स्मरणशक्तीची समस्या आणि स्मृतिभ्रंश
Memory problems and dementia
Below is a Marathi translation of our information resource on memory problems and dementia. You can also read our other Marathi translations.
आपल्यापैकी बरेच जण मोठे होत असताना अधिक विसराळू होतात.
हे स्मृतिभ्रंश किंवा अल्झायमर रोगाचे प्रारंभिक लक्षण असू शकते अशी चिंता असणे स्वाभाविक आहे.
परंतु याची इतरही अनेक कारणे आहेत - आपल्यापैकी काहींनाच स्मृतिभ्रंशाची अधिक गंभीर समस्या उद्भवू शकते. हे वेबपृष्ठ स्मृतिभ्रंशांसह, कमकुवत स्मरणशक्तीची काही कारणे आणि तुम्हाला तुमच्या स्वतःच्या किंवा इतर कोणाच्या स्मरणशक्ती बद्दल काळजी वाटत असल्यास मदत कशी मिळवायची याबद्दल माहिती देते.
अनेक गोष्टी आपल्या स्मरणशक्तीवर परिणाम करू शकतात - जसे की तणाव, नैराश्य, मृत्युकारण वियोग - आणि अगदी शारीरिक लक्षण जसे की जीवनसत्वाची कमतरता किंवा संसर्ग.1
खाली, आम्ही दोन विशिष्ट स्मरणशक्ती समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे: स्मृतिभ्रंश, जो अल्झायमर रोग आणि सौम्य संज्ञानात्मक कमजोरी (MCI) यासह विविध स्वरूपात येतो.
स्मृतिभ्रंश म्हणजे काय?
स्मृतिभ्रंश ही एक सामान्य संज्ञा आहे जी स्मरणशक्तीवर परिणाम करणाऱ्या परिस्थितींच्या समूहाचे वर्णन करण्यासाठी वापरली जाते.
- तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवणे कठीण वाटते आणि विचारांशी निवडीत इतर समस्या निर्माण होतात. यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनात अधिक अडचणी निर्माण होतात.
- या समस्या अजूनच खराब होत जातात किंवा वाढत जातात. सामान्यतः हा वृद्धत्वाचा भाग नाही. 2
स्मृतिभ्रंशाचे अनेक प्रकार आहेत. सर्व प्रकारांमध्ये स्मृती कमी होणे समाविष्ट आहे, परंतु त्यांच्यात इतर लक्षणे देखील आहेत, जी कारणांनुसार भिन्न आहेत. स्मृतिभ्रंशाची सुरुवात अनेकदा स्मरणशक्तीच्या समस्यांपासून होते, परंतु स्मृतिभ्रंश असलेल्या व्यक्तीस पुढील गोष्टींमध्ये अडचण येऊ शकते:
- नियोजन आणि दैनंदिन कार्ये पार पाडणे
- इतरांशी संभाषण.
त्यांच्या मनःस्थितीत, निर्णय घेण्याच्या क्षमतेत ही बदल होऊ शकतात किंवा तुम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बदल दिसू शकतात.
स्मृतिभ्रंश प्रगतीशील असल्याने, स्मृतिभ्रंश असलेली एखादी व्यक्ती मदत मिळवण्यासाठी इतरांवर अधिकाधिक अवलंबून असते.
स्मृतिभ्रंश किती सामान्य आहे?
सध्या यूके मधील 850,000 पेक्षा जास्त लोक या आजाराने ग्रस्त आहेत3. वाढत्या वयानुसार याचे प्रमाण वाढत जाते; त्यामुळे:
- वयाच्या 65 व्या वर्षी, प्रत्येक 100 लोकांपैकी सुमारे 2 लोकांना स्मृतिभ्रंश होईल .
- वयाच्या 85 व्या वर्षी, प्रत्येक 5 पैकी एका व्यक्तीला काही प्रमाणात स्मृतिभ्रंश होतो.4
स्मृतिभ्रंश काहीवेळा तरुण लोकांवर परिणाम करू शकतो आणि कुटुंबात अनेकांना असू शकतो; मात्र असे फारसे घडत नाही.
सौम्य संज्ञानात्मक समस्या म्हणजे काय?
सौम्य संज्ञानात्मक समस्या (एम सी आय) ही कमी गंभीर स्मरणशक्ती समस्या आहे. तुमच्या दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात व्यत्यय आणणारी ही गोष्ट नाही आणि याला स्मृतिभ्रंश म्हणावे इतके गंभीर नाही. तुमच्या लक्षात येईल की तुम्ही:
- लोकांची नावे, ठिकाणे, पासवर्ड विसरता
- गोष्टी चुकीच्या ठिकाणी ठेवता
- नियोजित केलेल्या गोष्टी करायला विसरलात.
65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक 10 पैकी एकाला MCI असतो. या दहापैकी एका व्यक्तीला कोणत्याही एका वर्षात स्मृतिभ्रंश होतो.5कोणाला स्मृतिभ्रंश होईल आणि कोणाला होणार नाही हे आपण अजून सांगू शकत नाही.
स्मृतिभ्रंशाचे कोणते प्रकार आहेत?
खाली आम्ही स्मृतिभ्रंशांच्या सर्वात सामान्य प्रकारांचे वर्णन केलेले आहे. परंतु एखाद्या व्यक्तीला कधीकधी यापैकी एकापेक्षा जास्त विकार असू शकतात - 'मिश्र स्मृतिभ्रंश'.
अल्झायमर्स रोग
आयलीन एक 82 वर्षांची सेवानिवृत्त सचिव आहे, जी तिच्या दुर्बल, 90 वर्षांच्या पतीसोबत राहते आणि त्यांची काळजी घेते. ती शारीरिकदृष्ट्या मजबूत आहे आणि कोणताही औषधोपचार घेत नाही.
गेल्या 2 वर्षांत, आयलीनच्या मुलींच्या लक्षात आले आहे की ती तिच्या चाव्या हरवत आहे आणि तिच्या पतीला वेळेवर औषधोपचार देण्यास विसरत आहे. जरी आयलीन नेहमीच एक उत्कृष्ट ड्रायव्हर राहिली असली तरी, आता तिच्या कारच्या बंपरवर खड्डे आणि बाजूला काही ओरखडे आहेत, ज्याचे स्पष्टीकरण आयलीन करू शकत नाही. तिला नवीन रिमोटने टीव्ही चालू करता येत नाही. सुरुवातीला त्यांनी या समस्या तिच्या वयाशी आणि काळजीशी संबंधित तणावाशी जोडल्या.
आयलीनला असे वाटत नाही की तिच्या स्मरणशक्ती मध्ये खरोखर समस्या आहे. जेव्हा तिच्या मुली तिला सांगतात की त्यांना तिच्या स्मरणशक्ती बद्दल काळजी वाटते तेव्हा ती चिडते आणि अस्वस्थ होते. खूप समजावून सांगितल्यावर तिने त्यांच्यासोबत डॉक्टरांकडे जायचे मान्य केले. डॉक्टरांनी स्मरणशक्ती साठी काही सोप्या चाचण्या केल्या आणि नंतर आयलीनला स्मृती तज्ञाकडे पाठवले.
सर्व स्मृतिभ्रंशांपैकी 10 पैकी 6 मध्ये अल्झायमर्स आढळतो.6हे सहसा स्मरणशक्तीच्या समस्यांपासून सुरू होते आणि कालांतराने हळूहळू बिघडत जाते. लोकांना बऱ्याचदा लक्षात येईल की जरी त्यांना कित्येक वर्षांपूर्वी झालेल्या गोष्टी अजूनही आठवत असल्या, तरीही नुकत्याच झालेल्या गोष्टी आठवत नाहीत.
त्यांना अनेकदा असे आढळून येईल की त्यांना विशिष्ट शब्द आणि वस्तूंची नावे आठवण्यात अडचण येते. कधीकधी त्यांना त्यांच्या स्मरणशक्तीच्या समस्यांबद्दल माहिती नसते, परंतु इतर लोक त्यांची दखल घेतात. स्मृतिभ्रंश असलेल्या व्यक्तीस हे करणे कठीण होऊ शकते:
- नवीन गोष्टी शिकणे
- अलीकडील घटना, भेटी किंवा फोन संदेश लक्षात ठेवणे
- लोकांची किंवा ठिकाणांची नावे लक्षात ठेवणे
- इतर लोकांना समजून घेणे किंवा त्यांच्याशी संवाद साधणे
- त्यांनी वस्तू कोठे ठेवल्या आहेत हे लक्षात ठेवणे, जे खूप अस्वस्थ करू शकते - असे वाटू शकते की कोणीतरी त्यांच्या घरात आहे किंवा त्यांच्या वस्तू घेतल्या आहेत
- काहीतरी चुकीचे आहे हे समजणे – कोणीतरी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केल्यावर ते रागावू शकतात.
या सर्व अडचणींमुळे साध्या दैनंदिन क्रियाकलापांचा सामना करणे कठीण होते.
जे लोक अल्झायमर असलेल्या एखाद्याला ओळखतात त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सूक्ष्म बदल दिसून येतात. ते आजारी पडण्यापूर्वी जे वागले होते त्यापेक्षा वेगळे वागतात किंवा प्रतिक्रिया देतात.
अल्झायमरर्स मध्ये, अमायलोइड आणि टाऊ नावाची प्रथिने मेंदूमध्ये तयार होतात आणि 'प्लॅक्स' आणि 'टँगल्स' नावाच्या ठेवी तयार करतात. या भागात मेंदूला दुखापत होते आणि याचा परिणाम मेंदूतील रसायनांवर होतो जे संदेश एका पेशीतून दुसऱ्या पेशीत पाठवतात, विशेषतः ज्याला एसिटाइलकोलीन म्हणतात. 7
रक्तवहिन्यासंबंधीचा स्मृतिभ्रंश
जॉन हे 78 वर्षांचे निवृत्त अभियंता आहेत. त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह आणि उच्च कोलेस्ट्रॉल आहे. दोन हृदयविकाराच्या झटक्यांनंतर 18 महिन्यांपूर्वी त्यांची अँजियोप्लास्टी (अवरोधित धमन्या उघडण्याची प्रक्रिया) झाली, परंतु तरीही त्यांना कधीकधी छातीत दुखते.
पहिल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांची स्मरणशक्ती काही काळ बिघडली, नंतर पुन्हा बरी झाल्यासारखे वाटले. पण दुसऱ्या हृदयविकाराचा झटका आल्यापासून, त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या लक्षात आले आहे की ते अधिक विस्मरणशील होत आहेत आणि ते पूर्वीसारखे लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. त्यांची मनःस्थिती अधिक वर-खाली असते - ते सहजपणे चिडतात आणि रागावतात, परंतु इतर वेळी ते कोणतेही स्पष्ट कारण नसताना रडतात. त्यांना कुठेही जाणे कठीण जात आहे आणि त्यांनी एक-दोनदा नकळत लघवी केली आहे, जे त्यांना खूप लाजिरवाणे वाटते. त्यांच्या डॉक्टरांना त्याच्या अल्पकालीन स्मरणशक्ती मध्ये समस्या आढळल्यानंतर, एमआरआय ब्रेन स्कॅन मध्ये अनेक लहान स्ट्रोकची चिन्हे दिसून आली.
रक्त वाहिन्यांना दुखापत होऊन मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हे घडते. याचा अर्थ मेंदूच्या काही भागांना पुरेसा ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये मिळत नाहीत आणि त्यामुळे मेंदूच्या पेशी मरतात.
रक्तवहिन्यासंबंधीच्या स्मृतिभ्रंश मध्ये खालील प्रकार आहेत:
- स्ट्रोक-संबंधित – जिथे मेंदूची रक्तवाहिनी अचानक बंद होते, उदाहरणार्थ रक्ताच्या गुठळ्यामुळे
- सबकॉर्टिकल डिमेंशिया – एक प्रकारचा स्मृतिभ्रंश जो मेंदूच्या खालच्या भागावर परिणाम करतो, जेथे रक्त प्रवाह अगदी लहान रक्तवाहिन्यांमध्ये कमी होतो.
एखाद्या आरोग्य स्थितीमुळे तुमच्या धमन्या ब्लॉक झाल्या असल्यास तुम्हाला व्हॅस्क्यूलर डिमेंशिया होण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल आणि धूम्रपान यांचा समावेश आहे.8
रक्तवहिन्यासंबंधी स्मृतिभ्रंश कसा होईल हे सांगणे कठीण आहे कारण मेंदूच्या कोणत्या भागावर परिणाम होतो यावर समस्या अवलंबून असतात. तेथे कदाचित ही लक्षण असू शकतात:
- स्मरणशक्ती कमी होणे आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे
- अल्झायमर सारख्या भाषेच्या अडचणी
- सतत भावना बदलणे किंवा नैराश्य
- चालण्यात अडचण किंवा असंयम यांसारख्या शारीरिक समस्या.
लेवी बॉडीसह स्मृतिभ्रंश, किंवा पार्कींसन्स रोग स्मृतिभ्रंश
टेरी हे 66 वर्षांचे निवृत्त शिक्षक आहेत जे एकटे राहतात. 6 महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यापासून त्यांना निराश वाटत आहे आणि त्यांना वाटते की त्याची विचारक्षमता खूप कमी झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा उजवा हात थरथरत असल्याचे त्यांना दिसत आहे आणि काल ते रस्त्यावर पडले. ते अनैच्छिकपणे थरथर कापतात, ज्यामुळे ते अस्वस्थ होतात कारण त्यांनी स्वतःला नेहमी सक्रिय आणि क्रीडापटू म्हणून पाहिले आहे. त्यांची मुलगी कॅथ चिंतीत असते कारण गाडी चालवतांना त्यांचे लक्ष विचलित झाले आणि अपघात होण्यापासून ते थोडक्यात बचावले. त्यांनी खराब झोपेला दोष दिला कारण सकाळी त्यांचा पलंग नेहमी अव्यवस्थित असतो आणि कधीकधी ते जखमांसह उठतात.
काही आठवड्यांपासून त्यांना एक लहान मुलगा शांतपणे खोलीच्या कोपऱ्यात खेळतांना दिसतो. त्यांनी एका रात्री त्याला काहीतरी खाण्यासाठी दिले; पण मग त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या मुलीला तो मुलगा दिसत नाही. कॅथला असे वाटते की त्यांना तारखा लक्षात ठेवणे आणि घरातील कामाचे नियोजन करणे कठीण होत आहे.
त्यांचे डॉक्टर चिंतित झाले आहेत आणि त्यांनी त्यांना मेमरी क्लिनिकमध्ये पाठवले आहे. मेंदूच्या स्कॅन नंतर त्यांनी त्यांना असा स्मृतिभ्रंश असल्याचे निदान केले ज्यामध्ये सामान्यतः लेवी बॉडी असतात.
हे मेंदूत प्रथिने जमा झाल्यामुळे (लेवी बॉडीज) होते.9पार्किन्सन रोगाची लक्षणे विकसित होतात, परंतु बहुतेकदा ती आजारपणात नंतर दिसून येतात. या लक्षणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो:
- स्मरणशक्तीची समस्या आणि कामांचे नियोजन करण्यात अडचण
- दिवसभरात बदलत जाणारा गोंधळ
- लोक किंवा प्राण्यांचे स्पष्ट दृश्य भ्रम
- झोपेची समस्या आणि स्वप्न पाहताना खूप हालचाल
- पार्किन्सनची लक्षणे जसे की हात थरथर कापणे, स्नायू कडक होणे, पडणे किंवा चालण्यात अडचण येणे.
फ्रंटोटेम्पोरल डिमेंशिया
या प्रकारचा स्मृतिभ्रंश प्रामुख्याने तरुण लोकांमध्ये होतो. त्याचा मेंदूच्या पुढच्या भागावर इतर भागांपेक्षा जास्त परिणाम होतो. हा प्रकार अनेकदा 50 आणि 60 च्या वयोगटातील लोकांमध्ये सुरू होतो. 11
यामुळे व्यक्तिमत्त्व आणि वर्तनातील बदल आणि बोलण्यात समस्या येण्याची शक्यता असते. स्मृती दीर्घकाळ अप्रभावित असू शकते. त्यात 3 मुख्य प्रकार आहेत:
- वर्तणुकी संबंधित – एखादी व्यक्ती जी सहसा अतिशय विनम्र आणि योग्य असते ती कदाचित चिडचिड किंवा उद्धट होऊ शकते किंवा तिच्या शारीरिक स्वरूपाची काळजी घेण्यात रस गमावू शकते
- सिमेंटिक – मुख्य चिन्ह म्हणजे भाषा समजण्यात समस्या आणि तथ्यांबद्दल स्मरणशक्ती मध्ये समस्या
- प्रगतीशील नॉन-फ्लुएंट ऍफॅसिया – बोलण्यात अडचण आणि शब्द बाहेर येण्यात अडचण.
लिंबिक-प्रिडॉमिनंट एज-रिलेटेड TDP-43 एन्सेफॅलोपॅथी (LATE)
मेंदूच्या ऊतींचे पोस्टमॉर्टम नमुने पाहून अलीकडेच एक नवीन स्मृतिभ्रंश ओळखला गेला आहे. हा देखील वर नमूद केलेल्या इतर विकारांप्रमाणे सामान्यतः वृद्ध लोकांमध्ये आढळतो. “LATE” चे निदान कसे करावे हे अद्याप माहीत नाही.10
दुर्मिळ कारणे
स्मृतिभ्रंश होण्याची इतर अनेक भिन्न कारणे आहेत. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
- कॉर्टिकोबॅसल डीजनरेशन
- क्रेट्झफेल्ड्ट-जाकोब रोग
- एचआयव्ही-संबंधित संज्ञानात्मक कमजोरी
- हंटिंग्टन रोग
- मल्टीपल स्क्लेरोसिस
- कोर्साकोफ सिंड्रोम
- सामान्य दाब हायड्रोसेफलस
- पोस्टरियर कॉर्टिकल ऍट्रोफी
- प्रोग्रेसिव्ह सुप्रान्यूक्लियर पाल्सी.
स्मृतिभ्रंशाचे निदान कसे केले जाते?
एखाद्या व्यक्तीला कोणती लक्षणे आहेत आणि त्यांचा त्या व्यक्तीवर दैनंदिन कसा परिणाम होतो, हे बघून डॉक्टर स्मृतिभ्रंशाचे निदान करतात.
तर, पहिली पायरी म्हणजे त्या व्यक्तीला जाणून घेण्यासाठी मुलाखत. प्रश्नावली त्यांच्या विचारांची आणि स्मरणशक्तीची चाचणी घेण्यासाठी वापरली जाईल – याला 'कॉग्निटिव्ह टेस्टिंग' म्हणतात. शारीरिक तपासणी केली जाईल आणि काही चाचण्या असतील ज्यात हँड टॅपिंग (हाताने थपथपणे) यासारख्या साध्या शारीरिक कार्यांचा समावेश असेल. घडत असलेल्या गोष्टींची माहिती देऊ शकतील अशा नातेवाइकाशी बोलणे मूल्यांकनकर्त्यासाठी उपयुक्त ठरते.
ही पहिली बैठक समस्या क्षेत्रे ओळखण्यात मदत करेल आणि बऱ्याचदा स्मृतिभ्रंशांच्या प्रकाराबद्दल संकेत देईल. या लक्षणांची इतर कारणे शोधण्यासाठी रक्त तपासणी आणि स्कॅनचा वापर केला जाऊ शकतो. स्कॅन (CT/MRI मेंदू स्कॅन) डिमेंशियाचा प्रकार ओळखण्यात मदत करू शकतात आणि कोणता उपचार निवडायचा याचे मार्गदर्शन करण्यात मदत करतात.12
लवकर निदान करण्यात मदत करण्यासाठी आता ‘मेमरी क्लिनिक’ तज्ज्ञांचा संदर्भ घेणे सामान्य आहे. स्मृतिभ्रंश असलेल्या व्यक्तीला अनेकदा अनेक व्यावसायिकांकडून उपचार मिळतील - मानसोपचारतज्ज्ञ, वृद्धारोगतज्ञ, मानसशास्त्रज्ञ, व्यावसायिक थेरपिस्ट आणि परिचारिका.
डिमेंशियाचा धोका कोणाला आहे?
आपल्यापैकी कोणालाही स्मृतिभ्रंश होऊ शकतो परंतु तो वृद्धत्वाचा नैसर्गिक किंवा अपरिहार्य परिणाम नाही. काही वैद्यकीय परिस्थितीमुळे असे होण्याची शक्यता जास्त असते 13.
यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
- पार्किन्सन्स रोग
- स्ट्रोक आणि हृदयरोग
- उच्च रक्तदाब, आणि उच्च कोलेस्ट्रॉल
- प्रकार 2 मधुमेह
ह्या अतिशय धोकादायक बाबींवर, विशेषतः ऊच्च रक्तदाब आणि मधुमेह ह्यांची काळजी घेणे व उपचार घेणे खुप महत्वाचे आहे. आयुष्याच्या मध्यात, श्रवणक्षमता कमी होणे, लठ्ठपणा, समाजापासुन दुरावा आणि नैराश्य यासारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवल्यास देखील लाभ होऊ शकतो.14
खालील घटक विविध प्रकारच्या स्मृतिभ्रंशांचा धोका वाढवू शकतात 15:
- धूम्रपान
- दारू पिण्याची सुरक्षित मर्यादा ओलांडणे - आठवड्यातून 14 युनिट्स पेक्षा जास्त पिणे
- पोषक नसलेला आहार
- शारीरिक हालचालींचा अभाव
- जास्त वजन असणे
- वारंवार डोक्याला इजा होणे, उदा. मुष्ठीयौध्यांमध्ये.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) सुचवते की धूम्रपान थांबवणे, मद्यपान कमी करणे, व्यायाम वाढवणे आणि संतुलित, आरोग्यदायी आहार (उदा. भूमध्यसागरीय आहार) घेणे डिमेन्शियाचा धोका कमी करू शकते, विशेषतः जर हे बदल तुमच्या 40 आणि 50व्या वर्षी केले तर.16
डिमेन्शियामध्ये जनुके देखील भूमिका बजावतात. 65 व्या वर्षानंतर होणारा अल्झायमरचा आजार सहसा अनुवांशिक विकारामुळे होत नाही, परंतु काही जनुके सापडली आहेत ज्यामुळे डिमेन्शियाचा धोका थोड्या प्रमाणात वाढू किंवा कमी होऊ शकतो. 17जर तुमच्या नातेवाईकाला डिमेन्शिया असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला देखिल डिमेन्शिया होईल, आणि सध्या अशी कोणतीही चाचणी उपलब्ध नाही जी तुमचा वैयक्तिक धोका ओळखू शकते.
काही कुटुंबांमध्ये, ‘लवकर सुरू होणारा डिमेन्शिया’ अधिक सामान्य असतो, त्यामुळे येथे एक अधिक ठोस अनुवांशिक कारण असल्याचे दिसते. तसेच, डाऊन सिंड्रोम असलेल्या व्यक्तींमध्ये डिमेन्शिया लवकर विकसित होण्याची अधिक शक्यता असते. 17जर तुमच्या कुटुंबात 65 वर्षांपूर्वी डिमेन्शिया सुरू झालेल्या एकाहून अधिक व्यक्ती असतील, तर क्लिनिकल जनुशास्त्र तज्ज्ञाकडून सल्ला घेणे योग्य ठरू शकते.
डिमेन्शियासाठी काही उपचार आहेत का?
हे निदान आणि तुमच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. यासाठी अद्याप कोणतेही उपचार नाहीत. तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकाला शक्य तितका काळ स्वतंत्र आणि चालते फिरते राहण्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत.
- अल्झायमरच्या डिमेन्शियाच्या काही लक्षणांचे उपचार करण्यासाठी आणि लोकांना अधिक काळ चालते फिरते राहण्यास मदत करण्यासाठी acetylcholinesterase inhibitors (असिटाइलकोलाइनस्टेरास इनहिबिटर्स) (डोनपेज़िल, गॅलंटामाइन आणि रिवास्टिग्मिन) आणि memantine (मेमंटाइन) नावाचे औषध वापरले जातात. 18हि औषधे लेवी बॉडी डिमेन्शियात देखील मदतकारक ठरतात, विशेषत: जर भ्रम होण्याचा त्रास असल्यास.19 अल्झायमरच्या आजाराच्या औषध उपचारांवरील माहिती पहा.
- वैस्कुलर डिमेन्शियामध्ये, तुमचे डॉक्टर तुम्हाला उच्च रक्तदाब, वाढलेला कोलेस्टेरॉल, किंवा मधुमेह असल्यास औषधोपचार घेण्याचा सल्ला देऊ शकतात. धुम्रपान थांबवण्याने, सकस आहार घेण्याने आणि नेहमी व्यायाम करण्याने देखील फायदा होऊ शकतो.
- साधारणतः बी आणि ई जीवनसत्व, फॅटी ॲसिड्स (माश्यांच तेल सुद्धा) आणि जटिल आहार पुरके यांचा डिमेंशियाचा त्रास कमी करण्यासाठी सल्ला दिला जात नाही20, परंतु तुमचे डॉक्टर जर जीवनसत्वांची कमतरता असेल तर त्यावर उपचार सांगतील. काही पर्यायी औषधे निर्धारित औषधोपचारांसोबत परस्पर क्रिया करू शकतात, त्यामुळे तुम्ही यापैकी कोणतेही औषध घेण्याचा विचार करत असाल तर डॉक्टरसह तपासून घेणे सर्वोत्तम आहे.
- एक मानसशास्त्रीय थेरपी ज्याला गृप कॉग्निटिव्ह स्टिम्युलेशन म्हणतात, तो गृप खेळांचा वापर करून विचारशक्तीला उत्तेजित करून, स्मृती सुधारण्यात आणि व्यक्तीच्या जीवनाची गुणवत्ता वाढवण्यात मदत करू शकतो.21
- रिमिनिस्सन्स थेरपी म्हणजे भूतकाळातील क्रियाकलाप, घटना आणि अनुभवांवर दुसऱ्या व्यक्तीसोबत किंवा लोकांच्या गटासोबत चर्चा करणे. हे समज आणि ज्ञान (आकलन) सुधारण्यात मदत करू शकते, तसेच काळजी घेणाऱ्यांवरील ताण कमी करण्यासही मदत करू शकते.22
- डिमेन्शिया किती वेगाने वाढतो ह्यात बरीच वारंवारता आहे. डिमेन्शियाचे निदान झाल्यावरही लोक अनेक वर्षे सक्रिय, उत्पादक आणि अर्थपूर्ण जीवन जगू शकतात.
मला डिमेन्शिया आहे - मी इतर लोकांना कशी मदत करू शकतो?
युनायटेड किंगडम आणि जगभरात डिमेन्शियाच्या कारणांवर आणि त्यावर उपचार कसे करावे यावर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे. वर्तमानात युनायटेड किंगडममध्ये तीन प्रमुख संशोधन नेटवर्क कार्यरत आहेत:23:
- इंग्लंड - Dementias & Neurodegenerative Diseases Research Network (DeNDRoN)
- स्कॉटलंड - The Scottish Dementia Clinical Research Network (SDCRN) - या वेबसाइटची सध्या निर्मिती सुरू आहे.
- वेल्स - The Wales Dementias and Neurodegenerative Diseases Research Network (NEURODEM Cymru)
Join Dementia Research हा युनायटेड किंगडममध्ये रुग्ण किंवा काळजी कर्ता म्हणून नोंदणी करण्याचा मुख्य मार्ग आहे. तुम्ही दुसऱ्या कोणासाठीसुद्धा त्यांच्या परवानगीने साइन अप करू शकता.
ही सेवा नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ रिसर्च (NIHR) ने अल्झायमर स्कॉटलंड, अल्झायमर रिसर्च यूके, आणि अल्झायमर सोसायटी यांच्या सहकार्याने विकसित केली आहे, ज्याचा उद्देश इच्छुक स्वयंसेवकांना संशोधकांसोबत जोडणे हा आहे.
तुम्ही तुमच्या डॉक्टर किंवा स्थानिक मानसिक आरोग्य गटाकडून स्थानिकपणे चालू असलेल्या संशोधनांबद्दल विचारू शकता.
मी स्वतःची कशी मदत करू?
साध्या व्यावहारिक पायऱ्या
- अपॉइंटमेंट्स लक्षात ठेवण्यासाठी डायरीचा वापर करा.
- तुम्हाला करायच्या गोष्टींच्या सूची तयार करा – आणि तुम्ही त्या पूर्ण करत जाता तशा त्यांना चिन्हांकित करा!
- तुमचे मन सक्रिय ठेवण्यासाठी वाचन करा किंवा कोडी सोडवा, नवीन गोष्टी शिका आणि तुमच्या जीवनात उद्दिष्ट ठेवा.
- सक्रिय रहा आणि जोडलेले रहा – तुमच्या स्थानिक मेमोरी कॅफे किंवा तुम्हाला आवडणाऱ्या इतर सामाजिक क्रियाकलापांमध्ये सहभागी व्हा.
- आरोग्यदायी आहार घ्या आणि शारीरिक व्यायाम करा (ह्याचा कोणत्याही वयात फायदा होतो).
- दिनक्रम करतांना त्रास असल्यास आधार मागा किंवा तुम्हास गोष्टींचे व्यवस्थापन करणे कठिण जात आहे असे वाटल्यास इतरांना सल्ला मागा. कुटुंब, मित्र, आणि सेवा अनेक प्रकारे तुम्हाला शक्य तितके काळ स्वतंत्रपणे जगण्यास मदत करू शकतात.
नियोजन
कधीतरी अशी वेळ येऊ शकते जेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनाच्या महत्वाच्या भागांबद्दल निर्णय घेणे अवघड वाटू लागेल, जसे कि पैश्यांचे व्यवस्थापन करणे किंवा वैद्यकीय निर्णय घेणे. तुम्ही एखादा विश्वासू नातेवाईक, मित्र, किंवा वकील यांना तुमच्या वतीने असे निर्णय घेण्याचा अधिकार देऊ शकता. जे अश्या प्रकारे निर्णय घेतील जसे तुम्ही डिमेंशियामुळे तुमची विचारक्षमता प्रभावित होण्यापूर्वी घेतले असते.
याला Lasting Power of Attorney (LPA) (लास्टिंग पॉवर ऑफ अटॉर्नी) असे म्हणतात.24 एक वकील तुम्हाला LPA तयार करण्यात मदत करू शकतो. LPA चे 2 प्रकार आहेत - एक 'मालमत्ता आणि आर्थिक व्यवहार' व्यवस्थापनासाठी, आणि दुसरा 'आरोग्य आणि कल्याण' संबंधित मुद्द्यांसाठी.
- मालमत्ता आणि आर्थिक व्यवहार LPA - अटॉर्नी नियुक्त केले जाऊ शकतात जेणेकरून ते बँकिंग आणि गुंतवणूक, मालमत्ता विक्री, कर आणि फायदे यासंबंधी निर्णय घेऊ शकतात.
- आरोग्य आणि कल्याण LPA- अटॉर्नी नियुक्त केले जाऊ शकतात जेणेकरून ते वैद्यकीय उपचार, दैनंदिन देखभाल आणि निवासस्थान यासंबंधी निर्णय घेऊ शकतात.
सर्व LPA ऑफिस ऑफ द पब्लिक गार्डियन मध्ये नोंदवले जावे लागतात त्यानंतरच ते वापरले जाऊ शकतात.
दाखल घ्या: Enduring Power of Attorney (EPA) (एंड्युरिंग पॉवर ऑफ अटॉर्नी): LPA ने आता EPA ची जागा घेतली आहे. तथापि, 1 ऑक्टोबर 2007 पूर्वी कार्यान्वित केलेला एक वैध EPA अद्याप नोंदवलेला नसला तरीही वैध राहील.
आधीच घेतलेले निर्णय - तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता गमावल्यास, भविष्यकाळात काही विशिष्ट वैद्यकीय उपचार नाकारण्याचा तुमचा निर्णय नोंदवणे शक्य आहे. तुमची काळजी घेणारे या निर्णयाचा आदर करतील.25हे एकाच वेळी किंवा LPA पासून वेगळे केले जाऊ शकते.
'हा/ही मी आहे'
स्मरणशक्तीची समस्या असलेल्या एखाद्यासाठी, व्यावसायिकांना त्यांच्याबद्दलची महत्त्वाची माहिती सहजपणे पाहता येणे आवश्यक आहे.
'हा/ही मी आहे' हा एक दस्तऐवज आहे जो या उद्देशासाठी भरला जाऊ शकतो. यामध्ये एखाद्या व्यक्तीचा वैद्यकीय इतिहास, त्यांचे जीवन आणि प्राधान्यांबद्दल बरीच उपयुक्त माहिती असते. हे अपॉइंटमेंट किंवा हॉस्पिटल मध्ये दाखल होताना नेले जाऊ शकते आणि Alzheimers.org वेबसाइटवर उपलब्ध आहे.
वाहन चालवणे
स्मृतिभ्रंशाचे निदान हे स्वतःच वाहन चालवणे थांबवण्याचे कारण नाही, परंतु स्मृतिभ्रंश जसजसा वाढत जाईल तसतसे वाहन चालविण्याचे कौशल्य कमी होईल. हे तुमच्या दृश्य स्थानिक जागरुकतेतील बदल, एकाग्रता कमी होणे किंवा निर्णय घेण्याच्या कौशल्यावर होणारे परिणाम यामुळे असू शकते. लोकांमध्ये या कौशल्यांच्या अनुपस्थितीबद्दल जाणिवेची कमतरता असू शकते.26
- यूके कायदा सांगतो की जर एखाद्या परवाना धारकाला स्मृतिभ्रंश झाल्याचे निदान झाले असेल, तर त्यांनी त्यांच्या संबंधित परवाना एजन्सीशी - Driver and Vehicle Licensing Agency (ड्रायव्हर अँड व्हेईकल लायसन्सिंग एजन्सी) (DVLA) किंवा उत्तर आयर्लंडमध्ये असल्यास, ड्रायव्हर अँड व्हेईकल एजन्सी (DVA) यांच्याशी त्वरित संपर्क/माहिती देणे आवश्यक आहे. ).27
- जर एखाद्या डॉक्टरला स्मृतिभ्रंश असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या वाहन चालविण्याच्या क्षमतेबद्दल काळजी वाटत असेल - आणि त्या व्यक्तीने परवाना देणाऱ्या एजन्सीला माहिती दिली नसेल - तर परवाना देणाऱ्या एजन्सीला कळवणे हे त्या डॉक्टरांचे कर्तव्य आहे.28
- जर एखाद्या डॉक्टरला तुमच्या ड्रायव्हिंग वर डिमेंशियाचा परिणाम होत असल्याबद्दल काळजी वाटत असेल, तर ते म्हणू शकतात की तुम्ही ताबडतोब गाडी चालवणे थांबवा किंवा किमान DVLA (Driver and Vehicle Licensing Agency) /DVA तपासणी चे निकाल येईपर्यंत थांबवा.
- ड्रायव्हरने त्यांची पॉलिसी वैध आहे याची खात्री करण्यासाठी त्यांच्या विमा कंपनीला देखील कळवले पाहिजे.
- डिमेंशियाचा तुमच्या ड्रायव्हिंग वर काय परिणाम होतो हे स्पष्ट करण्यात ड्रायव्हिंगचे मूल्यांकन मदत करू शकते - ही माहिती परवाना देणाऱ्या एजन्सीला तुम्ही गाडी चालवणे सुरू ठेवू शकता की नाही हे ठरवत असताना मदत करू शकते. या मूल्यांकना साठी तुम्हाला वैध ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता असेल. परवाना एजन्सीच्या निर्णयाची वाट पाहत असताना तुम्ही ते करू शकता.
- बरेच लोक स्वतः वाहन चालवणे थांबवतात आणि त्यांचा परवाना DVLA (Driver and Vehicle Licensing Agency) /DVA कडे परत पाठवतात, ज्याला 'स्वैच्छिक आत्मसमर्पण' म्हणून ओळखले जाते.
नैराश्य आणि चिंता
डिमेंशिया असलेल्या लोकांमध्ये नैराश्य आणि चिंता सामान्य आहे. तथापि, नैराश्य डिमेंशिया सारखे वाटणे देखील शक्य आहे.29 स्मृतिभ्रंशा प्रमाणे, एखाद्या व्यक्तीच्या स्वतःची काळजी घेण्याच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
याला ‘स्यूडो-डिमेंशिया’ म्हणतात आणि ते ओळखणे आणि त्यावर उपचार करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला काळजी वाटत असेल की तुम्ही किंवा नातेवाईक नैराश्यात आहात, तर प्रथमतः तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. नैराश्यावर प्रतिअवसादी (अँटीडिप्रेसंट्स) आणि संभाषण थेरपी ने उपचार केले जाऊ शकतात..30
मदत आणि आधार मिळवणे
शेवटी, जर तुम्हाला तुमच्या किंवा इतर कोणाच्या स्मरणशक्ती बद्दल काळजी वाटत असेल, तर तुमच्या डॉक्टरांची भेट घ्या. ते तुमची शारीरिक तपासणी करतील, तुमची स्मृती तपासण्यासाठी काही सोप्या चाचण्या आणि रक्ताच्या तपासण्या करतील. गरज भासल्यास, तुमचे डॉक्टर तुम्हाला तज्ञांच्या टीमकडे, मानसशास्त्रज्ञ कडे किंवा तज्ञ डॉक्टरांकडे पाठवू शकतात.
स्मृतिभ्रंशाच्या कोणत्याही टप्प्यावर माहिती देऊ शकतील अशा इतर संस्थांसाठी कृपया खालील यादी पहा. तुम्हाला दैनंदिन क्रियाकलापांसाठी मदत हवी असल्यास, तुम्ही सामाजिक सेवा आणि समर्थन सेवांबद्दल सल्ल्यासाठी तुमच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता.
माहितीचे इतर स्रोत आणि उपयुक्त संस्था
स्थानिक सेवा आणि स्मृतिभ्रंश बद्दल माहितीचे दुवे.
सल्ला आणि समर्थनाची राष्ट्रीय हेल्पलाइन: 0300 222 11 22.
ईमेल: helpline@alzheimers.org.uk
नॅशनल डिमेंशिया हेल्पलाइन डिमेंशिया ने बाधित असलेल्या कोणालाही ऐकणे, मार्गदर्शन आणि योग्य सूचना देऊन माहिती, सल्ला आणि समर्थन प्रदान करते.
एज यूके ग्रुप प्रत्येकासाठी जीवनोपयोगी सेवा आणि महत्त्वपूर्ण समर्थन प्रदान करून नंतरचे जीवन सुधारण्यासाठी कार्य करते. एज यूके ला कॉल करा: 0800 169 8787; ईमेल: contact@ageuk.org.uk
माहितीसाठी संपर्क: 0808 808 7777. केअरर्स यूके अश्या काळजी वाहकांना समर्थन देते जे मित्र किंवा नातेवाईकांसाठी विनाशुल्क काळजी प्रदान करतात.
नागरिक सल्ला ब्यूरो विनामूल्य, गोपनीय आणि स्वतंत्र सल्ला देतात. लाभ, आर्थिक नियोजन किंवा आयोजन यासाठी तुमच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधा.
एक धर्मादाय संस्था जी लेवी बॉडीज सह डिमेंशिया च्या संशोधनासाठी निधी देते, ज्यांना रोग आणि त्याचे परिणाम समजून घेणे आवश्यक आहे अशा कुटुंबांना आणि काळजीवाहूंना मदत करण्यासाठी समर्थन आणि माहिती प्रदान करते.
लॉ सोसायटीकडे पॉवर ऑफ ॲटर्नी किंवा ॲडव्हान्स निर्णय घेण्यात गुंतलेल्या कायदेशीर समस्यांबद्दल बरीच उपयुक्त माहिती आहे आणि मदतीसाठी सॉलिसिटर्स शोधण्यासाठी एक उपयुक्त संसाधन असू शकते.
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ओळखत असाल किंवा एखाद्या व्यक्तीची काळजी घेत असाल, ज्याला त्यांच्या वैयक्तिक आरोग्य, आर्थिक किंवा कल्याणाबाबत निर्णय घेण्यात अडचणी येत असतील, तर तुम्हाला संरक्षण न्यायालयाकडे अर्ज करावा लागेल जेणेकरून तुम्ही (किंवा इतर कोणीतरी) त्यांच्यासाठी निर्णय घेऊ शकता.
जबाबदारी असलेली एजन्सी जी संपूर्ण इंग्लंड आणि वेल्स मध्ये विस्तारली आहे (स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंड साठी स्वतंत्र व्यवस्था अस्तित्वात आहे). हे एंड्युरिंग पॉवर्स ऑफ ॲटर्नी (EPA) आणि लास्टिंग पॉवर्स ऑफ ॲटर्नी (LPA) च्या नोंदणीमध्ये आणि संरक्षण न्यायालया द्वारे नियुक्त केलेल्या डेप्युटीजच्या देखरेखीसाठी सार्वजनिक पालकांना समर्थन देते.
अधिक माहिती
रीडिंग वेल बुक्स ऑन प्रिस्क्रीप्शन योजना स्मृतिभ्रंश असलेल्या लोकांना आणि त्यांच्या काळजी घेणाऱ्यांना मदत करते. त्यांची शिफारस आरोग्य तज्ञांनी आणि स्मृतिभ्रंशाचा अनुभव असलेल्या लोकांकडून करण्यात आली आहे.
आरोग्य व्यावसायिकांद्वारे पुस्तकांची शिफारस केली जाऊ शकते किंवा लोक त्यांच्या स्थानिक लायब्ररीतून स्वतः: संदर्भ घेऊ शकतात आणि पुस्तके विनामूल्य घेऊ शकतात.
पुस्तक यादीतील शीर्षके चार श्रेणींमध्ये विभागली आहेत: माहिती आणि सल्ला; स्मृतिभ्रंशासह चांगले जगणे; नातेवाईक आणि काळजीवाहूंसाठी मदत; आणि वैयक्तिक कथा.
- Alzheimer's and Other Dementias: answers at your fingertips. केटन, ग्रॅहम आणि वॉर्नर. क्लास पब्लिशिंग (लंडन) लि. 3री आवृत्ती 2008.
- Your Memory: a users guide. बॅडली. कार्लटन बुक्स (लंडन). सुधारित आवृत्ती 2004.
- Dancing with Dementia: My story of living positively with dementia. ब्रायडेन. जेसिका किंग्सले पब्लिशर्स (लंडन आणि फिलाडेल्फिया). 2005.
संदर्भ
- Prince, M. et al. (2014). Nutrition and Dementia: a review of available research. Alzheimer’s Disease International. London. [online] Available at: https://www.alz.co.uk/nutrition-report [Accessed 4 Jul. 2019].
- Alzheimer’s Society. (2019). Normal ageing vs dementia. [online] Available at: https://www.alzheimers.org.uk/about-dementia/symptoms-and-diagnosis/how-dementia-progresses/normal-ageing-vs-dementia [Accessed 4 Jul. 2019].
- Prince, M et al. (2014). Dementia UK: Update Second Edition. Alzheimer’s Society. [online] Available at: http://eprints.lse.ac.uk/59437/1/Dementia_UK_Second_edition_-_Overview.pdf [Accessed 4 Jul. 2019]. p 16.
- Alzheimer’s Research UK. (2018). Prevalence by age in the UK. [online] Available at: https://www.dementiastatistics.org/statistics/prevalence-by-age-in-the-uk/ [Accessed 4 Jul. 2019].
- Alzheimer’s Research UK. (2018). Mild cognitive impairment. [online] Available at: https://www.alzheimersresearchuk.org/about-dementia/types-of-dementia/mild-cognitive-impairment/about/ [Accessed 4 Jul. 2019].
- Alzheimer’s Research UK. (2018). Different types of dementia. [online] Available at: https://www.dementiastatistics.org/statistics/different-types-of-dementia/ [Accessed 4 Jul. 2019].
- National Institute on Aging. (2017). What Happens to the Brain in Alzheimer’s Disease? [online] Available at: https://www.nia.nih.gov/health/what-happens-brain-alzheimers-disease [Accessed 4 Jul. 2019].
- British Heart Foundation. (2019). Vascular dementia. [online] Available at: https://www.bhf.org.uk/informationsupport/conditions/vascular-dementia [Accessed 4 Jul. 2019].
- National Health Service. (2016). Overview: Dementia with Lewy bodies. [online] Available at: https://www.nhs.uk/conditions/dementia-with-lewy-bodies/ [Accessed 4 Jul. 2019].
- Nelson, P. et al. (2019). Limbic-predominant age-related TDP-43 encephalopathy (LATE): consensus working group report. Brain. Vol.142:6. pp 1503-1527. [online] Available at: https://academic.oup.com/brain/article/142/6/1503/5481202 [Accessed 4 Jul. 2019].
- Alzheimer’s association. (2019). Frontotemporal Dementia. [online] Available at: https://www.alz.org/alzheimers-dementia/what-is-dementia/types-of-dementia/frontotemporal-dementia [Accessed 4 Jul. 2019].
- National Institute for Health and Care Excellence. (2018) Dementia: assessment, management and support for people living with dementia and their carers. Nice guideline 97. [online] Available at: https://www.nice.org.uk/guidance/ng97/chapter/Recommendations#diagnosis [Accessed 4 Jul. 2019]. Standard 1.2.13.
- Prince, M. et al. (2014). World Alzheimer Report 2014. Dementia and Risk Reduction. An analysis of Protective and Modifiable Risk Factors. Alzheimer's Disease International, London UK. [online] Available at: https://www.alz.co.uk/research/WorldAlzheimerReport2014.pdf (PDF) [Accessed 4 Jul. 2019]. pp. 66-83.
- Prince, M. et al. (2014). World Alzheimer Report 2014. Dementia and Risk Reduction. An analysis of Protective and Modifiable Risk Factors. Alzheimer's Disease International, London UK. [online] Available at: https://www.alz.co.uk/research/WorldAlzheimerReport2014.pdf (PDF) [Accessed 4 Jul. 2019]. pp. 26-39.
- Prince, M. et al. (2014). World Alzheimer Report 2014. Dementia and Risk Reduction. An analysis of Protective and Modifiable Risk Factors. Alzheimer's Disease International, London UK. [online] Available at: https://www.alz.co.uk/research/WorldAlzheimerReport2014.pdf (PDF) [Accessed 4 Jul. 2019]. pp. 42-63.
- Prince, M. et al. (2014). World Alzheimer Report 2014. Dementia and Risk Reduction. An analysis of Protective and Modifiable Risk Factors. Alzheimer's Disease International, London UK. [online] Available at: https://www.alz.co.uk/research/WorldAlzheimerReport2014.pdf (PDF) [Accessed 4 Jul. 2019]. p. 61.
- Alzheimer’s Research UK. (2018). Genes and dementia. [online] Available at: https://www.alzheimersresearchuk.org/about-dementia/helpful-information/genes-and-dementia/ [Accessed 4 Jul. 2019].
- Knight, R et al. (2018). A Systematic Review and Meta-Analysis of the Effectiveness of Acetylcholinesterase Inhibitors and Memantine in Treating the Cognitive Symptoms of Dementia. Dementia and Geriatric Cognitive Disorders, vol. 45, no. 3-4. pp. 131-151. [online] Available at: https://www.karger.com/Article/FullText/486546 [Accessed 4 Jul. 2019].
- National Institute for Health and Care Excellence. (2018) Dementia: assessment, management and support for people living with dementia and their carers. Nice guideline 97. [online] Available at: https://www.nice.org.uk/guidance/ng97/chapter/Recommendations#pharmacological-interventions-for-dementia [Accessed 4 Jul. 2019]. Standards 1.5.10-1.5.13.
- World Health Organisation. (2019). Risk reduction of cognitive decline and dementia: WHO guidelines. Geneva: World Health Organisation. [online] Available at: https://apps.who.int/iris/bitstream/handle/10665/312180/9789241550543-eng.pdf?ua=1 (PDF) [Accessed 4 Jul. 2019]. p. 19.
- Spector, A. et al. (2003). Efficacy of an evidence-based cognitive stimulation therapy programme for people with dementia: Randomised Controlled Trial. British Journal of Psychiatry. Vol. 183 pp. 248-254. [online] Available at: http://www.cstdementia.com/media/document/spector-et-al-2003.pdf [Accessed 4 Jul. 2019].
- Woods, B. et al. (2018). Reminiscence therapy for dementia. Cochrane Database of Systematic Reviews 2018, Issue 3. [online] Available at: https://www.cochranelibrary.com/cdsr/doi/10.1002/14651858.CD001120.pub3/full [Accessed 4 Jul. 2019].
- Join dementia research. (2019). About the service. [online] Available at: https://www.joindementiaresearch.nihr.ac.uk/content/about [Accessed 4 Jul. 2019].
- Office of the Public Guardian. (2019). Make, register or end a lasting power of attorney. Government Digital Service. [online] Available at: https://www.gov.uk/power-of-attorney [Accessed 4 Jul. 2019].
- National Health Service. (2017). Advance decision (living will); End of life care. [online] Available at: https://www.nhs.uk/conditions/end-of-life-care/advance-decision-to-refuse-treatment/ [Accessed 4 Jul. 2019].
- Alzheimer’s Society. (2019). Driving and dementia. [online] Available at: https://www.alzheimers.org.uk/get-support/staying-independent/driving-and-dementia [Accessed 4 Jul. 2019].
- Department of Transport. (2019). Dementia and driving. Government Digital Service. [online] Available at: https://www.gov.uk/dementia-and-driving [Accessed 4 Jul. 2019].
- General Medical Council. (2019). Patients’ fitness to drive and reporting concerns to the DVLA or DVA. [online] Available at: https://www.gmc-uk.org/ethical-guidance/ethical-guidance-for-doctors/confidentiality---patients-fitness-to-drive-and-reporting-concerns-to-the-dvla-or-dva/patients-fitness-to-drive-and-reporting-concerns-to-the-dvla-or-dva [Accessed 4 Jul. 2019].
- Thakur, M. (2007). Pseudodementia. Encyclopedia of Health & Aging. SAGE Publications, Inc. pp. 477-8. [online] Available at: http://go.galegroup.com/ps/i.do?p=GVRL&u=cuny_laguardia&id=GALE|CX2661000198&v=2.1&it=r&sid=GVRL&asid=3ad1e77f [Accessed 4 Jul. 2019].
- National Institute for Health and Care Excellence. (2009) Depression in adults: recognition and management. Nice clinical guideline 90. [online] Available at: https://www.nice.org.uk/guidance/cg90/chapter/1-Guidance#stepped-care [Accessed 4 Jul. 2019]. Standard 1.2.
This translation was produced by CLEAR Global (Nov 2024)