चिंता आणि जनरलाइज्ड एंग्जाइटी डिसऑर्डर (जीएडी)

Anxiety and generalised anxiety disorder (GAD)

Below is a Marathi translation of our information resource on anxiety and generalised anxiety disorder (GAD). You can also read our other Marathi translations.

ही माहिती अशा लोकांसाठी आहे जे सतत चिंतेच्या भावनांनी ग्रस्त झाले आहेत किंवा ज्यांना जनरलाइज्ड एंग्जाइटी डिसऑर्डर (जीएडी) चे निदान झाले आहे.

यामध्ये तुम्ही स्वत:ला कशी मदत करू शकता आणि तुम्हाला व्यावसायिक मदत कशी मिळवता येईल हे कळते. जे चिंतेच्या भावनांनी ग्रस्त झालेल्या इतर कोणाला ओळखत असतील किंवा त्यांची काळजी घेत असतील अशा लोकांसाठीही उपयुक्त माहिती यामध्ये आहे.

चिंता म्हणजे काय?

चिंता हा असा एक शब्द आहे जो आपण तणावपूर्ण, धोक्याच्या किंवा कठीण परिस्थितीत असताना किंवा एखाद्या समस्येला तोंड देत असताना आपल्या मनात येणाऱ्या अप्रिय भावनांचे वर्णन करण्यासाठी वापरतो. ही स्वतः मानसिक आरोग्याची स्थिती नाही.

आपल्यापैकी बहुतेकांना वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्या जीवनात कधीतरी चिंता जाणवते. हा एक सामान्य प्रतिसाद असू शकतो आणि सामान्यतः जेव्हा परिस्थिती बदलते किंवा जेव्हा तुम्हाला चिंताग्रस्त बनवणाऱ्या परिस्थितीपासून तुम्ही दूर जाता तेव्हा तो कालांतराने कमी होतो.

चिंता ही समस्या कधी बनते?

चिंता ही समस्या बनू शकते जेव्हा:

 • तुमची चिंता खूप तीव्र असते
 • तुम्हाला पूर्ण वेळ किंवा बहुतेक वेळा चिंता वाटत असते
 • तुम्हाला चिंता का वाटते याचे कोणतेही स्पष्ट कारण नसते
 • त्याचा तुमच्या दैनंदिन जीवनावर नकारात्मक परिणाम होत असतो

जेव्हा असे घडते तेव्हा चिंता तुम्हाला सतत अस्वस्थ करू शकते, तुम्हाला हव्या त्या गोष्टी करण्यापासून थांबवू शकते आणि जीवनाचा आनंद घेणे तुमच्यासाठी कठीण होऊ शकते.

चिंतेचा अनुभव कसा असतो?

चिंतेमुळे तुम्हाला तुमच्या मनात आणि शरीरात बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी जाणवू शकतात, जसे की:

तुमच्या मनात

 • सतत काळजीत राहणे
 • थकल्यासारखे वाटणे किंवा झोपेचा त्रास जाणवणे
 • लक्ष केंद्रित न करता येणे
 • चिडचिड किंवा उदास वाटणे
 • अस्वस्थ किंवा तणाव जाणवणे
 • भारावून गेल्यासारखे वाटणे
 • काहीतरी भयंकर घडेल याची भीती वाटणे.

तुमच्या शरीरात

 • जलद किंवा अनियमित हृदयाचे ठोके (धडधडणे)
 • घाम येणे
 • तोंड कोरडे होणे
 • स्नायूंचा ताण आणि वेदना
 • डोके दुखणे
 • थरथरणे/ कापणे
 • हाताच्या/ पायाच्या बोटांमध्ये किंवा ओठांमध्ये सुन्नपणा जाणवणे किंवा मुंग्या येणे
 • जलद श्वासोच्छवास
 • गरगरल्यासारखं वाटणे किंवा चक्कर येणे
 • पोटाच्या समस्या जसे अपचन, मुरडा किंवा मळमळल्यासारखं वाटणे
 • वारंवार शौचालयात जाणे
 • या शारीरिक संवेदनांशी संबंधित खूप चिंता वाटणे.

काहीवेळा, चिंताग्रस्त लोकांना काळजी वाटते की त्यांची लक्षणे शारीरिक आजाराशी निगडित आहेत. यामुळे त्यांची चिंता आणखी वाढू शकते.

जेव्हा चिंता दीर्घकाळ चालू राहते, तेव्हा नैराश्य येणे सहज शक्य होते. चिंताग्रस्त असणाऱ्या काही लोकांना त्याचबरोबर नैराश्य_ देखील एकाच वेळी जाणवते.

चिंता कशामुळे होते?

चिंता असंख्य कारणांमुळे होऊ शकते, जसे की:

 • दैनंदिन घटना जसे की कामाच्या ठिकाणी एखादे तणावपूर्ण ईमेल येणे किंवा एखाद्या कठीण ग्राहकाशी संवाद साधणे
 • जीवनातील ठळक घटना जसे की घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जाणे, एखादा शारीरिक आजार असणे किंवा एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या मृत्यूची माहिती मिळणे.

कधी कधी काहीतरी चांगले घडत असताना देखील आपण चिंता अनुभवतो. उदाहरणार्थ, जर आपण संभाव्य भावी जोडीदाराला भेटायला जाणार असलो किंवा नोकरीसाठी मुलाखत देणार असलो. या काही वाईट गोष्टी नाहीत, परंतु त्या आपल्या शरीरात चिंतेचे शारीरिक आणि मानसिक परिणाम निर्माण करू शकतात.

चिंता का होते?

जरी चिंता आपल्याला अस्वस्थ करू शकत असली, तरीही ती काही विशिष्ट परिस्थितींमध्ये आणि मर्यादित कालावधीसाठी उपयुक्त ठरू शकते:

 • मानसिकदृष्ट्या – कठीण परिस्थितीमध्ये चिंता आपल्याला सांगते की काहीतरी चुकीचे आहे आणि आपल्याला सतर्क ठेवते जेणेकरून आपण योग्य प्रतिक्रिया देऊ शकू.
 • शारीरिकदृष्ट्या – चिंतेमुळे येणाऱ्या शारीरिक संवेदना आपल्या शरीराला धोक्यापासून दूर पळण्यासाठी किंवा स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तयार करू शकतात. याला 'फाईट ऑर फ्लाइट' प्रतिसाद म्हणतात.

जनरलाइज्ड एंग्जाइटी डिसऑर्डर (जीएडी) म्हणजे काय?

जनरलाइज्ड एंग्जाइटी डिसऑर्डर (जीएडी) हा चिंता विकाराचा एक प्रकार आहे. ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर (ओसीडी) किंवा पॅनीक डिसऑर्डर यांसारखे इतर अनेक चिंता विकार आहेत ज्यांचा येथे समावेश नाही.

तुम्हाला जीएडीचा त्रास असल्यास, तुम्हाला:

 • एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या चिंता वाटत असतील
 • परिस्थितीच्या प्रमाणात नसलेल्या चिंता असतील
 • तुमच्या चिंतांवर नियंत्रण ठेवणे कठीण जात असेल.

जीएडी अगदी सामान्य आहे आणि युकेमधील दर २५ लोकांपैकी १ व्यक्तीला त्याचा त्रास होतो. 

जीएडी कशामुळे होतो?

जीएडीला एकच कारण नाही. तुमची जनुके, सामाजिक वातावरण आणि जीवनाचे अनुभव हे सर्व सक्रिय असतात आणि एकमेकांशी संवाद साधतात.

जर तुमच्या जवळच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला जीएडीची समस्या असेल तर तुम्हाला चिंता विकार होण्याची शक्यता चार ते सहा पटीने जास्त असते. तथापि कोणत्याही एकाच जनुकामुळे चिंता विकार होत नाहीत. त्याऐवजी अनेक जनुके, त्यातील प्रत्येकाच्या लहानश्या प्रभावासह एकमेकांशी संवाद साधून तुमचा एकंदर धोका वाढवतात.

मी मदत कधी मागावी?

जर तुमच्या चिंतेचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होत असेल किंवा जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही जीएडीची लक्षणे अनुभवत आहात, तर तुम्ही जितक्या लवकर मदत मागाल तितक्या लवकर तुम्ही बरे होण्यास सुरुवात करू शकता.

लोक मदत घेणे का टाळतात याची बरीच कारणे आहेत आणि खरे नसले तरीही मनात खालीलपैकी काही विचार येणे सामान्य आहे:

 • “माझा स्वभावच असा आहे, मी स्वतःहून ठीक होण्याचा प्रयत्न केला पाहिजे” – कोणालाही एकट्याने संघर्ष करावा लागू नये आणि प्रत्येकजण मदत घेण्यासाठी पात्र आहे. तुम्ही तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या एखाद्या व्यक्तीशी जसे बोलाल तसेच दयाळूपणे आणि मायेने स्वत:शी बोलण्याचा प्रयत्न करा.
 • “माझ्याकडे लक्ष देण्यासाठी इतर महत्त्वाच्या गोष्टी आहेत” – अनेक लोकांना त्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे कठीण जाते. जर त्यांच्या कुटुंबात किंवा व्यापक समुदायामध्ये त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतील किंवा जर त्यांना इतर बाह्य आव्हानांना तोंड द्यावे लागत असेल तर हे विशेषतः कठीण असू शकते. तथापि, तुमची तब्येत बरी नसेल तर तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी करत राहण्यास तुम्ही सक्षम राहणार नाही. स्वतःला मदत करून तुम्ही इतर लोकांना मदत करण्यासाठी सर्वोत्तम स्थितीत असाल.
 • “मी मदत मागितली तर लोक काय विचार करतील याची मला काळजी वाटते” – तुम्हाला हे समजून आश्चर्य वाटेल की किती लोक तुमचे अनुभव समजून घेऊ शकतील आणि कदाचित त्यांनी स्वतः अशीच आव्हाने अनुभवली असतील. तुमच्या आयुष्यातील तुम्हाला समजून घेणाऱ्या आणि तुम्ही मदत घ्यावी याचं समर्थन करणाऱ्या लोकांचे म्हणणे ऐकायचा प्रयत्न करा.

मी स्वतःची कशी मदत करू?

जर तुम्हाला चिंताग्रस्त होण्याचा त्रास होत असेल किंवा तुम्हाला जीएडी असेल तर बरीच मदत उपलब्ध आहे. अनेकदा, स्वतःला मदत करण्यासाठी काही पावले उचलून चिंता सुधारू शकते:

 • त्याबद्दल बोला – जर तुमच्या आयुष्यातील काही घटनांमुळे तुमची चिंता सुरू झाली असेल, जसे की नातेसंबंध तुटणे, मूल आजारी पडणे, किंवा नोकरी गमावणे, तर त्याबद्दल कोणाशी तरी बोलणे उपयुक्त ठरू शकते. ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे आणि तुम्हाला ज्यांचा आदर वाटतो आणि जे तुमचे बोलणे नीटपणे ऐकून घेतात अशा एखाद्या व्यक्तीशी बोला. हे एक जवळचा मित्र/मैत्रीण, सामान्य चिकित्सक, धार्मिक नेता किंवा असे कोणीही असू शकतात ज्यांच्याकडे मदत मागणे तुम्हाला सोपे वाटते.
 • स्वयं-मदतीची साधने – अशी अनेक स्वयं-मदतीची साधने आहेत जी तुम्ही तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी वापरू शकता. यामध्ये ध्यान साधना किंवा सजगतेसाठी बनवलेले ॲप्स, तसेच तुम्हाला कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी (सीबीटी) चा स्वतःहून सराव करू देणारी पुस्तके किंवा ॲप्स यांचा समावेश आहे. तुम्ही सीबीटी बद्दल अधिक माहिती खालील मनोवैज्ञानिक उपचारांवरील विभागात जाणून घेऊ शकता.
 • स्वयं-मदत गट– तुमच्या सामान्य चिकित्सकांशी संपर्क साधून त्यांना अशा स्वयं-मदत गटांविषयी सुचवायला सांगा, जिथे तुम्हाला सारख्याच समस्या असलेल्या इतर लोकांशी भेटता येईल. इतरांशी बोलण्याची संधी मिळण्याबरोबरच, इतर लोक त्यांची चिंताग्रस्त स्थिती कशी सांभाळतात हे तुम्ही जाणून घेऊ शकता. यापैकी काही गट विशिष्ट प्रकारची चिंता आणि भय यांच्याशी निगडित असतात. तुमच्यासाठी कोणत्या प्रकारचा गट उपयुक्त ठरू शकतो हे तुमच्या सामान्य चिकित्सकांना विचारा.
 • पीयर मदत– जेव्हा तुम्ही सुरक्षित आणि आश्वासक वातावरणात तुमच्यासारखे अनुभव असणाऱ्या इतर लोकांना भेटता तेव्हा त्याला पीयर मदत असे म्हणतात. पीयर मदत मिळवणे याविषयी अधिक माहिती जाणून घ्या.

तुम्हाला एखाद्या धर्मादाय संस्थेद्वारे देखील स्वयं-मदत गट किंवा पीयर मदत मिळू शकेल. उदाहरणार्थ, माइंड या मानसिक आरोग्य धर्मादाय संस्थेकडे स्थानिक सेवा आहेत ज्या तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता आहे यावर अवलंबून निरनिराळे गट चालवतात.

मला व्यावसायिकांची मदत कशाप्रकारे मिळवता येईल?

जर तुम्ही स्वतःला मदत करण्याचा प्रयत्न केला असेल आणि तरीही त्रास होत असेल, तर तुम्हाला अधिक मदतीची आवश्यकता असू शकते. तुम्हाला कोणते उपचार दिले जातील हे तुमच्या परिस्थितीवर अवलंबून असेल, परंतु तुम्हाला जीएडी असल्यास तुम्हाला यांपैकी काही उपचार दिले जाऊ शकतात.

मानसशास्त्रीय थेरपी

मानसशास्त्रीय थेरपी किंवा 'संभाषणाद्वारे उपचार' यांमध्ये तुम्ही थेरपिस्ट बरोबर तुम्हाला भेडसावत असलेल्या समस्यांविषयी बोलता.

वेगवेगळ्या मानसिक आरोग्य स्थितींमध्ये मदत करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. जीएडीसाठी खालील दोन पद्धतींची शिफारस केली जाते:

कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी (सीबीटी)

सीबीटी ही एक संभाषणाद्वारे केली जाणारी थेरपी आहे जी तुम्हाला विचार करण्याचे आणि दैनंदिन जीवनातील परिस्थितींवर प्रतिक्रिया देण्याचे अधिक उपयुक्त मार्ग शिकण्यास मदत करू शकते. तुमचे विचार, कृती आणि भावना यांच्यातील दुवे शोधण्यास शिकवून तुमची मनःस्थिती सुधारणे हा या थेरपीचा उद्देश आहे.

तुम्हाला जीएडी असल्यास, सीबीटी तुम्हाला तुमच्या भयाचा सामना करण्यास आणि तुमची चिंताग्रस्त स्थिती सहन करण्यास मदत करू शकते. सीबीटी वैयक्तिक रितीने किंवा गटाचा भाग म्हणून केली जाऊ शकते. तुम्ही सीबीटी प्रत्यक्ष भेटून किंवा ऑनलाइन करू शकता आणि ती सहसा आठवड्यातून एकदा असे अनेक आठवड्यांसाठी किंवा महिन्यांसाठी दिली जाते.

तुम्ही आमचे सीबीटी माहिती संसाधन वाचून सीबीटी विषयी अधिक जाणून घेऊ शकता.

अप्लाइड रिलॅक्सेशन

अप्लाइड रिलॅक्सेशन ही अशी एक थेरपी आहे जी तुम्ही सहसा जेव्हा चिंताग्रस्त होता तेव्हा अशा परिस्थितीत तुमच्या शरीराला आराम करण्यास शिकवून तुम्हाला मदत करते. एक प्रशिक्षित थेरपिस्ट दर आठवड्याला एक तासाच्या सत्रात असे अनेक महिने तुमच्यासोबत काम करेल आणि तुमच्या शरीराला आराम कसा करावा हे शिकवेल.

एकदा तुम्ही ही थेरपी घेतल्यानंतर, दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा तुम्हाला चिंताग्रस्त होण्याचा अनुभव येईल तेव्हा तुम्ही अप्लाइड रिलॅक्सेशनचा वापर करू शकाल.

औषधोपचार

जर मानसशास्त्रीय उपचार तुमच्यासाठी उपयुक्त ठरले नाहीत किंवा तुम्हाला ते घ्यायचे नसतील, तर तुम्हाला औषधोपचार दिला जाऊ शकतो.

तुमचे डॉक्टर तुम्हाला औषधोपचार आणि संभाषणाद्वारे केली जाणारी थेरपी हे दोन्ही मिळून उपचार सुचवू शकतात. याचे कारण असे की काही लोकांसाठी फक्त औषधोपचार किंवा संभाषणाद्वारे केली जाणारी थेरपी याऐवजी दोन्ही एकाच वेळी करणे अधिक प्रभावी ठरू शकते.

एसएसआरआय

सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रीअपटेक इनहिबिटर्स (एसएसआरआय) ही एक प्रकारची अँटीडिप्रेसंट औषधे आहेत. जरी एसएसआरआयला अँटीडिप्रेसंट औषधे असे म्हटले जात असले, तरीही ते जनरलाइज्ड एंग्जाइटी डिसऑर्डर वर उपचार करण्यासाठी वापरले जाऊ शकतात.

असे मानले जाते की एसएसआरआय मेंदूतील सेरोटोनिनची पातळी वाढवतात. सेरोटोनिनचा मनाचा कल, भावना आणि झोप यावर चांगला प्रभाव पडतो असे मानले जाते. इतर अँटीडिप्रेसंट औषधांपेक्षा एसएसआरआयमुळे कमी दुष्परिणाम होतात.

एसएनआरआय

जर तुमच्यासाठी एसएसआरआय वापरून उपयोग होत नसेल, तर तुम्हाला सेरोटोनिन-नॉरएड्रेनालिन रीअपटेक इनहिबिटर (एसएनआरआय) दिले जाऊ शकते. हे दुसऱ्या एका प्रकारचे अँटीडिप्रेसंट औषध आहे जे एसएसआरआय सारखेच आहे परंतु ते थोड्या वेगळ्या रितीने कार्य करते.

अँटीडिप्रेसंट औषधांचा परिणाम होण्यासाठी सामान्यतः २ ते ८ आठवडे लागतात आणि ती योग्य रितीने प्रभावी होण्यासाठी नियमितपणे घ्यावी लागतात. सर्व औषधांप्रमाणे, अँटीडिप्रेसंट औषधांचे दुष्परिणाम होऊ शकतात, ज्याबद्दल तुमच्या डॉक्टरांनी तुमच्याशी चर्चा केली पाहिजे. तुम्ही आमच्या अँटीडिप्रेसंट औषधे संसाधनांमध्ये याविषयी अधिक जाणून घेऊ शकता.

प्रीगॅबालिन

जर एसएसआरआय आणि एसएनआरआय हे तुमच्यासाठी काम करत नसतील, तर तुम्हाला प्रीगॅबालिन दिले जाऊ शकते, ज्याचा उपयोग दौरे पडणे आणि वेदनांवर उपचार करण्यासाठी देखील केला जातो. याची चिंताग्रस्त लोकांना मदत होते असे दिसून आले आहे.

प्रीगॅबालिन व्यसनाधीन करू शकते. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही प्रीगॅबालिनवर अधिकाधिक अवलंबून राहत आहात किंवा तुम्ही ते तुम्हाला लिहून दिलेल्यापेक्षा जास्त प्रमाणात घेत आहात, तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी बोला.

इतर उपचार

बेंझोडायझेपाइन्स

बेंझोडायझेपाइन्स हे एक प्रकारचे शामक आहेत. जर तुम्हाला चिंताग्रस्त स्थितीचा सामना करण्यास त्रास होत असेल आणि तुमची चिंता नियंत्रणाबाहेर असेल तर हे तुम्हाला थोड्या काळासाठी दिले जाऊ शकतात. बेंझोडायझेपाइन्स जास्त काळ वापरल्यास व्यसनाधीन करू शकतात. जर तुम्ही बेंझोडायझेपाइन्सवर अवलंबून राहत आहात असे तुम्हाला वाटत असेल तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी बोला.

बीटा-ब्लॉकर्स

क्वचितच, तुम्हाला बीटा ब्लॉकर्स दिले जाऊ शकतात. हे एक असे औषध आहे जे तुमच्या हृदयाची गती कमी करून काम करते. यामुळे चिंताग्रस्त स्थितीची शारीरिक लक्षणे थांबविण्यास मदत होऊ शकते.

वनौषधी उपाय

काही लोकांना त्यांच्या चिंतेसाठी वनौषधी उपाय उपयुक्त वाटतात. तथापि, त्यापैकी कोणतेही उपाय प्रभावी असल्याचा ठळक पुरावा नाही. कोणतीही पर्यायी औषधे वापरण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलले पाहिजे कारण ती इतर औषधांसोबत घेतल्यास गंभीर समस्या निर्माण करू शकतात.

पूरक आणि पर्यायी औषधे आणि शारीरिक उपचार यांवरील आमची माहिती संसाधने वाचून तुम्ही याबद्दल अधिक जाणून घेऊ शकता.

एखाद्या व्यक्तीला चिंताग्रस्त होण्याचा त्रास होत आहे हे मी कसे सांगू शकेन?

बहुतेक लोक वेळोवेळी कोणतीही समस्या न होऊ देता चिंता अनुभवतात. तुमच्या ओळखीची एखादी व्यक्ती नेहमीपेक्षा अधिक पातळीवर चिंता अनुभवत आहे असे तुम्हाला वाटत असल्यास या गोष्टींवर ध्यान द्या:

 • ते एखाद्या गोष्टीबद्दल किंवा अनेक गोष्टींबद्दल तर्कसंगत न वाटणाऱ्या पातळीवर काळजी करत आहेत असे वाटत असेल.
 • ते अशा परिस्थिती किंवा वातावरण टाळू लागत असतील जे ते पूर्वी कधी टाळत नव्हते. उदाहरणार्थ, पार्ट्यांना जाणे, बाहेर जेवायला किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणे.
 • ते डोकेदुखी, पोटदुखी किंवा थकवा यासारख्या शारीरिक लक्षणांची तक्रार करत असतील.
 • ते कोणतेही स्पष्ट कारण नसताना देखील नाराज, रागावलेले किंवा निराश दिसत असतील.
 • ते ठरवलेले कार्यक्रम रद्द करत असतील किंवा आधी कबूल केल्याप्रमाणे गोष्टी करत नसतील.
 • जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलत असता तेव्हा ते विचलित दिसत असतील किंवा असे वाटत असेल की जणू त्यांना तुमचे बोलणे ऐकू येत नाही.

वेगवेगळे लोक त्यांच्या जीवनातील अनुभव, सांस्कृतिक किंवा धार्मिक पार्श्वभूमी आणि त्यांची प्राथमिक भाषा यानुसार वेगवेगळ्या प्रकारे चिंता अनुभवतात आणि त्याविषयी संवाद साधतात. याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीचे चिंताग्रस्त होणे ताबडतोब तुमच्या लक्षात येऊ शकत नाही.

चिंताग्रस्त होण्याचा त्रास होत असलेल्या एखाद्या व्यक्तीला मी कशी मदत करू शकेन ?

विशेषतः जर तुम्ही स्वतः चिंताग्रस्त स्वभावाचे नसाल, तर एखाद्या चिंताग्रस्त व्यक्तीला मदत करणे तुमच्यासाठी आव्हानात्मक असू शकते. या काही गोष्टी करून तुम्ही मदत करू शकता:

 • ऐका - स्वतःच्या चिंताग्रस्त होण्याने त्रासून गेलेल्या एखाद्या व्यक्तीचे म्हणणे ऐकायला त्यांच्याबरोबर उपस्थित असणे हा एक मोठा आधार असू शकतो. कधीकधी आपल्या चिंताग्रस्त भावनांबद्दल दुसऱ्या व्यक्तीशी बोलून देखील त्यांची चिंता कमी होण्यास मदत होऊ शकते.
 • धीर धरा - तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला जर तुम्ही ठरवलेल्या योजनांवर टिकून राहणे कठीण वाटत असेल किंवा त्यांना चिडचिड किंवा विचलित वाटत असेल तर धीर धरण्याचा प्रयत्न करा. हे वैयक्तिक रितीने न घेणे महत्त्वाचे आहे.
 • त्यांना गांभीर्याने घ्या. - जरी एखादी व्यक्ती तुम्हाला तर्कसंगत न वाटणाऱ्या गोष्टींबद्दल चिंता करत असेल, तरीही त्यांना जे वाटत आहे ते त्यांच्यासाठी अगदी वास्तविक असते. तुम्हाला त्यांच्या चिंताग्रस्त विचारांना प्रोत्साहन देण्याची गरज नाही, परंतु तुम्ही त्यांना खात्री करून देऊ शकता की त्यांच्या भावना वैध आहेत आणि ते मदतीस पात्र आहेत.

जर तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीला ओळखत असाल ज्यांना आपल्या चिंताग्रस्त होण्याचा त्रास होत असेल तर त्यांना मदत घेण्यासाठी प्रोत्साहित करा, याचा अर्थ त्यांनी स्वतःला मदत करणे किंवा व्यावसायिकांकडून मदत घेणे यापैकी कोणतेही असू शकते.

एंग्जाइटी यूके या धर्मादाय संस्थेकडे चिंताग्रस्त व्यक्तीला मदत करण्यासाठी उपयुक्त टिपा आहेत.

अधिक माहिती आणि समर्थन

तुम्ही किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला चिंताग्रस्त होण्याचा त्रास किंवा जीएडी असल्यास माहिती आणि मदतीचे काही उपयुक्त स्रोत येथे आहेत.

चिंतेबद्दल माहिती आणि मदत

जीएडी विषयी माहिती आणि मदत

श्रेय नामावली

ही माहिती Royal College of Psychiatrists यांच्या पब्लिक एंगेजमेंट एडिटोरियल बोर्ड (पीइइबी) ने तयार केली आहे. ही माहिती लेखनाच्या वेळी उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम माहितीवर आधारित आहे.

तज्ञ लेखक: प्रोफेसर डेव्हिड व्हील आणि प्रोफेसर डेव्हिड नट

या संसाधनासाठीचे संपूर्ण संदर्भ विनंतीवर उपलब्ध आहेत.

प्रकाशित: मे २०२२

पुनरावलोकन नियत काळ: मे २०२५

© Royal College of Psychiatrists

This translation was produced by CLEAR Global (May 2024)