शारीरिक आजार आणि मानसिक आरोग्य

Physical illness and mental health

Below is a Marathi translation of our information resource on physical illness and mental health. You can also read our other Marathi translations.

आपल्यापैकी बहुतेक जणांना आपल्या आयुष्यात कधीतरी एखादा गंभीर किंवा जीवन बदलून टाकणारा असा शारीरिक आजार होईल. आजार आणि त्यावरील उपचार या दोन्हींचा आपण कसे विचार करतो आणि काय अनुभवतो यावर परिणाम होऊ शकतो. ज्या लोकांना त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणारा एखादा शारीरिक आजार असेल अशा आणि जे त्यांची काळजी घेत असतील अशा लोकांसाठी ही माहिती आहे.

एखादा शारीरिक आजार असण्याचे काय परिणाम होतात?

एखादा शारीरिक आजार असण्यामुळे किंवा झाल्यामुळे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या व्यावहारिक जीवनावर परिणाम होऊ शकतो, जसे:

  • काम - तुमच्या असे लक्षात येईल की तुम्हाला कामावर जाणे थांबवावे लागेल, कमी करावे लागेल किंवा काम बदलावे लागेल.
  • दैनंदिन क्रिया - तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टींमध्ये सहभागी होणे किंवा तुम्हाला कितीही आवडत असले तरी मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीयांशी भेटणे तुम्हाला कठीण वाटत असेल. ज्या गोष्टी तुम्ही आधी स्वतः करत होता त्या करण्यासाठी तुम्हाला मित्रमैत्रिणी, कुटुंबीय किंवा व्यावसायिक सेवेची मदत घेणे गरजेचे वाटत असेल.
  • आर्थिक - शारीरिक आजार असल्याने तुमच्या आर्थिक परिस्थितीवर वेगवेगळ्या कारणांनी परिणाम होत असेल. उदाहरणार्थ, नियोजित वैद्यकीय भेटींसाठी जाण्याच्या खर्चामुळे किंवा तुम्ही किंवा तुम्हाला आधार देणाऱ्या लोकांना कमी काम करावे लागत असल्यामुळे.
  • रुग्णालयात वेळ घालवणे - तुम्हाला काही विशिष्ट उपचार किंवा शस्त्रक्रियांसाठी रुग्णालयात जाणे गरजेचे असेल. यामुळे घरापासून आणि तुमच्या नेहेमीच्या आधार देणाऱ्या लोकांपासून दूर राहावे लागणे.

शारीरिक आजारामुळे तुमच्या विचार करण्यावर आणि तुम्हाला कसे वाटते यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो:

  • ताण - शारीरिक आजार झाल्यामुळे तुम्हाला भविष्याची काळजी वाटणे आणि वर्तमानात त्याचा ताण जाणवणे हे समजून घेता येण्यासारखे आहे. विशेषतः काही गोष्टींविषयी तुम्ही चिंताग्रस्त होऊ शकता. उदाहरणार्थ, एखाद्या महत्त्वाच्या चाचणीचा निकाल किंवा तुम्हाला रुग्णालयात जावे लागल्यामुळे मुलांना सांभाळण्याची व्यवस्था.
  • आत्मविश्वास - शारीरिक आजारामुळे तुम्हाला तुमचे शरीर आणि तुमचे जीवन तुमच्या ताब्यात न राहिल्यासारखे वाटू शकते. शारीरिक आजार होणे ही काही तुमच्या नियंत्रणात असणारी गोष्ट नाही. यामुळे अस्वस्थ आणि निराश वाटू शकते.
  • नातेसंबंध - शारीरिक आजार झाल्यामुळे तुम्हाला एकटे आणि मित्रमैत्रिणी व कुटुंबीयांपासून दूर अलिप्त झाल्यासारखे देखील वाटू शकते. त्यांना काळजी किंवा अस्वस्थ वाटू नये म्हणून तुम्ही तुमच्या तब्येती विषयी त्यांना सांगणे टाळू शकता. किंवा तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात हे त्यांना सांगाल परंतु त्यांना ते समजणार नाही असे तुम्हाला वाटू शकते.
  • जगाची समज - आजारी पडल्यामुळे तुमच्या सभोवती असलेल्या जगाविषयी आणि योग्य व न्याय्य काय आहे याबाबतीत तुमच्या समजुतींविषयी तुम्हाला प्रश्न पडू शकतात. काही लोकांना त्यांच्या आध्यात्मिक किंवा धार्मिक श्रद्धांवर त्याचा प्रभाव पडत असल्यासारखा वाटतो.

जर तुमच्या शारीरिक आजाराचा तुमच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होत असेल तर त्यासंबंधी मदत उपलब्ध आहे. जर तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्यासंबंधी मदतीची गरज असेल तर जे लोकं तुम्हाला शारीरिक आरोग्यसेवा पुरवत असतील त्यांना ही माहिती जाणणे आवश्यक आहे. ते तुम्हाला असे इतर व्यावसायिक किंवा संस्था सुचवू शकतील जे याबाबत मदत करू शकतात.

माझ्या शारीरिक आजाराचा माझ्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आहे हे मी कसे ओळखावे?

तुम्ही कोण आहात आणि तुमच्या आयुष्यात काय घडते आहे यावर अवलंबून शारीरिक आजाराचा तुमच्या मानसिक आरोग्यावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होऊ शकतो. आम्हाला इथे सर्व प्रकारच्या मानसिक आरोग्य समस्यांचा समावेश करता येणार नाही परंतु तुम्ही लक्ष ठेवावे अशी काही लक्षणे इथे खाली नमूद केली आहेत.

चिंता

जर तुम्हाला चिंता वाटत असेल तर तुमच्या लक्षात येईल की:

  • तुम्हाला एखाद्या गोष्टीविषयी किंवा वेगवेगळ्या अनेक गोष्टींविषयी सतत चिंता वाटते
  • तुम्हाला आराम करता येत नाही
  • तुमचे हृदय किती वेगाने धडधडत आहे, तुमचा श्वासोच्छवास किंवा तुमची पचनक्रिया यांमधील बदल तुम्हाला जाणवतो.
  • आमची  चिंता संसाधने वाचून तुम्हाला चिंतेच्या लक्षणांविषयी अधिक माहिती वाचता येईल.

नैराश्य

जर तुम्हाला नैराश्य वाटत असेल तर तुमच्या लक्षात येईल की:

  • तुम्हाला बरेच वेळा किंवा नेहेमीच खूप दुःखी असल्यासारखे वाटते
  • तुम्हाला थकल्यासारखे, अस्वस्थ वाटते आणि तुमच्या झोपेतील, आहारातील किंवा लैंगिक संबंधांच्या इच्छेतील बदल तुमच्या लक्षात येतात
  • तुम्हाला इतर व्यक्तींशी संवाद साधावे असे वाटत नाही.

आमची नैराश्य संसाधने वाचून तुम्हाला नैराश्याच्या लक्षणांविषयी अधिक माहिती वाचता येईल.

अ‍ॅडजेस्टमेंट डिसऑर्डर

तुम्हाला एखादा शारीरिक आजार झाल्यानंतर किंवा एखादी दुखापत झाल्यानंतर काळजी वाटणे, व्यथित होणे किंवा अस्वस्थ वाटणे हे पूर्णपणे समजण्यासारखे आहे. कठीण परिस्थितींमध्ये किंवा अनिश्चिततेच्या काळात वागण्याचे ‘योग्य प्रमाण’ असे नसते.

तथापि जर तुम्हाला एखाद्या तणावपूर्ण घटनेशी किंवा अनेक घटनांच्या मालिकेशी ‘जुळवून’ घेणे कठीण जात असेल तर तुम्हाला असा आजार ज्याला ‘अ‍ॅडजेस्टमेंट डिसऑर्डर’ म्हणतात, असू शकतो.

जर तुम्हाला अ‍ॅडजेस्टमेंट डिसऑर्डर असेल तर तुम्हाला:

  • तुमचा शारीरिक आजार किंवा त्याचा तुमच्याशी काय संबंध आहे याविषयी विचार करणे थांबवणे अशक्य होऊ शकते
  • तुमच्या शारीरिक आजाराविषयी विचार करताना अतिशय काळजी वाटत असेल किंवा तुम्ही व्यथित होत असाल
  • परिस्थितीशी कराव्या लागणाऱ्या सामन्याचा किंवा कार्याचा तुमच्या आयुष्याच्या इतर क्षेत्रांवरही नकारात्मक परिणाम होत असेल.

जर तुम्हाला अ‍ॅडजेस्टमेंट डिसऑर्डर असेल तर हे तुमच्या आजाराचे निदान झाल्यानंतर किंवा दुखापत झाल्यानंतर साधारणपणे महिन्याभराच्या काळात स्पष्ट होईल.

पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी)

ज्यांना शारीरिक आजार किंवा दुखापत झाली आहे अशा काही लोकांना पोस्ट-ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी) होण्याची शक्यता असते. जेव्हा एखाद्या घटनेमुळे किंवा घटनांच्या मालिकेमुळे एखाद्या व्यक्तीमध्ये मानसिक प्रतिक्रिया विकसित होते तेव्हा पीटीएसडी होतो.

ज्यांच्यामुळे पीटीएसडी होऊ शकतो त्यामध्ये पुढील अनुभवांचा समावेश आहे:

  • एखाद्या गंभीर शारीरिक आजाराचे निदान होणे
  • अतिदक्षतेखाली राहावे लागणे
  • गुंतागुंतीच्या बाळंतपणाचा अनुभव येणे
  • गंभीर अपघात होणे.

जर तुम्हाला पीटीएसडीची बाधा झाली असेल तर तुम्हाला खाली नमूद केलेल्यांपैकी काही लक्षणांचा अनुभव येऊ शकतो:

  • त्या घटनेच्या नकोशा वाटणाऱ्या आणि क्लेशदायक आठवणी किंवा स्वप्ने येणे
  • ती घटना पुन्हा घडत असल्यासारखे वाटणे
  • ती घटना आठवू न शकणे किंवा त्याविषयी विचार करण्याचे टाळणे
  • मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीयांविषयी अलिप्त वाटणे
  • स्वतःबद्दल, इतरांबद्दल किंवा जगाबद्दल नकारात्मक भावना येणे
  • तुम्हाला आधी आवडणाऱ्या गोष्टींमध्ये आता रस न वाटणे आणि खूश किंवा समाधानी वाटणे कठीण जाणे
  • अस्वस्थ वाटणे आणि लक्ष केंद्रित करायला किंवा झोपायला कठीण जाणे
  • इतर लोकांशी आक्रमक रितीने वागणे
  • धोकादायक किंवा बेजबाबदार कृती करणे.

तुम्हाला पीटीएसडी विषयी अधिक माहिती इथे मिळू शकेल.

तुम्ही आजारी असल्याची जाणीव होणे

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मानसिक आजार झाला असेल तर पुढील गोष्टी तुमच्या आसपासच्या लोकांच्या लक्षात येऊ शकतात:

  • तुम्ही नेहमीपेक्षा वेगळ्या रितीने वागत आहात
  • तुमच्या शारीरिक आजारावर उपचार किंवा औषधोपचार घेण्याची तुमची इच्छा नाही
  • तुम्ही नियोजित वैद्यकीय भेटींना जात नाही.

वर नमूद केलेल्या पैकी काही लक्षणांबरोबरच तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला:

  • थकल्यासारखे वाटते
  • झोप लागत नाही
  • भूक लागत नाही.

यांपैकी काही गोष्टींसाठी शारीरिक आजार किंवा वैद्यकीय उपचार सुद्धा कारणीभूत असू शकतात. त्यामुळे तुम्ही जे अनुभवत असाल ते सामान्यपणे ‘ठीक’ आहे किंवा नाही हे ठरवणे तुमच्यासाठी किंवा तुमची काळजी घेणाऱ्या इतरांसाठी कठीण जाऊ शकते.

तुम्हाला कसे वाटते आहे याविषयी तुमच्या डॉक्टरांशी किंवा इतर एखाद्या विश्वासू व्यक्तीशी बोला. तुम्ही जे बदल अनुभवत असाल ते तुमच्या शारीरिक आजाराशी निगडित आहेत की तुमच्या मानसिक आरोग्याशी हे ठरवण्यामध्ये ते तुमची मदत करू शकतात.

इतर मानसिक आरोग्य समस्यांविषयी अधिक माहिती तुम्ही इथे वाचू शकता.

जर मला शारीरिक आजार असेल तर त्यामुळे मला मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते का?

शारीरिक आजार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मानसिक आरोग्य समस्यांचा अनुभव येतोच असे नाही. तथापि, ज्या लोकांना दीर्घ काळासाठी शारीरिक आजार असेल त्यांच्या मानसिक आरोग्याची स्थिती खालावण्याची शक्यता जास्त असते. मानसिक आजार आणि काही विशिष्ट प्रकारचे शारीरिक आजार यांच्यातील जोड संशोधनात दिसून आले आहेत, जसे की:

  • कर्करोग
  • मधुमेह
  • अस्थमा
  • उच्च रक्तदाब
  • मिरगी.

तथापि, फक्त ह्याच शारीरिक आजारांचा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो असे नाही.

ज्या लोकांना सतत शारीरिक आजारांनी ग्रासलेले आहे अशा लोकांमध्ये नैराश्य येण्याची शक्यता इतर निरोगी लोकांच्या मानाने 2 ते 3 पटींनी जास्त असते.

शारीरिक आणि मानसिक आरोग्य यांमध्ये काय संबंध आहे?

शारीरिक आणि मानसिक आजार एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे नेहेमीच स्पष्टपणे कळते असे नाही.

तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे शारीरिक किंवा मानसिक आजार आहेत यावर अवलंबून:

  • एखादा शारीरिक आजार असल्यामुळे कदाचित तुम्हाला मानसिक आजार होऊ शकतो
  • तुमचा शारीरिक आजार तुमच्या मानसिक आजाराशी जुळलेला असू शकतो
  • तुमचा शारीरिक आजार आणि मानसिक आजार यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसेल परंतु ते एकाच वेळी होत असतील.

एखाद्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य खालावण्यामध्ये काही गोष्टींचा थेट हातभार लागू शकतो, जसे की:

  • ताण - शारीरिक आजारामुळे मनावरील ताण खूप वाढू शकतो आणि मानसिक ताणाचा तुमच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
  • औषधोपचार - काही औषधांचा तुमच्या मेंदूच्या कामावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, स्टिरॉइड्स घेतल्यामुळे लहरीपणा आणि भ्रमिष्टपणा यांची लक्षणे उद्भवल्याचे दिसून आले आहे. भ्रमिष्टपणाच्या लक्षणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो:
    • खऱ्या नसलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणे
    • स्पष्टपणे विचार करणे कठीण जाणे
    • खऱ्या नसलेल्या गोष्टींचा अनुभव येणे.
  • शारीरिक आजार - काही शारीरिक आजारांचा मेंदूच्या कामावर अनिष्ट परिणाम होतो. उदाहरणार्थ, ज्या लोकांचे थायरॉईड कमी सक्रिय आहे (हायपोथायरॉईडीजम) त्यांना नैराश्य आणि चिंता यांचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते.

मला मानसिक आजार होण्याची सर्वात जास्त शक्यता केव्हा असेल?

तुम्हाला शारीरिक आजार झाला असताना तुमचे मानसिक आरोग्य खालावण्याची शक्यता जास्त असेल जर:

  • याआधी तुम्हाला मानसिक आरोग्यासंबंधी त्रास झाला असेल किंवा याआधी तुम्हाला एखाद्या मानसिक आजाराचे निदान झाले असेल
  • तुमच्या आजाराविषयी बोलण्यासाठी तुमच्या जवळ कोणीही कुटुंबीय किंवा मित्र नसतील
  • त्याच वेळी तुमच्या आयुष्यात इतर काही समस्या किंवा ताणदायक गोष्टी घडत असतील. उदाहरणार्थ, तुमची नोकरी जाणे, घटस्फोट होणे, किंवा जवळच्या नात्यातील व्यक्तीचा मृत्यू होणे. कधी कधी आयुष्यातील चांगले बदलसुद्धा जर ते अनपेक्षितपणे किंवा ताणदायक स्थितीत घडून आले तर तुमच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतात.
  • तुमच्या शारीरिक आजारामुळे तुम्हाला खूप वेदना होत असतील
  • तुम्हाला एखादा असाध्य किंवा जीवघेणा आजार असेल
  • तुमच्या आजारामुळे तुम्हाला स्वतःची काळजी घेता येत नसेल.

ज्यावेळी तुमचे मानसिक आरोग्य खालावण्याची शक्यता सर्वात जास्त असेल अशी वेळ म्हणजे:

  • जेव्हा तुम्हाला अगदी पहिल्या वेळी तुमच्या आजाराविषयी सांगितले जाते
  • तुमच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर किंवा जर तुमच्यावर होणाऱ्या औषधोपचाराचे त्रासदायक दुष्परिणाम होत असतील तर
  • तुम्ही बरे होत आहात असे वाटू लागत असतानाच जर आजार पुन्हा बळावला तर. उदाहरणार्थ कर्करोग पुन्हा होणे किंवा हृदयविकाराचा झटका दुसऱ्यांदा येणे
  • जर औषधोपचाराचा तुमच्या आजारावर काही उपयोग होणे थांबले तर.

मी मदत कधी मागावी?

तुम्हाला शारीरिक आजाराचा त्रास होत असताना काही प्रमाणात चिंता आणि निराश वाटणे समजण्यासारखे असते. तथापि, तुम्ही मदत मागणे आवश्यक आहे जर तुम्हाला:

  • याआधी मानसिक आरोग्यासंबंधी त्रास झाला असेल किंवा याआधी तुम्हाला एखाद्या मानसिक आजाराचे निदान झाले असेल आणि आपल्याला पुन्हा बरे वाटत नाही असे तुम्हाला वाटत असेल
  • आधीपेक्षा अधिक वाईट अवस्था वाटत असेल
  • काही काळानंतरही त्यात सुधारणा वाटत नसेल
  • तुमच्या भावनांचा तुमच्या नातेसंबंधांवर, कामावर, छंदांवर किंवा दैनंदिन आयुष्यावर परिणाम होत असल्याचे लक्षात येत असेल
  • आयुष्यात जगण्यासारखे काही नाही किंवा आपण नाही राहिलो तर इतरांचे आयुष्य अधिक चांगले होईल असे वाटत असेल.

मदत घ्यावी किंवा नाही हे मला कळत नाही आहे

शारीरिक आजार असताना मदत मागणं कठीण जाऊ शकतं. खरे नसले तरीही, खालील विचार मनात येणे हा एक सामान्य प्रतिसाद आहे:

  • “मी माझ्या शारीरिक आरोग्यावर लक्ष दिले पाहिजे. माझे मानसिक आरोग्य कमी महत्त्वाचे आहे.” - तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य एकमेकांशी जोडलेले आहे. मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्याचा तुमच्या शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
  • "माझे लक्ष देण्यासाठी इतर गोष्टी आहेत." - तुम्हाला कदाचित तुमच्या कुटुंब, आर्थिक स्थिती, निवास किंवा कामाला प्राधान्य द्यावे असे वाटत असेल. पण जर तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ काढला नाही, तर तुम्ही खूप अस्वस्थ होऊ शकता. असे झाल्यास तुम्ही अशा महत्वाच्या गोष्टींवर सुद्धा लक्ष देऊ शकणार नाही.
  • “अर्थातच मला निराश वाटतंय, मी आजारी आहे. त्यासाठी मदत घेण्यात काही अर्थ नाही.” - हे पूर्णपणे समजण्यासारखे आहे की तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्याबाबत अडचणी अनुभवत आहात. तथापि, याचा अर्थ असा नाही की आपण मदतीसाठी पात्र नाही. सगळ्यांना आनंदी वाटण्याचा, पाठिंबा मिळण्याचा व काळजी करून घेण्याचा हक्क आहे.
  • "मला कृतघ्न वाटायचे नाही आहे, माझी हेल्थकेअर टीम मला मदत करण्यासाठी खूप काही करत आहे." - तुमचे डॉक्टर तुमच्या शारीरिक आरोग्याबरोबरच तुमच्या मानसिक आरोग्याबद्दलही ऐकू इच्छितात. हे सर्व तुम्हाला बरे ठेवण्याचा एक भाग आहे, आणि तुम्ही मदत मागितल्यावर तुम्ही आभारी नसल्यासारखं त्यांना वाटणार नाही.

मी मदत कशी मिळवू शकतो?

तुम्हाला कसे वाटतंय हे एका विश्वसनीय व्यक्तीशी बोलून सुरुवात करू शकता. अनेकदा, तुमच्या भावना व्यक्त केल्याने तुमच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो.

जर तुम्हाला आणखी मदतीची आवश्यकता असेल, तर तुमच्या GP किंवा तुमच्या शारीरिक आजारावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय टीमशी बोला. ते तुम्हाला उपलब्ध असलेल्या समर्थनाबद्दल सल्ला देऊ शकतात आणि ते मिळवण्यास मदत करू शकतात.

शारीरिक आजार असलेल्या लोकांना समर्थन देणाऱ्या अनेक चॅरिटी आणि संस्था आहेत. तुम्ही या स्त्रोताच्या शेवटी त्याबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.

जर तुम्ही आधीच मानसिक आरोग्य टीमच्या देखरेखीखाली असाल, तर तुम्हाला शारीरिक आजार झाला असल्यास त्यांना सांगितलं पाहिजे. हे त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल जेणेकरून ते तुम्हाला योग्य प्रकारे समर्थन देऊ शकतील.

मला कोणत्या प्रकारचे उपचार मिळतील?

तुम्हाला दिला जाणारा उपचाराचा प्रकार पुढील गोष्टींवर अवलंबून असेल:

  • तुम्ही ज्या अडचणींचा सामना करत आहात
  • त्या तुमच्या आयुष्यावर कसा परिणाम करत आहेत
  • तुमची वैयक्तिक परिस्थिती.

तुम्ही ज्या समस्येशी निपटत आहात त्यावर आधारित, तुम्हाला पुढील उपचार दिले जाऊ शकतात:

कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी (सीबीटी) संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी देखील वेदना सहन करणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त ठरल्याचं सिद्ध झालं आहे.

तुम्ही खालील आजारांसाठी उपचारांबद्दल अधिक माहिती आमच्या माहिती स्रोतांद्वारे वाचून जाणून घेऊ शकता:

विविध मानसिक आजार आणि त्यांच्या उपचारांबद्दल तुम्ही इथे अधिक वाचू शकता.

हे उपचार कसे मदत करतील?

संभाषण थेरपी

तुम्हाला कसं वाटतंय ते व्यक्त करणे कठीण जाऊ शकतं, अगदी जवळच्या कुटुंबीय आणि मित्रांसमोरही. काहीवेळा जर तुम्हाला त्यांना आपली काळजी वाटू नये असे वाटत असेल, तर तुम्हाला कसं वाटतंय हे जवळच्या व्यक्तीशी बोलणं आणखीन कठीण होऊ शकते.

याच कारणासाठी, एखाद्या व्यावसायिकाशी बोलणं सोपं जाऊ शकतं. ते तुम्हाला भावना, विचार आणि व्यवहार्य समस्यांशी अधिक चांगल्या प्रकारे सामना करण्याच्या मार्गांमध्ये मदत करू शकतात.

तुम्हाला असे जाणवू शकते की, संभाषण थेरपी सुरू केल्यानंतर, तुमच्या चिंता व्यक्त करण्यामुळे तुम्हाला लगेचच बरं वाटतंय. किंवा संभाषण थेरपीमुळे तुम्हाला बरं वाटायला थोडा अधिक वेळ लागू शकतो.

औषधोपचार

हे तुम्हाला दिलेल्या औषधांवर आणि तुम्हाला मिळणाऱ्या इतर मदतीवर अवलंबून असेल.

सामान्यतः, तुमच्या जीवनात इतर सकारात्मक बदल करण्यास सुरुवात करण्याइतके तुम्हाला बरे वाटावे यासाठी औषधे दिली जातात. कोणत्याही प्रकारची औषधे कार्य करण्यास थोडा वेळ घेतात आणि ती तुमच्या डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे घेतली पाहिजेत.

औषधे तुमच्या झोप, भुकेसाठी किंवा शारीरिक वेदनांसाठी सुद्धा मदत करू शकतात. औषधे तुम्हाला कशी मदत करू शकतात याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला.

मी आधीच शारीरिक आजारासाठी औषध घेत असल्यास मी मानसिक आजारासाठी औषध घेऊ शकतो का?

तुम्हाला शारीरिक आजार असल्यास, तुम्ही आधीच औषधे घेत असाल. तुम्ही घेत असलेली कोणती औषधे एकत्र घेऊ नयेत का, हे तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील. काही दुष्परिणाम आहेत का ते देखील ते तुम्हाला सांगतील.

सर्व औषधांचे काही दुष्परिणाम असतात, पण सहसा ते सौम्य असतात आणि काही काळ औषधे घेतल्यावर कमीदेखील होतात. तुम्ही अनुभवलेल्या कोणत्याही शारीरिक किंवा भावनिक बदलांची माहिती डॉक्टरांना द्यावी.

मी स्वतःची कशी मदत करू?

व्यावसायिक मदत मिळवण्याबरोबरच, स्वत:ला मदत करण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टी करू शकता:

इतरांशी बोला

तुमची भीती आणि चिंता जवळच्यांना सांगा. पूर्वी तुम्हाला पाठिंबा देणाऱ्या आणि तुमचं ऐकून घेणाऱ्या माणसांशी बोला.

तुमच्या डॉक्टरांशी बोला

तुमच्या आजाराबद्दल तुमच्या डॉक्टरांना किंवा जनरल प्रॅक्टिशनरला प्रश्न विचारायला घाबरू नका. जर आजाराविषयी किंवा त्यावरील उपचारांविषयी अशा काही गोष्टी असतील ज्याबद्दल तुम्ही अनिश्चित असाल तर ते तुम्हाला त्या गोष्टी समजावून सांगण्यास मदत करू शकतात.

समर्थन मिळवा

विविध धर्मादाय आणि इतर संस्था तुम्हाला विश्वसनीय माहिती आणि समर्थन देऊ शकतील. ज्यांना तुमच्या सारखाच शारीरिक आजार आहे अशा इतर लोकांशीही तुम्ही बोलू शकता आणि सहयोगी मदत मिळवू शकता.

आर्थिक मदतीसाठी अर्ज करा

जर तुम्हाला एखादा शारीरिक किंवा मानसिक आजार असेल तर तुम्ही वैद्यकीय सवलती आणि इतर आर्थिक मदत यांचे हक्कदार असू शकता.

चांगला आहार घ्या

संतुलित आहार घेण्याचा प्रयत्न करा. वजन कमी होणे किंवा सत्त्वहीन अन्न खाणे हे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. जर तुम्हाला अन्न सेवनाचा विकार असेल तर तुमच्यासाठी संतुलित आणि पोषक असलेला आहार वेगळा असेल.

नियमित व्यायाम करा

शक्य असल्यास, नियमितपणे थोडा शारीरिक व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. हे चालायला जाणे किंवा दहा मिनिटे सोपी योगासने करणे यासारखे साधे असू शकते.

संतुलन राखा

कठीण परिश्रम घेणे आणि आराम करणे यामध्ये संतुलन आणण्याचा प्रयत्न करा.

स्वतःसाठी चांगले असे काहीतरी करा (स्वतःची काळजी)

तुमच्या दिनचर्येमध्ये आरामदायक, आनंददायक अशा क्रिया समाविष्ट करा. हे एखाद्या मित्रासोबत किंवा मैत्रिणीसोबत फोन वर गप्पा मारण्यापासून बागेत बसून एखादे पुस्तक वाचण्यापर्यंत काहीही असू शकते.

मद्य सेवनाचा अतिरेक करणे टाळा

अतिप्रमाणात दारू पिणे टाळण्याचा प्रयत्न करा कारण दीर्घ काळामध्ये त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

मनोरंजनासाठी अंमली पदार्थ घेणे टाळा

अंमली पदार्थांचा तुमच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि विशेषतः तुम्ही इतर औषधोपचार घेत असल्यास ते अधिक धोकादायक ठरू शकतात. तुम्हाला वेगवेगळ्या अंमली पदार्थांविषयी माहिती आणि मदत आमच्या वेबसाईटवर मिळू शकते.

स्व-औषधोपचार

काही लोक त्यांच्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्य समस्यांवर उपाय म्हणून दारू किंवा अंमली पदार्थांचा वापर करतात. याला कधी कधी ‘स्व-औषधोपचार’ असे म्हणतात. तुम्हाला हे अल्प कालावधीसाठी उपयुक्त वाटू शकते परंतु जसा अधिक काळ जाईल तसा तुम्हाला त्याचा अधिक त्रास होऊ लागेल. जर तुम्ही तुमच्या अवघड भावनांचा सामना करण्यासाठी अंमली पदार्थ किंवा दारूचा वापर करत असाल तर तुमच्या डॉक्टरांशी बोला.

पुरेशी झोप घ्या

चांगल्या झोपेच्या पद्धतीचे नियमितपणे पालन करा. सूचनांसाठी चांगली झोप यावरील आमची माहिती वाचा.

तुमचे औषधोपचार घ्या

तुमच्या डॉक्टरांशी चर्चा केल्याशिवाय तुमची औषधे घेणे थांबवू नका, डोस किती किंवा केव्हा घ्यायचा यामध्ये बदल करू नका किंवा इतर काही उपचार करून बघू नका. जर तुमच्या औषधांचे त्रासदायक दुष्परिणाम होत असतील तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.

तुमची आरोग्य तपासणी करून घेत जा

जर तुम्हाला काही विशेष शारीरिक किंवा मानसिक आरोग्य समस्या असतील किंवा तुम्ही काही विशेष औषधोपचार घेत असाल तर तुम्हाला तुमच्या नेहेमीच्या डॉक्टरांकडे किंवा तज्ञ डॉक्टरांकडे नियमित आरोग्य तपासणींसाठी बोलावले जाईल. त्यांच्याकडे तुम्ही नक्की जात राहा आणि शारीरिक किंवा मानसिक आरोग्यासंबंधित काही नवीन लक्षणे विकसित झाल्यास त्याबद्दल तुमच्या नेहेमीच्या डॉक्टरांना किंवा तज्ञ डॉक्टरांना सांगा. यामुळे तुमच्यावर उपचार करणाऱ्या लोकांना कोणत्याही समस्या जास्त बिकट होण्याआधीच लक्षात येण्यास मदत होईल.

मला दुसऱ्यांची मदत कशी करता येईल?

एखाद्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य खालावले असल्यास बरेचदा ते त्यांच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीय यांच्या आधी लक्षात येते. तुम्ही ओळखत असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत जर तुमच्या हे लक्षात आले तर:

  • हळूवारपणे त्यांना मदत घेण्यास प्रोत्साहित करा
  • मदत घेतल्यास त्यांना बरे वाटण्याची शक्यता आहे हे समजावून सांगा
  • मदत घेणे हे कमकुवतपणाचे लक्षण नाही हे समजावून सांगा.

त्यांना अधिक मदत करण्यासाठी तुम्ही करू शकाल अशा या काही गोष्टी आहेत:

  • त्यांच्या बरोबर वेळ घालवा - ज्यांच्या मानसिक आरोग्याची स्थिती खालावली आहे त्यांच्या बरोबर वेळ घालवल्यामुळे मदत होते. त्यांना कसे वाटते आहे हे सांगण्यासाठी आणि ज्या गोष्टी ते नियमितपणे करतात त्या करत राहण्यासाठी त्यांना हळूवारपणे प्रोत्साहित करा.
  • त्यांना आश्वासन द्या - वेळ आणि मदत यांच्या साहाय्याने त्यांचे मानसिक आरोग्य सुधारू शकते याचे त्यांना आश्वासन द्या. असे होईल यावर विश्वास ठेवणे त्यांना कठीण वाटू शकते.
  • आरोग्यदायी जीवनशैली ठेवण्यासाठी प्रोत्साहित करा - त्यांच्यावर अतिरिक्त दबाव न आणता त्यांना चांगले खाणे, चांगली झोप घेणे, अति मद्यपान टाळणे आणि त्यांची औषधे घेणे या गोष्टींसाठी प्रोत्साहित करा. हे करण्यासाठी त्यांच्यासाठी जेवण बनवून किंवा त्यांच्याबरोबर ज्यामध्ये दारूचा समावेश नाही अशी एखादी क्रिया करून तुम्ही त्यांना मदत करू शकता.
  • चांगले श्रोता बना - त्यांना त्यांच्या आजाराविषयी किंवा उपचारांविषयी काही काळजी किंवा प्रश्न असतील तर ते ऐकण्यासाठी तुम्ही उपस्थित आहात याची त्यांना जाणीव करून दिल्याने मदत होऊ शकेल.
  • चेतावणीच्या खुणांवर लक्ष ठेवा - त्यांना गंभीरपणे घ्या आणि त्यांच्या डॉक्टरांशी बोलण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा जर:
    • त्यांची परिस्थिती खालावत असल्यासारखी वाटत असेल
    • ते जगण्याची इच्छा नसल्याचे बोलू लागले असतील
    • स्वतःला दुखापत करून घेत असतील किंवा ते असे करणार असल्याचे त्यांनी सूचित केले असेल.

मी कोणाची तरी काळजी घेत आहे, माझ्यासाठी कोणती मदत उपलब्ध आहे?

जे शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही रितीने आजारी आहेत अशा व्यक्तीची काळजी घेणे हे खूप आव्हानात्मक काम असू शकते. तुम्ही स्वतःची काळजी घेणे आणि तुमच्या आरोग्याकडे आणि एकंदर स्वास्थ्याकडे लक्ष देणे हे सहजपणे विसरून जाऊ शकता.

जर तुम्ही एखाद्या व्यक्तीची काळजी घेत असाल तर तुमच्यासाठी आणि तुम्ही ज्यांची काळजी घेत आहेत त्या व्यक्तीसाठी कोणती मदत उपलब्ध आहे हे पाहण्यासाठी तुम्ही काळजी घेणाऱ्यांचे मूल्यांकन करून घेऊ शकता. यामुळे काळजी घेणाऱ्या व्यक्तीची भूमिका पार पाडण्यामध्ये तुम्हाला मदत होईल. हे मूल्यांकन करून घेण्याविषयी अधिक माहिती एनएचएस वेबसाईटवर मिळवा.

काळजी घेणाऱ्या व्यक्तींसाठी उपलब्ध मदत आणि सहकार्य याची अधिक माहिती तुम्हाला केअरर्स ट्रस्ट वेबसाईटइथे देखील मिळू शकेल.

आमच्याकडे मानसिक आजार असलेल्या व्यक्तीची काळजी घेण्यासाठी एक संसाधन आहे ज्यात पुढील गोष्टींविषयी माहिती आहे:

  • काळजी घेणारा असणे म्हणजे काय
  • रुग्णाचे आणि काळजी घेणार्‍याचे अधिकार
  • कोणाचे समर्थन कसे करावे
  • स्वतःची काळजी घेणे
  • काळजी घेणाऱ्यांसाठी उपलब्ध फायदे
  • आरोग्य आणि समाजसेवा करणारे व्यावसायिक काळजी घेणार्‍यांना आणि रुग्णांना कशाप्रकारे प्रभावीपणे मदत करु शकतात.

निदान न झालेला आजार किंवा वेदनेसह जगणे

काही लोक निदान न झालेल्या आजार किंवा वेदनेसह जगतात. याला ‘वैद्यकीयदृष्ट्या अस्पष्ट लक्षणे’, असेही म्हणतात आणि जेव्हा डॉक्टर एखाद्या व्यक्तीला होत असलेल्या लक्षणांचे शारीरिक कारण शोधू शकत नाहीत तेव्हा हे आढळून येते.

तसेच आजारपण किंवा वेदनांसह जगण्याची नेहमीची आव्हाने, तुमच्या समस्या कशामुळे उद्भवत आहेत हे माहित नसणे इतर कारणांसाठी कठीण असू शकते:

  • तुमच्या समस्या कशामुळे निर्माण होत आहेत हे माहीत नसणे भीतीदायक आणि तणावपूर्ण असू शकते, ज्यामुळे तुम्हाला अजूनच त्रास होऊ शकतो.
  • तुम्हाला उपचार मिळणे कठीण असू शकते.
  • निदान केल्याने तुम्ही जे अनुभवत आहात त्यास नाव देण्यास आणि इतरांना ते समजावून सांगण्यास मदत होऊ शकते. हे नसेल तर, काही लोकांना विश्वास मिळवण्यासाठी किंवा प्रमाणित वाटण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
  • तुम्ही कदाचित उपचार केले असतील ज्याचा उपयोग झाला नाही. हे अस्वस्थ करणारे असू शकते किंवा इतर शारीरिक आरोग्य समस्या निर्माण करू शकते.

या सर्व गोष्टी तुमच्या मानसिक आरोग्यासाठी वाईट असू शकतात, विशेषतः जर तुमच्या समस्यांचे दीर्घकाळ निदान होत नसेल.

तुम्ही किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीला वैद्यकीयदृष्ट्या अस्पष्ट लक्षणे जाणवत असतील, तरी सुद्धा मदत उपलब्ध आहे. यात हे समाविष्ट असू शकते:

वैद्यकीयदृष्ट्या अस्पष्ट लक्षणांसाठी उपचार आणि समर्थन याबद्दल अधिक माहिती कॉलेज वेबसाइटवरशोधा.

अधिक मदत

ज्या संस्था मदत करू शकतात

शारीरिक आजार असलेल्या लोकांना मदत करणाऱ्या वेगवेगळ्या अनेक धर्मादाय संस्था आणि संस्था आहेत. आम्ही त्या सर्वांची येथे यादी करू शकत नसलो तरी, आम्ही UK मधील सर्वसामान्य आजार असलेल्या लोकांना मदत करणाऱ्या धर्मादाय संस्थांची माहिती समाविष्ट केली आहे.

अधिक धर्मादाय संस्था शोधण्यासाठी द चॅरिटी कमिशन रजिस्टरवापरा.

दमा + फुफ्फुस UK

हेल्पलाइन: 0300 222 5800
WhatsApp

दमा + फुफ्फुस UK फुफ्फुसाच्या आजाराने जगणाऱ्या लोकांसाठी हेल्पलाइन, आरोग्य सल्ला आणि मदत गट देऊ करते.

आतड्याचा कर्करोग UK

आतड्याचा कर्करोग UK आतड्याच्या कर्करोगाने बाधित लोकांसाठी माहिती आणि मदत देते. यामध्ये निदान, आरोग्य सल्ला, मदत कार्यक्रम, ऑनलाइन समुदाय तसेच पुस्तिका आणि तथ्यपत्रके यांचा समावेश आहे.

आता स्तनाचा कर्करोग

हेल्पलाइन: 0808 800 6000

ईमेल: hello@breastcancernow.org किंवा त्यांचा परिचारिकेला विचारा फॉर्मवापरा

ब्रेस्ट कॅन्सर नाऊ स्तनाच्या कर्करोगाने बाधित लोकांना आधार आणि माहिती देते. यामध्ये एक विशेषज्ञ परिचारिका हेल्पलाइन, थेट सत्रे आणि कर्करोगावरील माहिती, एक मदत ॲप आणि एक ऑनलाइन मंच समाविष्ट आहे.

डायबेटीस UK

हेल्पलाइन: 0345 123 2399

ईमेल: helpline@diabetes.org.uk

मधुमेह UK मधुमेह असताना जगण्याच्या सर्व पैलूंवर तज्ञ माहिती आणि सल्ला देते.

ब्रिटिश हार्ट फाऊंडेशन

हेल्पलाइन: 0300 330 3311

ईमेल: hearthelpline@bhf.org.uk

ब्रिटिश हार्ट फाऊंडेशन हृदय आणि रक्ताभिसरण स्थिती, चाचण्या आणि उपचारांबद्दल माहिती प्रदान करते.

किडनी केअर UK

हेल्पलाइन: 01420 541 424

ईमेल: info@kidneycareuk.org

किडनी केअर UK ही रुग्ण अनुदान, सुट्टी अनुदान, समुपदेशन आणि मदत सेवा आणि बरेच काही देऊ करणारी एक मूत्रपिंड रुग्ण मदतकार्य करणारी धर्मादाय संस्था आहे.

ब्रिटिश लिव्हर ट्रस्ट

हेल्पलाइन: 0800 652 7330

ईमेल: helpline@britishlivertrust.org.uk 

ब्रिटिश लिव्हर ट्रस्ट यकृत रोग किंवा कर्करोग झाला असताना जगण्यासाठी परिचारिकेच्या-नेतृत्वाखालील हेल्पलाइन, मदत गट आणि व्यावहारिक मदत प्रदान करते.

पेन कन्सर्न

हेल्पलाइन: 0300 123 0789

ईमेल: help@painconcern.org.uk

पेन कन्सर्न वेदना सहन करणाऱ्या लोकांना मदत करते आणि हेल्पलाइन, मंच आणि स्वयं-व्यवस्थापन साधने प्रदान करते.

पार्किन्सन्स UK

हेल्पलाइन: 0808 800 0303.
पार्किन्सन्स UK पार्किन्सन्स रोग असलेल्या लोकांना आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांना आधार देते.

प्रोस्टेट कॅन्सर UK

हेल्पलाइन: 0800 074 8383

प्रोस्टेट कॅन्सर UK प्रोस्टेट कर्करोगाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी मदत आणि माहिती प्रदान करते, ज्यामध्ये एक विशेषज्ञ परिचारिका हेल्पलाइन, प्रकाशने, ऑनलाइन मदत आणि एकास एक मदत समाविष्ट आहे.

स्ट्रोक असोसिएशन

हेल्पलाइन: 0303 3033 100

ईमेल: helpline@stroke.org.uk

स्ट्रोक असोसिएशन स्ट्रोकने बाधित लोकांना हेल्पलाइन, मदत गट आणि ऑनलाइन समुदाय देऊ करते.

शाऊट
टेक्स्ट: 85258
शाऊट ही UK मध्ये राहणाऱ्या चिंताग्रस्त, नैराश्य, आत्महत्या किंवा दबलेल्या लोकांसाठी असलेली एक मोफत, गोपनीय मजकूर मदत सेवा आहे.

अधिक वाचन

  • द हॅपीनेस ट्रॅप, डॉ रस हॅरिस
  • बॉडी किप्स द स्कोअर; ब्रेन, माईंड अँड बॉडी इन द हीलिंग ऑफ ट्रॉमा, बेसेल व्हॅन डेर कोल्क
  • कदाचित आपण एखाद्याशी बोलले पाहिजे: कार्यपुस्तिका: अ टूलकिट फॉर एडिटींग युअर स्टोरी अँड चेंजिंग युअर लाईफ, लोरी गॉटलिएब

इतर संसाधने

  • मूड झोन: अनहेल्पफुल थिंकींग, NHS चॉईसेसचा भाग म्हणून डॉ ख्रिस विल्यम्स द्वारा ऑडिओ पॉडकास्ट.
  • स्टेइंग सेफ – या वेबसाइटचे उद्दिष्ट अशा लोकांना मदत करणे आहे जे भावनिक संघर्ष करत आहेत आणि ज्यांना आत्महत्या करावीशी वाटते आहे. यात व्हिडिओ आणि ‘सुरक्षितता योजना’ पत्रकाचा समावेश आहे.
  • Emotional distress in South Asian men with long term conditions - YouTube – हा व्हिडिओ आजार असलेल्या दक्षिण आशियाई पुरुषांसाठी आहे आणि कोणती मदत उपलब्ध आहे हे स्पष्ट करते.

श्रेय नामावली

ही माहिती Royal College of Psychiatrists यांच्या पब्लिक एंगेजमेंट एडिटोरियल बोर्ड (पीइइबी) ने तयार केली आहे. ही माहिती लेखनाच्या वेळी उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम माहितीवर आधारित आहे.

तज्ञ लेखक: डॉ संयुक्ता दास

विनंती केल्यास पूर्ण संदर्भ उपलब्ध होईल. 

© Royal College of Psychiatrists

This translation was produced by CLEAR Global (Jan 2025)