठी उपलब्ध आहे.

ज्यांना ‘वाजवी तडजोड’, जी नोकरी नियोक्त्यांनी पुरवणे कायद्याने आवश्यक आहे, त्याहून अधिक मदतीची किंवा जुळवून घेण्याची गरज आहे फक्त अशाच लोकांसाठी ही उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, अ‍ॅक्सेस टू वर्क एखाद्या नोकरी प्रशिक्षकासाठी किंवा अतिरिक्त प्रशिक्षण पुरवण्यासाठी पैसे खर्च करण्यात मदत करू शकतात.

पात्रता आणि अर्ज प्रक्रियेविषयी अधिक माहिती युके सरकारच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.

मानसशास्त्रीय थेरपी

काही मानसशास्त्रीय थेरपी तुम्हाला एडीएचडी ची लक्षणे सांभाळण्यामध्ये मदत करू शकतात. यामध्ये समावेश आहे:

तुम्हाला एनएचएस वेबसाईट वर एडीएचडी मध्ये मदत करू शकतील अशा थेरपींविषयी अधिक माहिती मिळू शकते.

जेव्हा तुम्ही थेरपिस्ट शोधाल तेव्हा त्यांना एडीएचडी विषयी माहिती आहे ना किंवा ते जाणून घेण्यास तयार आहेत ना याची माहिती करून घ्या. या मुळे तुम्हाला आश्वासक, सकारात्मक सेवा मिळण्यात मदत होईल. एडीएचडी मुळे येणारी काही आव्हाने तुमच्या थेरपी वर परिणाम करण्याची शक्यता असल्याने त्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, विसरण्याच्या सवयीमुळे तुम्ही नियोजित भेट चुकवण्याची किंवा त्या साठी उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे किंवा नियोजित भेटी व्यतिरिक्त तुम्हाला नेमून दिलेली इतर कार्ये करणे कठीण जाण्याची शक्यता आहे.

एनएचएस वेबसाईटवर तुमच्या आसपास असलेली एखादी संभाषण थेरपी सेवा शोधा.

कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी (सीबीटी)

सीबीटी ही एक रचनात्मक कार्यक्रम थेरपी आहे जी लोकांना निरुपयोगी विचारसारणी ओळखण्यास आणि त्यावर मात करण्याची रीत विकसित करण्यास मदत करते.

जर तुम्हाला एडीएचडी असेल तर सीबीटी तुम्हाला पुढील गोष्टींमध्ये मदत करू शकते:

  • आयोजनाची आणि वेळ व्यवस्थापनाची कौशल्ये
  • भावनिक नियमन आणि नियंत्रण
  • सहानुभूती विकसित करणे आणि इतरांचा दृष्टिकोन समजून घेणे
  • लक्ष देण्यात सुधारणा आणि आवेगाचे व्यवस्थापन यासाठी धोरणे.

एडीएचडी मध्ये, सीबीटी औषधोपचाराबरोबर एकत्रित रितीने केल्यास सर्वात जास्त परिणामकारक होऊ शकते.

प्रशिक्षण आणि मार्गदर्शन

दैनंदिन आयुष्यातील कौशल्ये जसे की वेळ व्यवस्थापन आणि वातावरणात सुधारणा घडवून आणणे, आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक मदत करू शकतात. हे प्रशिक्षक एडीएचडी असलेल्या लोकांना मदत करण्यामध्ये तज्ञ असतात.

तथापि, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की प्रशिक्षण आणि मार्गदर्शन या व्यवसायांना कायदेशीर नियम लागू होत नाहीत. वेगवेगळ्या दर्जाच्या आणि गुणवत्तेच्या प्रशिक्षण आणि मार्गदर्शन सेवा असतात.

औषधोपचार

जर तुम्ही वातावरणातील सुधारणा करून बघितल्या असतील आणि तरीही त्रास होत असेल, तर तुम्हाला औषधोपचाराचा उपयोग होऊ शकतो.

औषधोपचार सुरू करण्यापूर्वी, तुमच्यावर इलाज करणाऱ्या व्यक्तीने तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य तपासून पाहणे आवश्यक आहे. त्यांनी तुम्हाला इतर आरोग्य समस्या असल्यास उत्तेजक औषधे घेण्याशी संबंधित धोक्यांविषयी माहिती देणे आवश्यक आहे आणि कुठल्याही दुष्परिणामांवर तुम्ही स्वतः नजर ठेवण्यामध्ये तुमची मदत केली पाहिजे. एकदा तुम्ही तुमच्यासाठी उपयुक्त असे औषध घेण्यास सुरुवात केली की तुमची कमीत कमी वर्षातून एकदा तपासणी होणे आवश्यक आहे.

एडीएचडीच्या उपचारासाठी अनेक निरनिराळी औषधे उपलब्ध आहेत. ही दोन गटांमध्ये विभागली जातात:

उत्तेजक औषधे:

  • मेथिलफिनीडेट
  • डेक्समफेटामिन

उत्तेजक औषधे, डोपमिन आणि नॉरअड्रेनलिन हे न्यूरोट्रान्समीटर्स मेंदूचे जे भाग लक्ष आणि वागणूक नियंत्रित करण्यास मदत करतात, त्या भागांमध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध करून देतात. एडीएचडीवर उपचारांसाठी उत्तेजकांचा वापर करण्यासाठी चांगला पुरावा उपलब्ध आहे आणि बहुतेक लोकांमध्ये ती परिणामकारक, सुरक्षित आणि चांगल्या प्रकारे सहन केली जातात. त्यांचा उपयोग होतो आहे किंवा नाही हे सर्वसामान्यपणे तुम्हाला लगेच कळते.

कोणत्याही दुष्परिणामांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि तुमच्यासाठी योग्य डोस लक्षात येण्यासाठी या औषधाचे प्रमाण हळूहळू वाढवत जाऊन पहावे लागते. बहुतेक लोकांना त्यांनी घेऊन बघितलेल्या पहिल्या औषधानेच लक्षात येण्यासारखे फायदे दिसतात. इतर लोकांना सर्वोत्तम परिणाम झालेला पाहण्यासाठी कदाचित वेगळे औषध घेऊन बघावे लागते.

ज्या विकारामुळे अतिक्रियाशीलता वाढते त्याचा उपचार करण्यासाठी उत्तेजक का वापरले जाते असा अनेक लोकांना प्रश्न पडतो. ही औषधे मेंदूचा तो भाग सशक्त बनवतात जो अतिक्रियाशीलता चालवणाऱ्या मेंदूच्या भागांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतो.

उत्तेजक-विरहित औषधे:

  • अ‍ॅटोमॉक्सेटिन
  • ग्वाॅनफसीन

उत्तेजक-विरहित औषधे नॉरअड्रेनलिनची उपलब्धता वाढवतात किंवा त्याच्या परिणामांची नक्कल करतात. उत्तेजक औषधांच्या तुलनेत त्यांचा परिणाम होण्यास सुरुवात व्हायला उशीर लागतो. सर्वसामान्यपणे जर उत्तेजक औषधांचा तुम्हाला उपयोग झाला नसेल किंवा जर तुम्हाला ती घेणे कठीण गेले असेल तर यांचा वापर केला जातो.

एडीएचडी असलेले बरेच लोक जे औषधोपचाराचा वापर करतात त्यांना त्याचा खूप उपयोग होतो, परंतु असेही काही लोक असतात जे औषधोपचार न करण्याचे ठरवतात किंवा करू शकत नाहीत. सर्व औषधांचे दुष्परिणाम असतात, आणि काही लोकांमध्ये हे इतरांपेक्षा जास्त दिसून येतात.

प्रिस्क्राइब न केलेला औषधोपचार

काही लोक प्रिस्क्रीप्शन शिवाय औषधे विकत घेतात. हे यामुळे असू शकते की त्यांना स्वतःला एडीएचडी असल्याचा संशय असतो परंतु त्यांना मूल्यमापन करून घ्यायचे नसते किंवा करणे शक्य नसते. प्रिस्क्राइब न केलेली औषधे घेण्याच्या इतर कारणांमध्ये पुढील गोष्टी समाविष्ट असतात:

  • शैक्षणिक किंवा व्यावसायिक कामगिरी सुधारण्यासाठी
  • पार्टी आणि मौज मस्ती करण्यासाठी
  • वजन कमी करण्यासाठी.

एडीएचडीची औषधे ऑनलाइन किंवा प्रिस्क्रिप्शन शिवाय खरेदी करणे धोकादायक असू शकते कारण तुम्हाला:

  • तुम्ही मागितलेलेच औषध मिळेल असे जरुरी नाही
  • ते औषध तुम्हाला उपयोगी पडते आहे का किंवा ते योग्य प्रकारे कसे वापरावे यासाठी डॉक्टरांची मदत मिळणार नाही
  • आवश्यक असलेली देखरेख मिळू शकणार नाही.

एडीएचडीची औषधे घेतल्यामुळे एडीएचडी नसलेल्या लोकांची कार्यक्षमता वाढते याचा काही ठोस पुरावा नाही.

“अशा काही काळ्या बाजाराच्या वेबसाईट आहेत ज्या या गोष्टी विकतात, पण त्यांच्यावर काही नियमन नसते आणि तुम्हाला काय मिळते आहे हे कळेलच असे नाही, आणि हे अतिशय धोकादायक आहे.” जेम्स

मी स्वतःची मदत करण्यासाठी काय करू शकतो/ शकते?

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या एडीएचडी असलेले लोकं त्यांच्या एकंदर आरोग्य आणि खुशालीसाठी करू शकतात.

1. तुमच्या आसपासच्या लोकांना ते कशी मदत करू शकतात हे सांगा

इतर कुठल्याही आजाराप्रमाणेच, लोकांना नेहेमी मदत करायची असते परंतु ती कशी करावी हे माहीत नसते, आणि ते निरुपयोगी सल्ले देत राहतात. तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी उपयोगी आणि निरुपयोगी आहेत हे तुमच्या आयुष्यातील लोकांना सांगा.

2. नियमित थोडा व्यायाम करण्याचा प्रयत्न करा

नियमित व्यायाम हा प्रत्येकासाठी चांगला असतो. एडीएचडी असलेल्या लोकांमध्ये, त्यामुळे चिंता आणि नैराश्याची लक्षणे, ज्यांच्यामुळे एडीएचडीची लक्षणे अधिक वाईट होऊ शकतात, त्यांच्यामध्ये लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले आहे. व्यायामामुळे अतिक्रियाशीलता, आवेश किंवा दुर्लक्ष करण्याच्या लक्षणांमध्ये वाढीव परिणाम झालेला आढळला नाही.

3. पुरेशी चांगली झोप घ्या

पुरेशी झोप न झाल्यामुळे एडीएचडीची लक्षणे अधिक वाईट होऊ शकतात. चांगल्या झोपेच्या सवयी विकसित करणे आव्हानात्मक वाटू शकते, परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्यांचा तुम्ही प्रयत्न करू शकता:

  • झोपायच्या वेळेचा एखादा आरामदायी नित्यक्रम विकसित करा, उदाहरणार्थ आंघोळ करणे, संगीत ऐकणे
  • दररोज ठराविक त्याच वेळी झोपा आणि उठा, अगदी शनिवार व रविवार देखील
  • झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी स्क्रीन पाहणे टाळा
  • झोपण्यापूर्वी काही तास आधी साखर, कॅफिन किंवा मद्य सेवन करू नका
  • दिवसभरात पुरेसा व्यायाम करा
  • झोपण्याच्या खोलीमध्ये अंधार आणि शांतता ठेवा. शक्य असल्यास, ताज्या हवेसाठी खिडकी उघडी ठेवा

4. नियमित आणि संतुलित आहाराचे लक्ष्य ठेवा

एका मोठ्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीची लक्षणे आणि अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयींमध्ये संबंध आहे, ज्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाणे समाविष्ट आहे. अस्वास्थ्यकर आहाराचा शारीरिक आरोग्यावर आणि कदाचित मनःस्थितीवर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे एडीएचडी लक्षणे ताब्यात ठेवणे अधिक कठीण होऊ शकते.

5. वाहन चालवणे

कायद्यानुसार तुम्ही Driver and Vehicle Licensing Agency (DVLA) ला तुमच्या सुरक्षितपणे गाडी चालवण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकणाऱ्या कोणत्याही स्थितीबद्दल सांगणे आवश्यक आहे.

तुमचा एडीएचडी किंवा तुमचा एडीएचडीचा औषधोपचार तुमच्या सुरक्षितपणे गाडी चालवण्याच्या क्षमतेवर परिणाम करते अथवा नाही, याची जर तुम्हाला खात्री नसेल तर तुमच्या डॉक्टरांशी बोला. जर एडीएचडीचा तुमच्या वाहन चालवण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आणि तुम्ही DVLA ला सांगितले नाही, तर तुम्हाला £1,000 पर्यंत दंड होऊ शकतो. जर तुम्ही अपघातात सामील असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

याबद्दल अधिक माहिती तुम्ही DVLA वेबसाइटवर मिळवू शकता.

एडीएचडी असलेल्या माझ्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीला मी कशी मदत करू शकतो?

जर तुम्ही एखाद्याला एडीएचडी असलेल्या व्यक्तीला ओळखत असाल, तर त्यांचे आणि स्वतःचे आयुष्य सोपे करण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टी करू शकता.

1. आजाराबद्दल जाणून घ्या

तुम्ही एडीएचडी असलेल्या एखाद्या व्यक्तीला भेटला आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्या सर्वांना भेटला आहात. या आजाराबद्दल अधिक जाणून घेतल्याने एडीएचडीचे अधिक चांगले आकलन होण्यामध्ये तुम्हाला मदत होऊ शकते. हे त्या व्यक्तीला हे देखील दिसेल की तुम्हाला त्याची काळजी आहे.

“ते दिवसातून अनेक वेळा थकवणारे, बदलणारे आणि संताप आणणारे असते. याचा तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर परिणाम होऊ शकतो आणि तो बऱ्याच वेळा लपलेला असतो, खास करून घर, काम, कुटुंब सांभाळण्याची कसरत करणाऱ्या स्त्रियांवर मानसिक ताण असतो. लोकांना काहीही कल्पना नसते.” मार्गारेट

2. सहयोगी मदत गटात सामील व्हा

काही प्रौढ एडीएचडी सहयोगी मदत गट जोडीदार आणि पती अथवा पत्नीसाठी वेगळे गट चालवतात, किंवा त्यांना एडीएचडी असलेल्या व्यक्तींच्या गटात सहभागी होण्याची परवानगी देतात. उपस्थित राहण्यापूर्वी प्रथम गटाशी संपर्क साधा. सहयोगी मदत गटाविषयी तुम्ही अधिक माहिती सहसा ऑनलाइन मिळवू शकता.

3. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीशी बोला

तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला विचारा की तुम्ही काही मदत करू शकता का. जरी त्यांना सध्या काहीही सुचत नसेल, तरी भविष्यात जर त्यांना कोणाशी बोलण्याची गरज असेल तर तुम्ही तिथे असाल हे त्यांना सांगू शकता.

4. कलंकाची जाणीव ठेवा

एडीएचडी आणि तो असलेल्या लोकांबद्दल बरेच गैरसमज आहेत. एडीएचडीच्या वास्तविकतेबद्दल माहिती देऊन तुम्ही स्वतःला आणि इतर लोकांना मदत करू शकता.

5. तुमच्या नैराश्यावर ताबा ठेवण्याची व्यवस्था करा

जर तुम्हाला तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचे वर्तन अस्वस्थ करणारे किंवा निराश करणारे वाटत असेल, तर तुम्हाला विश्वासू वाटणाऱ्या व्यक्तीशी बोलून तुमच्या भावना व्यक्त करा. जर तुम्हाला काही समस्या उपस्थित करायच्या असतील, तर ती समस्या काय आहे आणि काय केल्याने मदत होऊ शकेल असे तुम्हाला वाटते हे स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करा. समस्या सोडवण्यासाठी काही गोष्टी कदाचित अशा असतील ज्या तुम्ही दोघेही करू शकता.

“कधीकधी आपण अपंगत्वाबद्दल बोलतो तेव्हा आपण असे गृहीत धरतो की ते काहीतरी दृश्य स्वरूपातले आहे. आणि जेव्हा तुम्हाला एडीएचडी असतो तेव्हा ते इतके स्पष्ट नसते आणि लोक त्याचा संबंध तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी जोडतात.” हमीद

अधिक माहिती आणि मदत

एडीएचडी वर NICE मार्गदर्शन

या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मुले, तरुण आणि प्रौढांमध्ये एडीएचडी ओळखणे, निदान करणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे समाविष्ट आहे. एडीएचडी असलेल्या लोकांसाठी ओळख आणि निदान, तसेच काळजी आणि मदतीच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

    एडीएचडी बद्दल माहिती

    एडीएचडी सेवाभावी संस्था

    एडीएचडी असलेल्या लोकांसाठी आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या काही सेवाभावी संस्थांची माहिती आम्ही खाली समाविष्ट केली आहे:

    सहयोगी मदत गट

    • मदत | एडीएचडी यूके – एडीएचडी यूके सहयोगी मदत गट, माहितीपूर्ण व्याख्याने आणि प्रश्नोत्तर सत्रे चालवते.
    • एडीएचडी सहयोगी मदत गट बैठका - एडीएचडी अवेअर - सुरक्षित जागेची तरतूद करण्यासाठी एडीएचडी अवेअर सहयोगी मदत गट बैठका घेतात. हे गट एडीएचडी असलेल्या लोकांसाठी आणि त्यांच्या मित्रांसाठी आणि कुटुंबांसाठी आहेत.

    स्वास्थ्य विषयक माहिती

    श्रेय नामावली

    ही माहिती रॉयल कॉलेज ऑफ सायकायट्रिस्टस (Royal College of Psychiatrists) यांच्या पब्लिक एंगेजमेंट एडिटोरियल बोर्ड (पीइइबी) ने तयार केली आहे. ही माहिती लेखनाच्या वेळी उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम पुराव्यांवर आधारित आहे.

    तज्ञ लेखक: डॉ डायटमार हँक आणि डॉ केट फ्रँकलिन

    ज्यांना एडीएचडीचा प्रत्यक्ष अनुभव आहे, ज्यांनी हे संसाधन विकसित करण्यास मदत केली आणि त्यांचे अनुभव वक्तव्य म्हणून शेअर करण्यास सहमती दर्शवली त्या लोकांचे आभार.

    ब्रिस्टॉल अॅडल्ट एडीएचडी सपोर्ट ग्रुपच्या संस्थापक आणि सूत्रधार, सुसान डन मोरुआ यांचे विशेष आभार.

    विनंती केल्यास पूर्ण संदर्भ उपलब्ध होईल.

    This translation was produced by CLEAR Global (Mar 2025)