मृत्यू कारण वियोगाचा शोक

Bereavement

Below is a Marathi translation of our information resource on bereavement. You can also read our other Marathi translations.

ही माहिती शोकग्रस्त व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय, मित्रमैत्रिणी आणि दुःख प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ इच्छिणाऱ्या इतर कोणासाठीही उपयुक्त आहे.

या पृष्ठावर तुम्हाला पुढील माहिती मिळेल:

  • वियोगानंतर सामान्यतः लोक कसे शोक करतात
  • सावरले न गेलेले दुःख
  • मदतीसाठी उपलब्ध ठिकाणे
  • इतर संदर्भ आणि माहिती स्रोत
  • मित्र आणि नातेवाईक कशी मदत करू शकतात.

मृत्यू कारण वियोगाचा शोक म्हणजे काय?

शोक ही क्लेशदायक पण सामान्यतः अनुभवली जाणारी प्रक्रिया आहे. आपल्या आयुष्यात कधीतरी, आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचा किंवा गमावल्याचा अनुभव येतो.

तरीसुद्धा, आपल्या दैनंदिन जीवनात आपण मृत्यूबद्दल फारसा विचार करत नाही किंवा बोलत नाही. याचे एक कारण म्हणजे आपल्या आधीच्या पिढीच्या तुलनेत, आपली मृत्यूशी ओळख कमी प्रमाणात होते. पूर्वीच्या पिढ्यांसाठी, बालपणी किंवा तरुण वयातच एखाद्या भावंडाचा, मित्राचा किंवा नातेवाईकाचा मृत्यू ही नेहमीची गोष्ट होती. आपल्यासाठी, अशी हानी बहुतेक वेळा आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यात होते. त्यामुळे शोक व्यक्त करताना कसे वाटते, योग्य वर्तन कसे असते आणि ‘सामान्य’ शोक प्रक्रिया कशी असते हे शिकण्याची संधी आपल्याला मिळत नाही. आणि त्यामुळे, आपल्या मनाला त्या वास्तवाचा स्वीकार करण्याचा अनुभवही नसतो.

तरीसुद्धा, जेव्हा आपल्याला आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूचा अनुभव येतो, तेव्हा आपल्याला त्याचा सामना करावा लागतो. प्रत्येक जण वेगळा असतो आणि शोक व्यक्त करण्याची प्रत्येकाची स्वतःची पद्धत असते – पण शोक करताना बऱ्याच जणांचे अनुभव सारखेच असतात.

आपण शोक/ मृत्यू कारण वियोग कसा अनुभवतो

कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यानंतर आपण शोक व्यक्त करतो, पण एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर ते अधिक तीव्रतेने जाणवते. शोक/ मृत्यू कारण वियोग ही फक्त एक भावना नसून, ती अनेक भावनांची मालिका असते. या भावना पूर्णपणे अनुभवल्या जायलाच काही काळ लागतो आणि प्रत्येक जण त्याचा सामना आपल्या गतीने करतो.

बहुतेक वेळा आपण अशा व्यक्तीसाठी शोक करतो, जिच्याशी आपले दीर्घ काळाचे नाते असते. तथापि, ज्यांना मृत जन्म किंवा गर्भपाताचा अनुभव आला आहे, किंवा ज्यांनी अतिशय लहान बाळ गमावले आहे, ते सारख्याच प्रकारे शोक व्यक्त करतात. त्यांना देखील सारख्याच प्रकारच्या काळजीची आणि सहानुभूतीची गरज असते.

शोक व्यक्त करताना लोक विविध प्रकारच्या अनेक भावनांमधून जातात. या भावना कोणत्याही एखाद्या ठराविक क्रमाने अनुभवायला येत नाहीत. कधी कधी एखादी भावना संपली असे वाटते, पण ती पुन्हा परत येऊ शकते. काही जणांना यापैकी काही भावना कधीच अनुभवाला येणार नाहीत.

धक्का

जवळच्या नातेवाईकाच्या किंवा मित्राच्या मृत्यूनंतर बहुतेक लोक धक्क्यात जातात, जणू काही असे प्रत्यक्ष घडले आहे यावर त्यांचा विश्वास बसत नाही. मृत्यू अपेक्षित असला तरीही त्यांना असे वाटू शकते.

हा भावनिक सुन्नपणा कधी कधी उपयुक्त ठरू शकतो, कारण त्यामुळे नातेवाईकांना कळवणे आणि अंत्यसंस्काराची तयारी करणे यासारखी महत्त्वाची कामे पूर्ण करता येतात. तथापि, ही अवास्तव वाटणारी भावना खूप काळ टिकल्यास ती समस्या बनू शकते. काहींसाठी, मृत व्यक्तीच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेणं ही या भावनेतून बाहेर येण्याची महत्त्वाची प्रक्रिया ठरू शकते.

खूप जणांसाठी, अंत्यसंस्कार किंवा स्मृतिसभा हा असा क्षण असतो जेव्हा झालेल्या घटनेची वास्तविकता मनोमन स्वीकारण्यास सुरुवात होते. पार्थिव पाहणे किंवा अंत्यसंस्काराला हजर राहणे क्लेशदायक असू शकते, पण हे आपल्या प्रिय व्यक्तीला निरोप देण्याचे महत्त्वाचे मार्ग असतात. त्यावेळी, अंत्यसंस्काराला जाणे खूप वेदनादायक वाटू शकते. पण जर ते गेले नाहीत तर, अनेकांना भविष्यात याबद्दल पश्चात्ताप वाटू शकतो.

नकार

थोड्याच काळात हा भावनिक सुन्नपणा नाहीसा होतो आणि त्याऐवजी नकाराची भावना निर्माण होऊ शकते. जे घडले आहे ते स्वीकारणे कठीण वाटते. तथ्य माहीत असूनही, त्या व्यक्तीच्या जाण्याचा स्वीकार करणे कठीण वाटते. तुम्हाला सतत त्या गमावलेल्या व्यक्तीची ओढ लागलेली असते. जरी ते स्पष्टपणे अशक्य असले, तरीही तुम्हाला कोणत्याही प्रकारे त्यांना शोधायचे असते. यामुळे विश्रांती घेणे किंवा एकाग्र होणे कठीण जाते आणि चांगली झोप येणेही अवघड होते. स्वप्ने खूप अस्वस्थ करणारी असू शकतात.

काही लोकांना वाटते की ते जिथे जातात तिथे त्यांना आपली प्रिय व्यक्ती दिसते - रस्त्यावर, उद्यानात, घराच्या आसपास, जिथे त्यांनी त्यांच्याबरोबर एकत्र वेळ घालवला असेल तिथे.

राग आणि अपराधीपणाची भावना

तुम्हाला या वेळी खूप रागही येऊ शकतो - डॉक्टरांवर आणि पारिचारिकांवर, ज्यांनी मृत्यूला रोखले नाही, मित्र आणि नातेवाईकांवर, ज्यांनी पुरेसा प्रयत्न केला नाही, किंवा अगदी त्या व्यक्तीवरही, जे तुम्हाला एकटे सोडून गेले आहेत. कधी कधी तुम्हाला स्वतःवरही राग येऊ शकतो, कारण तुम्ही पुरेसे केले नाही असे वाटू शकते.

अजून एक सामान्य भावना म्हणजे अपराधीपणाची भावना. तुम्ही वारंवार त्या गोष्टींचा विचार करत राहता ज्या तुम्ही म्हणायला किंवा करायला हव्या होत्या. तुम्हाला कदाचित असेही वाटू शकते की गोष्टी वेगळ्या पद्धतीने केल्या असत्या, तर कदाचित मृत्यू टाळता आला असता. नक्कीच, मृत्यू सहसा कोणाच्याही नियंत्रणाबाहेर असतो, आणि शोकाकुल व्यक्तीला याची आठवण करून देण्याची गरज भासू शकते. वेदनादायक किंवा क्लेशदायक आजारानंतर आपल्या प्रिय व्यक्तीच्या निधनामुळे तुम्हाला दिलासा वाटत असल्यास, तुम्ही स्वतःला दोषीही समजू शकता. हा दिलास्याचा भाव नैसर्गिक, समजण्यासारखा आणि अत्यंत सामान्य आहे.

दुःख

ही अस्वस्थतेची अवस्था साधारणतः शांत दुःख, एकांतवास आणि शांततेच्या काळानंतर येते, जेव्हा तुम्हाला फक्त स्वतः सोबत राहायचे असते. भावनांमध्ये हे अचानक होणारे बदल मित्र किंवा नातेवाईकांना गोंधळात टाकू शकतात, परंतु ते शोक प्रक्रियेचा एक सामान्य भाग असतात. 

जरी तुम्हाला कमी अस्वस्थ वाटत असले तरी, काळ जसजसा जातो तसतसे नैराश्याचे कालावधी अधिक वारंवारतेने येऊ लागतात. तुम्हाला वेळोवेळी तीव्र शोकाची लहर येऊ शकते, जी तुम्हाला गमावलेल्या व्यक्तीच्या आठवणी जागवणाऱ्या व्यक्ती, ठिकाणे किंवा गोष्टींमुळे उद्भवू शकते.

इतर लोकांना हे समजून घेण्यात अडचण येऊ शकते किंवा तुम्ही अचानक कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय रडायला लागल्यावर त्यांना लाजिरवाणे वाटू शकते. या टप्प्यावर, असे वाटू शकते की तुम्ही इतर लोकांपासून दूर राहावे, जे पूर्णपणे शोक समजून घेत नाहीत किंवा वाटून घेत नाहीत. तथापि, इतरांपासून दूर राहणे भविष्यात समस्या निर्माण करू शकते, आणि साधारणतः दोन आठवड्यांनंतर आपल्या सामान्य जीवनात (जेवढे शक्य असेल तितके) परत जाणे हे सर्वात चांगले असते.

या काळात, इतरांना असे वाटू शकते की तुम्ही खूप वेळ फक्त बसून, काहीही न करता घालवत आहात. खरे तर, तुम्ही कदाचित गमावलेल्या व्यक्तीबद्दल विचार करत असाल, आणि त्यांच्यासोबत घालवलेले चांगले आणि वाईट क्षण वारंवार पुन्हा एकदा विचारात आणत असाल. हा मृत्यूशी सामोरे जाण्याचा एक शांत, पण अत्यंत आवश्यक भाग आहे.

काळ जसजसा जातो, तशी प्रारंभिक मृत्यू कारण वियोगाच्या शोकाची तीव्र वेदना हळूहळू कमी होऊ लागते. नैराश्य कमी होते आणि इतर गोष्टींबद्दल विचार करणे आणि भविष्याकडे पुन्हा एकदा पाहणे शक्य होते. तथापि, तुमच्यातील एक भाग गमावल्याची भावना कधीच पूर्णपणे नष्ट होत नाही.

जर तुम्ही तुमचा जीवनसाथी गमावला असेल, तर इतर जोडप्यांना एकत्र पाहून आणि सुखी कुटुंबांची समाज माध्यमांमधील चित्रे पाहून नुकत्याच आलेल्या एकटेपणाची सतत जाणीव होत राहते. तथापि, जरी तुमच्या आयुष्यातील एक भाग गायब असला तरी काही काळानंतर तुम्हाला पुन्हा परिपूर्ण वाटू शकते. असे असले तरी काही वर्षांनंतर कधी कधी तुम्हाला असे आढळेल की तुम्ही अशा प्रकारे बोलता जसे काही तुम्हाला सोडून गेलेली व्यक्ती अजूनही तुमच्यासोबतच आहे.

स्वीकृती

हे विविध अनुभव एकमेकांमध्ये मिसळू शकतात आणि वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगळ्या प्रकारे व्यक्त होऊ शकतात. आपल्यापैकी बहुतेक लोक एक किंवा दोन वर्षांच्या आत मृत्यू कारण वियोगाच्या मोठ्या शोकातून सावरतात. शोकाचा शेवटचा टप्पा म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीला हळूहळू मनातून मुक्त करणे आणि एका नव्या आयुष्याची सुरुवात करणे. हळूहळू मनःस्थिती सुधारते, झोप चांगली लागते आणि ऊर्जा पूर्ववत होते. आपण आपल्या नेहमीच्या स्वभावाकडे परत येता, अगदी लैंगिक इच्छा देखील पूर्ववत होते.

हे सर्व असले तरी, वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये मृत्यूला सामोरे जाण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. काही समुदायांमध्ये मृत्यू हा अंतिम समाप्ती ‘पूर्णविराम’ याऐवजी जीवन-मृत्यूच्या अखंड चक्रातील फक्त एक टप्पा मानला जातो. शोक व्यक्त करण्याच्या विधी आणि समारंभ काही ठिकाणी जाहीर आणि भावना प्रदर्शक असतात, तर काही ठिकाणी खाजगी आणि शांतपणे पार पडतात. काही संस्कृतींमध्ये शोककाल निश्चित असतो, तर काहींमध्ये त्याला कोणतीही मर्यादा नसते. वेगवेगळ्या संस्कृतींतील शोकग्रस्त लोकांना सारखीच दुःखद भावना येऊ शकते, परंतु त्या व्यक्त करण्याच्या पद्धती मात्र खूप वेगळ्या असतात.

मुलं आणि किशोरवयीन तरुण

लहान मुलांना मृत्यूचा अर्थ पूर्णपणे समजत नसेल, तरीही ते आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या अनुपस्थितीमुळे होणारे दुःख मोठ्या माणसांप्रमाणेच अनुभवतात. अगदी बाल्यावस्थेत सुद्धा मुले दुःख अनुभवतात आणि त्यांना ते क्लेशदायक ठरते.

तथापि, मोठ्यांच्या तुलनेत त्यांचा वेळेचा अनुभव वेगळा असतो आणि ते शोकाचे टप्पे तुलनेने लवकर पार करू शकतात. शालेय जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, मुलांना आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या मृत्यूला स्वतःला जबाबदार असल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे त्यांना हे आश्वासन देणे गरजेचे असते की, त्यांचा यात काहीही दोष नाही. किशोरवयीन तरुण कधीकधी आपल्या दुःखाबद्दल बोलत नाहीत, कारण त्यांना काळजी वाटते की असे केल्याने त्यांच्या आसपासच्या मोठ्या माणसांवर आणखी ओझे येईल.

म्हणूनच कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या निधनानंतर मुलांचे आणि किशोरवयीन तरुणांचे दुःख आणि त्यांच्या शोकाची गरज दुर्लक्षित करता कामा नये. मुलांना शक्यतो अंत्यसंस्काराच्या तयारीत समाविष्ट करावे, कारण त्यांना या प्रक्रियेत सामील होण्याची आणि आपल्या भावनांना व्यक्त करण्याची संधी मिळते.

आत्महत्येनंतर मृत्यू कारण वियोगाचा शोक

ओळखीच्या व्यक्तीच्या आत्महत्येचा सामना करणे विशेषतः कठीण असते. मृत्यू कारण वियोगाच्या सामान्य शोक भावनांच्या व्यतिरिक्त, यात अनेक विरोधाभासी भावना असू शकतात. तुम्हाला असे वाटू शकते की:

  • त्या व्यक्तीने आपले जीवन संपवल्यामुळे राग येऊ शकतो.
  • त्यांच्या कृत्यामुळे तुम्हाला नाकारले गेल्यासारखे वाटू शकते.
  • त्यांनी असे का केले, याबद्दल मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो.
  • अपराधी भावना – बहुतांश लोक अत्यंत हताश झाल्यामुळे आत्महत्या करतात: तुम्हाला त्यांच्या भावना कशा कळल्या नाहीत?
  • त्यांना वाचवू न शकल्याबद्दल अपराधीपणा – तुम्ही त्यांच्या सोबत घालवलेल्या वेळेचा विचार करत राहू शकता आणि स्वतःला विचारू शकता की तुम्ही काहीतरी वेगळे केले असते, तर ते वाचू शकले असते का
  • त्या व्यक्तीने मृत्यूपूर्वी यातना भोगल्या असतील का, याची चिंता वाटू शकते
  • त्यांचे दुःख पाहावे लागणार नाही, यामुळे काही प्रमाणात दिलासा वाटू शकतो
  • त्यांना आधार देण्यासाठी किंवा त्यांच्या आत्महत्येच्या विचारांचा आणि तीव्र इच्छांचा सामना करण्यासाठी तुम्ही सतत उपलब्ध असण्याची आवश्यकता यातून सुटका झाल्यासारखे वाटू शकते
  • त्यांच्या कृत्याबद्दल लाज वाटू शकते, विशेषतः जर तुमच्या संस्कृतीत किंवा धर्मात आत्महत्या पाप किंवा अपमानास्पद मानली जात असेल
  • इतरांशी याबद्दल बोलण्यास अनिच्छा वाटू शकते, कारण अ) तुमच्या संस्कृतीत आत्महत्या हा कलंक असू शकतो, किंवा ब) लोक मृत व्यक्तीच्या भावना आणि आयुष्यापेक्षा या घटनेच्या नाट्यमय बाजूवरच अधिक लक्ष केंद्रित करत आहेत, असे तुम्हाला वाटू शकते
  • एकटे वाटणे – आत्महत्येमुळे प्रियजन गमावलेल्या इतर लोकांशी संवाद साधल्यास मदत मिळू शकते.

NICE मार्गदर्शक तत्त्वे १०५ (विभाग १.८) अंतर्गत प्रदान केलेल्या संशयित आत्महत्येमुळे प्रभावित किंवा मृत्यू कारण वियोगाने शोकग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी काही शिफारशी.  इतर उपयुक्त स्रोत:

अंत्यपरीक्षण (ऑटोप्सी)

कोणताही अनपेक्षित मृत्यू झाल्यास सहसा अंत्यपरीक्षण केले जाते. जर हे मृत व्यक्तीच्या धार्मिक किंवा सांस्कृतिक श्रद्धांविरुद्ध असेल, तर त्यांच्या कुटुंबीयांनी किंवा मित्रांनी शक्य तितक्या लवकर कोरोनर म्हणजेच अपमृत्युनिर्णेता अधिकारी यांना आणि संबंधित तज्ज्ञांना याची माहिती द्यावी.

साधारणतः यानंतर चौकशी केली जाते. कोरोनरच्या न्यायालयीन सुनावणीदरम्यान पुरावे सादर केले जातात जेणेकरून मृत्यू नेमका कसा झाला हे शोधता येईल. तुम्ही चौकशी सुनावणीला उपस्थित राहू शकता, त्यामुळे कदाचित तुम्हाला मदत मिळेल – परंतु जर तुम्ही उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला नाही, तरीही तुम्ही कोरोनरच्या कार्यालयाकडून संपूर्ण अहवाल विनामूल्य मिळवू शकता.

कोरोनर सेवा आणि कोरोनर तपासणीसाठी सरकारी मार्गदर्शक आणि जेव्हा एखाद्या मृत्यूची नोंद कोरोनरला केली जाते तेव्हा काय होतेयामध्ये याविषयी अधिक माहिती मिळू शकते. 

मित्र आणि नातेवाईक कशी मदत करू शकतात?

  • मृत्यू कारण वियोगाने शोकग्रस्त व्यक्तीसोबत वेळ घालवून तुम्ही मदत करू शकता. केवळ शब्दांपेक्षा अधिक, त्यांना हे जाणवणे आवश्यक आहे की या दुःखद काळात तुम्ही त्यांच्या सोबत आहात. शब्द अपुरे पडतात तेव्हा, समजुतीने खांद्यावर ठेवलेला हात काळजी आणि पाठिंबा व्यक्त करू शकतो.
  • हे अत्यंत महत्त्वाचे आहे की, मृत्यू कारण वियोगाने शोकग्रस्त व्यक्तीला ‘स्वतःला सावर’ असे सांगितले जाण्याऐवजी जर त्यांची इच्छा असेल, तर एखाद्या समोर मोकळेपणाने रडता यावे आणि आपल्या वेदना व भावनांबद्दल बोलता यावे. कालांतराने, ते त्याच्याशी जुळवून घेतील, परंतु प्रथम त्यांना बोलणे आणि रडणे आवश्यक आहे.
  • काही लोकांना मृत्यू कारण वियोगाने शोकग्रस्त व्यक्तीला वारंवार त्याच गोष्टींबद्दल बोलण्याची गरज का वाटते हे समजत नाही मात्र, हे दुःखावर मात करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे आणि त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. तुम्हाला काय बोलावे हे समजत नसेल, किंवा हे विषय काढावे की नाही याचीही खात्री नसेल, तर प्रामाणिकपणे ते मान्य करा. यामुळे मृत्यू कारण वियोगाने शोकग्रस्त व्यक्तीला त्यांना काय हवे आहे ते सांगण्याची संधी मिळते. बहुतेक वेळा लोक मृत व्यक्तीचे नाव घेण्याचे टाळतात, कारण त्याने शोकग्रस्त व्यक्ती दुखावली जाईल, अशी त्यांना भीती वाटते. मात्र, मृत्यू कारण वियोगाने शोकग्रस्त व्यक्तीला असे वाटू शकते की इतर लोक त्यांचे दुःख विसरून गेले आहेत आणि त्यामुळे त्यांना अधिकच एकाकी वाटू शकते.
  • सण आणि वाढदिवस (फक्त वर्षश्राद्धच नव्हे तर जन्मदिवस आणि लग्नाचा वाढदिवस हे सुद्धा) यासारखे प्रसंग विशेषतः भावनिकदृष्ट्या कठीण असतात हे लक्षात ठेवा. मित्र आणि नातेवाईकांनी मृत्यू कारण वियोगाने शोकग्रस्त व्यक्तीच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करावा.
  • स्वच्छता, खरेदी किंवा मुलांची देखभाल यासारखी व्यवहार्य मदत एकटेपणाचा भार हलका करू शकते. वृद्ध मृत्यू कारण वियोगाने शोकग्रस्त जोडीदारांना ज्या जबाबदाऱ्या पूर्वी त्यांचा साथीदार सांभाळत असे त्यामध्ये मदतीची गरज भासू शकते  - जसे की घरगुती बिलांची जबाबदारी, स्वयंपाक, घरकाम, गाडी दुरुस्ती इत्यादी.
  • लोकांना दुःख सावरण्यासाठी पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे. काहीजण लवकर सावरतात, तर काहींना जास्त वेळ लागू शकतो. म्हणून, मृत्यू कारण वियोगाने शोकग्रस्त नातेवाईक किंवा मित्राकडून खूप लवकर खूप अपेक्षा करू नका. त्यांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी पुरेसा वेळ द्या, कारण योग्य प्रकारे शोक करण्यास वेळ मिळाल्यास भविष्यातील मानसिक समस्या टाळता येतील. 

दुःख जर सावरले गेले नाही तर काय होते?

काही लोक अगदी थोडेसेही दुःख व्यक्त करत नाहीत. ते अंत्यसंस्कारावेळी रडत नाहीत, त्यांनी गमावलेल्या व्यक्तीचा उल्लेख टाळतात, आणि आश्चर्यकारकरीत्या लगेच त्यांच्या दैनंदिन आयुष्यात परत जातात. हे त्यांच्या दुःख हाताळण्याच्या नैसर्गिक पद्धतीचा भाग असू शकते, आणि त्यामुळे त्यांना कोणतेही नुकसान होणार नाही मात्र, इतर काही लोकांना अनोखी शारीरिक लक्षणे जाणवू शकतात किंवा पुढील काही वर्षांत पुनरावृत्ती होणाऱ्या नैराश्याच्या टप्प्यांमधून जावे लागू शकते. काही लोकांना योग्य प्रकारे शोक व्यक्त करण्याची संधी मिळत नाही. कुटुंबाची किंवा व्यवसायाची जबाबदारी सांभाळताना त्यांना पुरेसा वेळच मिळत नाही.

कधी कधी समस्या अशी असते की त्यांच्या दुःखाला 'योग्य' प्रकारचा शोक म्हणून मान्यता दिली जात नाही. हे नेहमीच असे नाही, पण प्रामुख्याने, गर्भपात, मृतजन्म किंवा हेतुपुरस्सर गर्भपात झालेल्या व्यक्तींना अनुभवायला मिळते. अशा परिस्थितीत, वारंवार नैराश्याचे टप्पे येऊ शकतात.

काही लोक दुःख व्यक्त करायला सुरुवात करतात, पण त्याच्यातच अडकून पडतात. प्रारंभीचा धक्का आणि अविश्वास वर्षानुवर्षे टिकून राहतो. कित्येक वर्षे उलटली तरी त्यांना आपल्या प्रिय व्यक्तीचे निधन झाले आहे हे स्वीकारणे कठीण वाटते. काही जण दिवसागणिक केवळ त्या व्यक्तीच्या आठवणींमध्येच अडकून राहतात, त्यांच्या खोलीला एक प्रकारचे स्मारक बनवतात आणि त्या आठवणींमध्ये जगतात.

कधी कधी मृत्यू कारण वियोगाच्या शोकातून येणारे नैराश्य एवढे गडद होते की व्यक्ती अन्न-पाणी नाकारते आणि आत्महत्येचे विचार मनात येऊ लागतात.

तुमच्या डॉक्टरांकडून मदत

मृत्यू कारण वियोगाचा शोक आपल्या आयुष्याची संपूर्ण उलथापालथ करून टाकतो आणि तो सहन करणे हे सर्वांत वेदनादायक अनुभवांपैकी एक असते. हे विचित्र, भयानक आणि सहन न होणारे वाटू शकते. तथापि, हा जीवनाचा एक भाग आहे, जो आपण सर्वजण अनुभवतो आणि यात सहसा वैद्यकीय उपचारांची आवश्यकता नसते. परंतु, काही वेळा दुःख एक गंभीर समस्या बनू शकते.

  • जर एखाद्या व्यक्तीचे दुःख काही महिन्यांनंतरही कमी होत नसेल, तर त्यांचे सामान्य चिकित्सक (जीपी) मदत करू शकतात. काहींसाठी, जे समान अनुभवातून गेले आहेत अशा लोकांना भेटणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे पुरेसे ठरू शकते, . तर काहींना काही काळ शोक-सल्लागार किंवा मानसोपचारतज्ज्ञाची मदत घ्यावी लागू शकते, कधी विशेष गटामध्ये तर कधी वैयक्तिक रीतीने.
  • कधी कधी, निद्रानाश बराच काळ चालू राहू शकतो आणि तो गंभीर समस्या बनू शकतो. अशा वेळी डॉक्टर काही दिवसांसाठी झोपेच्या गोळ्या देऊ शकतात.
  • जर नैराश्य अधिकाधिक वाढत असेल आणि त्यामुळे भूक, ताकद आणि झोप यावर परिणाम होत असेल, तर अँटीडिप्रेसेन्ट्स (प्रतिअवसादी औषधे) उपयुक्त ठरू शकतात; अधिक माहितीसाठी आमचे अँटीडिप्रेसेन्ट्सविषयी माहितीपत्रक बघा. जर नैराश्य तरीही सुधारत नसेल, तर तुमचे जीपी मानसोपचारतज्ज्ञासोबत भेट ठरवू शकतात.
  • ज्यांनी दीर्घकालीन आजारामुळे कोणाला गमावले असेल, त्यांच्यासाठी अनेक हॉस्पिसेस मोफत शोकसंबंधी सेवा आणि आधार देतात.
  • ज्यांना अडचणी येतात, त्यांच्यासाठी फक्त डॉक्टरांकडूनच नव्हे, तर खालील सूचीतील संस्थांकडूनही मदत उपलब्ध आहे.

मृत्यू कारण वियोगाच्या शोकासंबंधी आधार आणि सल्ला सेवा

Bereavement Advice Centre

हेल्पलाइन: ०८०० ६३४ ९४९४

ही सेवा शोकग्रस्त व्यक्तींना विविध व्यवहारिक समस्यांसंबंधी मदत करते आणि एकाच मोफत फोन क्रमांकाद्वारे समर्थन देते. या सेवेत मृत्यू नोंदणीपासून ते अंत्यसंस्कार व्यवस्थापक शोधणे, वारसाहक्क, कर आणि लाभांशी संबंधित प्रश्नांपर्यंत शोकसंबंधी सर्व पैलूंवर मार्गदर्शन केले जाते.

Breathing Space Scotland

हेल्पलाइन: ०८०० ८३ ८५ ८७

येथे अनुभवी सल्लागार उपलब्ध आहेत, जे नैराश्य अनुभवणाऱ्या आणि बोलण्याची गरज असलेल्या लोकांचे ऐकून घेऊन त्यांना सल्ला व माहिती देतात.

Child Bereavement UK

मदत आणि माहिती सेवा: ०८०० ०२ ८८८ ४०

ही एक राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे जी शोकग्रस्त कुटुंबांना आणि त्यांची काळजी घेणाऱ्या व्यावसायिकांना मदत करते.

Cruse Bereavement Care आणि Cruse Bereavement Care Scotland

हेल्पलाइन: ०८०८ ८०८ १६७७

हेल्पलाइन (स्कॉटलंड): ०८४५ ६०० २२२७

आपल्या जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर मदत करणारी सेवा. प्रशिक्षित शोक-सहाय्य स्वयंसेवक यूके मध्ये सर्व ठिकाणी प्रत्यक्ष भेटी आणि गट-आधारित समर्थन प्रदान करतात.

Dying Matters

इंग्लंड आणि वेल्समधील ३२,००० सदस्यांचे हे संघटन आहे, जे लोकांना मृत्यू, अंत्यसंस्कार आणि शोक याबद्दल अधिक मुक्तपणे बोलण्यासाठी आणि जीवनाच्या शेवटच्या टप्प्याचे नियोजन करण्यासाठी प्रोत्साहित करते.

Rosie Crane Trust

हेल्पलाइन: ०१४६० ५५१२०

ईमेल: contact@rosiecranetrust.co.uk

ही ट्रस्ट पालकांना त्यांच्या मुलगा किंवा मुलगी, कोणत्याही वयाची असो, यांच्या निधनानंतर शोक प्रक्रियेत मदतीचा हात देते.

Samaritans

हेल्पलाइन: ११६ १२३

ईमेल: jo@samaritans.org

ही एक राष्ट्रीय संस्था आहे जी मानसिक तणाव, आत्महत्येचे विचार किंवा क्लेश अनुभवणाऱ्या लोकांना आधार आणि संवादाची संधी प्रदान करते.

Support After Suicide Partnership

ही संस्था अशा व्यक्तींसाठी कार्य करते, ज्यांनी एखाद्या व्यक्तीला आत्महत्येमुळे गमावले आहे किंवा त्याचा परिणाम भोगला आहे.

Survivors of Bereavement by Suicide

हेल्पलाइन: ०३०० १११ ५०६५

ही एक स्व-सहाय्यता संस्था आहे जी यूकेमधील मृत्यू कारण वियोगाने शोकग्रस्त प्रौढांसाठी कार्य करते आणि तिचे संचालन शोक अनुभवलेल्या लोकांकडून केले जाते.

The Compassionate Friends: supporting bereaved parents and their families

हेल्पलाइन: ०३४५ १२३ २३०४

ही एक स्वयंसेवी संस्था आहे जी अशा मृत्यू कारण वियोगाने शोकग्रस्त पालक, भावंडे आणि आजी-आजोबांना आधार देते, ज्यांनी आपल्या मुलाचा/मुलांचा मृत्यू अनुभवला आहे.

The Lullaby Trust

फोन: ०८०८ ८०२ ६८६८

ईमेल: support@lullabytrust.org.uk

ही एक स्वयंसेवी संस्था आहे जी अचानक बाळाच्या मृत्यूचा सामना करणाऱ्या कुटुंबांना विशेष मदत प्रदान करते. तसेच, ती बाळाच्या सुरक्षित झोपेच्या सवयींबाबत तज्ज्ञ सल्ला देते आणि अचानक होणाऱ्या शिशू मृत्यू) विषयी जागरूकता निर्माण करते.

The Loss Foundation

ही संस्था कर्करोगामुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या लोकांना आधार देते. लंडन आणि ऑक्सफर्डमध्ये (प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी) आधार गट आणि इतर सहाय्यक कार्यक्रम आयोजित करते.

WAY: Widowed and Young

ही संस्था अशा पुरुष आणि महिलांसाठी कार्य करते, ज्यांचे जोडीदार ५० वर्षांखालील असताना निधन पावले आहे.

Winston's Wish

Winston’s Wish ही यूकेमधील राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे, जी मुलांना, तरुणांना (२५ वर्षांपर्यंत) आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर शोक-सहाय्य प्रदान करते.

फ्रीफोन हेल्पलाइन: ०८०८८ ०२० ०२१

ईमेल: ask@winstonswish.org

अधिक वाचन

  • A Grief Observed, सी. एस. लुईस द्वारे लिखित.
  • You'll get over it: the rage of bereavement, व्हर्जिनिया आयरनसाइड लिखित.
  • क्रूज बिरीव्हमेंट केअर शोकसंबंधी वाचनासाठी विविध शिफारस केलेले साहित्यदेखील उपलब्ध करून देते.

संदर्भ

Zisook, S., & Shear, K. (2009). Grief and bereavement: what psychiatrists need to know. World Psychiatry, 8 (2), 67-74.

Bonanno, G.A., & Kaltman, S. (2001). The varieties of grief experience. Clinical Psychology Review, 21 (5), 705-734.

Zisook, S., et al. (2014). Bereavement: Courses, consequences and care. Current Psychiatry Reports, 16, 482-492.

Lobar, S.L., Youngblut, J.M., & Brooten, D. (2006). Cross-cultural beliefs, ceremonies and rituals surrounding death of a loved one. Pediatric Nursing, 32 (1), 44-50.

Watson-Jones, R.E., Busch, J.T.A., Harris, P.L., & Legare, C.H. (2017). Does the body survive death? Cultural variation in beliefs about life everlasting. Cognitive Science, 41 (Suppl.3), 455-476.

Bibby, R.W. (2017). Life after death: Data and reflections on the last information gap: A research note. Studies in Religion, 46 (1), 130-141.

Perkins, H.S., Cortez, J.D., & Hazuda, H.P. (2012). Diversity of patients’ beliefs about the soul after death and their importance in end of life care. Southern Medical Journal, 105 (5), 266-272.

Bonoti, F., Leondari, A., & Mastora, A. (2013). Exploring children’s understanding of death: through drawings and the death concept questionnaire. Death Studies, 37, 47-60.

Slaughter, V. (2005). Young children’s understanding of death. Australian Psychologist, 40 (3), 179-186.

Willis, C.A. (2002). The grieving process in children: strategies for understanding, educating and reconciling children’s perceptions of death. Early Childhood Education Journal, 29 (4), 221-226.

Simon, N.M. (2013). Complicated grief. JAMA, 310 (4), 416-423.

Horowitz, M.J., et al. (1997). Diagnostic criteria for complicated grief disorder. American Journal of Psychiatry, 154 (7), 904-910.

Monk, T.H., Germain, A., & Reynolds, C.F. (2008). Sleep disturbance in bereavement. Psychiatric Annals, 38 (10), 671-675.

श्रेय

ही माहिती रॉयल कॉलेज ऑफ सायकायट्रिस्टसच्या (Royal College of Psychiatrists) पब्लिक एंगेजमेंट एडिटोरियल बोर्ड द्वारे तयार करण्यात आली आहे.

मालिका संपादक: डॉ. फिलिप टिम्स
मालिका व्यवस्थापक: थॉमस केनेडी
तज्ञ पुनरावलोकन: डॉ. मनोज राजगोपाल

प्रकाशित: मार्च २०२०

पुनरावलोकन नियत काळ: मार्च २०२३

© रॉयल कॉलेज ऑफ सायकियाट्रिस्टस् (Royal College of Psychiatrists)

This translation was produced by CLEAR Global (Feb 2025)