पोस्ट-ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी)

Post-traumatic stress disorder (PTSD)

Below is a Marathi translation of our information resource on post-traumatic stress disorder (PTSD). You can also read our other Marathi translations.

ही माहिती अशा लोकांसाठी आहे ज्यांना पोस्ट-ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी) चा त्रास होत असेल किंवा जे असा त्रास होत असलेल्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला ओळखत असतील.

पीटीएसडी म्हणजे काय?

पोस्ट-ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर ही अशी एक मानसिक आरोग्य समस्या आहे जी एखाद्या व्यक्तीला अत्यंत क्लेशकारक घटनेचा अनुभव घेतल्यामुळे होऊ शकते.

अत्यंत क्लेशकारक घटनेच्या अनुभवातून गेलेल्या बऱ्याच लोकांना नकारात्मक भावना, विचार आणि आठवणी येतात. तथापि, बऱ्याच जणांना कालांतराने बरे वाटते. जेव्हा या नकारात्मक प्रतिक्रिया निघून जात नाहीत आणि एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात अडथळा आणू लागतात तेव्हा त्यांना कदाचित पीटीएसडीचा त्रास झाला असण्याची शक्यता आहे.

पीटीएसडी कशामुळे होतो?

पीटीएसडीचा त्रास कोणालाही होऊ शकतो आणि हा त्रास अशा वेळी होतो जेव्हा एखाद्या व्यक्तीला थेट किंवा जवळून पुढील अनुभव येतात:

  • मृत्यू
  • गंभीर दुखापत
  • लैंगिक हिंसाचार

पुढे दिलेल्या पैकी एखाद्या प्रकारे ते यांना सामोरे जाऊ शकतात:

  • थेट प्रकारे – जे त्यांच्या बाबतीत घडले
  • साक्षीदार राहून – त्यांनी हे दुसर्‍या एखाद्या व्यक्तीबरोबर घडताना पाहिले
  • माहिती द्वारे – त्यांना असे कळले की हे त्यांच्या अगदी जवळच्या एखाद्या व्यक्तीबरोबर घडले आहे
  • वारंवार घडणे – त्यांना वारंवार अशा क्लेशकारक घटनांची अनुभूती होणे किंवा वारंवार इतर लोकांवर परिणाम करणाऱ्या घटनांशी सामना होणे. आपल्याला देखील लक्षात येते की ज्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमे, टेलिव्हीजन, चित्रपट किंवा नोकरीच्या ठिकाणी पाहिलेली दृष्ये यांच्याद्वारे क्लेशकारक घटनांचा सामना करावा लागतो अशा काही व्यक्तींना देखील मानसिक आरोग्य समस्यांचा त्रास होऊ शकतो.

क्लेशकारक घटनांमध्ये साधारणपणे पुढील अनुभव समाविष्ट असू शकतात:

  • हिंसक मृत्यू होताना पाहणे
  • गंभीर अपघात, उदाहरणार्थ मोटारीचा अपघात
  • शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार
  • गंभीर आरोग्य समस्या किंवा अतिदक्षता विभागात राहावे लागणे
  • गुंतागुंतीच्या बाळंतपणाचे अनुभव येणे
  • एखाद्या जीवघेण्या आजाराचे निदान होणे
  • युद्ध आणि संघर्ष
  • दहशतवादी हल्ले
  • नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती, उदाहरणार्थ त्सुनामी किंवा आग

हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की येथे नमूद न केलेल्या अशा अनेक घटना आहेत ज्यांच्यामुळे, आघातोत्तर ताणतणाव विकाराची बाधा होऊ शकते. जर तुमचा अनुभव येथे नमूद केलेला नसेल, तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही यासंदर्भात मदत आणि आधार घेऊ नये.

क्लेशकारक घटना इतक्या धक्कादायक का असतात?

क्लेशकारक घटना धक्कादायक असतात कारण त्या आपल्या समजण्याच्या पलीकडे असतात. जग कसे असावे याविषयीच्या ह्या आपल्या समजूतीमध्ये त्या बसत नाहीत.

क्लेशकारक घटना नेहमी ‘आकस्मिक’ पणे घडून आल्यासारख्या वाटतात किंवा त्यांना स्पष्ट असे कारण नसते. जग कसे असावे याविषयीच्या आपल्या दृष्टिकोनात त्या बसत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या घडून येण्याचा अर्थ समजणे कठीण होऊ शकते.

क्लेशकारक अनुभव आपल्याला हे ही दाखवून देतात की आपल्याबरोबर आणि आपल्या प्रेमाच्या व्यक्तींबरोबर वाईट गोष्टी कधीही होऊ शकतात. याचा परिणाम होऊन आपल्याला असुरक्षित आणि धोकादायक वाटू शकते जे किती भितीदायक आहे हे आपण समजू शकतो. कधी कधी अत्यंत क्लेशकारक घटनांमुळे आपल्याला आपल्या अस्तित्वाविषयी शंका वाटू शकते आणि ते त्रासदायक सुद्धा असू शकते.

एखाद्याला पीटीएसडीची बाधा होते तेव्हा काय होते?

बऱ्याच लोकांना आयुष्यभर वेदनादायक घटनांचा अनुभव येत राहतो. इंग्लंडमधील सुमारे एक तृतियांश प्रौढांनी त्यांच्या आयुष्यभरात किमान एक अत्यंत क्लेशकारक घटना अनुभवल्याचे नोंदवले आहे. तथापि अत्यंत क्लेशकारक घटना अनुभवणाऱ्या प्रत्येकाला पीटीएसडी होईलच असे नाही.

अत्यंत क्लेशकारक अनुभवानंतर अनेक लोकांना दुःख, खिन्नता, अपराधीपणा आणि क्रोध जाणवू शकतो. याचा अर्थ असा नाही की एखाद्या व्यक्तीला पीटीएसडी आहे. ज्यांना पीटीएसडी आहे अशा लोकांना नेहेमी पुढीलपैकी अनेक लक्षणे जाणवतात. ही ताबडतोब सुरु होऊ शकतात, किंवा काही आठवड्यांनंतर किंवा महिन्यांनंतरही सुरु होऊ शकतात.

पीटीएसडीची बाधा झाल्याने ही लक्षणे तुमच्या दैनंदिन व्यवहारांमध्ये हस्तक्षेप करू लागतात आणि/ किंवा यांचा तुम्हाला अतिशय त्रास होऊ लागतो. एखाद्या अत्यंत क्लेशकारक घटनेनंतर जर तुम्हाला यांपैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर याचा अर्थ तुम्हाला पीटीएसडीची बाधा होणार आहे असे जरुरी नाही.

पुनर-अनुभवाची लक्षणे

  • आठवणी - त्या घटनेच्या अतिशय अनिवार आणि त्रासदायक नकोशा वाटणाऱ्या आठवणी येणे, ज्यांना इन्ट्रुजीव थॉट्स असे म्हंटले जाते.
  • स्वप्ने - त्या घटनेची त्रासदायक स्वप्ने किंवा भितीदायक स्वप्ने येणे.
  • विभक्त प्रतिक्रिया - ती क्लेशकारक घटना पुन्हा घडत असल्यासारखे वाटणे किंवा तसे वागणे (याला फ्लॅशबॅक्स असे म्हंटले जाते). अतिशय गंभीर परिस्थितींमध्ये तुमची तुमच्या आसपास काय घडते आहे याविषयीची जाणीव नाहीशी होऊ शकते.
  • शारीरिक आणि मानसिक त्रास - जेव्हा तुमचा अशा गोष्टीशी संबंध येतो ज्या तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्या घटनेची आठवण करून देतात तेव्हा तुम्हाला अतिशय त्रासदायक आणि शारीरिकरित्या उत्तेजित वाटणे (उदा. जोरजोरात श्वास घेणे, नाडीचे ठोके वाढणे).

टाळण्याची लक्षणे

  • संबंध टाळणारे विस्मरण - त्या अत्यंत क्लेशकारक घटनेचे काही भाग आठवू न शकणे.
  • विभक्ती - विभक्त वाटणे किंवा ज्यांच्याशी आधी खूप जवळचे संबंध होते अशा लोकांशी आता जवळीक न वाटणे.
  • बोलणे आणि विचार करणे टाळणे - त्या क्लेशकारक घटनेविषयी किंवा एकंदर क्लेशकारक घटनांविषयी बोलण्याची किंवा त्यांचा विचार करण्याची इच्छा न वाटणे.
  • संबंध टाळणे - त्या क्लेशकारक घटनेशी संबंधित आठवणी, विचार, भावना, गोष्टी, लोक आणि जागा टाळणे. यामध्ये त्या घटनेशी संबंधित टीव्ही किंवा इतर माध्यमांमधील बातम्या टाळणे याचा समावेश असू शकतो, विशेषतः जर ते बघितल्याने तुम्हाला खूप त्रास होत असेल तर.

मानसिक कलाविषयीची लक्षणे

  • नकारात्मक विश्वास आणि अपेक्षा - तुम्ही स्वतःविषयी, इतरांविषयी किंवा जगाविषयी नकारात्मक विचार करणे.
  • दोष - ती क्लेशकारक घटना घडून येण्यासाठी किंवा त्याच्या परिणामांसाठी तुम्ही स्वतःला किंवा इतर लोकांना दोषी ठरवणे.
  • नकारात्मक भावना - सतत भीती, भयानकता, राग, अपराधीपणा किंवा लज्जा अनुभवणे.
  • कार्यरत होण्यामध्ये स्वारस्य गमावणे - ज्या क्रिया करण्यामध्ये तुम्हाला याआधी आनंद मिळत असे किंवा ज्या क्रिया तुम्ही याआधी नियमितपणे करू शकत होता त्या क्रियांमध्ये आता सहभागी न होणे किंवा स्वारस्य न वाटणे.
  • सकारात्मक भावना जाणवू न शकणे - आनंद, समाधान किंवा प्रेमळ भावना अनुभवण्यास सक्षम नसणे.

सतर्कता आणि प्रतिक्रियाशीलता लक्षणे

  • टोकाची दक्षता - आपल्या आजूबाजूला काय चालले आहे याबद्दल जास्त जागरूक असणे आणि विश्रांती घेण्यास असमर्थ असणे.
  • सहज दचकणे - क्लेशकारक घटनेची आठवण करून देणारे आवाज किंवा हालचालींवर अतिप्रतिक्रिया देणे.
  • लक्ष केंद्रित करण्यात अडचण – ज्या कामांवर आपण आधी लक्ष केंद्रित करण्यास सक्षम होतो अशा कामांवर लक्ष केंद्रित करणे कठीण वाटणे.
  • झोप न लागणे - झोप लागणे आणि झोपणे कठीण होणे. झोप लागली तरीही ती फारशी गाढ नसणे किंवा वाईट स्वप्ने पडणे.
  • चिडचिडेपणा - भावनिक उद्रेक होऊन लोक किंवा गोष्टींबद्दल शाब्दिक किंवा शारीरिकरित्या आक्रमक होणे. हे उद्रेक असे काही अनुभवल्यामुळे उद्भवू शकतात जे आपल्याला क्लेशदायक घटनेची आठवण करून देते.
  • निष्काळजीपणा – धोकादायक किंवा आत्मघातकी गोष्टी करणे.

पीटीएसडी का होतो ?

पीटीएसडी कशामुळे होतो याबद्दल अनेक संभाव्य स्पष्टीकरणे आहेत.

मानसशास्त्रीय

पीटीएसडीची मानसिक लक्षणे अत्यंत अप्रिय आणि त्रासदायक असतात. मात्र, जेंव्हा एखाद्या क्लेशकारक घटनेनंतर आपले मन आपले रक्षण करण्यासाठी कसे कार्य करू शकते याचा आपण विचार करतो तेंव्हा; हि लक्षणे समजून घेणे सोपे जाते.

  • स्मरणशक्ती - एखादी क्लेशदायक घटना अनुभवल्यानंतर आपण ती लक्षात ठेवण्यास असमर्थ किंवा अनिच्छुक असू शकतो. जे घडले आहे ते लक्षात ठेवणे त्रासदायक असले तरीही असे केल्याने आपल्याला घटनेचा अर्थ लावण्यास मदत होते. हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
  • अनाहूत विचार किंवा फ्लॅशबॅक – घडून गेलेल्या गोष्टींची मनातल्या मनात पुनरावृत्ती होणे. हे आपल्याला काय घडले आहे याचा विचार करण्यास भाग पाडू शकतात जेणेकरून अशी घटना पुन्हा घडली तर आपण अधिक चांगल्या प्रकारे तयार असू . मात्र, पीटीएसडी मध्ये या विचारांमुळे आपल्याला त्रासच होतो.
  • टाळणे आणि सुन्न होणे – कोणत्याही आघाताची आठवण थकवणारी आणि त्रासदायक असते. टाळणे आणि सुन्न होणे यांसारख्या प्रतिक्रिया घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करण्यापासून आपल्याला थांबवण्यास मदत करतात. मात्र, त्या आपल्याला आपल्या अनुभवांचा अर्थ लावण्यापासून देखील थांबवतात.
  • टोकाची दक्षता - जर आपण ‘सावध’ असू तर दुसरे एखादे संकट आल्यास आपण त्वरीत प्रतिक्रिया देण्यास तयार असू असे वाटणे. अपघात किंवा संकटानंतर आवश्यक असलेल्या कामासाठी असे करणे आपल्याला ऊर्जा देखील देऊ शकते. मात्र, हे थकवणारे देखील असू शकते आणि पूर्वी आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करण्यापासून आपल्याला रोखू शकते.

शारीरिक

पीटीएसडी सह उद्भवणारी काही शारीरिक लक्षणे उद्भवतात कारण आपले शरीर झालेला आघात चुकीच्या पद्धतीने स्वीकारण्याचा प्रयत्न करत असते.

  • अड्रेनलिन - जेव्हा आपण तणावाखाली असतो तेव्हा आपल्या शरीरात हे संप्रेरक (हार्मोन) तयार होते. हे आपल्या शरीरास अशा क्रियाकलापांसाठी तयार करण्यास मदत करते ज्यांना भरपूर ऊर्जा लागते, उदाहरणार्थ, धावणे किंवा एखाद्याशी लढणे. तणाव नाहीसा होतो, तेंव्हा अड्रेनलिनची पातळी सामान्य होणे अपेक्षित असते. पीटीएसडी मध्ये, तणावपूर्ण घटनेच्या ज्वलंत आठवणी अड्रेनलिनची पातळी उच्च ठेवू शकतात. अड्रेनलिनची उच्च पातळी आपल्याला तणावग्रस्त, चिडचिडी बनवते आणि आराम करण्यास किंवा चांगली झोप घेण्यास असमर्थ बनवू शकते.
  • हिप्पोकॅम्पस – हा मेंदूचा एक भाग आहे जो स्मृती निर्मिती संबंधित कार्य करतो. अड्रेनलिन सारख्या तणाव संप्रेरकांची उच्च पातळी, याला योग्यरित्या काम करण्यापासून थांबवू शकते. याचाच अर्थ असा आहे की क्लेशकारक घटनेच्या आठवणी योग्य प्रकारे नोंदवल्या जात नाहीत. याचा परिणाम असा होतो की घडलेली घटना ही भूतकाळात घडून गेलेली घटना नसून ती अशी एक घटना आहे जिची जोखीम अजूनही अस्तित्वात आहे अश्या प्रकारे आपण ती लक्षात ठेवतो. 

अशी काही कार्यक्षेत्रे आहेत का जिथे पीटीएसडी होण्याची शक्यता जास्त असते?

एखाद्या क्लेशदायक घटनेचा अनुभव घेतलेल्या कोणालाही पीटीएसडी होऊ शकतो. मात्र, काही लोकांच्या नोकर्‍या अशा असतात की त्यांना कामावर असताना क्लेशकारक घटनांचा अनुभव येण्याची शक्यता जास्त असते. याचा अर्थ असा की त्यांना पीटीएसडी होण्याचा धोका इतर कार्यक्षेत्रांपेक्षा जास्त असतो. यामध्ये पुढील नोकऱ्यांचा समावेश असू शकतो:

  • आपत्कालीन सेवा कर्मचारी (उदा. पोलिस, अग्निशमन दल किंवा रुग्णवाहिका कर्मचारी)
  • सामाजिक कार्यकर्ते
  • अतिदक्षता विभाग कर्मचारी
  • लष्करी कर्मचारी आणि युद्ध क्षेत्रात काम करणारे इतर लोक

पीटीएसडी कधी सुरु होतो?

पीटीएसडीची लक्षणे एखाद्या अत्यंत क्लेशकारक घटनेनंतर लगेचच किंवा आठवडा अथवा महिन्यांनंतर सुरू होऊ शकतात. सहसा, लक्षणे घटना घडल्यानंतर 6 महिन्यांच्या आत सुरू होतात. कधीकधी लक्षणे 6 महिन्यांनंतर सुरू होतात; पण असे फारसे घडत नाही. दुर्दैवाने, जेंव्हा लक्षणे प्रथम सुरू होतात तेव्हा बरेच लोक मदत मागत नाहीत.

एखाद्या क्लेशकारक घटनेनंतर पहिल्या महिन्यात पीटीएसडी चे निदान करता येत नाही. तुम्हाला लगेचच आघाताची लक्षणे जाणवत असतील,आणि ती गंभीर असून तुम्हाला कार्य करण्यापासून प्रतिबंधित करत असतील; तर तुम्हाला कदाचित 'तीव्र तणाव विकार (acute stress disorder)' झालेला असू शकतो.

क्लेशकारक अनुभवानंतर प्रत्येकालाच पीटीएसडी का होत नाही?

क्लेशकारक अनुभवानंतर अनेक लोकांमध्ये पहिल्या महिन्यात किंवा त्यापेक्षा जास्त काळ आघाताची काही लक्षणे दिसून येऊ शकतात. यापैकी बरीच लक्षणे वास्तविक किंवा गृहित धरलेला धोका अनुभवल्यानंतरची सामान्य प्रतिक्रिया असतात. तुमच्या मेंदूचा तुम्हाला हानीपासून सुरक्षित ठेवण्याचा एक मार्ग म्हणून तुम्ही यांचा विचार करू शकता.

तथापि, बहुतांश लोक काही आठवड्यांनंतर किंवा त्यापेक्षा काहीशा जास्त कालावधीत घडलेली गोष्ट स्वीकारतात आणि त्यांच्या तणावाची लक्षणे नाहीशी होऊ लागतात.

संशोधनातून असे दिसून येते की काही गटांतील व्यक्तींमध्ये पीटीएसडी होण्याचा धोका अधिक असतो. पीटीएसडी होण्याचा धोका कमी होतो जेव्हा एखाद्या व्यक्तीला:

  • सामाजिक आधार मिळतो आणि
  • आघातजन्य प्रसंगातून बरे होऊन बाहेर पडताना 'कमी तणावाचं वातावरण' असतं.

कोणत्या प्रसंगांमुळे पीटीएसडी होण्याची शक्यता अधिक असते?

कोणत्याही आघातजन्य घटनेमुळे पीटीएसडी होऊ शकतो, मात्र अनुभव जितका अधिक क्लेशदायक असेल तितकी तुम्हाला पीटीएसडी होण्याची शक्यता अधिक असते. उदाहरणार्थ, तुम्हाला पीटीएसडी होण्याची अधिक शक्यता असते जर ती घटना:

  • अचानक आणि अनपेक्षितपणे घडते
  • बराच काळ घडत राहते
  • जेव्हा तुम्ही अडकलेले असता आणि सुटू शकत नाही तेव्हा घडते
  • मानवनिर्मित असते
  • अनेक मृत्यूंना कारणीभूत असते
  • विकृती निर्माण करणारी असते
  • लहान मुलांचा समावेश असलेली असते.

जर तुमचे तणाव आणि अनिश्चिततेला सामोरे जाणे सुरू राहिले, तर तुमच्या पीटीएसडीच्या लक्षणांमध्ये सुधारणा होणे अधिक कठीण होईल.

मी अत्यंत क्लेशकारक घटनेच्या अनुभवातून केव्हा बाहेर आलो आहे हे मला कसे समजेल?

तुम्ही अत्यंत क्लेशकारक घटनेच्या अनुभवातून कदाचित बाहेर आला आहात जर तुम्ही हे करू शकत असाल:

  • अति प्रमाणात दुःखी न होता त्याबद्दल विचार करणे
  • धोका आहे अशी भावना सतत नसणे
  • अयोग्य वेळी त्याबद्दल विचार न करणे.

पीटीएसडीचे नेहमीच निदान का होत नाही?

पीटीएसडी असलेल्या एखाद्या व्यक्तीचे निदान का होऊ शकत नाही याची अनेक कारणे आहेत.

कलंक आणि गैरसमज

पीटीएसडी असलेली व्यक्ती अनेकदा त्यांना कसे वाटत आहे याबद्दल बोलणे टाळतात ज्यामुळे त्यांना क्लेशकारक घटनेबद्दल विचार करावा लागत नाही.

काही व्यक्तींना असे वाटते की ते अनुभवत असलेली लक्षणे (उदाहरणार्थ, टाळणे आणि सुन्न होणे) त्यांना सामना करण्यास मदत करत आहेत, आणि त्यांना हे लक्षात येत नाही की ते पीटीएसडीमुळे झाले आहे.

जेव्हा एखादी व्यक्ती खूप आजारी असते, तेव्हा त्यांना विश्वास ठेवणे कठीण जाते की ते या स्थितीमध्ये परत जाऊ शकतील की त्यांना क्लेशकारक घटनेपूर्वी कसे वाटले होते. यामुळे त्यांना मदत मिळवण्यामध्ये उशीर होऊ शकतो.

शिवाय असाही एक सामान्य गैरसमज आहे की केवळ सशस्त्र दलात असणाऱ्या व्यक्तींनाच पीटीएसडी होतो. खरं तर, पीटीएसडी कोणालाही होऊ शकतो आणि पीटीएसडीचा प्रत्येक अनुभव वैध आहे.

चुकीचे निदान

पीटीएसडी असलेल्या काही व्यक्तींचे कदाचित चिंताकिंवा नैराश्य असे चुकीचे निदान केले जाऊ शकते. काही व्यक्तींना इतर मानसिक किंवा शारीरिक आरोग्य समस्या असतील ज्यामुळे त्यांचा पीटीएसडी लक्षात येत नाही.

त्यांच्यामध्ये 'वैद्यकीयदृष्ट्या सुस्पष्ट नसलेली शारीरिक लक्षणे' देखील असू शकतात जसे की:

  • जठर आणि आतड्याच्या समस्या
  • वेदना
  • डोकेदुखी

या लक्षणांचा असा अर्थ होऊ शकतो की त्यांचे पीटीएसडी दुसरे काहीतरी म्हणून ओळखले गेले आहे.

इतर आव्हाने

पीटीएसडी असलेल्या काही व्यक्तींना इतर आव्हाने देखील असू शकतात, जसे की नातेसंबंधातील अडचणी किंवा अल्कोहोल अथवा मादक पदार्थांवर अवलंबून असणे. हे कदाचित त्यांच्या पीटीएसडीमुळे झालेले असू शकतात, परंतु ते प्रत्यक्ष पीटीएसडी पेक्षा अधिक उघडपणे दिसणारे असू शकतात.

लहान मुलांना पीटीएसडी होऊ शकतो का?

पीटीएसडी कोणत्याही वयात होऊ शकतो. हे कदाचित त्यांच्या पीटीएसडीमुळे झालेले असू शकते, परंतु ते प्रत्यक्ष पीटीएसडी पेक्षा अधिक उघडपणे दिसणारे असू शकतात:

  • भीतीदायक स्वप्ने – लहान मुलांमध्ये, ही स्वप्ने वास्तविक क्लेशकारक घटना दर्शवणारी असू शकतात किंवा नसू शकतात.
  • खेळताना पुनरावृत्ती – काही मुले खेळत असताना क्लेशकारक घटना घडवून आणतील. उदाहरणार्थ, रस्त्यावरील एखाद्या गंभीर रहदारी अपघातामध्ये सहभागी मूल कदाचित खेळण्यांतील कारने पुन्हा अपघाताचे नाट्य घडवून आणू शकते. 
  • शारीरिक लक्षणे – ते कदाचित पोटदुखी आणि डोकेदुखीची तक्रार करू शकतात.
  • त्यांचे आयुष्य लवकरच संपेल अशी भीती – ते मोठे होण्याइतके दीर्घकाळ जगतील यावर विश्वास ठेवणे कदाचित त्यांना कठीण जाईल.

पीटीएसडीसाठी उपचार काय आहेत?

पीटीएसडीसाठी अनेक प्रकारचे उपचार आहेत, ज्यामध्ये ट्रॉमा-फोकस्ड कॉग्नीटीव्ह बिहेवियरल थेरपी (टीएफ-सीबीटी), आय मूव्हमेंट डिसेन्सिटायझेशन अँड रीप्रोसेसिंग (इएमडीआर) आणि औषधोपचार यांचा समावेश होतो.

मानसोपचार

पीटीएसडीसाठीचे मानसोपचार तुमच्या भूतकाळातील जीवनाऐवजी अत्यंत क्लेशकारक अनुभवावर लक्ष केंद्रित करतील. ते तुम्हाला पुढील गोष्टींमध्ये मदत करतील:

  • स्वीकृती – जे घडले आहे ते जरी तुम्ही बदलू शकत नसलात तरी तुम्ही ती घटना, जग आणि तुमच्या आयुष्याबद्दल वेगळा विचार करू शकता हे स्वीकारायला शिकणे.
  • घटना आठवणे – भीती आणि दुःखाने दडपून न जाता काय घडले ते आठवणे. अनाहूतपणे घुसणारे विचारांच्या किंवा फ्लॅशबॅक्सच्या ऐवजी, काय घडले होते याविषयी तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही विचार करू शकाल.
  • तुमचे अनुभव शब्दात मांडणे – जे घडले त्याबद्दल बोलणे जेणेकरून तुमचे मन आठवणी साठवून बाजूला ठेवू शकेल आणि इतर गोष्टींकडे लक्ष देऊ शकेल.
  • सुरक्षित वाटणे – तुम्हाला तुमच्या भावनांवर अधिक ताबा ठेवण्यास मदत करणे. तुमचा तुमच्या भावनांवर ताबा असल्याची जाणीव वाढवण्यास तुमची मदत करणे.

कोणतेही मानसोपचार योग्यरित्या प्रशिक्षित आणि मान्यताप्राप्त व्यक्तीद्वारा दिले गेले पाहिजेत. सत्र सामान्यतः किमान दर आठवड्याला, त्याच रोगनिवारणतज्ञाबरोबर, आणि बहुतेक वेळा किमान 8-12 आठवडे चालणारी असतात.

सत्रे जरी साधारणतः एक तास चालत असली, तरी ती काहीवेळा 90 मिनिटांपर्यंत चालू शकतात.

पीटीएसडी वरील उपचारांमध्ये हे समाविष्ट आहे:

ट्रॉमा-फोकस्ड कॉग्नीटीव्ह बिहेवियरल थेरपी (टीएफ-सीबीटी)

ही एक बोलण्याची उपचारपद्धती आहे जी तुम्हाला तुमची विचार करण्याची पद्धत बदलण्यात मदत करू शकते. कालांतराने ही तुम्हाला बरे वाटण्यासाठी आणि वेगळ्या पद्धतीने वागण्यासाठी मदत करू शकते. हे सहसा एका वेळी एक व्यक्ती असे दिले जाते परंतु टीएफ-सीबीटी समूहामध्ये सुद्धा दिले जाऊ शकते असे दिसून आले आहे.

इएमडीआर (आय मुव्हमेंट डिसेन्सेटायझेशन अँड रिप्रोसेसिंग)

हे एक असे तंत्र आहे जे डोळ्यांच्या हालचालींचा उपयोग करून मेंदूला अत्यंत क्लेशकारक अशा आठवणींवर प्रक्रिया करण्यास मदत करते.

तुम्हाला त्या अत्यंत क्लेशकारक घटनेची आठवण करण्यास सांगितले जाईल आणि त्यामुळे तुम्ही काय विचार करता व तुम्हाला कसे वाटते हे विचारले जाईल. तुम्ही हे करत असताना तुम्हाला डोळ्यांची हालचाल करण्यास किंवा एखाद्या प्रकारचे ‘दुतर्फी उत्तेजन’, जसे की हाताने थाप मारणे, करण्यास सांगितले जाईल. यामुळे तुम्ही एखाद्या अत्यंत क्लेशकारक आठवणी संबंधित अनुभवत असलेल्या भावनांची तीव्रता कमी होऊन त्या आघाताचा प्रभाव कमी होताना दिसून आले आहे.

इएमडीआर एखाद्या प्रशिक्षित चिकित्सकानेच केले पाहिजे. इएमडीआर सहसा प्रत्येकी ६०-९० मिनिटे लांबीच्या अशा ८-१२ बैठकींमध्ये दिले जाते.

जे लोकं इएमडीआर किंवा टीएफ-सीबीटी यांना चांगला प्रतिसाद देत नाहीत त्यांच्यासाठी इतर काही प्रकारच्या बोलण्याच्या थेरपी विशिष्ट लक्षणांवर (उदाहरणार्थ झोप न येणे) लक्ष्य केंद्रित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

औषधोपचार

जर तुम्ही तुमच्या पीटीएसडी वर उपचार म्हणून इतर थेरपी करून पाहिल्या असतील आणि त्यांचा काही उपयोग झाला नसेल तर तुमचे डॉक्टर तुमच्यासाठी अँटीडिप्रेसंट्स लिहून देण्याची शक्यता आहे.

सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रीअपटेक इनहिबिटर्स (एसएसआरआय) ही एक प्रकारची अँटीडिप्रेसंट औषधे आहेत जी पीटीएसडीची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात. जर तुम्हाला नैराश्याचा त्रासही होत असेल तर अँटीडिप्रेसंट्स त्यातून बरे होण्यासाठी मदत करू शकतात.

जर तुमच्यासाठी एसएसआरआय वापरून उपयोग होत नसेल तर तुम्हाला दुसरे एखादे औषध दिले जाऊ शकते, मात्र सहसा हे एखाद्या मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार केले जाते.

कोणते उपचार सर्वात जास्त उपयोगाचे आहेत?

टीएफ-सीबीटी आणि इएमडीआर या सर्वांत चांगल्या पहिल्या पातळीच्या थेरपी असल्याचे दिसून आले आहे. ज्यांना बोलण्याच्या थेरपी नको असतील किंवा त्यांच्यासाठी त्या सहजपणे उपलब्ध नसतील त्यांना औषधोपचारांचा उपयोग होऊ शकेल.

मी प्रथम कोणता उपचार करावा?

शक्य असेल तेव्हा कोणत्याही औषधोपचारांच्या आधी आघात-केंद्रित मानसिक थेरपी (टीएफ-सीबीटी किंवा इएमडीआर) देऊ केल्या गेल्या पाहिजेत. हे नॅशनल इन्स्टिटयूट फॉर हेल्थ अँड केअर एक्सलंस (एनआयसीइ) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सुचवले गेले आहे.

मी स्वतःची मदत कशाप्रकारे करू?

तुम्हाला पीटीएसडी असेल तर त्यातून बरे होण्यासाठी तुम्ही करू शकाल अशा काही गोष्टी आहेत. तुमचे थेरपिस्ट तुम्हाला या गोष्टी करण्यामध्ये मदत करतील आणि तुम्ही त्या योग्य वेळी कराल याची खात्री करतील:

  • तुमची दिनचर्या चालू ठेवणे - शक्य असल्यास, तुमची नेहेमीची दिनचर्या पुन्हा सुरू करण्याचा किंवा ती नेहेमी पाळण्याचा प्रयत्न करा. तुमचे आयुष्य जितके शक्य असेल तितके नियमित ठेवल्याने तुम्हाला स्थिरता जाणवेल
  • एखाद्या विश्वासू व्यक्तीशी बोलणे - जे घडले त्याविषयी येत्या जात्या कोणत्याही व्यक्तीशी तुम्ही बोलले पाहिजे असे तुम्हाला न वाटणे साहजिक आहे, तरीही ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे अशा एखाद्या व्यक्तीशी बोलल्याने सुरक्षित वातावरणात तुम्हाला तुमच्या भावनांचा विचार करण्याची संधी मिळू शकते. जर असे करणे खूप त्रासदायक वाटत नसेल, तर ज्यांनी तुम्ही घेतलेला तोच अनुभव स्वतःही घेतला असेल किंवा ज्यांनी त्याच प्रकारचा एखादा अनुभव याआधी घेतला असेल, अशा एखाद्या व्यक्तीशी बोलणे उपयोगी ठरू शकते.
  • शिथिल होण्याचे व्यायाम करून बघणे - स्व-मार्गदर्शनानुसार केलेले ध्यान किंवा इतर प्रकारचे व्यायाम करून शिथिल होण्याचा प्रयत्न करा. पीटीएसडी ची बाधा झालेली असताना शिथिल होणे कठीण जाऊ शकते, त्यामुळे तुमच्या थेरपीस्टशी तुमच्यासाठी योग्य असे व्यायाम आणि कृती यांविषयी बोला.
  • शाळा किंवा कामाच्या जागी परत जाणे - जर तुम्हाला शक्य वाटत असेल तर काम, शाळा किंवा कॉलेजला परत जाणे उपयोगी ठरू शकते. यामुळे तुम्हाला तुमच्या दिनचर्येची जाणीव होईल. तथापि, ज्यामुळे तुम्हाला अधिक आघात किंवा तीव्र ताण अनुभवावा लागण्याची शक्यता असेल अशा परिस्थिती टाळण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. साधारणपणे, तुमचे उपचार सुरू होईपर्यंत कमी ताण असलेल्या आश्वासक वातावरणात काम करणे तुमच्यासाठी सर्वात योग्य आहे.
  • वेळेवर खाणे आणि व्यायाम करणे - जरी तुम्हाला भूक लागली नसेल तरीही नेहेमीच्या वेळेवर खाण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला शक्य वाटत असेल तर नियमितपणे व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे झोपायच्या वेळी तुम्हाला अधिक थकवा जाणवायला मदत होईल.
  • इतरांच्या संगतीत वेळ घालवणे - तुमच्या प्रेमाच्या व्यक्तींबरोबर वेळ घालवल्यामुळे तुम्हाला आधाराची जाणीव होऊ शकते.
  • बरे होण्याची अपेक्षा करणे - तुम्हाला शेवटी नक्की बरे वाटेल या विचाराकडे लक्ष केंद्रित केल्यामुळे तुम्हाला बरे होण्यामध्ये मदत होईल. लवकरात लवकर बरे होण्यासाठी स्वतःवर दबाव न आणण्याचे लक्षात ठेवा.
  • ती अत्यंत क्लेशकारक घटना जिथे घडली त्या जागी परत जाणे - जेव्हा असे करणे शक्य आहे असे तुम्हाला वाटेल फक्त तेव्हाच, जिथे ती अत्यंत क्लेशकारक घटना घडली तिथे तुम्ही परत गेले पाहिजे. तुम्ही जर असे करण्याचे ठरवत असाल तर तुमच्या थेरपिस्ट किंवा डॉक्टरांशी बोला, म्हणजे ते तुम्हाला या बाबतीत मदत करू शकतील.

तुम्ही बरे होत असताना अशा काही गोष्टी आहेत ज्या करताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे किंवा त्यांच्याविषयी तुम्ही जागरूक असले पाहिजे. तथापि, ‘योग्य वर्तन’ करणे अतिशय कठीण जाऊ शकते आणि जर तुम्ही यांपैकी कोणतेही वर्तन करत असल्याचे तुमच्या लक्षात आले तर तुम्ही स्वतःला अपराधी ठरवू नये:

  • स्वतःवर टीका - पीटीएसडी लक्षणे हे कोणत्याही प्रकारच्या कमकुवतपणाचे लक्षण नाही. अत्यंत भयानक अनुभवांची ती एक साधारण प्रतिक्रिया आहे.
  • तुमच्या भावना तुमच्यापाशीच ठेवणे - जर तुम्हाला पीटीएसडी ची बाधा झाली असेल तर तुम्ही तुमचे विचार आणि भावना इतरांपाशी व्यक्त करण्यासाठी स्वतःला अपराधी ठरवू नका. तुम्हाला काय वाटते ह्या बद्दल बोलणे तुमच्या आजारपणातून बरे होण्यासाठी सहाय्यक ठरू शकते.
  • सगळे काही पूर्वपदावर येण्याची अपेक्षा करणे – पीटीएसडी च्या उपचारांना वेळ लागू शकतो. लगेचच स्वतःकडून खूप अपेक्षा ठेवण्याचा प्रयत्न करू नका.
  • इतर लोकांपासून दूर राहणे – स्वतःमध्ये जास्तीत जास्त वेळ राहिल्याने एकटेपणाची भावना वाढून तुम्हाला आणखीनच वाईट वाटू शकते.
  • मद्यपान आणि धूम्रपान – भलेही दारू तुम्हाला आराम देण्यास मदत करू शकते, कालांतराने तुमची अवस्था आणखीनच वाईट होऊ शकते. जर तुम्ही पीटीएसडीची लक्षणे अनुभवत असाल तर  कॉफी आणि निकोटीन हे उत्तजेकांप्रमाणे काम करू शकतात ज्याने तुमची अवस्था आणखीनच वाईट होऊ शकते.
  • अत्याधिक थकून जाणे – पीटीएसडीमुळे झोप येणे कठीण होऊ शकते, परंतु तुमच्या नेहमीच्या झोपण्याच्या दिनचर्येवर टिकून राहा आणि उशिरा पर्यंत जागे राहणे टाळा, ज्यामुळे तुमची अवस्था आणखीन वाईट होऊ शकते. तुम्ही आमच्या चांगली झोपया साधनामध्ये अधिक माहिती मिळवू शकता.

शेवटी, गाडी चालवत असताना तुम्हाला अधिक सतर्क राहावे असे सुद्धा वाटू शकते आणि जर तुम्हांस असुरक्षित वाटत असल्यास तुम्ही डीव्हीएलए ला कळवू शकता. काहीतरी क्लेशकारक घडल्यानंतर लोकं अधिकतर अपघातांना बळी पडू शकतात.

जटिल पीटीएसडी  म्हणजे काय?

काही लोकांमध्ये जटिल पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (जटिल पीटीएसडी) विकसित होऊ शकते. हे अत्यंत धोकादायक किंवा भयावह घटना किंवा एकापेक्षा अधिक घटना अनुभवल्याने होऊ शकते. ह्या घटना बालपणी  किंवा मोठेपणी घडू शकतात.

बहुतेक वेळा ह्या घटनांपासून बचावणे किंवा त्यातून सहजपणे सुटका होणे कठीण किंवा अशक्यप्राय झालेले असेल. उदाहरणार्थ:

  • छळ
  • गुलामगिरी
  • वंश हत्या मोहीमा
  • यद्ध क्षेत्रात राहणे
  • दीर्घकालीन कौटुंबिक हिंसा
  • बालपणी वारंवार झालेले लैंगिक किंवा शारीरिक शोषण. 

पीटीएसडीच्या लक्षणांबरोबरच, जटिल पीटीएसडी असलेल्या लोकांमध्ये :

  • स्वतःबद्दल अत्यंत नकारात्मक समजुती असतात जसे 'हिन, पराभूत किंवा नालायक'
  • स्वतःच्या भावना आणि भावनिक प्रतिसादांना नियमित करणे खूप कठीण असते
  • इतर लोकांबद्दल जवळीक बाळगण्यात आणि नाती टिकविणे अत्यंत कठीण होते

मी जटिल पीटीएसडी मधून बरा/ बरी कसा/ कशी होऊ शकतो/ शकते?

जटिल पीटीएसडी असलेल्या लोकांमध्ये इतर लोकांवर आणि सर्वसाधारणपणे जगावर अविश्वास असणे सामान्य आहे. थेरपिस्ट सोबत सुरक्षित नातेसंबंध विकसित व्हावेत यासाठी बहुदा उपचाराचा कालावधी जास्त असतो. जटिल पीटीएसडी असलेली एखादी व्यक्ती थेरपिस्टसोबत जे काम करते ते तीन टप्प्यांत होते :

स्थिरीकरण

स्थिरीकरणाच्या टप्प्यात तुम्ही तुमच्या थेरपिस्टवर विश्वास ठेवायला शिकाल आणि तुमच्या दुःखाच्या आणि अलिप्ततेच्या भावना समजून त्यांना नियंत्रित कराल.

स्थिरीकरणाचा भाग म्हणून, तुम्ही 'ग्राउंडिंग' तंत्र शिकू शकता. हे तुम्हाला सामान्य शारीरिक भावनांवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करू शकतात आणि तुम्ही भूतकाळात नाही तर वर्तमानात जगत आहात याची तुम्हाला आठवण करून देतात.

स्थिरीकरण तुम्हाला तुमच्या आठवणीतील भीती आणि चिंता आणि त्यांना निर्माण करणाऱ्या भावना यांपासून 'वेगळे करण्यास' मदत करू शकतात. यामुळे या आठवणी कमी भितीदायक होण्यास मदत होऊ शकते.

स्थिरीकरणाचे उद्दिष्ट आहे कि शेवटी तुम्ही मागील घटना आणि चिंता न अनुभवता तुमचे आयुष्य जगू शकाल.

काहीवेळा फक्त स्थिरीकरण ही एकमेव मदत आवश्यक असते.

मानसिक आघात-केंद्रित उपचार

इएमडीआर किंवा टीएफ-सीबीटी सह मानसिक आघातांवर केंद्रित उपचार तुम्हाला तुमचे क्लेशदायक अनुभव हाताळण्यास मदत करू शकते. मनोविकार मानसोपचारांसह इतर मानसोपचार देखील उपयुक्त ठरू शकतात. जटिल पीटीएसडी मध्ये काळजी घेणे आवश्यक आहे कारण या उपचारांचा योग्य वापर न केल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते.

पुनर्एकीकरण किंवा पुनर्रसंबंध

दैनंदिन जीवनामध्ये पुनर्एकीकरण, तुम्हाला वास्तविक जगाची सवय होण्यास मदत करू शकते कारण तुम्ही पूर्वी ज्या धोकादायक परिस्थितीत होता त्यामध्ये तुम्ही आता नाही आहात. हे तुम्हाला स्वतःला अधिकार आणि निवडी असलेली व्यक्ती म्हणून पाहण्यास मदत करू शकते.

पुनर्एकीकरण तुम्हाला यामध्ये मदत करेल:

  • स्वतःशी आणि इतरांशी अनुकंपेने जोडणे
  • स्वतः आणि इतरांवर विश्वास पुनःप्रस्थापित करणे
  • मैत्री, घनिष्ट नातेसंबंध आणि तुमचे आरोग्य आणि हित वाढवणाऱ्या क्रियांमध्ये पुनः गुंतणे

औषधोपचार

पीटीएसडी साठी, नैराश्यावरील औषधे  किंवा इतर औषधोपचार तसेच मानसोपचारांचा देखील उपयोग केला जाऊ शकतो. मानसोपचार तुमच्यासाठी काम करीत नसेल अथवा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही औषधोपचारांचा देखील उपयोग करू शकता. मानसिक आरोग्य तज्ञांनी तुमच्या औषधांचे पुनरावलोकन करण्याने देखील मदत होऊ शकते.

स्वतःची मदत

जर तुम्हाला जटिल पीटीएसडी असेल, तर तुमच्या भूतकाळातील मानसिक आघाताच्या अनुभवांशी काहीही संबंध नसलेल्या सामान्य गोष्टी करण्याचा प्रयत्न करणे उपयुक्त ठरू शकते. यात हे समाविष्ट असू शकते:

  • मित्र बनविणे
  • नोकरी मिळणे
  • नियम व्यायाम करणे
  • विरंगुळ्याचे तंत्र शिकणे
  • छंद जोपासणे
  • पाळीव प्राणी पाळणे.

ह्या गोष्टी तुम्हाला हळूहळू सभोवतालच्या जगावर विश्वास ठेवण्यास मदत करू शकतात. तथापि, यास वेळ लागू शकतो आणि या गोष्टी करण्यास कठीण भासण्यात किंवा त्या त्वरित करण्यात अक्षम असण्यात कोणतीही लाज नाही.

एखाद्यास पीटीएसडी आहे हे मी कसे सांगू शकते/ शकतो?

जर तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीला ओळखत असाल ज्याने नुकतीच एक अत्यंत क्लेशकारक घटना अनुभवली असेल, तर अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे.  या गोष्टी त्यानां सामोरे जाण्यासाठी संघर्ष करत असल्याची चिन्हे असू शकतात :

  • वर्तनातील बदल – कामावर खराब कामगिरी, उशिरा पोहचणे, आजारी असल्याची रजा घेणे, किरकोळ अपघात
  • भावनेतील बदल – राग, चिडचिड, नैराश्य, रस नसणे आणि एकाग्रतेचा अभाव
  • विचारांमध्ये बदल – धमक्या किंवा भीती मध्ये राहणे, भविष्याबद्दल नकारात्मक विचार
  • अनपेक्षित शारीरिक लक्षणे  – जसे की श्वास न घेता येणे, चिंताग्रस्त होणे, किंवा पोट दुखणे

जर तुम्हाला वाटत असेल की कोणीतरी पीटीएसडी ची चिन्हे दाखवत आहे, तर तुम्ही त्यांना यांच्या डॉक्टरशी बोलण्यासाठी प्रोत्साहित करू शकता. हे करण्यासाठी जर तुम्ही त्यांच्या जवळचे व्यक्ती नसाल, तर तुम्ही त्यांच्या जवळच्या कोणाशी तरी बोलू शकता, जो हे करू शकेल.

या संसाधनासारखी पीटीएसडी बद्दल माहिती पाहणे, त्यांना येत असलेल्या अडचणी ओळखण्यात मदत करण्यासाठी देखील त्यांना मदत करू शकते.

ज्याने एखाद्या क्लेशकारक घटनेचा अनुभव घेतला आहे अशा व्यक्तीला मी कशा प्रकारे मदत करू शकेन?

क्लेशकारक अनुभवातून गेलेल्या व्यक्तीला आधार देण्यासाठी खालील गोष्टी लाभदायक ठरू शकतात:

  • बोला  – त्यांना त्यांच्या अनुभवांबद्दल तुमच्याशी बोलण्याची परवानगी देण्यासाठी वेळ द्या.
  • ऐका – त्यांना बोलू द्या आणि प्रवाहात व्यत्यय आणू नका किंवा तुमचे स्वतःचे अनुभव सांगू नका.
  • सामान्य प्रश्न विचारा – जर तुम्ही प्रश्न विचारणार असाल तर ते सामान्य असावेत आणि कोणत्याही प्रकारचा निर्णय किंवा मत व्यक्त करणारे नसावेत. उदाहरणार्थ, तुम्ही विचारू शकता की , 'तुम्ही याबद्दल इतर कोणाशी बोलला आहात का?' किंवा 'तुम्हाला अजून थोडी मदत मिळवून देण्यासाठी मी काही प्रयत्न करू का?'

तुम्ही हे टाळण्याचा प्रयत्न करावा:

  • त्यांना कसं वाटतं आहे हे तुम्हाला माहिती आहे असे सांगणे – जरी तुम्ही असे काही अनुभवले असले तरी निरनिराळे लोक खूपच वेगळ्या प्रकारे घटनांना सामोरे जातात. येथे तुलना करून काहीही मदत होणार नाही.
  • ते जिवंत आहेत हीच नशिबाची गोष्ट आहे असे त्यांना सांगणे – क्लेशकारक घटना अनुभवलेल्या लोकांना ते नशीबवान आहेत असे सहसा वाटत नाही. बरेचदा, इतरांचा मृत्यू झाला असल्यास त्यांना स्वतः जिवंत राहिल्याबद्दल दोषी वाटू शकते.
  • त्यांच्या अनुभवाचा प्रभाव कमी करणे – जरी त्यांना बरे वाटावे हा तुमचा उद्देश असला तरीही गोष्टी अजून वाईट थराला जाऊ शकल्या असत्या असे सुचवणे टाळा. यामुळे लोकांना असे वाटू शकते की त्यांच्या भावना न्याय्य नाहीत.
  • निरुपयोगी सल्ले देणे – जरी अशा काही गोष्टी केल्याने तुम्हाला यापूर्वी फायदा झाला असला तरीही त्यांना सूचना देणे थांबवा. लोक खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि बरेचदा तुम्ही सुचवत असलेल्या गोष्टी त्यांनी आधीच करून पाहिलेल्या असतात.

अधिक मदत

पीटीएसडी बद्दल माहिती

यूके सायकॉलॉजिकल ट्रॉमा सोसायटी – पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस रिॲक्शन्सबद्दल सामान्य लोकांसाठी आणि आरोग्य व्यावसायिकांसाठी उपयुक्त माहितीसह सामग्रीची निवड येथे तुम्हाला मिळेल.

ओव्हरव्ह्यू ऑफ पीटीएसडी, एनएचएस– एनएचएस कडील या माहितीत पीटीएसडी संबंधित माहितीचा अंतर्भाव आहे

ओव्हरव्ह्यू ऑफ कॉम्प्लेक्स पीटीएसडी, एनएचएस– एनएचएस कडील या माहितीत कॉम्प्लेक्स पीटीएसडी संबंधित माहितीचा अंतर्भाव आहे

पीटीएसडी, माईंड  – माईंड या धर्मादाय संस्थेकडे पीटीएसडी आणि कॉम्प्लेक्स पीटीएसडी संबंधित माहिती आहे

मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीय कशाप्रकारे मदत करू शकतात? माईंड– ही माहिती पीटीएसडी असलेल्या तुमच्या ओळखीच्या एखाद्याला तुम्ही कशी मदत करू शकता याची कल्पना देते

युजफूल काँटॅक्ट्स, माईंड – या पृष्ठावर पीटीएसडी असलेल्या लोकांना मदत करणार्‍या इतर धर्मादाय संस्था आणि इतर संस्थांचे दुवे आहेत

पीटीएसडी असलेल्या लोकांना मदत करणारे धर्मादाय संस्था

येते काही धर्मादाय संस्था आहेत ज्या पीटीएसडी किंवा क्लेशकारक घटनेचा अनुभव येणाऱ्या लोकांना समर्थन देतात :

पीटीएसडी यूके – पीटीएसडी संबंधित जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित असलेली एक यूके धर्मादाय संस्था

कॉम्बॅट स्ट्रेस  – दिग्गजांच्या मानसिक आरोग्यासाठी यूके धर्मादाय.

क्रूज बिरीव्हमेन्ट केअर – इंग्लंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंडमधील शोकग्रस्त लोकांसाठी मदत देणारी धर्मादाय संस्था

क्रूज बिरीव्हमेन्ट केअर स्कॉटलंड– स्कॉटलंडमधील शोकग्रस्त लोकांच्या कल्याणाचा प्रचार करणारी एक धर्मादाय संस्था

रेप क्रायसिस  – अशा तीन धर्मादाय संस्था आहेत ज्या संपूर्ण यूके मधील बलात्कारासारख्या संकटाशी संबंधित लोकांना मदत करतात :

व्हिक्टीम सपोर्ट – अशा तीन पीडित समर्थन धर्मादाय संस्था आहेत ज्या संपूर्ण यूके मधील अशा लोकांना मदत करतात जे गुन्हेगारी आणि क्लेशकारक घटनांना बळी पडले आहेत:

श्रेय नामावली

ही माहिती रॉयल कॉलेज ऑफ सायकियाट्रिस्टस् यांच्या पब्लिक एंगेजमेंट एडिटोरियल बोर्ड (पीइइबी) (Royal College of Psychiatrists’ Public Engagement Editorial Board) (PEEB) ने तयार केली आहे. ही माहिती लेखनाच्या वेळी उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम माहितीवर आधारित आहे. 

ज्यांनी या संसाधनावर आपला अभिप्राय दिला, अशा पीटीएसडी यूके यांचे आम्ही विशेष आभारी आहोत.

तज्ञ संपादक: प्रोफेसर नील ग्रीनबर्ग 

या संसाधनासाठीचे संपूर्ण संदर्भ विनंतीवर उपलब्ध आहेत.

प्रकाशित: नोव्हेंबर 2021

पुनरावलोकन नियत काळ: नोव्हेंबर 2024

© रॉयल कॉलेज ऑफ सायकियाट्रिस्टस् (Royal College of Psychiatrists)

This translation was produced by CLEAR Global (Jul 2024)