ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर (ओ सी डी)

Obsessive-compulsive disorder (OCD)

Below is a Marathi translation of our information resource on obsessive-compulsive disorder (OCD). You can also read our other Marathi translations.

"त्याला फूटबॉलचं खूपच वेड आहे."
"ती चपलांच्या बाबतीत वेडी आहे."
"त्याला सतत खोटं बोलायची सवय आहे."

जे लोक एखाद्या गोष्टीबद्दल खूप विचार करतात किंवा एखादी गोष्ट वारंवार करतात परंतु इतरांना मात्र तसे करण्याचे काहीही कारण वाटत नाही; अशा लोकांचे वर्णन करण्यासाठी आपण अशी वाक्ये वापरतो. सहसा ही काही समस्या नसते आणि काही व्यवसायांमध्ये तर हे उपयुक्त देखील ठरू शकते.

मात्र, काही लोकांच्या मनात सतत तेच ते त्रासदायक विचार येत राहतात किंवा एकच गोष्ट वारंवार केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. याचा तुमच्या रोजच्या जगण्यावर परिणाम होऊ शकतो, अशा सवयी तुम्हाला गोष्टींचा आनंद घेण्यापासून आणि आवश्यक असलेल्या गोष्टी करण्यापासून सुद्धा थांबवू शकतात.

त्यामुळे, जर:

  • तुम्ही कितीही झटकून टाकण्याचा प्रयत्न केला तरीही जर तुमच्या मनात सतत खूप वाईट विचार येत असतील

    किंवा

  • तुम्हाला सतत एखाद्या गोष्टीला स्पर्श करण्याची किंवा एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा मोजून ठेवण्याची, किंवा एखादी कृती, जसे की स्वच्छ करणे, वारंवार करण्याची आवश्यकता वाटत असेल

तर तुम्हाला ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर (ओ सी डी) असू शकतो.

हे पत्रक ज्यांना वारंवार किंवा सक्तीने एखादी कृती करण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी आहे. आम्हाला आशा आहे की हे कुटुंबियांसाठी आणि मित्रांसाठी - तसेच इतर कोणालाही ज्यांना ओ सी डी बद्दल जाणून घ्यायचे आहे त्यांच्यासाठी देखील उपयुक्त ठरेल.

ओ सी डी असणे म्हणजे काय, यासाठी कोणती मदत उपलब्ध आहे आणि तिचा किती चांगल्याप्रकारे उपयोग होतो, तुम्ही स्वतःला कशी मदत करू शकता आणि दुसऱ्या एखाद्या उदासीन व्यक्तीला कशी मदत करू शकता याची माहिती यात आहे. ओ सी डी बद्दल आपल्याला माहीत नसलेल्या काही गोष्टींचाही यात उल्लेख आहे. पत्रकाच्या शेवटी, अधिक माहिती मिळवण्यासाठी इतर ठिकाणांची यादी आहे आणि हे पत्रक ज्या संशोधनावर आधारित आहे त्याचे संदर्भ आहेत.

ओ सी डी असण्याची लक्षणे काय आहेत?

ओ सी डी चे घटक

ओ सी डी चे तीन मुख्य घटक आहेत.

  • ध्यास - जे विचार तुम्हाला अस्वस्थ करतात
  • भावना - तुम्हाला जी काळजी वाटते
  • अनिवार्यता - ज्या गोष्टी तुमची काळजी कमी करण्यासाठी तुम्ही करता

चला याकडे अधिक सविस्तरपणे पाहू.

ध्यास - जे विचार तुम्हाला अस्वस्थ करतात

"मी माझ्या लहान मुलीला इजा पोहोचवेन अशी मला भीती वाटते. मला कळतं आहे की मला असं नाही करायचं, पण माझ्या डोक्यात वाईट विचार येतच राहतात. माझा स्वतःवरचा ताबा सुटला आहे आणि मी तिला चाकूने भोसकते आहे असं चित्र माझ्या डोळ्यांसमोर येत राहतं. या विचारांना दूर करण्याचा माझा एकमेव मार्ग म्हणजे प्रार्थना करणे आणि त्यानंतर "मला माहीत आहे की मी तिच्यावर खूप प्रेम करते" असा चांगला विचार करणे. सहसा त्यानंतर मला थोडे बरे वाटते, पण पुन्हा ती भयानक चित्रे माझ्या डोक्यात येतातच. मी माझ्या घरातील सगळ्या धारधार गोष्टी आणि चाकू लपवून ठेवले आहेत. मी स्वतःशीच विचार करते "असे विचार माझ्या डोक्यात येतात म्हणजे मी एक भयंकर आई आहे. नक्कीच मला वेड लागलं आहे." - दिया
  • विचार – कडवट, धक्कादायक किंवा निंदनीय असा एखादा शब्द, वाक्प्रचार किंवा गाणं. तुम्ही त्यांच्याबद्दल विचार न करण्याचे ठरवता मात्र तरीही ते डोक्यातून जाता जात नाही. तुम्ही स्वतः आजारी व्हाल (जंतू, घाण किंवा रोगामुळे), किंवा तुमच्या निष्काळजीपणामुळे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला इजा होऊ शकेल अशी तुम्हाला काळजी वाटते.
  • तुमच्या मनातील चित्रे  – तुम्ही तुमचे कुटुंब मृतावस्थेत पाहता, किंवा स्वतःला असे काहीतरी हिंसक किंवा लैंगिक वर्तन करताना पाहता जे तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे - एखाद्याला चाकूने मारणे किंवा शिवीगाळ करणे किंवा विश्वासघात करणे. असे विचार पीडित व्यक्तीसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आणि अगदी तज्ञांसाठीसुद्धा खूप चिंताजनक असू शकतात. परंतु आपल्याला माहीत आहे की ओ सी डी असलेल्या लोकांना जरी अशी भीती वाटत असली की ते तसे करतील तरीही ते या विचारांवर कृती करत नाहीत. इजा करण्याच्या बाबतीत ओ सी डी असणारे लोक इतर सामान्य लोकांइतकेच निरुपद्रवी असतात. असे असले तरीही, जर तुमच्या मनात असे विचार येत असतील तर, ओ सी डी वर उपचार करण्याचा तज्ञ अनुभव असलेल्या मानसिक आरोग्य व्यावसायिकांना भेटणे अतिशय चांगले होईल.
  • शंका – आपल्या हातून एखादा अपघात तर झाला नाही ना किंवा एखाद्याच्या दुर्दैवाला आपण कारणीभूत तर ठरलो नाही ना याचा तुम्ही तासनतास विचार करता. तुमच्या गाडीने एखाद्याला धडक तर दिली नाही ना, किंवा तुम्ही निघताना घराची दारे खिडक्या उघडयाच ठेवल्या नाहीत ना याची तुम्हाला चिंता वाटते.
  • अतिविचार – एक गोष्ट करायची की दुसरी करायची याबद्दल तुम्ही सतत स्वतःशी वाद घालत बसता आणि त्यामुळे तुम्ही सर्वात साधे निर्णय सुद्धा घेऊ शकत नाही.
  • परिपूर्णतावाद –जर गोष्टी योग्य क्रमाने नसतील, संतुलित नसतील किंवा योग्य ठिकाणी नसतील तर तुम्हाला जसा त्रास होतो तसा इतरांना होत नाही. उदाहरणार्थ, जर पुस्तके फळीवर रांगेत अचूकपणे मांडलेली नसतील.

भावना - तुम्हाला जी काळजी वाटते

"माझा पूर्ण दिवस काही चुकणार तर नाही हे तपासण्यातच जातो. सकाळी घरातून बाहेर पडायलाच मला एक तास लागतो, कारण माझी कधी खात्रीच पटत नाही की मी कुकर सारखी सर्व विद्युत उपकरणे बंद केली आहेत आणि सर्व खिडक्या बंद केल्या आहेत. त्यानंतर मी पाच वेळा गॅस बंद केला आहे हे तपासून पाहतो; पण मग सगळं समाधानकारक वाटलं नाही की मग परत पहिल्यापासून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सरतेशेवटी, मी माझ्या जोडीदाराला माझ्यासाठी हे सर्व पुन्हा तपासून पाहण्यास सांगतो. कामाच्या ठिकाणी मी नेहमी मागे असतो कारण माझ्याकडून काही चूक तर झाली नाही ना हे बघण्यासाठी मी प्रत्येक गोष्ट अनेक वेळा तपासतो. जर मी असं नाही केलं तर मी इतका अस्वस्थ होतो की मला असह्य होतं. मला माहीत आहे की हे हास्यास्पद आहे; पण मला वाटतं की जर काही भयानक घडलं तर मी दोषी असेन." - जयेश
  • तुम्हाला तणावग्रस्त, चिंताग्रस्त, भयभीत, दोषी, घृणास्पद किंवा उदासीन वाटते.
  • तुम्ही तुमची सतत सवयीची कृती किंवा कार्य विधी पार पाडल्यास तुम्हाला बरे वाटते - परंतु ते फार काळ टिकत नाही.

अनिवार्यता - ज्या गोष्टी तुमची काळजी कमी करण्यासाठी तुम्ही करता

"मला इतरांकडून कसलीतरी लागण होईल याची भीती वाटते. मी जंतू संसर्ग थांबवण्यासाठी माझ्या घरातील सर्व पृष्ठभाग धुण्यामध्ये तासनतास घालवते आणि दिवसातून अनेक वेळा माझे हात धुते. शक्यतो घराबाहेर न जाण्याचा मी प्रयत्न करते. जेव्हा माझा नवरा आणि मुले घरी परत येतात, तेव्हा कदाचित ते एखाद्या हॉस्पिटलसारख्या धोकादायक ठिकाणी तर गेले नव्हते ना ह्या भीतीने मी त्यांना ते कुठे कुठे गेले होते याविषयी खूप तपशीलवार विचारते. मी त्यांना त्यांचे सर्व कपडे बदलायला आणि स्वच्छ आंघोळ करायला लावते. माझं मलाच जाणवतं की ही भीती म्हणजे मूर्खपणा आहे. माझ्या कुटुंबाला याचा वैताग आला आहे पण हे इतके दिवस चालू आहे की मी आता थांबवू शकत नाही." - ललिता
  • अस्वस्थता निर्माण करणारे विचार सुधारणे – तुम्ही पर्यायी 'तटस्थ' गोष्टींचा विचार करणे जसे अंक मोजणे, प्रार्थना करणे किंवा एखादा खास शब्द पुन्हा पुन्हा म्हणणे. असे केल्यामुळे वाईट गोष्टी घडण्याचे थांबेल असे वाटते. तुम्हाला त्रास देणाऱ्या कडवट विचारांपासून आणि चित्रांपासून मुक्त होण्याचाही हा एक मार्ग असू शकतो.
  • कार्यविधी – तुम्ही तुमचे हात वारंवार धुता, गोष्टी खूप हळू आणि काळजीपूर्वक करता, कदाचित एखाद्या ठराविक पद्धतीनेच वस्तू ठेवता किंवा गोष्टी करता. यातच इतका वेळ जातो की बाहेर कुठे जाणे किंवा काही उपयुक्त गोष्ट करणे शक्य होत नाही.
  • तपासणे – अंगाला काही घाण लागली आहे का, उपकरणे बंद आहेत का, घराला कुलूप लावले आहे का, प्रवासाचा रस्ता सुरक्षित आहे का.
  • टाळणे  – चिंताजनक विचारांची आठवण करून देणार्‍या कोणत्याही गोष्टी. तुम्ही विशिष्ट वस्तूंना स्पर्श करणे, विशिष्ट ठिकाणी जाणे, जोखीम घेणे किंवा जबाबदारी स्वीकारणे टाळता. उदाहरणार्थ, तुम्ही स्वयंपाकघर टाळता कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला तेथे धारदार चाकू सापडू शकतात.
  • साठवणूक – निरुपयोगी आणि जीर्ण झालेल्या मालमत्तेची. तुम्ही काहीही टाकून देऊ शकत नाही.
  • आश्वासन – तुम्ही वारंवार इतरांना तुम्हाला हे सांगण्यास सांगता की सर्व काही ठीक आहे .

ओ सी डी किती सर्वसामान्यपणे आढळतो?

प्रत्येक ५० व्यक्तींपैकी १ व्यक्ती त्यांच्या आयुष्यात कधीतरी ओ सी डी ने ग्रस्त होते, यात पुरुष आणि स्त्रियांचे प्रमाण सारखे आहे. याचा अर्थ यू.के. मध्ये १ दश लक्षाहून अधिक लोक.

याने ग्रस्त असलेल्या प्रसिद्ध लोकांमध्ये जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन, आद्यप्रवर्तक परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल, अभिनेत्री कॅमेरून डियाझ आणि फुटबॉल खेळाडू डेव्हिड बेकहॅम यांचा समावेश आहे.

जर तुमच्यासाठी वारंवार जुगार खेळणे, खाणे किंवा दारू पिणे अनिवार्य होत असेल तर तुम्हाला ओ सी डी आहे का?

नाही. 'कंपल्सिव्ह' (अनिवार्य) आणि 'ऑब्सेसिव्ह' (ध्यास) हे शब्द काही वेळा जुगार खेळणाऱ्या, दारू पिणार्‍या, अमर्यादित खरेदी करणार्‍या, रस्त्यावरील अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या – किंवा कधी कधी खूप व्यायाम करणाऱ्या लोकांचेही वर्णन करण्यासाठी वापरले जातात.

मात्र, या सर्व प्रकारची वर्तणूक आनंददायी असू शकते. ओ सी डी मधील अनिवार्यता कधीही आनंददायी नसते - ती कायम नकोशी वाटणारी मागणी किंवा ओझ्यासारखी वाटते.

ओ सी डी किती वाईट होऊ शकतो?

हे व्यक्तीगणिक बदलते, परंतु जर तुम्हाला सतत ओ सी डी चा सामना करावा लागत नसेल तर काम, नातेसंबंध आणि कौटुंबिक जीवन हे सर्व अधिक फलदायी आणि समाधानकारक वाटते.

गंभीर ओ सी डी मुळे नियमितपणे काम करणे, कौटुंबिक जीवनात भाग घेणे - किंवा तुमच्या कुटुंबासोबत जुळवून घेणे देखील अशक्य होऊ शकते.

विशेषतः, जर तुम्ही त्यांना तुमच्या कृतीमध्ये सामील करण्याचा प्रयत्न केला तर तुमचे कुटुंबीय वैतागू शकतात.

ओ सी डी असणारे लोक नियंत्रण गमावतात का?

नाही - जरी त्यांना सतत तशी भीती असली तरी ओ सी डी असणारे लोक नियंत्रण गमावत नाहीत. ते कदाचित विचारतील की ते 'वेड्यासारखं' किंवा 'विचित्र' वागत आहेत का. जरी यात त्यांचा दोष नसला तरी त्यांना बहुतांश वेळा त्यांच्या वागण्याची लाज वाटेल आणि ते लपवण्याचा प्रयत्न करतील.

तुम्‍ही नियंत्रण गमावाल अशी तुम्‍हाला काळजी वाटत असली, तरी आम्‍हाला माहीत आहे की हे अत्यंत दुर्मिळ आहे.

ओ सी डी सारखी अजून कोणती लक्षणे आहेत?

अशी इतर अनेक लक्षणे आहेत जी ओ सी डी सह जुळू शकतात किंवा त्यांच्यामध्ये इतर समानता असू शकते.

  • बॉडी डिसमॉर्फिक डिसऑर्डर, किंवा 'कल्पित कुरूपतेचा त्रास'. तुमच्या चेहऱ्याचा किंवा शरीराचा एखादा भाग चुकीच्या आकाराचा आहे याची तुम्हाला खात्री पटते आणि आरशासमोर तासनतास घालवून तुम्ही तो निरखून बघण्याचा आणि झाकण्याचा प्रयत्न करता. कधीकधी तुम्ही चार लोकांमध्ये जाण्याचेही थांबवता.
  • ट्रायकोटिलोमॅनिया - तुमचे केस किंवा भुवया उपटण्याची इच्छा.
  • आरोग्य चिंता (हायपोकॉन्ड्रियासिस) – कर्करोगासारख्या गंभीर शारीरिक आजाराने ग्रस्त होण्याची भीती.
  • टुरेट्स सिंड्रोम असलेल्या लोकांमध्ये (जेथे एखादी व्यक्ती अचानक ओरडू शकते किंवा त्यांना अनियंत्रितपणे झटका बसू शकतो) अनेकदा ओ सी डी देखील असतो.
  • अस्पर्गर्स सिंड्रोम सारखे ऑटिझमचे काही प्रकार असलेल्या मुलांना आणि प्रौढांना ओ सी डी आहे असे वाटू शकते कारण त्यांना गोष्टी एका विशिष्ट प्रकारेच राहिलेल्या आवडतात आणि त्यांना एकच काम पुन्हा पुन्हा करायला आवडते.

ओ सी डी ची सुरुवात कधी होते?

बर्‍याचश्या लहान मुलांमध्ये अनिवार्यता सौम्य प्रमाणात आढळते. त्यांना त्यांची खेळणी एका ठराविक पद्धतीनेच मांडून ठेवलेली आवडतात किंवा ते चालताना फुटपाथवरच्या भेगांवर पाय देणे टाळतात. सहसा ही वागणूक ते जसे जसे मोठे होतात तशी निघून जाते

प्रौढांमध्ये ओ सी डी ची सुरुवात सामान्यत: किशोरवयात किंवा वयाच्या विशीमध्ये होते. लक्षणे वेळेनुसार येऊ शकतात आणि जाऊ शकतात, परंतु बर्‍याचदा पीडित व्यक्ती ओ सी डी होऊन बरीच वर्षे होईपर्यंत मदत घेत नाहीत.

मदत किंवा उपचार न घेतल्यास काय होते?

ओ सी डी ची लक्षणे काही काळ सुधारू शकतात किंवा निघून जाऊ शकतात, परंतु ती वारंवार परत येतात. काही लोकांची स्थिती हळूहळू खराब होऊ लागते तर काही लोकांमध्ये ताणतणाव किंवा नैराश्यामुळे लक्षणे अधिक तीव्र होतात.

उपचारांची सहसा मदत होते.

ओ सी डी कशामुळे होतो?

ओ सी डी होईल की नाही यावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत.

  • जनुके – ओ सी डी हा एक गुंतागुंतीचा विकार आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की एखाद्याला ओ सी डी होईल की नाही यामागे वेगवेगळे अनुवांशिक जोखीम घटक आहेत. ज्या लोकांचे नातेवाईक ओ सी डी ग्रस्त आहेत अशांना ओ सी डी ग्रस्त नातेवाईक नसलेल्या लोकांच्या तुलनेत ओ सी डी होण्याची शक्यता जास्त असते.
  • तणाव – तीन पैकी एक किंवा दोन रुग्णांमध्ये आयुष्यातील तणावपूर्ण घटनेमुळे हा आजार झाल्याचे दिसते.
  • आयुष्यातील बदल – जेव्हा एखाद्या व्यक्तीला अचानक अधिक जबाबदारी घ्यावी लागते - उदाहरणार्थ, यौवन, बाळंतपण किंवा नवीन नोकरी.
  • मेंदूतील बदल – हे ओ सी डी चे कारण आहे की परिणाम हे आम्हाला माहीत नाही - मात्र, जर तुम्हाला ही लक्षणे थोड्या जास्त कालावधी पासून जाणवत असतील, तर संशोधकांना वाटते की त्यामुळे सेरोटोनिन (हे ५ एच टी म्हणूनही ओळखले जाते) नावाचे रसायन मेंदूमध्ये कसे कार्य करते यात बदल होऊ शकतात.
  • व्यक्तिमत्त्व – जर तुम्ही उच्च दर्जाची अपेक्षा करणारे, नीटनेटके, बारीक तपशीलाबद्दल विलक्षण जागरूक, पद्धतशीर अशी व्यक्ती असाल तर तुम्हाला ओ सी डी होण्याची शक्यता जास्त आहे. हे गुण सामान्यतः उपयुक्त असतात, परंतु ते अति झाल्यास त्यांची ओ सी डी मध्ये परिणीती होऊ शकते.
  • विचार करण्याची पद्धत – जवळपास आपल्या सर्वांच्या मनात कधीकधी विचित्र किंवा त्रासदायक विचार किंवा चित्र येतात - "मी अचानक त्या गाडीसमोर गेलो/ गेले तर?" किंवा "मी माझ्या बाळाला हानी पोहोचवेन". आपल्यापैकी बरेच जण या कल्पना त्वरित फेटाळून लावतात आणि जीवन पुढे जगू लागतात. परंतु, जर तुमच्याकडे विशेष उच्च दर्जाची नैतिकता आणि जबाबदारीची जाणीव असेल, तर तुम्हाला असे वाटेल की हे विचार नुसते डोक्यात येणे देखील भयंकर आहे. त्यामुळे, तुम्ही त्यांच्या परत येण्याकडे लक्ष देण्याची अधिक शक्यता आहे - ज्यामुळे ते पुन्हा मनात येण्याची शक्यता देखील वाढते.

मदत घेणे

मी स्वतःची कशी मदत करू?

या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही स्वतः करू शकता आणि त्यांची ओ सी डी असलेल्या इतर लोकांना मदत झाली आहे.

  • लक्षात ठेवा – यात तुमची काहीही चूक नाही आणि तुम्हाला 'वेड' लागलेले नाही.
  • तुमच्या त्रासदायक विचारांचा स्वीकार करा. हे ऐकायला विचित्र वाटते, परंतु त्यांच्यावर अधिक नियंत्रण मिळवण्याचा हा एक मार्ग आहे. तुम्ही ते रेकॉर्ड करून पुन्हा ऐकू शकता, किंवा लिहून काढून पुन्हा वाचू शकता. तुमची चिंता कमी होईपर्यंत तुम्ही दररोज सुमारे अर्धा तास हे नियमितपणे केले पाहिजे.
  • अनिवार्य वर्तनाचा प्रतिकार करा, परंतु अस्वस्थता निर्माण करणार्‍या विचारांचा नाही.
  • तुमची चिंता नियंत्रित करण्यासाठी अल्कोहोल किंवा रस्त्यावरील अंमली पदार्थ वापरू नका.
  • जर तुमच्या विचारांमध्ये तुमच्या श्रद्धा किंवा धर्मासंबंधित चिंता असेल, तर ही ओ सी डी समस्या आहे का हे जाणून घेण्यासाठी कधीकधी एखाद्या धार्मिक नेत्याशी बोलणे उपयुक्त ठरू शकते.
  • या पत्रकाच्या शेवटी सूचीबद्ध केलेल्या समर्थन गट किंवा वेबसाइट्सपैकी एकाशी संपर्क साधा.
  • या पत्रकाच्या शेवटी सूचीबद्ध केलेल्यांपैकी एखादे स्वयं-सहायता पुस्तक वापरून पहा.

कमी उपयुक्त वर्तन

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तुम्ही स्वतःला मदत म्हणून करत असलेल्या काही गोष्टी वास्तविक अशा प्रकारचे वर्तन राहण्यात मदत करतात:

  • आपल्या मनातून अप्रिय विचार बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करणे - यामुळे सामान्यतः हे विचार पुन्हा परत येतात. उदाहरणार्थ, पुढच्या एक मिनिटासाठी गुलाबी हत्तीचा विचार न करण्याचा प्रयत्न करा - तुम्हाला कदाचित इतर कशाचाही विचार करणे कठीण जाईल.
  • 'सुरक्षित' किंवा 'दुरुस्त करणाऱ्या' गोष्टींचा विचार. उदाहरणार्थ, तुम्ही त्या त्रासदायक विचाराला दुसर्‍या एखाद्या विचाराच्या (जसे की दहा पर्यंत मोजणे) किंवा चित्राच्या (जसे की एखाद्या व्यक्तीला जिवंत आणि निरोगी पाहणे) मदतीने दुरुस्त करण्याचा प्रयत्न करता.
  • नियमित कार्यविधी, तपासणे, टाळणे आणि स्वतःचे समाधान करून घेणे या सर्व गोष्टी तुम्हाला थोड्या काळासाठी तुमची चिंता कमी करतील – विशेषत: जर तुम्हाला असे वाटत असेल की या गोष्टी केल्याने काहीतरी भयानक घडण्यापासून रोखले जाईल. परंतु, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही त्या कृती करता तेव्हा तुमचा हा विश्वास दृढ होतो की असे केल्याने वाईट गोष्टी घडण्याचे टाळले जाते. आणि मग तुम्हाला त्या कृती करणे अधिकाधिक आवश्यक वाटते...आणि असेच पुढे चालू राहते.

मला कशा प्रकारची मदत मिळू शकते?

ओ सी डी असलेल्यांसाठी विविध उपचार आणि इतर प्रकारची मदत उपलब्ध आहे.

कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी (सी बी टी) - संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी

ही एक अशी उपचारपद्धती आहे जी तुम्हाला तुमची विचार करण्याची आणि वागण्याची पद्धत बदलण्यात मदत करते जेणेकरून तुम्हाला बरे वाटू शकेल आणि तुमचे आयुष्य पुढे जगता येईल.

ओ सी डी वर उपचार करण्यासाठी दोन प्रकारचे सी बी टी उपचार आहेत - एक्सपोजर आणि रिस्पॉन्स प्रिव्हेंशन (इ आर पी) आणि कॉग्निटिव्ह थेरपी (सी टी).

एक्सपोजर आणि रिस्पॉन्स प्रिव्हेंशन (इ आर पी)

अनिवार्य वागणूक आणि चिंता यांना एकमेकांना बळकट बनवण्यापासून रोखण्याचा हा उपाय आहे. आपल्याला माहीत आहे की जर तुम्ही तणावपूर्ण परिस्थितीत बराच काळ राहिलात तर तुम्हाला हळूहळू त्याची सवय होते आणि तुमची चिंता दूर होते. त्यामुळे, तुम्हाला ज्या परिस्थितीची भीती वाटते त्या परिस्थितीचा तुम्ही हळूहळू सामना करा (एक्सपोजर), परंतु तुमचे नेहमीचे अनिवार्य कार्यविधी, तपासणी किंवा साफसफाई करण्यापासून स्वत:ला थांबवा (प्रतिसाद प्रतिबंध) आणि तुमची चिंता दूर होण्याची वाट पहा.

हे लहान टप्प्यांमध्ये करणे सहसा चांगले असते:

  • या क्षणी तुम्हाला ज्या गोष्टींची भीती वाटते किंवा तुम्ही टाळता अशा सर्व गोष्टींची यादी बनवा;
  • तुम्हाला ज्या परिस्थितीची किंवा विचारांची सर्वात कमी भीती वाटते त्या तळाशी ठेवा, सर्वात भयानक वाटणारे विचार यादीत वर ठेवा;
  • त्यानंतर तळापासून सुरुवात करा आणि एका वेळी एक असे हे विचार हाताळा. आधीच्या टप्प्यावर मात केल्याशिवाय पुढच्या टप्प्यावर जाऊ नका.

तुम्ही दररोज अनेक वेळा, असे किमान एक किंवा दोन आठवडे सराव केल्यास याचा चांगला उपयोग होईल. प्रत्येक वेळी, तुमची चिंता सर्वात वाईट पातळीपेक्षा निम्म्याहून कमी होईपर्यंत तुम्ही हे करा - याला सुरूवातीस १० ते ९० मिनिटांपर्यंत वेळ लागू शकतो. दर ५ मिनिटांनी तुम्ही किती चिंताग्रस्त आहात याचे मोजमाप लिहिणे उपयुक्त ठरू शकेल, उदाहरणार्थ, ० (भीती नाही) ते १० (अत्यंत भीती). तुमची चिंता कशी आधी वाढते आणि मग कमी होते हे तुम्हाला दिसेल.

तुम्ही तुमच्या तज्ञ सल्लागारांसोबत काही टप्प्यांचा सराव करू शकता, परंतु बहुतेक वेळा तुम्हाला सोईस्कर वाटेल अशा गतीने तुम्ही स्वतःच हे कराल. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की तुम्हाला तुमच्या सर्व चिंतांपासून मुक्त होण्याची आवश्यकता नाही, फक्त त्यांच्यावर अधिक चांगल्या रितीने ताबा मिळवणे पुरेसे आहे. लक्षात ठेवा की तुमची चिंता:

  • नकोशी वाटणारी असली तरी हानिकारक नाही.
  • काही काळाने नाहीशी होईल.
  • नियमित सरावाने तिचा सामना करणे सोपे जाईल.

इ आर पी वापरण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत:

  • मार्गदर्शनासह स्व-सहाय्यता  – तुम्ही पुस्तक वाचून किंवा डीव्हीडी पाहून त्यातील मार्गदर्शनाचे अनुसरण करणे किंवा कॉम्प्युटरवर, टॅब्लेटवर एखाद्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅमचा वापर करणे किंवा फोनवरील अॅप वापरणे. सल्ला आणि समर्थनासाठी तुम्ही अधूनमधून व्यावसायिकांच्याही संपर्कात असाल. जर तुमचा ओ सी डी सौम्य प्रकारचा असेल आणि तुम्हाला स्वतःच स्वतःला मदत करण्याचे मार्ग वापरण्याचा आत्मविश्वास असेल तर हा दृष्टिकोन योग्य असू शकतो.
  • स्वतः किंवा समूहामध्ये मिळून नियमितपणे थेट व्यवसायिक तज्ञाशी संपर्क करणे  – हे समोरासमोर बसून, फोनवरून किंवा व्हिडिओ लिंकद्वारे केले जाऊ शकते. हे सहसा सुरूवातीला दर आठवड्याला किंवा दर दोन आठवड्यांनी एकदा असते आणि एका वेळी ४५ ते ६० मिनिटांपर्यंत चालू शकते. सुरूवातीला दहा तासांपर्यंत संपर्क व्हावा अशी शिफारस केली जाते, परंतु तुम्हाला आणखी वेळ घालवण्याची गरज असू शकते.

येथे एक उदाहरण पाहू:

जयेशला रोज कामावर जाण्यासाठी घरातून वेळेवर निघणे शक्य होत नव्हते कारण त्याला घरातल्या बऱ्याच गोष्टी निघण्याआधी तपासायच्या असायच्या. प्रत्येकी पाच वेळा काही गोष्टी तपासल्या नाहीत तर घर जळून खाक होईल किंवा घरात चोरी होईल अशी भीती त्याला वाटत असे. तो रोज काय काय तपासून बघतो याची त्याने यादी तयार केली. त्यामध्ये हाताळायला सोप्या अशा गोष्टीपासून सुरुवात केली. ती यादी अशी होती:

  • कुकर (सर्वात कमी भीती)
  • किटली
  • गॅसची ज्योत
  • खिडक्या
  • दारे (सर्वाधिक भीती)

कुकरला सामोरे जाणे हे त्याचे पहिले पाऊल होते, कारण ही त्याला सर्वात कमी भीती वाटणारी समस्या होती. कुकर अनेक वेळा बंद केल्याची खात्री करण्याऐवजी, त्याने तो एकदाच तपासला (स्वीकारणे). सुरुवातीला त्याला खूप काळजी वाटली. परंतु पुन्हा जाऊन तपासण्यापासून त्याने स्वतःला थांबवले. त्याने त्याच्याऐवजी त्याच्या पत्नीला सर्व काही तपासण्यास  सांगण्याचे आणि घर सुरक्षित असल्याचे आश्वासन  मागण्याचे मान्य केले (प्रतिसाद प्रतिबंध). पुढच्या दोन आठवड्यांत त्याची भीती हळूहळू कमी झाली.

त्यानंतर तो पुढच्या टप्प्यावर (किटली) गेला आणि असेच एकामागून एक करत राहिला. अखेरीस, त्याचे तपासणीचे कोणतेही कार्यविधी केल्याशिवाय त्याला घर सोडणे शक्य झाले आता तो वेळेवर कामावर जाऊ शकतो.

परिणामकारकता

इ आर पी पूर्ण करणाऱ्या ४ पैकी ३ जणांना त्याचा खूप फायदा जाणवतो. जे बरे होतात त्यांच्यापैकी सुमारे दर ५ व्यक्तींपैकी एका व्यक्तीमध्ये भविष्यात पुन्हा लक्षणे विकसित होताना दिसून येतात आणि त्यांना अतिरिक्त उपचारांची आवश्यकता भासते. मात्र सुमारे ४ पैकी १ व्यक्ती इ आर पी वापरण्यास नकार देतात, किंवा ती प्रक्रिया पूर्ण करत नाहीत. त्यांना त्याची खूपच भीती वाटते किंवा त्याचे खूप दडपण जाणवते.

कॉग्निटिव्ह थेरपी (सी टी)

कॉग्निटिव्ह थेरपी ही एक मनोवैज्ञानिक उपचार पद्धती आहे जी तुम्हाला विचारांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी विचारांसंबंधित तुमची प्रतिक्रिया बदलण्यात मदत करते. जर तुम्हाला वारंवार अस्वस्थ करणारे विचार येत असतील मात्र स्वतःला बरे वाटण्यासाठी सतत कोणतेतरी कार्यविधी किंवा कृती करण्याची तुम्हाला सवय नसेल तर हे उपयुक्त ठरू शकते. ओ सी डी वर मात करण्यासाठी ही पद्धती एक्सपोजर उपचार पद्धतीच्या (इ आर पी) च्या जोडीनेही वापरता येते.

कॉग्निटिव्ह थेरपी आपल्याला यासाठी मदत करते:

विचारांशी लढाई थांबवण्यासाठी

आपल्या सर्वांच्या मनात कधीकधी विचित्र विचार येतात, पण ते तेवढ्या पुरतेच असतात. त्यांचा अर्थ असा नाही की तुम्ही एक वाईट व्यक्ती आहात किंवा वाईट गोष्टी घडणार आहेत – आणि अशा विचारांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न केला तरी उपयोग होत नाही. असे विचार येत असताना कॉग्निटिव्ह थेरपी तुम्हाला बरे वाटण्यास, अगदी निवांत वाटण्यासही मदत करू शकते. तुम्ही त्या विचारांकडे सौम्य कुतूहलाने किंवा करमणुकीने पाहण्यास शिकू शकता. आणखी अधिक अप्रिय विचार येत राहिल्यास, तुम्ही त्यांचा प्रतिकार न करता, त्यांना येऊ देण्यास आणि त्यांच्याबद्दल तशाच प्रकारे विचार करत राहण्यास शिकता. जेव्हा तुम्ही त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करणे थांबवता तेव्हा असे विचार बरेचदा पुसट होत जातात.

तुमच्या विचारांवर तुमची प्रतिक्रिया बदलण्यासाठी

जेव्हा 'विचारांशी निगडित अस्वस्थ करणारे विचार' तुमच्या मनात येतात तेव्हा ते तुमच्या लक्षात येऊ लागते. जसे की 'मी असा विचार करतोय म्हणजे मी वाईट माणूस आहे.’ तुम्ही या निरुपयोगी पद्धतीने केलेल्या विचारांची डायरीमध्ये नोंद ठेवू शकता, आणि त्यानंतर स्वतःला खालील गोष्टी विचारून या विचारांना आव्हान देऊ शकता:

  • ही कल्पना खरी असण्याचा - आणि त्याच्या विरुद्ध स्थितीचा - काय पुरावा आहे?
  • हा विचार किती उपयुक्त आहे? याकडे बघण्याचा दुसरा मार्ग कोणता?
  • याचा सर्वात वाईट/सर्वोत्तम/सर्वात वास्तववादी परिणाम काय?
  • माझ्यासारखीच समस्या असणार्‍या माझ्या मित्राला/ मैत्रिणीला मी काय सल्ला देईन? मी त्यांना दिलेला माझा सल्ला जर मी स्वतःला दिलेल्या सल्ल्यापेक्षा वेगळा असेल तर तसे का?

जबाबदारी आणि दोष हाताळण्यासाठी

तुम्ही अवास्तव आणि स्वत:ची टीका करणारे विचार हाताळता, यामध्ये खालील गोष्टी समाविष्ट असू शकतात:

  • विचारांना अवास्तव महत्त्व देणे (ते 'फक्त' विचार आहेत);
  • काहीतरी वाईट घडण्याच्या शक्यतेचा बाऊ करणे;
  • तुमच्या नियंत्रणाबाहेर असतानाही, घडणार्‍या वाईट गोष्टींची जबाबदारी घेणे;
  • आपल्या प्रिय जनांच्या जीवनातील सर्व जोखीमा दूर करण्याचा प्रयत्न करणे.

निरुपयोगी विश्वास तपासून पाहण्यासाठी

ओ सी डी मध्ये सामान्यतः ही एक भीती असते की 'विचार केल्याने तसे होईल'. खिडकीतून बाहेर एखाद्या इमारतीकडे पाहण्याचा प्रयत्न करा आणि ती खाली पडत असल्याचा विचार करा. आपल्या मनात त्याचे खरोखर एक ठाम चित्र बनवा. काय होतं? आणखी एक अस्वस्थ करणारी समजूत म्हणजे 'एखाद्या गोष्टीचा विचार करणे हे ती अंमलात आणण्याइतकेच वाईट आहे'. कल्पना करा की तुमचा शेजारी आजारी आहे आणि त्याला काही खरेदी करणे आवश्यक आहे. त्याच्यासाठी ते करण्याचा फक्त विचार करा. त्यामुळे तुम्ही एक चांगली व्यक्ती ठरता का? खरं तर नाही. खरंच दुसऱ्याला मदत करायची असेल तर ती कृती करायला हवी. 'वाईट' विचारांच्या बाबतीत सुद्धा हे लागू होतं. स्वत:ला ही आठवण करून देणे महत्त्वाचे आहे की ओ सी डी असलेली व्यक्ती त्यांच्या सततच्या अस्वस्थ करणार्‍या विचारांप्रमाणे वागत नाही.

कॉग्निटिव्ह तज्ञ सल्लागार तुम्हाला तुमच्या कोणत्या कल्पना बदलायच्या आहेत हे ठरविण्यात मदत करेल आणि तुम्हाला अशा नवीन कल्पना तयार करण्यात मदत करेल ज्या अधिक वास्तववादी, संतुलित आणि उपयुक्त असतील.

तज्ञ सल्लागारासोबतच्या बहुतांश भेटी तुमच्या स्थानिक डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये, क्लिनिकमध्ये किंवा कधी कधी हॉस्पिटलमध्ये होतात. जर तुम्ही घरातून बाहेर पडू शकत नसाल तर तुम्ही फोनवर किंवा तुमच्या स्वतःच्या घरी सी टी घेऊ शकता.

अँटीडिप्रेसंट औषधे

एस एस आर आय (सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रीअपटेक इनहिबिटर्स) तुम्हाला नैराश्य नसले तरीही ध्यास आणि अनिवार्यता कमी करण्यास अँटीडिप्रेसंट्स मदत करू शकतात. उदाहरणार्थ, सर्ट्र्लिन, फ़्लुआक्सेटिन, परॉक्सटिन, एसटालफ्राम आणि फ़्लुवाक्समिन.

ही सामान्यतः सुरक्षित असतात, परंतु पहिल्या काही दिवसांत अस्वस्थता, डोकेदुखी, कोरडे तोंड किंवा आजारी वाटणे यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात. मध्यम ते गंभीर ओ सी डी साठी फक्त एस एस आर आय किंवा सी बी टी सह एस एस आर आय वापरले जाऊ शकतात. ओ सी डी साठी जास्त प्रमाणाचे डोस अनेकदा चांगले काम करतात.

जर एका प्रकारच्या एस एस आर आय सह केलेल्या उपचाराने ३ महिन्यांनंतर काहीच फायदा झाला नाही, तर पुढील पायरी म्हणजे औषध बदलून भिन्न एस एस आर आय किंवा क्लोमीप्रामाइन नावाचे औषध घेणे. जर त्याचा उपयोग होत असेल तर कमीत कमी १२ महिने औषधोपचार चालू ठेवणे चांगले. या औषधांचे व्यसन लागत नाही, परंतु पूर्णपणे थांबवण्याआधी काही आठवड्यांपर्यंत हळूहळू कमी केली पाहिजेत.

परिणामकारकता

१० पैकी ६ लोक औषधोपचाराने बरे होतात. सरासरी त्यांची लक्षणे सुमारे एक तृतीयांश कमी होतात. ध्यास (ऑब्सेशन) विरोधी औषधोपचार औषध चालू असताना तसेच नंतरही अनेक वर्षे ओ सी डी ला परत येण्यापासून रोखण्यास मदत करतो. परंतु - जे औषधोपचार थांबवतात त्यांच्यामध्ये सुमारे ३ पैकी १ व्यक्तीला ते थांबवल्यानंतर काही महिन्यांत पुन्हा लक्षणे दिसू लागतात.  जर सी बी टी च्या जोडीने औषध घेतले तर असे होण्याची शक्यता खूपच कमी असते.

माझ्यासाठी सर्वोत्तम मार्ग कोणता आहे - औषधोपचार की बोलून उपचार?

एक्सपोजर थेरपी (इ आर पी ) व्यावसायिक तज्ञांच्या मदतीशिवाय (सौम्य प्रकरणांमध्ये) केली जाऊ शकते. ती प्रभावी आहे आणि चिंता वाटणे या व्यतिरिक्त तिचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. दुसरीकडे, यासाठी खूप प्रेरणा आणि कठोर परिश्रम आवश्यक आहेत आणि यात थोड्या काळासाठी अधिक प्रमाणात चिंता वाटणे समाविष्ट आहे.

सी बी टी आणि औषधे कदाचित सारखीच प्रभावी आहेत. जर तुम्हाला फक्त सौम्य प्रमाणात ओ सी डी असेल तर फक्त सी बी टी सुद्धा प्रभावी ठरू शकते.

जर तुम्हाला मध्यम प्रमाणात ओ सी डी असेल, तर तुम्ही सी बी टी (जास्तीत जास्त एकूण १० तासांसाठी एखाद्या व्यावसायिक तज्ञाशी संपर्क) किंवा औषध (१२ आठवड्यांसाठी) यांपैकी एक निवडू शकता. तुमच्या परिस्थितीत काही सुधारणा वाटत नसेल तर तुम्ही दोन्ही उपचार पद्धती करून पाहायला हव्यात.  देशाच्या काही भागांमध्ये व्यावसायिक तज्ञाशी भेटण्यासाठी अनेक महिन्यांची प्रतीक्षा यादी असू शकते.

तुमचा ओ सी डी गंभीर स्वरूपाचा असल्यास, सुरुवातीपासूनच औषधोपचार आणि सी बी टी एकत्र करून पाहणे चांगले. तुमचा ओ सी डी सौम्य पेक्षा जास्त प्रमाणात असेल आणि तुम्ही इ आर पी आणि तुमच्या ओ सी डी च्या चिंतेचा एकत्र सामना करू शकाल असे तुम्हाला वाटत नसेल तर फक्त औषधोपचार हा एक पर्याय आहे. याचा १० पैकी ६ लोकांना उपयोग होतो, परंतु ओ सी डी भविष्यात परत येण्याची अधिक शक्यता असते - सुमारे ३ पैकी १ व्यक्तीच्या बाबतीत असे होऊ शकते. एक्सपोजर उपचारांच्या (इ आर पी) बाबतीत हे प्रमाण ५ पैकी १ इतके आहे. ही सुमारे एक वर्षाच्या कालावधीसाठी घ्यावी लागतात आणि जर तुम्ही गरोदर असाल किंवा स्तनपान करत असाल तर सामान्यतः हा तुमच्यासाठी सर्वात योग्य पर्याय नसतो.

या पर्यायांबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोलणे योग्य आहे. ते तुम्हाला आवश्यक असलेली कोणतीही अधिक माहिती देऊ शकतील. तुम्ही आपल्या विश्वासू मित्रमैत्रिणींना किंवा कुटुंबातील सदस्यांना देखील विचारू शकता.

उपचारांचा फायदा होत नसेल तर काय?

तुमचे डॉक्टर तुम्हाला एखाद्या तज्ञांच्या टीमकडे पाठवू शकतात, ज्यात मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, परिचारिका, सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिक थेरपिस्ट यांचा समावेश असू शकतो. ते यापैकी काही मार्ग सुचवू शकतात:

  • एक्सपोजर उपचार किंवा औषधांसोबत संज्ञानात्मक थेरपी घेणे;
  • एकाच वेळी दोन प्रकारची अँटी-ऑब्सेशनल औषधे घेणे, जसे की क्लोमिप्रमिन आणि सटॅलोप्राम;
  • अँटीसायकोटिक औषधे जोडणे, जसे की एरिपिप्रझोल किंवा रिस्पेरिडोन;
  • इतर आजारांवर उपचार करणे (ओ सी डी असलेल्या ३ पैकी १ व्यक्तीला चिंता, नैराश्य किंवा दारू किंवा अंमली पदार्थांच्या गैरवापराची समस्या असते);
  • तुमचे कुटुंबीय आणि तुमची देखभाल करणाऱ्यांसोबत मिळून काम करणे, त्यांना पाठिंबा देणे आणि त्यांना सल्ला देणे.

तुम्हाला एकटे राहून जगण्यात अडचण येत असल्यास, ते तुम्हाला अधिक स्वावलंबी होण्यास मदत करणाऱ्या तुमच्यासारख्या इतर लोकांसह योग्य निवासस्थान शोधण्याचा सल्ला देखील देऊ शकतात.

उपचाराने, ओ सी डी असलेल्या बहुतेक लोकांना सुधारणा जाणवते. परंतु जर तुम्हाला खूप गंभीर प्रमाणात ओ सी डी असेल ज्यामध्ये काहीच सुधारणा झालेली नाही तर:

  • रुग्णालयात राहून करण्याचा मानसशास्त्रीय उपचारांचा अधिक सखोल दैनंदिन कार्यक्रम (सी बी टी आणि इ पी आर)
  • सध्या अशा एका नवीन दृष्टिकोनावर संशोधन केले जात आहे ज्यामध्ये लक्षणे दूर करण्यासाठी इलेक्ट्रिकल पल्स वापरून सखोल मेंदू उत्तेजित केला जातो.
  • जर इतर कशानेही मदत होत नसेल तर,क्वचितच सुचवला जाणारा उपचार म्हणजे 'अॅब्लेटिव्ह न्यूरोसर्जरी' नावाची मेंदूवरील शस्त्रक्रिया. हा खरोखरच शेवटचा उपाय आहे कारण याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

मला उपचारासाठी रुग्णालयात जावे लागेल का?

बहुतेक लोक त्यांच्या नेहेमीच्या डॉक्टरांचा दवाखाना किंवा एखाद्या रुग्णालयाशी संलग्न असलेल्या क्लिनिकमध्ये उपस्थित राहून बरे होतात. मानसिक आरोग्य विभागामध्ये प्रवेश फक्त तेव्हाच सुचवला जाईल जेव्हा:

  • तुमची लक्षणे खूप गंभीर असतील, तुम्ही स्वतःची योग्य काळजी घेऊ शकत नसाल किंवा तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील;
  • तुम्हाला इतर गंभीर मानसिक आरोग्य समस्या असतील, जसे की खाण्याचा विकार, स्किझोफ्रेनिया, सायकोसिस किंवा तीव्र नैराश्य;
  • तुमच्या ओ सी डी मुळे तुम्ही उपचारासाठी दवाखान्यात जाऊ शकत नाही.

ओ सी डी वर कोणते उपचार काम करत नाहीत?

यापैकी काही दृष्टीकोन इतर परिस्थितींमध्ये कार्य करू शकतात - परंतु त्यांच्यासाठी ओ सी डी मध्ये प्रभावशाली असण्याचे ठोस पुरावे नाहीत:

  • पूरक किंवा वैकल्पिक उपचार जसे की संमोहन, होमिओपॅथी, अॅक्युपंक्चर आणि आयुर्वेदिक उपचार – जरी ते आकर्षक वाटत असले तरी.
  • इतर प्रकारची अँटीडिप्रेसंट औषधे, मात्र जर तुम्ही उदासीनता आणि ओ सी डी या दोन्हींनी ग्रस्त असाल तर ते उपयोगी होऊ शकतात.
  • झोपेच्या गोळ्या आणि गुंगीची औषधे (झोपक्लोन, डायझेपाम आणि इतर बेंझोडायझेपाइन्स) दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ घेणे. या औषधांचे व्यसन लागू शकते.
  • जोडपे किंवा वैवाहिक संबंधांविषयी सल्ला - ओ सी डी व्यतिरिक्त नातेसंबंधांमध्ये इतर समस्या असल्यास याचा उपयोग होऊ शकतो. जोडीदार आणि कुटुंबीयांनी ओ सी डी विषयी आणि त्यासंबंधी कशी मदत करावी याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणे उपयुक्त ठरते .
  • समुपदेशन आणि मनोविश्लेषणात्मक मनोचिकित्सा. वर वर्णन केलेल्या अधिक विशिष्ट उपचार पद्धती ओ सी डी च्या लक्षणांसाठी अधिक चांगले कार्य करतात असे दिसते. परंतु ओ सी डी असलेल्या काही लोकांना त्यांचे बालपण आणि भूतकाळातील अनुभवांबद्दल बोलणे उपयुक्त वाटते.

सी बी टी सुरू करण्यासाठी बराच वेळ थांबावे लागणार असल्यास?

तुमचे नेहेमीचे डॉक्टर तुम्हाला 'इम्प्रूव्हिंग ऍक्सेस टू सायकोलॉजिकल थेरपीज' (आय ए पी टी) नावाच्या स्थानिक सेवेकडे किंवा तज्ञ मानसिक आरोग्य टीमकडे पाठवू शकतात.

सध्या सी बी टी प्रशिक्षित राष्ट्रीय आरोग्यसेवा व्यावसायिकांची कमतरता आहे. काही भागांमध्ये, तुम्हाला उपचार सुरू करण्यासाठी अनेक महिने प्रतीक्षा करावी लागेल. पात्र थेरपिस्ट अनेकदा British Association of Behavioural and Cognitive Psychotherapies मध्ये नोंदणीकृत असतात.

'मी स्वतःला कशी मदत करू शकतो?' विभागात दिलेल्या उपायांनी फरक न पडल्यास , तुम्ही तुमच्या नेहेमीच्या डॉक्टरांना या दरम्यान एस एस आर आय औषधोपचार सुरू करण्याबद्दल विचारू शकता.

माझे कुटुंबीय आणि मित्र परिवार काय मदत करू शकतात?

येथे काही मार्ग आहेत ज्यायोगे कुटुंब आणि मित्र मदत आणि समर्थन देऊ शकतात.

  • ओ सी डी असलेल्या एखाद्या व्यक्तीचे वागणे खूप निराशाजनक असू शकते - हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की तो किंवा ती कठीण किंवा विचित्र वागण्याचा प्रयत्न करत नाही - ते शक्य तितक्या चांगल्या प्रकारे याचा सामना करत आहेत.
  • एखाद्या व्यक्तीला आपल्याला मदतीची गरज आहे हे स्वीकारण्यास थोडा वेळ लागू शकतो. त्यांना ओ सी डी बद्दल वाचण्यासाठी प्रोत्साहित करा आणि एखाद्या व्यावसायिक तज्ञाशी याबद्दल बोला.
  • ओ सी डी बद्दल अधिक जाणून घ्या.
  • तुम्ही तुमच्या नातेवाईकांच्या अनिवार्य वागण्यावर वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देऊन एक्सपोजर उपचारांना मदत करू शकता:
    • त्यांना भयभीत करणारी परिस्थिती हाताळण्यासाठी प्रोत्साहित करा;
    • सततचे कार्यविधी किंवा विनाकारण तपासणीमध्ये भाग घेण्यासाठी 'नाही' म्हणा;
    • सर्व ठीक आहे अशी खात्री त्यांना पुन्हा पुन्हा देऊ नका.
  • आपण हिंसक होऊ असे वारंवार विचार करणारी व्यक्ती खरंच हिंसक होईल म्हणून काळजी करू नका. असे होत नाही .
  • एखाद्याला सततचा कार्यविधी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न न करणे चांगले.
  • तुम्ही त्यांचे डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ किंवा इतर व्यावसायिकांना भेटण्यासाठी त्यांच्यासोबत जाऊ शकता का ते विचारा.

इतर कोणते समर्थन आणि संसाधने उपलब्ध आहेत?

समर्थन गट

OCD Action
ओ सी डी, बॉडी डिसमॉर्फिक डिसऑर्डर, सक्तीची त्वचा उपटणे आणि ट्रायकोटिलोमॅनिया असलेल्या लोकांसाठी धर्मादाय संस्था.

मदत आणि महितीसाठी संपर्क: 0845 390 6232

ईमेल: support@ocdaction.org.uk.

OCD-UK
ओ सी डी असलेल्या मुलांसाठी आणि प्रौढांसाठी राष्ट्रीय समर्थन गट.

महितीसाठी संपर्क: 0845 120 3778

ईमेलsupport@ocduk.org.  

Anxiety UK
पॅनिक, फोबिया, ओ सी डी सारख्या चिंतेशी संबंधित समस्या आणि संबंधित लक्षणे असलेल्या लोकांसाठी एक संस्था. पीडित, त्यांचे कुटुंब आणि काळजी घेणार्‍यांना आधार देते. थेट गप्पा, ईमेल, स्वयं-मदत पुस्तके, सीडी, डीव्हीडी आणि संसाधने.

मदतीसाठी संपर्क: 0844 775774

ईमेल: support@anxietyuk.org.uk.

अधिक माहिती

NHS Choices
लक्षणे, उपचार, स्थानिक सेवा आणि निरोगी जीवन याविषयी राष्ट्रीय आरोग्य सेवेकडून माहिती.

British Association for Behavioural & Cognitive Psychotherapies (BABCP)

एन एच एस अंतर्गत आणि बाहेर सी बी टी देऊ करणार्‍या व्यावसायिकांच्या विविध गटांसाठी मुख्य संस्था. हे चांगल्या पद्धतींची मानके राखते, माहिती, पत्रके प्रदान करते आणि एन एच एस चा भाग नसलेल्या उपचारांसाठी संपर्क साधू शकणाऱ्या सदस्यांची नोंदणी ठेवते. दूरध्वनी: 0161 054 304; ईमेल: babcp@babcp.com

संगणकीकृत सी बी टी

चिंता, नैराश्य, धसका, पॅनिक आणि ओ सी डी साठीच्या स्वयं-मदत संगणक पॅकेजच्या माहितीसाठी आमचे सी बी टी माहितीपत्रक किंवा खालील लिंक पहा: 

अधिक वाचन

Reading Well Books on Prescription

ही योजना तुम्हाला स्व-सहाय्यता वाचन वापरून तुमचे आरोग्य जपण्यास मदत करते. या आजाराशी लढा देत असणारे लोक तसेच रॉयल कॉलेज ऑफ सायकियाट्रिस्ट्ससह इतर आरोग्य व्यावसायिकांनी या पुस्तक यादीचे समर्थन केले आहे. याला सार्वजनिक ग्रंथालयांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे.

Understanding NICE guidance

ओ सी डी किंवा बॉडी डिसमॉर्फिक डिसऑर्डर असलेल्या लोकांसाठी, त्यांचे कुटुंब आणि काळजी घेणारे लोक आणि इतर सामान्य लोकांसाठी माहिती.

पुस्तके

Break Free from OCD: Overcoming Obsessive Compulsive Disorder with CBT by Fiona Challacombe, Victoria Bream Oldfield and Paul Salkovskis, Vermillion.

Understanding Obsessions & Compulsions: A self-help manual by Frank Tallis, Sheldon Press.

Overcoming Obsessive-Compulsive Disorder: a self-help book using cognitive-behavioural techniques by David Veale and Robert Willson, Constable and Robinson.

श्रेय नामावली

RCPsych पब्लिक एंगेजमेंट एडिटोरियल बोर्ड द्वारे निर्मित

तज्ञ पुनरावलोकन: डॉ पॉल ब्लेंकिरॉन

मालिका संपादक: डॉ फिल टिम्स

मालिका व्यवस्थापक: थॉमस केनेडी

This translation was produced by CLEAR Global (Sep 2023)