इलेक्ट्रोकॉन्व्हल्सिव्ह थेरपी (ईसीटी)
Electroconvulsive therapy (ECT)
Below is a Marathi translation of our information resource on electroconvulsive therapy (ECT). You can also read our other Marathi translations.
ही माहिती इलेक्ट्रोकॉन्व्हल्सिव्ह थेरपी (ईसीटी) घ्यायची की नाही याचा विचार करत असलेल्यांसाठी आणि त्यांचे कुटुंबीय किंवा मित्रांसाठी आहे.
ईसीटी घ्यायची की नाही याचा निर्णय घेताना तुम्हाला आणि तुमच्या डॉक्टरांना याची खात्री असणे आवश्यक आहे की तुम्हाला याची पूर्ण माहिती आहे. तुमचे डॉक्टर तुमच्याशी याबद्दल बोलतील. आम्हाला आशा आहे की ही माहिती तुम्हाला पुढील माहिती देऊन हा निर्णय घेण्यास मदत करेल:
- ईसीटी म्हणजे काय आणि ती का वापरले जाते
- ईसीटी घेतांना कोणत्या गोष्टींचा समावेश होतो
- ईसीटीचे फायदे
- ईसीटी संबंधित जोखीम आणि संभाव्य दुष्परिणाम
- तुम्ही उपचार न घेतल्यास काय होऊ शकते
- ईसीटी घेण्याबाबत निर्णय घेणे
- अधिक माहिती कुठे मिळेल.
ईसीटी म्हणजे काय आणि ती का वापरले जाते?
काही प्रकारच्या गंभीर मानसिक आजारांवर ईसीटी हा एक प्रभावी उपचार आहे. जेव्हा उपचाराचे इतर पर्याय जसे की मनोचिकित्सा किंवा औषधोपचार यशस्वी होत नाहीत किंवा जेव्हा एखादी व्यक्ती खूप अस्वस्थ असते आणि तिला तातडीने उपचारांची आवश्यकता असते तेव्हा सामान्यतः याचा विचार केला जातो.
ईसीटी उपचारांचा कोर्स म्हणून दिला जातो, सामान्यतः आठवड्यातून दोनदा 3-8 आठवड्यांसाठी . तुम्ही ईसीटी घेतल्यास, ती साधी भूल देऊन करण्यात येईल. याचा अर्थ असा की ते घडत असताना तुम्ही झोपलेले असाल.
तुम्ही झोपेत असताना, तुमचा मेंदू छोट्या इलेक्ट्रिक पल्सने उत्तेजित केला जाईल. यामुळे फिट येते जी दोन मिनिटांपेक्षा कमी काळ टिकते. भुलीसोबतच तुम्हाला स्नायू शिथिल करणारे औषध दिले जाईल जे फीट आली असताना शरीराची हालचाल कमी करण्यास मदत करते.
ईसीटी कोणत्या समस्यांसाठी वापरली जाऊ शकते?
ईसीटीचा वापर सामान्यतः ज्याने इतर उपचारांना प्रतिसाद दिला नाही अश्या गंभीर नैराश्यासाठी केला जातो. हि कॅटाटोनिया - एक असामान्य स्थिती ज्यामध्ये रुग्ण बोलणे, खाणे किंवा हलणं थांबवतो, यावर उपचार करण्यासाठी देखील वापरली जाते. कधीकधी, बायपोलर डिसऑर्डरच्या मॅनिक टप्प्यातील लोकांवर उपचार करण्यासाठी किंवा लोकांमध्ये उन्माद आणि नैराश्याची मिश्रित लक्षणे आढळल्यास त्याचा वापर केला जातो.
चिंता विकार किंवा इतर बहुतेक मानसिक स्थितींच्या उपचारांसाठी ईसीटीचा सल्ला दिला जात नाही. मध्यम कालावधीत, ईसीटी स्किझोफ्रेनियाच्या अश्या लक्षणांमध्ये मदत करू शकते जी औषधोपचाराने सुधारली नाहीत. तथापि, दीर्घकालीन फायदे, ज्यासाठी सतत ईसीटी आवश्यक आहे, ते कमी स्पष्ट आहेत. या कारणास्तव, यूकेमध्ये ते सहसा वापरले जात नाही.
तुमचे डॉक्टर ईसीटी कधी सुचवू शकतात?
ईसीटी सहसा तुमची लक्षणे खालीलप्रमाणे असल्यास सुचवली जाते :
- जीवघेणी परिस्थिती आणि तुमचा जीव वाचवण्यासाठी तुम्हाला लवकर बरे होण्याची गरज आहे
- परिस्थितीमुळे तुम्हाला प्रचंड त्रास होतो
- तुम्ही इतर उपचारांना प्रतिसाद दिला नाही, जसे की औषधोपचार आणि मानसशास्त्रीय उपचार
- तुम्ही पूर्वी ईसीटीला चांगला प्रतिसाद दिला आहे.
ईसीटी किती प्रभावी आहे?
ईसीटी वापरून लोकांवर उपचार करणारे डॉक्टर सांगतात की बहुतेक रुग्णांना त्यांच्या लक्षणांमध्ये सुधारणा जाणवते. 2018-2019 मध्ये, 68% लोक ज्यांच्यावर ईसीटी ने उपचार केले गेले होते ते उपचाराच्या शेवटी "बरेच-सुधारलेले" किंवा "खूप सुधारलेले" होते (एकूण 2,004 पैकी 1,361 अभ्यासक्रम). यापैकी काही लोकांच्या स्थितीत कोणताही बदल होत नसल्याची नोंद करण्यात आली होती आणि फारच कमी लोकांसाठी (1%) त्यांची स्थिती अधिक वाईट असल्याचे नोंदवले गेले.
नैराश्यावरील उपचार
मोठ्या प्रमाणातील पुराव्यांवरून असे दिसून आले आहे की ईसीटी नैराश्याच्या सर्वात गंभीर प्रकरणांवर उपचार करण्यात तिच्याशी तुलना करण्यात आलेल्या इतर कोणत्याही उपचार पद्धतीपेक्षा अधिक यशस्वी आहे . यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
- नैराश्यावरील औषधे
- प्लसिबोस - जेथे नवीन उपचारांच्या परिणामकारकतेची चाचणी घेण्यासाठी एखाद्याला असा पदार्थ किंवा प्रक्रिया दिली जाते ज्याचा कोणताही शारीरिक प्रभाव नाही
- neuromodulation treatments जसे की ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन (rTMS).
ईसीटी घेणाऱ्या लोकांमध्ये आत्महत्येचा धोका तुलनेने न घेणाऱ्या लोकांपेक्षा कमी असतो.
निरोगी राहणे
ईसीटी खूप आजारी असलेल्या लोकांना इतर प्रकारचे उपचार घेण्यायोग्य पुरेसे बरे होण्यासाठी मदत करू शकते. हे त्यांना अधिक काळ चांगले राहण्यास मदत करू शकते.
संशोधन असे सूचित करते की ज्या लोकांना गंभीर नैराश्य आहे; जे औषधोपचाराने बरे झाले नाही त्यांनी ईसीटी घेतल्यास ते बरे होण्याची आणि जास्त काळ बरे राहण्याची शक्यता जास्त असते.
जे लोक ईसीटी घेतल्यानंतर बरे होतात, त्यापैकी निम्मे लोक किमान वर्षभर बरे राहतील. ईसीटी संपल्यानंतर त्यांना अँटीडिप्रेससन्ट्स किंवा लिथियमसारखे उपचार दिले गेल्यास ही शक्यता जास्त असते.
त्या तुलनेत, तीव्र नैराश्याने ग्रस्त लोक जे दोन भिन्न अँटीडिप्रेसंट्स वापरूनही बरे झाले नाहीत त्यांना तिसरे अँटीडिप्रेसेंट दिल्यास बरे होण्याची आणि किमान एक वर्ष बरे राहण्याची केवळ 5% शक्यता असते.
ईसीटी कसे काम करते?
प्रत्येक उपचारात ईसीटीचे परिणाम हळूहळू दिसू लागतात. ईसीटी मुळे मेंदूतील काही रसायने बाहेर पडतात, ज्यामुळे मेंदूतील काही भागांच्या वाढीस उत्तेजन मिळते जे नैराश्याने संकुचित होतात.
भावनांशी संबंधित मेंदूचे भाग एकमेकांशी कसे संवाद साधतात यामध्ये देखील ईसीटी बदल घडवून आणते असे दिसते. ईसीटी कसे कार्य करते याबद्दल अधिक समजून घेण्यासाठी या क्षेत्रात संशोधन चालू आहे.
ईसीटीचे वेगवेगळे प्रकार आहेत का?
ईसीटी गेल्या काही वर्षांत बदलली आणि विकसित झाली आहे. उदाहरणार्थ, वापरल्या जाणाऱ्या विजेचे प्रमाण आणि स्वरूप बदलले आहे. यामुळे दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी झाली आहे.
ईसीटी दोन प्रकारे दिली जाते : द्विपक्षीय ईसीटी आणि एकपक्षीय ईसीटी. तुमचे डॉक्टर तुम्हाला अधिक समजावून सांगण्यास आणि तुम्हाला कोणत्या प्रकारची ईसीटी अधिक अनुकूल असेल याबद्दल सल्ला देण्यात मदत करण्यास सक्षम असतील.
द्विपक्षीय ईसीटीमध्ये उत्तेजक विद्युत लहरी (stimulating electrical pulses) तुमच्या डोक्यातून, तुमच्या दोन्ही कानशीलामधून जातात. एकपक्षीय ईसीटीमध्ये, ते तुमच्या उजव्या कानशीलामधून आणि तुमच्या डोक्याच्या वरच्या बाजूमधून जातात. द्विपक्षीय ईसीटी अधिक वेगाने कार्य करू शकते, तर एकपक्षीय ईसीटीचा स्मरणशक्तीवर कमी प्रभाव पडतो. या स्त्रोतामध्ये दुष्परिणामांबद्दल अधिक माहिती आहे जी पुढे पाहिली जाऊ शकते..
ईसीटी मुलांसाठी किंवा तरुणांमध्ये वापरता येईल का?
11 वर्षाखालील मुलांमध्ये ईसीटी चा वापर केला जात नाही. 11 ते 18 वयोगटातील मुलांना क्वचितच अशा प्रकारचे मानसिक आजार असतात जे ईसीटी ला चांगला प्रतिसाद देतात, परंतु ज्यांना ते होतात त्यांच्यासाठी ईसीटी उपयुक्त ठरू शकते. या प्रकरणांमध्ये ईसीटी प्रशासित करण्यापूर्वी औपचारिक, स्वतंत्र द्वितीय मत आवश्यक असते .
तुम्ही ईसीटी घेता तेव्हा काय होते?
ईसीटी हॉस्पिटलमध्ये दिली जाते आणि सामान्यतः 'ईसीटी सूट' नावाच्या खोलीत दिली जाते. कधीकधी, हे अनुपलब्ध असल्यास किंवा तुम्हाला गंभीर शारीरिक आरोग्य समस्या असल्यास, उपचार अधिक वैद्यकीय सहाय्य असलेल्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये किंवा ऑपरेटिंग थिएटरमध्ये होऊ शकतात.
ईसीटी घेणारे काही लोक रूग्णालयात दाखल होतात, तर काहींना हॉस्पिटलमध्ये दाखल न करता डे पेशंट म्हणून ईसीटी देण्यात येते. जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल न होता ईसीटी घेत असाल तर, ईसीटी सूटकडे जाताना आणि येताना एक ओळखीची , जबाबदार प्रौढ व्यक्ती तुमच्यासोबत असणे आवश्यक आहे.
ईसीटी सुइटमध्ये एक खोली असेल जिथे तुम्ही थांबू शकाल, एक खोली असेल जिथे तुम्ही तुमचे उपचार घ्याल आणि एक खोली असेल जिथे तुम्ही बाहेर पडण्यापूर्वी व्यवस्थित बरे होऊ शकाल.
तुम्ही तिथे असाल तेव्हा कायम पात्र कर्मचारी तुमची काळजी घेतील. ते तुमच्यावर उपचार करण्यापूर्वी तुमच्या कोणत्याही प्रश्नांची किंवा समस्यांची उत्तरे देण्यात मदत करू शकतात. तसेच ते तुम्हाला ऍनेस्थेटीकमधून जागे होण्याच्या प्रक्रियेत आणि उपचारानंतरच्या काळात मदत करतील.
ईसीटी साठी तयारी
तुमचा ईसीटी चा कोर्स सुरू होण्यापूर्वी काही दिवसात, तुमच्यासाठी सामान्य भूल देणे सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी तुमचे डॉक्टर काही चाचण्यांची व्यवस्था करतील. यामध्ये तुमच्या हृदयाचे ठोके (ECG) आणि रक्त चाचण्यांचा समावेश असू शकतो.
ईसीटी घेण्यापूर्वी तुम्ही किमान 6 तास काहीही खाऊ किंवा पिऊ नये, परंतु तुम्हाला 2 तास आधी थोडे पाणी पिण्याची परवानगी दिली जाऊ शकते. हे तुम्हाला ऍनेस्थेटिक सुरक्षितपणे घेता यावे यासाठी आहे.
या काळात तुम्ही सहसा औषधोपचार घेत असाल, तर तुम्ही अजूनही औषधे घेणे सुरू ठेवावे की नाही याबद्दल सल्ल्यासाठी ईसीटी टीमला विचारा.
तुमच्या ईसीटी उपचाराच्या दिवशी काय होते?
- जर तुम्ही आंतररुग्ण असाल, तर स्टाफचा एक सदस्य तुमच्यासोबत ईसीटी सूटमध्ये येईल. त्यांना तुमच्या आजाराबद्दल माहिती असेल आणि काय होत आहे ते समजावून सांगू शकतात. तुमचा उपचार सुरू असताना कुटुंबातील सदस्यांना प्रतीक्षालयात थांबू देण्याची सोय अनेक ईसीटी सुइट्स आनंदाने करतात.
- तुम्हाला ईसीटी कर्मचाऱ्यातील एक सदस्य भेटेल, जे नियमित शारीरिक तपासण्या करतील (जर आधी केल्या गेल्या नसतील).
- प्रत्येक उपचारापूर्वी तुम्हाला तुमची स्मरणशक्ती आणि ती किती चांगली आहे याबद्दल विचारले जाईल.
- जर तुम्ही स्वेच्छेने ईसीटी घेत असाल, तर कर्मचारी तुम्ही अजूनही ते घेण्यास इच्छुक असल्याचे तपासतील आणि तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर ते विचारतील.
- तुम्ही तयार झाल्यावर, ईसीटी कर्मचारी तुम्हाला उपचार क्षेत्रात घेऊन जातील.
- तुमची हृदय गती, रक्तदाब, ऑक्सिजन पातळी आणि मेंदूच्या लहरी मोजण्यासाठी कर्मचारी निरीक्षण उपकरणे जोडतील.
- तुम्हाला मास्क द्वारे श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन दिला जाईल. भूलतज्ज्ञ तुम्हाला तुमच्या हाताच्या मागील बाजूस इंजेक्शन द्वारे भूल देईल.
तुम्ही झोपेत असताना काय होते?
- तुम्ही झोपेत असताना, भूलतज्ज्ञ तुम्हाला स्नायू शिथिल करणारे औषध देईल आणि तुमच्या दातांचे संरक्षण करण्यासाठी तुमच्या तोंडात माउथ गार्ड ठेवला जाईल.
- तुमच्या डोक्यावर दोन मेटल डिस्क लावल्या जातील. द्विपक्षीय ईसीटी मध्ये, तुमच्या डोक्याच्या प्रत्येक बाजूला एक डिस्क लावली जाते, तर एकपक्षीय ईसीटी मध्ये दोन्ही डिस्क तुमच्या डोक्याच्या एकाच बाजूला लावल्या जातात.
- ईसीटी मशिन तीन ते आठ सेकंदांपर्यंत छोट्या विद्युतीय लहरींची मालिका वितरित करेल. यामुळे नियंत्रित फिट्स येतील, ज्या सरासरी 40 सेकंद टिकतील आणि कदाचित 120 सेकंदांपर्यंत टिकू शकतील. तुमचे शरीर ताठर होईल आणि नंतर सहसा तुमच्या हात, पाय आणि चेहऱ्यावर लचक जाणवेल . स्नायू शिथिल करणारी औषधे शरीराची हालचाल कमी करतील.
- दिला जाणारा विद्युत लहरींचा डोस हा फिट येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रमाणावर आधारित असतो. तुमच्या प्रतिसादाचे निरीक्षण केले जाते आणि आवश्यकतेनुसार डोस समयोजित केला जातो.
जेव्हा तुम्ही जागे होतात तेव्हा काय होते?
- स्नायू शिथिल करणाऱ्या औषधाचा प्रभाव काही मिनिटांतच नाहीसा होईल. जसजसे तुम्ही जागे व्हाल, तसतसे कर्मचारी तुम्हाला स्वास्थ्य-लाभ (recovery) कक्षात घेऊन जातील. येथे, तुम्ही पूर्णपणे जागे होईपर्यंत एक अनुभवी परिचारिका तुमची काळजी घेईल.
- परिचारिका तुमचा रक्तदाब घेईल आणि तुम्ही किती जागृत आहात हे तपासण्यासाठी तुम्हाला साधे प्रश्न विचारतील. तुमच्या रक्तातील ऑक्सिजन मोजण्यासाठी तुमच्या बोटावर एक छोटा मॉनिटर असेल. तुम्ही ऑक्सिजन मास्क लावून उठू शकता. पूर्णपणे जागे व्हायला थोडा वेळ लागू शकतो आणि सुरुवातीला, तुम्ही कुठे आहात हे कदाचित तुम्हाला समजणार नाही. अर्ध्या तासानंतर, हे प्रभाव कमी झाले पाहिजेत आणि हे तपासण्यासाठी तुम्हाला काही सोपे प्रश्न विचारले जातील.
- बऱ्याच ईसीटी सुइट्स मध्ये दुसरी जागा असते जिथे तुम्ही बसून एक कप चहा किंवा इतर काही हलका अल्पोपहार घेऊ शकता. जेव्हा तुमची शारीरिक स्थिती स्थिर असेल आणि जेव्हा तुम्हाला असे करणे योग्य वाटेल तेव्हा तुम्ही ईसीटी सूट सोडू शकता.
- संपूर्ण प्रक्रियेस सहसा सुमारे एक तास लागतो.
प्रत्येक उपचारानंतर 24 तासांच्या आत, तुम्ही दारू पिऊ नये किंवा कोणत्याही कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरी करू नये.
आपल्याबरोबर पुढचे २४ तास कोणीतरी जबाबदार प्रौढ असणे आवश्यक आहे.
ईसीटी किती वारंवार आणि किती वेळा दिली जाते?
ईसीटी उपचारादरम्यान काही दिवसांच्या अंतराने आठवड्यातून दोनदा दिली जाते. जाणवण्यासारखी सुधारणा दिसण्यासाठी बरेच वेळा ईसीटी देण्याची गरज असते.
किती वेळा ईसीटी देण्याची गरज आहे याचा आधीच अंदाज बांधणे शक्य नसते. सर्वसाधारणपणे, एका कोर्समध्ये 9 ते 10 वेळा ईसीटी दिली जाते. अनेकदा यापेक्षा जास्तवेळा सुद्धा दिली जाते.
सहा वेळा दिल्यानंतरही सुधारणा न दिसल्यास, तुमच्या डॉक्टर बरोबर तुमच्या ट्रीटमेंट प्लॅनची चर्चा करून, ट्रीटमेंट चालू ठेवायची की नाही किंवा त्यात काय बदल करायचे हे ठरवले जाईल.
तुम्हाला वैद्यकीय सेवा देणारी टीम, दर आठवड्याला तुमची होणारी प्रगती आणि या ट्रीटमेंटचे तुमच्या शरीरावर होणारे इतर परीणाम यांचा आढावा घेईल. तुमची स्मृती वारंवार तपासली जाईल आणि त्याबद्दल तुमची चौकशी केली जाईल.
तुम्ही पूर्ण बरे झाल्यानंतर किंवा पूर्ण निरोगी आणि समजत्या मनस्थितीत तुम्ही ईसीटी ट्रीटमेंट थांबवण्याचा निर्णय घेतल्यास ईसीटी ट्रीटमेंट थांबवली जाते.
ईसीटीचा कोर्स संपल्यानंतर पुढे काय ?
बरे होण्याच्या प्रवासामधला ईसीटी हा एक भाग आहे. इतर उपचार पद्धती किंवा मदत नव्याने सुरु करणे किंवा थांबवल्या असल्यास पुन्हा सुरु करणे फायद्याचे ठरेल.
सर्वसाधारणपणे ईसीटीचा कोर्स संपल्यानंतर डॉक्टरने दिलेल्या औषधांचा कोर्स चालू करणे / ठेवणे आवश्यक आणि फायद्याचे ठरते. यामुळे ईसीटी उपचारपद्धतीमुळे झालेल्या सुधारणा परिणामकारक राहण्यास मदत होईल.
तुम्हाला परत आजरी पडण्यापासून थांबवण्यासाठी सुद्धा ईसीटी चालू ठेवली जाऊ शकते. विशेषकरून यापूर्वी कधी ईसीटी दिल्यांनतरही आपण परत पूर्वस्थितीत (मानसिक आजाराच्या) गेला असल्यास असे केले जाते. याला 'कंटिन्युएशन' किंवा 'मेंटेनन्स' ईसीटी म्हणतात; ही ट्रीटमेंट कमी वेळा म्हणजे साधारणपणे २ ते ४ आठवड्यानी दिली जाते.
सीबीटी सारख्या संवादात्मक उपचारपद्धती किंवा समुपदेशन घेतल्याने आपल्या मानसिक आजारामागची कारणे आणि निरोगी राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी यांची माहिती होऊ शकते. आपल्या दैनंदिन राहणीमानात बदल करणे फायद्याचे ठरते. नियमित व्यायाम, आरोग्यवर्धक आहार, नियमित आणि पुरेशी झोप आणि सजग राहणे, ध्यानधारणा करणे अश्यासारख्या गोष्टींचा यात समावेश होतो.
तुमच्या शेवटच्या उपचारानंतर 2 महिन्यांनी तुमच्या स्मरणशक्तीबद्दल विचारण्यासाठी ईसीटी क्लिनिक किंवा उपचाराची व्यवस्था करणारे मानसोपचारतज्ज्ञ तुमच्याशी संपर्क साधतील. तुम्हाला तुमच्या स्मरणशक्तीमध्ये समस्या येत असल्यास तुम्ही तपशीलवार चाचणीसाठी न्यूरोसायकोलॉजिस्ट किंवा मेमरी तपासणी सेवा मागू शकता.
ईसीटी चे दुष्परिणाम काय आहेत?
कोणत्याही इतर उपचारपद्धतीप्रमाणेच, ईसीटीचेही दुष्परिणाम होऊ शकतात.
दुष्परिणाम सहसा सौम्य आणि अल्पकालीन असतात परंतु काहीवेळा ते अधिक गंभीर आणि दीर्घकाळ टिकणारे असू शकतात.
तुम्ही स्त्री किंवा वयोवृद्ध असाल तर, विशेषतः अधिक तीव्रतेचा डोस देण्याची गरज असल्यास, दुष्परिणामांचा धोका थोडा अधिक वाढतो.
जर तुम्हाला ईसीटी च्या कोर्स दरम्यान साइड इफेक्ट्सचा अनुभव येत असेल तर, उपचारपद्धतीत आवश्यक बदल केले जाऊ शकतात.
अल्पकालीन दुष्परिणाम
ईसीटी नंतर लगेच, खालील गोष्टी होऊ शकतात:
- डोके दुखणे
- स्नायू आणि/किंवा जबड्यात दुखणे
- ऍनेस्थेटिकचे (भूल) परिणाम कमी होत असताना थकवा जाणवणे
- गोंधळल्यासारखे वाटणे, विशेषत: जर तुम्ही वृद्ध असाल तर (हे सहसा 30 मिनिटांनंतर थांबते)
- मळमळ.
ईसीटी नंतर तुम्ही जागे व्हाल तेव्हा एक नर्स तुमच्यासोबत असेल. ते तुम्हाला पॅरासिटामॉल सारखे नेहमी वापरात असणारे वेदनाशामक औषध देऊ शकतात.
ईसीटी चालू असताना, 40% रुग्णांना तात्पुरत्या स्मरणशक्तीबद्धलच्या समस्या येऊ शकतात. उदाहरणार्थ, ते भेटायला आलेल्या व्यक्तींशी पूर्वी झालेलं संभाषण विसरू शकतात.
तथापि; ईसीटी घेण्यापूर्वीच आपली स्मरणशक्ती अडचणी निर्माण करण्याइतपत खराब होती असे मत सुमारे १७ % लोकांनी नोंदवले. ईसीटी उपचारांचा स्मरणशक्तीवर होणारा परिणाम हा ईसीटी ज्या मानसिक आजाराकरिता दिली जात आहे त्यापासून वेगळा करणे कठीण आहे.
बहुतेक लोकांमध्ये, शेवटच्या उपचारानंतर दोन महिन्यांत स्मरणशक्तीच्या अडचणी दूर होतात आणि त्यामुळे त्रास होत नाही.
सर्व वैद्यकीय उपचारपद्धतीमध्ये धोका असतो. जर भूलतज्ज्ञ तुम्हाला भूल देणे असुरक्षित मानत असेल, तर तुम्ही ईसीटी घेऊ शकणार नाही.
नैराश्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या लोकांमध्ये ईसीटी घेणाऱ्या रुग्नांच्या मृत्यूची शक्यता न घेणाऱ्या रुग्नांच्या तुलनेत कमी असते. ईसीटी लोकांना बरे होण्यास मदत करते किंवा ज्यांना ईसीटी दिले जाते त्यांच्याकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले जाते.
फार क्वचितच, ईसीटी नंतर दीर्घकाळाची फीट येऊ शकते. यावर उपस्थित वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून तातडीने उपचार केले जातात.
दीर्घकालीन दुष्परिणाम
ईसीटी च्या दीर्घकालीन दुष्परिणामांबाबत एकमत नाही.
वैज्ञानिक संशोधनाअंती ईसीटी झालेल्या रुग्णांमध्ये मेंदूवर होणाऱ्या नुकसानाचा कोणताही ठोस पुरावा आढळलेला नाही. ईसीटी नंतर अपस्मार, स्ट्रोक किंवा स्मृतिभ्रंशाचा धोका नाही.
ईसीटीचे सर्वात गंभीर संभाव्य दीर्घकालीन दुष्परिणाम म्हणजे तुम्हाला तुमच्या भूतकाळाची स्मृती न राहाणे. काही रुग्ण, ईसीटी होण्यापूर्वी घडलेल्या आयुष्यातील घटनांबद्दल पुसटशी स्मृती किंवा काहीच गोष्टी न आठवणे, अशा गोष्टी घडल्याचे सांगतात. नैराश्याच्या काळात किंवा नैराश्याच्या काही काळापूर्वी घडलेल्या घटनांच्या आठवणींच्या बाबतीत अश्या गोष्टी घडतात. काहीवेळा या स्मृती पूर्ण किंवा अंशत: परत येतात, परंतु काहीवेळा स्मृती जाणे हे कायमचे असू शकते. अलीकडील संशोधनातं आढळलेले आहे की ईसीटी घेणाऱ्या लोकांपैकी 7% लोकांची स्मृती ईसीटी नंतर 12 महिन्यांनी कायमची गेलेली आहे.
तुम्ही ईसीटी उपचार न घेतल्यास काय होऊ शकते ?
तुम्ही आणि तुमच्या डॉक्टरांनी मिळून, ईसीटी मुळे होणारे दुष्परिणाम आणि ईसीटी न घेण्यातील धोके हे पडताळून पाहून, कोणता धोका पत्करावा याचा निर्णय घ्यावा लागेल. ईसीटी न घेण्याने खालील गोष्टी होण्याची शक्यता जास्त आहे:
- प्रदीर्घ काळ टिकणारा आणि क्षमता नाहीशी करणारा मानसिक आजार
- अन्न-पाणी न घेतल्याने गंभीर शारीरिक आजार (आणि शक्यतो मृत्यू)
- आत्महत्येमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका वाढतो.
ड्रायव्हिंग (वाहन चालविणे) आणि ईसीटी
जर तुम्ही गंभीररित्या आजारी असाल आणि तुम्हाला ईसीटी ची गरज असेल तर तुम्ही गाडी चालवू नये. DVLA चा सल्ला आहे की तुम्ही ECT च्या कोर्स दरम्यान गाडी चालवू नका. कोर्स पूर्ण केल्यानंतर, पुन्हा ड्रायव्हिंग सुरू करण्यास थोडा काळ जावा लागेल. DVLA, तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने, हा निर्णय घेईल.
तुमची पूर्वी चालू असलेली ECT ट्रीटमेंट सध्या पुन्हा चालू असल्यास बहुतेक वेळा तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग चालू ठेवू शकता. तथापि, प्रत्येक ईसीटी उपचारानंतर तुम्ही किमान 48 तास गाडी चालवू नये, दुचाकी चालवू नये किंवा अवजड यंत्रसामग्री चालवू नये.
ईसीटी बद्दल निर्णय घेणे
ईसीटी घेण्यास संमती दर्शविणे
कोणत्याही महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया किंवा औषधोपचारांप्रमाणे, तुम्हाला ईसीटी देण्यासाठी तुमची संमती किंवा परवानगी मागितली जाईल. ईसीटी उपचार करण्याची कारणे, संभाव्य फायदे आणि दुष्परिणाम तुम्हाला समजावून सांगितले जातील.
तुम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतल्यास, तुम्हाला स्वाक्षरी करण्यासाठी एक संमती फॉर्म दिला जाईल. तुम्हाला ईसीटी बद्दल समजावून सांगितले गेले आहे, त्याचे संभाव्य परिणाम काय आहेत हे समजले आहे आणि यासाठी तुम्ही तुमची संमती दिली आहे, याचा हा लेखी पुरावा असेल. आपत्कालीन परिस्थिती नसल्यास तुम्हाला याचा विचार करण्यासाठी आणि तुमच्या नातेवाईकांशी, मित्रांशी किंवा सल्लागारांशी चर्चा करण्यासाठी किमान 24 तास दिले जातील.
तुम्ही तुमची संमती, कोणत्याही क्षणी, अगदी पहिल्या उपचारापूर्वीही मागे घेऊ शकता. तुम्हाला उपचारांना संमती देण्याबाबत तुमचे अधिकार स्पष्ट करणारी माहिती देण्यात येईल.
संमती देण्याबाबत अधिक माहिती पुढील संकेतस्थळांवर उपलब्ध आहे: Care Quality Commission (CQC) website (PDF).
ईसीटी घेण्याबद्दल किंवा न घेण्याबद्दल तुम्ही तुमची इच्छा आधीच व्यक्त करू शकता का?
तुमचे ईसीटी बद्दलचे मत ( ईसीटी च्या बाजूने किंवा विरुद्ध) तुम्ही तुमची काळजी घेत असलेल्या डॉक्टरांना आणि परिचारिकांना सांगावे. तुमचे ईसीटी बद्दलचे मत, तुम्ही तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना, आप्तस्वकीयांना, तुमच्या पाठीशी उभे राहणाऱ्या किंवा तुमचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोणासही सांगितले पाहिजे. ईसीटी तुमच्या हिताचे आहे की नाही याचा विचार करताना डॉक्टरांनी या मतांचा विचार केला पाहिजे.
तुम्ही बरे झाल्यांनतर, जर तुम्ही पुन्हा आजारी पडल्यास तुम्हाला ईसीटी नको आहे अशी तुम्हाला खात्री असेल , तर तुम्ही तसे इच्छापत्र करू शकता. हे इंग्लंड, उत्तर आयर्लंड आणि वेल्समध्ये 'ऍडव्हान्स्ड डिसिजन' किंवा स्कॉटलंडमध्ये 'ऍडव्हान्स्ड स्टेटमेंट' म्हणून ओळखले जाऊ शकते. काही ठराविक परिस्थिती वगळता या इच्छांचे पालन केले पाहिजे. हा एक गुंतागुंतीचा विषय आहे आणि या माहितीपत्रकाच्या व्याप्तीत न बसणारा आहे.
ज्यांच्यावर यापूर्वी यशस्वीरित्या ईसीटी उपचार केले गेले आहेत त्यांना ते इतके उपयुक्त वाटले आहे की, जरी त्यांनी त्या वेळी सांगितले की त्यांना ईसीटी उपचार नको आहेत, तरी त्यांनी पुन्हा आजारी पडल्यास त्यांना ईसीटी करायचा आहे अशा अर्थाची नोंदणी त्यांनी आजारी पडण्याआधीच केली आहे.
तुमच्या परवानगीशिवाय तुम्हाला ईसीटी देता येईल का?
ईसीटी उपचार घेण्याचा निर्णय घेण्याबाबत जरी कोणी सक्षम असेल तरी त्यांना पूर्ण माहिती देऊन संमती घेतल्याशिवाय ईसीटी देता येत नाही.
काही लोक इतके आजारी होतात की त्यांच्यात ईसीटी बद्दल निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. यामुळे ते उपचाराचे स्वरूप, उद्देश किंवा परिणाम योग्यरित्या समजू शकत नाहीत, माहिती लक्षात ठेवू शकत नाहीत किंवा ईसीटी घेण्याचे फायदे आणि तोटे समजू शकत नाहीत.
डॉक्टरांना, या परिस्थितीत ईसीटी उपचार देण्याबाबत निर्णय घेण्याची परवानगी देणारे कायदे UK मध्ये आहेत. उपचार अगदी आवश्यक असल्यासच दिले जातील याची खात्री करण्यासाठी हे कायदे सुरक्षा उपायांसह येतात.
ईसीटी उपचार घेणाऱ्या जवळपास निम्म्या लोकांची ही स्थिती आहे. ज्या लोकांना अशा प्रकारे ईसीटी उपचार दिले आहेत त्यांच्यावर ईसीटी उपचारपद्धती, जे लोक संमती देऊन उपचार घेऊ शकले आहेत त्यांच्याइतकीच परिणामकारक आहे.
जेव्हा एखादी व्यक्ती आजारातून बरी होते आणि पुन्हा निर्णयक्षम बनते तेंव्हा त्यांची संमती पुन्हा घेतली पाहिजे.
ईसीटी आणि संमती देण्याबाबत अधिक माहिती पुढील संकेतस्थळांवर उपलब्ध आहे: CQC website (PDF).
तुमच्या हॉस्पिटलमधील ईसीटी च्या गुणवत्तेचे/ परिणामकारकतेचे मूल्यांकन कसे केले जाते?
ECT Accreditation Service (ECTAS)
हे, इंग्लंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंडमधील, सर्वोत्तम ईसीटी उपचारांचा पाठपुरावा करणारे एक मानसिक आरोग्य सेवांचे स्वयंसेवी नेटवर्क आहे. कायदा आणि सुरक्षिततेचे काही ठराविक प्रमाण संकेत पाळून, ईसीटीची गुणवत्ता सुधारण्यासाठी, हे नेटवर्क ईसीटी क्लिनिकना मदत करते.
Scottish ECT Accreditation Network (SEAN)हेही याच प्रकारचे आणि पूर्ण स्कॉटलंड भर काम करणारे नेटवर्क आहे.
ECTAS आणि SEAN हे ईसीटी सेवांचे कायद्याने नियंत्रण करीत नाहीत. इंग्लंडमधील केअर क्वालिटी कमिशन, वेल्समधील हेल्थकेअर इंस्पेक्टरेट वेल्स, स्कॉटलंडमधील हेल्थकेअर इम्प्रूव्हमेंट स्कॉटलंड आणि नॉर्दन आयर्लंडमधील रेग्युलेशन अँड क्वालीटी इम्प्रूव्हमेंट ऑथॉरिटी यांची ही जबाबदारी आहे.
मला अधिक माहिती कुठे मिळेल?
याबाबत खालील संकेतस्थळांवर आपण अधिक माहिती मिळवू शकता:
अधिक माहिती
National Institute for Health and Care Excellence (NICE)
- Guidance on the use of electroconvulsive therapy. Technology appraisal guidance [TA59]
- Depression in adults: recognition and management. Clinical guideline [CG90]
- The use of electroconvulsive therapy: Understanding NICE guidance – information for service users, their advocates and carers, and the public (PDF)
- Scottish ECT Accreditation Network (SEAN)
- Electroconvulsive Therapy Accreditation Services (ECTAS)
आभार
ही माहिती रॉयल कॉलेज ऑफ सायकियाट्रिस्टस् यांच्या पब्लिक एंगेजमेंट एडिटोरियल बोर्ड (PEEB)ने तयार केली आहे. ही माहिती लेखनाच्या वेळी उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम माहितीवर आधारित आहे.
तज्ञ पुनरावलोकन आणि योगदानकर्ते
- Committee on ECT and Related Treatments
- Electroconvulsive Therapy Accreditation Service (ECTAS)
- Scottish ECT Accreditation Network (SEAN)
- Professor Wendy Burn, Immediate Past President and Chair of PEEB.
मार्च 2022 मध्ये ही माहिती सुधारित करण्यात आली आहे .
© Royal College of Psychiatrists
This translation was produced by CLEAR Global (Apr 2024)